सन्माननीय वाचक

Friday, November 16, 2018

दिन दिन दिवाळी




Tuesday, November 13, 2018

दिवाळीच गाण... गाय येली मोरी

आठवतंय का ?

दिन दिन दिवाळी, गाया म्हशी ओवाळी
गाया म्हशी कोणाच्या ,लक्षुमणाच्या..
लक्षुमण कोणाचा, आईबापाचा,
आईबाप कोणाचे, लक्षुमणाचे...
गाय पाच चवरं, बैल नवरं...
बैल कुणाचं, कृष्णदेवाचं...
कृष्णदेवाला गुण गुण डोळं..
अंबाला सव्वा डोळं..
हर हर महादेव्,
चिन्तमण मोरया
भैरोबाचं चांग भलं.
अंबिकेचं उदं उदं..

गाय येली मोरी गेनुबा, गाय येली मोरी..
मोरीला झालाय गोर्‍हा गेनुबा, मोरीला झालाय गोर्‍हा...
गोर्‍ह्याच्या गळ्यात गेठा गेनुबा, गोर्‍ह्याच्या गळ्यात गेठा..
गेठ्याला मोडलाय काटा गेनुबा, गेठ्याला मोडलाय काटा....
काट्याकुट्याचा येळु गेनुबा,काट्याकुट्याचा येळु ...
गाया लागल्या खेळु गेनुबा,गाया लागल्या खेळु....
खेळ फुटतो फांद्या गेनुबा,खेळ फुटतो फांद्या....
बैल डुरकतो नांद्या गेनुबा,बैल डुरकतो नांद्या...
नांद्या बैलाची वेसण गेनुबा,नांद्या बैलाची वेसण ...
निळ्या घोडीवर बसंन गेनुबा,निळ्या घोडीवर बसंन...
निळ्या घोडीचा खरारा गेनुबा,निळ्या घोडीचा खरारा....
वाघ मारतो भरारा गेनुबा,वाघ मारतो भरारा ....
भर्‍याभर्‍याच्या ज्योती गेनुबा,भर्‍याभर्‍याच्या ज्योती....
गाईच्या कल्पना किती गेनुबा,गाईच्या कल्पना किती .....
गाईच्या कल्पना ईस गेनुबा, गाईच्या कल्पना ईस .....
ईसाच्या घेतली घोंगडी गेनुबा,ईसाच्या घेतली घोंगडी.....
घोंगडीची दशी गेनुबा,घोंगडीची दशी.....
गाया वेशीपाशी गेनुबा,गाया वेशीपाशी.....
घोंगडीचा दोरा गेनुबा,घोंगडीचा दोरा.....
गाया आल्या घरा गेनुबा,गाया आल्या घरा....

संग्राहक .. गणेश मैड सर ( पिवर. डांगाणी )




