सन्माननीय वाचक

Saturday, October 26, 2019

दिवाळी गाणी (मोरी गाय ईली गेणुबा)

मोरी गाय ईली गेणुबा....

मोरी गाय ईली गेणुबा
मोरी गाय ईली।
मोरीला झालाय पाऱ्या गेणुबा
मोरीला झालाय पाऱ्या।।

पाऱ्याच्या गळयात गेठा गेणुबा
पाऱ्याच्या गळयात गेठा
गेठयाला मोडलाय काटा गेणुबा
गेठयाला मोडलाय काटा।।

काटया कुटयाच्या वनी गेणुबा
काटया कुटयाच्या वनी
गाई परसल्या पाणी गेणुबा
गाई परसल्या पाणी।।

पाणी पितोळो मासा गेणुबा
पाणी पितोळो मासा
गाई लागल्या देसा गेणुबा
गाई लागल्या देसा।।

देशादेशाचे येळू गेणुबा
देशादेशाचे येळू
गाईनी मांडले खेळू गेणुबा
गाईंनी मांडले खेळू।।

खेळू फुटतो पांडया गेणुबा
खेळू फुटतो पांडया
बैल डरतो नांदया गेणुबा
बैल डरतो नांदया।।

नांदया बैलाची येसन गेणुबा
नांदया बैलाची येसन
निळया घोडीवर बस गेणुबा
निळया घोडीवर बस।।

निळया घोडीचा रवा गेणुबा
निळया घोडीचा रवा
कोण्या शिळीचा पवा गेणुबा
कोण्या शिळीचा पवा।।

पव्या पाव्याच्या चिपळया
आम्ही रशीम गोंडयाच्या मावळया
पाभारीला चार नळया
मोघाडाला तीन नळया।।

हानील बुक्की फोडील चाडा
नरशा आला पिऊन गेला
लाथ बुक्की देऊन गेला
हंडुरले......💐




Friday, July 26, 2019

बैरोबाची जतरा...

