सन्माननीय वाचक

Friday, July 26, 2019

बैरोबाची जतरा...

#बैरोबाची_जतरा_कळंबई..
सकाळूच उठून हेरितो त काय,आय घरातला सारवून दार झाडाय लागली व्हती.दादा गोठ्यात म्हशींचा दूध कासांडीत काढीत व्हता.म्हतारीआय भानवशी पशी बसून पाणी तापईत व्हती.जरा येळ तसाच आथूरणाव पडून व्हतो,तेवढ्यात चावडीवल्या रेडीव मंदी "वंदे मातरम" चालू झाला.
तसाच डोळं चोळीत बाहेर आलो.त दोंचार बाया मोठोबाच्या दारात श्यानकाला देत व्हॉत्या. काकूंय व्हती तेच्यात,वजच तिला ईचारला इतक्या सकाळूच समदी लागबगीना कामा करीत्यात काय कारेक्रम ये का.त काकू हासाय लागली न म्हंगाली "आरं बा आज आपल्या बैरोबाची जत्राय"...
जसा का आईकला,तसा दोंचार उडीतच मोठोबाच्या दारातून आमच्या दारात.एक पाय उपांदऱ्यातचय त आय म्हंगाली गणपा तुवा बाप गुरा पाजीतोय तवर घेतो काय आंघूळ करुन. तसा डायरेक न्हाणीत.ओंन्मोशिवाय करीतच धाबारा तांब्यातच बादली रिकामी केेली.न्हाणीतून बाहेर आलेव,घडूशीव हंड्यापशी आयना नई कापडा यवस्थीत ठिवली व्हती.मस्त पैकीं मॅनिलासदरा,लँगा,टोपी ऐटबाज पॉशाक करुन हाताची बटनां लावाय म्हताऱ्याआयक.आय म्हनली भोयव बसू नको,पॉता घे तेचेव बस,कापडा मळवू नको,नैत तुई आय चांगली बदडईल.पितळच्या पितळीत गुळाचा चहा आयना दिला,फुरफूर करीत चारपाच दमात खपवला आन बाहेर डायरेक भैरोबाच्या देवळाक.
मांडव,मंडप बांधायची लागबाग,दूनदयाबुवाचा गाडा,गोपाळ्याची बैलगाडी,शिंगाडवाडीकुंन ३ गाड्या,नई कापडा घातलेली गावातली पोखतींलॉका,पॉरा,पकी गर्दी साळच्या म्होरं खाचरात जमा झाली.पाटील दादा म्हंगाला ढोललेजीम घेऊन खळ्याक चला रें डगळ आणाया.आम्ही बारकाली बैलगाडीत,मोठाली चालत निघाली. कॉना आंबेच,कॉना जांभळीच,कॉना उंबराच,कॉना निर्गिलीच,त कॉना लिंबाचं डगळ आणून गाड्या भरल्या. वाजत गाजत लेजिम खेळत बैरोबाच्या दारात सवासस्नींनी हळदीकुकू लावून,ववाळून मांडव डहाळ्याचा कारेक्रम झाला.कुकू लावूनच समदी घरी गेली,दारात गेलो त आय दारातच उभी राहून वाट हेरीत व्हती,मला ववाळुन पायेव पाणी घालून घरात घ्यातला.मला काही कळणाच,आय म्हंगाली गणपा तू देवाक ग्यालता,मांडव घातला,बारीकपॉर देवाचाच रूप असताय म्हणून.मंग काय ठयाप आमची,बसाय घोंगडी,ट्याकाय उशी,ऐटीतच काम,त्यात आमी नावकरी मंग काय...
माह्या उजया बाजूक दादा (महा बा) बसला,पलीकल्या बाजूला जतरला आल्याला महा मामा,म्याव्हना,बारखानल गडी लाईनवार पंगतीला बसलं.म्हताऱ्याआयच्या हातच्या पुरणाच्या पॉळ्या पक्या गॉड,सारभात-पोळ्या खाऊन आमी ज्यावान करीत व्हतो तवर मला वरल्या घराक बोलावना आला.आय म्हण बा जा नाना थांबलाय तुयासाटी दोंन घास खाऊन ये जा.
मी नानाचा बा नावकरी आलोय म्हणून परतेक येळी मान मिळायचा.
(अजूनही परंपरा चालू आहे...)
उलीसाक खाऊन उठलो आन वरल्या घराक गेलो.ज्यांवना झाली हात धिवल.तवर काकूूना ववाळायचा ताट क्याला व्हता.नानानी पुण्याकून नईन कापडा आणली व्हती.हळदकुकू लावून वरल्या घरातली म्हतारीआयसकाट,चुलतं,काकू,पॉरा समदी पाया पडली,मला जरा वंगाळ वाटला,पर नावकरी असल्यामुळं ऐकतच नव्हता कोणी.
परत सजलेल्या नवरदेवासारका नानाच्या हाताला धरुन घराक आलो.मंग नाना,मामा,दादा वटीव घोंगडी टाकून गप्पा माराय लागलं.तवर मी तेंच्या पशीच व्हतो.नानानी १०/-दादानी १०/-आन मामानी ८/-दिलेच आजुनय आठवताय. २८/-रुपये जमलं,बारखाणल्या भावांली,मेवण्याला घेऊन  देवळाक गेलो.देवाच्या पाया पडलो.तवर फुगंवाल,गाड्यावाल,पिपाण्यावाल,खुळखुळ,भुजारी येंची दुकाना लागली व्हती.पोरांली पिपाण्या घेतल्या,गारिगार खाया दिल्या,जतरत फिरलो.घरींयेस्तवर झावळा पडला व्हता.आय म्हणली आता थोडा येळ बसा,तोंडहातपाय धिवा,संदेकाळी भारुड बगाया जायेचेय.केवढा आनंद भारुड पाह्यचा म्हणलेव,ऐकल्यापसून दमच निघणा.कवा एकदाची रात व्हतेय,असा झाला व्हता.
(कलेचा नाद लागला तो तेव्हापासूनचं..)
परत समदी पावण्या,घरातली जेवली.आयला त घडोशीच्या खाली ठिवलेल्या मोठ्या टिपातून भांडेली पण पाणी काडून दिला.समदी कामा उरकलेव गोधड्या,चादरी,बुरंगूस घेऊन देवाम्होर चिचखाली जागा धरुन बसलो.पयला गावातला भजान झाला.राजवाडी,पोखरी,बेंढारवाडी,जांभोरी, मेघोली, काळवाडी, वचपे,कोलतावडा,येंची भजना झाली.बऱ्याच टायमना पालखी आली. द्यावळाभोतीना परदक्षिना करुन दयाव देवळात गेलं.त्याल माजना धुपारती झाली.मंग गावकरेंनी भारुडाचा नारळ फोडला.त्या साली पकी सात-आठ भारुडा आली व्हती.कोनालाय राग नको म्हणून समदी एका टायमाला चालू करायचा ठरला.खेळांत कोणाचा बागुलबुवा चालू,त कोणाचा राजा आल्याला,त कोणाची लढाय चाललेली,जाग आली तवा आमी मातर आयच्या डाया हाताव डॉका ठिवून झोपलो व्हतो..
क्रमशः
© गणपत रामचंद्र कोंढवळे,कळंबई..