#बैरोबाची_जतरा_कळंबई..
सकाळूच उठून हेरितो त काय,आय घरातला सारवून दार झाडाय लागली व्हती.दादा गोठ्यात म्हशींचा दूध कासांडीत काढीत व्हता.म्हतारीआय भानवशी पशी बसून पाणी तापईत व्हती.जरा येळ तसाच आथूरणाव पडून व्हतो,तेवढ्यात चावडीवल्या रेडीव मंदी "वंदे मातरम" चालू झाला.
तसाच डोळं चोळीत बाहेर आलो.त दोंचार बाया मोठोबाच्या दारात श्यानकाला देत व्हॉत्या. काकूंय व्हती तेच्यात,वजच तिला ईचारला इतक्या सकाळूच समदी लागबगीना कामा करीत्यात काय कारेक्रम ये का.त काकू हासाय लागली न म्हंगाली "आरं बा आज आपल्या बैरोबाची जत्राय"...
जसा का आईकला,तसा दोंचार उडीतच मोठोबाच्या दारातून आमच्या दारात.एक पाय उपांदऱ्यातचय त आय म्हंगाली गणपा तुवा बाप गुरा पाजीतोय तवर घेतो काय आंघूळ करुन. तसा डायरेक न्हाणीत.ओंन्मोशिवाय करीतच धाबारा तांब्यातच बादली रिकामी केेली.न्हाणीतून बाहेर आलेव,घडूशीव हंड्यापशी आयना नई कापडा यवस्थीत ठिवली व्हती.मस्त पैकीं मॅनिलासदरा,लँगा,टोपी ऐटबाज पॉशाक करुन हाताची बटनां लावाय म्हताऱ्याआयक.आय म्हनली भोयव बसू नको,पॉता घे तेचेव बस,कापडा मळवू नको,नैत तुई आय चांगली बदडईल.पितळच्या पितळीत गुळाचा चहा आयना दिला,फुरफूर करीत चारपाच दमात खपवला आन बाहेर डायरेक भैरोबाच्या देवळाक.
मांडव,मंडप बांधायची लागबाग,दूनदयाबुवाचा गाडा,गोपाळ्याची बैलगाडी,शिंगाडवाडीकुंन ३ गाड्या,नई कापडा घातलेली गावातली पोखतींलॉका,पॉरा,पकी गर्दी साळच्या म्होरं खाचरात जमा झाली.पाटील दादा म्हंगाला ढोललेजीम घेऊन खळ्याक चला रें डगळ आणाया.आम्ही बारकाली बैलगाडीत,मोठाली चालत निघाली. कॉना आंबेच,कॉना जांभळीच,कॉना उंबराच,कॉना निर्गिलीच,त कॉना लिंबाचं डगळ आणून गाड्या भरल्या. वाजत गाजत लेजिम खेळत बैरोबाच्या दारात सवासस्नींनी हळदीकुकू लावून,ववाळून मांडव डहाळ्याचा कारेक्रम झाला.कुकू लावूनच समदी घरी गेली,दारात गेलो त आय दारातच उभी राहून वाट हेरीत व्हती,मला ववाळुन पायेव पाणी घालून घरात घ्यातला.मला काही कळणाच,आय म्हंगाली गणपा तू देवाक ग्यालता,मांडव घातला,बारीकपॉर देवाचाच रूप असताय म्हणून.मंग काय ठयाप आमची,बसाय घोंगडी,ट्याकाय उशी,ऐटीतच काम,त्यात आमी नावकरी मंग काय...
माह्या उजया बाजूक दादा (महा बा) बसला,पलीकल्या बाजूला जतरला आल्याला महा मामा,म्याव्हना,बारखानल गडी लाईनवार पंगतीला बसलं.म्हताऱ्याआयच्या हातच्या पुरणाच्या पॉळ्या पक्या गॉड,सारभात-पोळ्या खाऊन आमी ज्यावान करीत व्हतो तवर मला वरल्या घराक बोलावना आला.आय म्हण बा जा नाना थांबलाय तुयासाटी दोंन घास खाऊन ये जा.
मी नानाचा बा नावकरी आलोय म्हणून परतेक येळी मान मिळायचा.
(अजूनही परंपरा चालू आहे...)
उलीसाक खाऊन उठलो आन वरल्या घराक गेलो.ज्यांवना झाली हात धिवल.तवर काकूूना ववाळायचा ताट क्याला व्हता.नानानी पुण्याकून नईन कापडा आणली व्हती.हळदकुकू लावून वरल्या घरातली म्हतारीआयसकाट,चुलतं,काकू,पॉरा समदी पाया पडली,मला जरा वंगाळ वाटला,पर नावकरी असल्यामुळं ऐकतच नव्हता कोणी.
परत सजलेल्या नवरदेवासारका नानाच्या हाताला धरुन घराक आलो.मंग नाना,मामा,दादा वटीव घोंगडी टाकून गप्पा माराय लागलं.तवर मी तेंच्या पशीच व्हतो.नानानी १०/-दादानी १०/-आन मामानी ८/-दिलेच आजुनय आठवताय. २८/-रुपये जमलं,बारखाणल्या भावांली,मेवण्याला घेऊन  देवळाक गेलो.देवाच्या पाया पडलो.तवर फुगंवाल,गाड्यावाल,पिपाण्यावाल,खुळखुळ,भुजारी येंची दुकाना लागली व्हती.पोरांली पिपाण्या घेतल्या,गारिगार खाया दिल्या,जतरत फिरलो.घरींयेस्तवर झावळा पडला व्हता.आय म्हणली आता थोडा येळ बसा,तोंडहातपाय धिवा,संदेकाळी भारुड बगाया जायेचेय.केवढा आनंद भारुड पाह्यचा म्हणलेव,ऐकल्यापसून दमच निघणा.कवा एकदाची रात व्हतेय,असा झाला व्हता.
(कलेचा नाद लागला तो तेव्हापासूनचं..)
परत समदी पावण्या,घरातली जेवली.आयला त घडोशीच्या खाली ठिवलेल्या मोठ्या टिपातून भांडेली पण पाणी काडून दिला.समदी कामा उरकलेव गोधड्या,चादरी,बुरंगूस घेऊन देवाम्होर चिचखाली जागा धरुन बसलो.पयला गावातला भजान झाला.राजवाडी,पोखरी,बेंढारवाडी,जांभोरी, मेघोली, काळवाडी, वचपे,कोलतावडा,येंची भजना झाली.बऱ्याच टायमना पालखी आली. द्यावळाभोतीना परदक्षिना करुन दयाव देवळात गेलं.त्याल माजना धुपारती झाली.मंग गावकरेंनी भारुडाचा नारळ फोडला.त्या साली पकी सात-आठ भारुडा आली व्हती.कोनालाय राग नको म्हणून समदी एका टायमाला चालू करायचा ठरला.खेळांत कोणाचा बागुलबुवा चालू,त कोणाचा राजा आल्याला,त कोणाची लढाय चाललेली,जाग आली तवा आमी मातर आयच्या डाया हाताव डॉका ठिवून झोपलो व्हतो..
क्रमशः
© गणपत रामचंद्र कोंढवळे,कळंबई..




Saturday, March 2, 2019

सादड्याचा डिग

डिग
        म्या साळात पैली दुस्रीला आसल निक्की नैय मना सांगता येत पर मना आठाव्वाताय आईतव्वाराची दिसवस व्हता मव्हा बा सकाळूच उठून कुराड आन् कॉयता निस्न्या जेव घसीत व्हता. म्या म्हण्ला बा काय कर्तोय र्र बा काइच नैय बोल्ला. म्या परत इच्चारला. त म्हण आर राबाया चालो. इखाना घसुन घेतो परत दिवस भर कट कट नैय. राबाया म्हजे काय? म्या म्हण्ला मी येऊ का ? त बा म्हण तु काय कामचा र बुव्वा? इडच रहे. आसा म्हणून बा गेला आडवात आडवय आम्च्या झापा जवळच व्हता. ठॉक... ठॉक... कडकडाट एैकाया आला आन् मी पळतच आंगणात पळत आलू पका मोठा सादडा तोडला व्हता मह्या बा ना मंग मला हेरला. हाक मारली पिंट्या ये पिंट्याव (तव्हर मना पिंट्याच म्हणायची सगळी ) मंग म्या ओ दिली आन् पळतच गोलूू वर त बा ना मना काय तरी खाया दिला त्या पका कडाक कडाक व्हाता. चावता चावणा बळाच चावला पका चिकाट व्हता. म्या बाला इचारला ह्या काय? बा म्हण डिगय ह्या. म्हन्ला ज्याम गॉड लागाताय. आजूक देव का बा म्हन्ला पर मला बोलता येईना ज्याम दाताला दात चिकटून बसल व्हत. मना बोलताच येत नव्ता. मंग वज वज बताळ्या हालइत रैलो मंग बोलाया लाग्लो मह्या बा ना मला पका टोपी भरून डिग काडुन दिला आन झापाक लाव्ला. मंग  आयला म्हन्ला आय आय ह्यार मना बा ना काय दिल्लाय. आय दाराक आली आन् काय र म्हन्तच व्हती त तेव्हड्यात लेगेच म्हन्ली आर त्या शिबल्यात ( जूनी पाटी किंवा टोपला) ओतुन ठिव आपलेली चैत्रीच्या जत्राला रेवड्या घीय्या म्या म्हन्ला रेवड्या कशा येतील ग आय डिगाव मंग म्हण ती राजूरची गंन्गी तेलीन आन् दिचा भाव गन्पा तेली येतुना जत्रांली रेवड्या घेऊन मंग तेंन्ली डिग आपू देव आन् रेवड्या घेव...
मंग परत दुपारा दुपारा भाकर खाऊन आय संगा गेलू आडवात परत पाक्का डिग गॉळा कॅला आन् पिपरीच्या जत्रात रेवड्या घेतल्या तंगसाची पिसई भरून आन्ल्या मोक्कार दिवस खाल्या बुव्वा आम्ह्या पकी चेंगळ झाल्ती आम्ची तवात मला कळाली निसर्गाची किंमत...

मुळनईतुन म्या सित्या, उर्फ दुंदा बांडे




Thursday, February 28, 2019

ऊरुस

*ऊरूस*
  सकाळच  आट नव वाजलं आसतील , मी आन सुप्याचा संत्या ऊंबराखाली बसलो व्हतो.  ऊंबरा पिकली व्हती. त्याना पाच सा आन म्या पाच ऊंबरा ग्वाळा केली. आन खायाला सुरवात क्यली.
   तुमाली काय सांगू ऊंबरा खाया किती मजा यतेय ती. म्या त ऊंबरामंदली पाखरा ऊडवयचो आन मंग खायचो. पण संत्या ऊंबार हातात घियाचा आन दोन्या हातानी फिरवयचा.  तो म्हणायचा" आरे रामा , आसा फिरावला का मंग तेच्यातुन त्याल निगाताय".
    तेवड्यात माह्या आयना हाक मारली " बा रामा आमी गायचोंडीव (  नदिचा ठिकान)कपड धिवाया निगालोय, पाटकन य." म्या घरी गेलो.
   आयना म्वाठा ब्वाचका बांदला व्हता कपड्यांचा. म्या आयला म्हणला " आय कह्याला यवडी कपडा घ्यतल्यात धिवाया." माही आय म्हंगाली " बा आपला आवफ्याचा ऊरूस हाये आज."
   आग बाबव मफल्याला पका आनंद झाला. आमी कपडा धिवाया गायचोंडीव ग्यलो.  कपड म्हणजी माह्या बापाचा आन भावांचा एकेक डिरेस आन माही फाटलेली चडी आन बंडी. माह्या बापाना सरळगाव च्या बाजारातुन लिलावाची बंडी आणली व्हती. लिलावाची म्हणजी जुन्यातली बरा का.
 हा त आम्या पटापट कपडा धिवली आन वाळावली.  आन मंग परत ब्वाचका बांधून  घरी आलो.
  सांच्या पाराला माह्या आयना हारबरेची डाळ घातली पोळ्या कराया. मी कह्याला घरात थांबतोय. पळालो बनाक.  तितच आमचा ऊरुस भराताय.
    पार नव धा वाजता पोखरीचा भारोड सुरु झाला. तसी आम्या पुडच जागा धरली व्हती. पक गमत्या केल्या दोरपाळानी. मफल्याला लय हासाय लागाताय. म्या हासायचो त समदी ल्वाका मफल्याकच पाहेची, भारोड पाह्याचा सोडुन. मफल्याला आजुन सवय हाये पका हासयची.  आसा म्हणीत्यात का पका हासला का बरा आसाताय.  त्या जावद्या, भारोड खपाया आन उजाडाया यकच टाईम झाला.
   म्या घरी ग्यलो पटापट आंघुळ क्यली. आन काल धिवलेली कपडा घातली.
म्या माह्या आयक पायला. मला वाटला आय मफल्याला आटआणे तरी देईल. माह्या आयला समाजला माहा प्वार पयशासाटी थांबलाय.  पन माह्या आयक काईच नवता त काय देयील.  माह्या  आयच्या डोळ्यात पाणी आला. मफल्याला काय समजायचा त्या समाजलो.  म्या आपली तशीच काळआंब्याकुन ऊडी मारली आन हाजेरीचा भारोड पाह्या गेलो.
   म्या भारोड पाह्यत व्हतो. यक नदार बाजुला टाकली, प्वारा रेवड्या ईकात घ्यत व्हती . काही प्वारा लाडु घ्यत व्हती. मला वाटला जावा पन लगेच आठावला आपल्याक पयस नाय. माह्या आयचा चेहरा आठवला आन माह्या डोळ्यात पाणी आला. म्या डाया हाताना डोळ पुसलं आन हजेरीच्या भारोडाक पायला. भारोडात परधानजी म्हणत व्हता" काईच कायमस्वरुपी नसताय,  आपली संकाटासुदा." मनाला धिर आला. म्या परत त्या खावाच्या दुकानाक पायलाच नाय
   आवफ्याचा
रामा लोखांडा



Saturday, February 23, 2019

*वलट*
  माह्याचा मयना खपला व्हता, शिमग्याचा मयना आल्ता. शिमगेच पाच दिवस मोडा व्हता. मोडा म्हणजी तुमाक जसी सुटी आसते तसी सुटी.
    आमाली पोरानली काय मोडा न फोडा.
आमाली समद दिवस सारखच.  सकाळी उटायचा आन कोणाच्या तरी दारात जाउन ख्याळायचा.
   आज मातर महा भाव लवकरच उटला.  यक दगड घ्यतला आन तेचेव कोयता घासाय लागला. म्या म्हणला " कयाला कोयता अन फरशी घासितोय?."
तो म्हंगाला " आता चार पाच दिस मोडा हाये, आपुन समदी फाटेच भारं आणाया जायाचा."
    मी बारीक व्हतो पन महा भाव मफल्याला घ्यतल्याशिवाय कुणीक जात नसं. भले म्या कमी काम क्याला तरी.
    माह्या भावाना आकडी घ्यतली,त्यात घासलेला कोयता टाकला.  माह्या आयना मफल्याला चुंबळिला यक फाटका टाईल घ्यातला. माह्या बापाना फरशी(छोटी कुर्हाड) घ्यतली. आम्या कवाड पुड क्याला,अन निगालो.
    माडखासला(जंगलाचे नाव) आमी गेलो. याक मळयाचा ( झाडाचा नाव) झाड पडला व्हता. मंग लगेच माह्या बापाना फरशीना हिलक कराया घ्यतलं.  माह्या भावाने आकडीतुन कोयता काडला. आन फाट्या तोडाया सुरवात क्यली.  आमी आदिवासी ओली फाट्या कदिच तोडती नाय. रान आमचा देव हाये
    मग पटापट भार बांधलं. भार बांधाया रानातुनच वाक आणलं. तवर दिवस डोकेव आल्ता. ऊन म्हणतो मी. आमाकल्या कोणाच्याच पायात वहाना नवत्या. वहाना आणाया यवड पयस कुणीकुण आणयच. वहाना नवत्या पन तसा माह्या पायेनी मफल्याला कंदिच सांगितला नाय. माह्या पायेनली माही परिस्थिती माईत व्हती,म्हणुन कदिच पायाना कुरकुर क्यली नाय.
     मंग आमी भर ऊनात आमी भार घेऊन घरी पोचलो. आमची वलट आमच्या दारापुडच व्हती. लोकानपेकशा आमची वलट कमी व्हती. जनाबायची आन चंद्र्या मामाची वलट मोटी व्हती.
    माहा भारा बारीक व्हता. म्हणुन तो लगेच चुलीला लावाया आणला. थ्वडा आमी बसलो.
   माह्या आयना पानेची कळशी बायेर आणलि. यक सांगु, काम क्यलेव, दमलेव पाणी यावडा ग्वाड लागाताय का सांगु नका......
      आवफ्याचा
       रामा लोखांडा