Tuesday, November 6, 2018

मह्यावाली पारध

पारध

मी दाव्हीची परीक्षा दिली व्होती आन् बिगीनाच सुट्या लागल्या साळत्ली गन्मानी मास्तरांक दिल्या जामा करूण आन् निघालू ज्याचत्याच्या  गावाच्या वाटाना जाता जाता रातच झाली व्होती. धरल्या मुक्काम गाड्या....
   मह्या झापाच्या (घराच्या) जळच येत व्हतु  त तेव्हढ्या कह्याचातरी खरबाडल्या वाणी आवाज आला. म्या त बॅहलूच व्हतु पर तीतक्या आमच्याच जवळ माळाव राहणारा एक मामा आला आन् म्हण कोणयर जवळ आला आन् म्हण सिताजी तुम्हीयत काय.. म्हन्ला हा तुह्या मुळ शिक्कार गेली ना..
म्या  म्हन्ला कयची आर मी बगेव बसलो  व्हतु पर तु अला तिकुन चौताळत गेली शिकमकार... मला म्हण लाग्ल्या का सुट्या म्हन्ला हा ऊंद्याक चल परधीव जाव म्या लगेचच हा म्हन्लु  आन गेलू घरी...
सकाळुच झावळ्याच तो मामा उठुन शिक्कारीच माग हेरीत हेरीत आला बुव्वा आमच्या झापाव
आन् मला म्हण लवकर भाकर खाऊन तयेरीत रहे आम्ही आलोच... आर्ध्या तासात आली बुव्वा पकीलैय जना  वाघुर, करंड्या, डंडे, हाडब, काठ्या घेउनच आली व्होती.. म्याय मह्या "बा" ला इचारला "बा" मी जाव का पारधीव बा म्हन्ला तुला काय जमाताय त्या पारधीचा काम लैय वंगाळ काट्या-कुट्यातुन हिडाया लागाताय. नैय बा म्या जाइलच म्हनलु आन् गेलू त्यांच्या संगा जाळीच्या देवाच्या पाया पडुलन म्होठ्या आडवाला घातल्या वाघुरी दोघजन ठुवल  वाघुरीव बाकीच आम्ही पार मांग गेलू आन पैल्यांदा लाईन लाऊन घेत्ली मला मंधी ठुवला. केली खोडायला सुर्वात
टनटन्या बारीक सारीक झुरमुंडा गुडग्या एवढ्याल्या गवतातुन हा. हो. व्हा करीत करीत मोहर मोहर चलत रैलो वरून दोन नंबर गड्याच्या पाथाव   उठली शिक्कार व्हा.. हा  व्हा...हा व्हा....हा आसा करीत करीत व्हती पर मला काय उम्जना.?
तितक्यात मह्याच मोहर आली शिक्कार तव्हा मला म्हन आर दटाव आन पळ त्याच्या मांग शेपाट त्याला मंग काय म्याय ज्याम व्हा... व्हा... व्हा करीत मर म्हणून पळालू डारीक वाघुरीत नेऊन पाडला वाघुरीवाल दोन गडी आल आन मोडला जागेवच...
     नेला नदिव खडकाव केल वाट वाघुरीचा वाटा काढला दोन कुत्र्यांचा एक वाटा काढला मंग आमच पारध्यांच वाट कढला  पार झावळा पडला व्हता गेलू तसाच झापाक आन दिली सगोती आयना नदिकुन खराट्याच्या हिरय्या काड्या आनुन चूल्हीच्या डहारात भुजून मिर्चीमसाला वाटला मंग बाज्रीचा रोम आन तांदळाची कणी करून जोरात कोरड्यास केला व्हाता त्याची चव आजही मला सारखीच आठवण करूण देतीय आशिझाली मह्या जिवनात्ली शिकारीची सुरवात
धन्यवाद
म्या अर्जूना बांड्याचा दुंद्या उर्फ (सित्या) मो. 9881141685




याटाळणी

याटाळणी

   आज आम्हाकला आकराईचा लास्टचा पेपर व्हता. सामाय परीक्षा एवडी महत्वाची नवती.  आमाली पेपरची नाय घरची ओड लागली व्हती. म्या उजाडायाच गोहेच्या ओढेव टाईल घेउन गेलो.
     पका गारठा व्हता. गारठेचच दिवस व्हत. पाटकन जाउन कडुलिंबाची काडी आणली. पटापट दात घासलं.  दसर्या वडकर आगुदरच पाण्यात उडाल्ता. 
म्या ईचारला" पाणि गार ये कारे?". तो म्हंगाला नाय.
   तसा पायला त आमाली समद्या आदिवासी पोरांनली एवढुसा आसल्या पसुन गार पाणेची आन पोहेची सवय. मास जेवढ येळ पाण्यात नसतील तेवढी यळ आमची प्वारा पाण्यात आसत्यात.
   हा त म्या पाण्यात हात घातला. मंग ती ब्वाटा कानात घातली. अन धापकान उडी मारली. तवर समदी प्वारा आलती.  मी शेलन मारीत दसर्याला शिवाया गेलो.  दसर्या कुतार पोहन्याना पुढ पळाला. आमाकला शिवाशिवीचा ख्येळ पका टाईम चालला.
   गारठा आमची जिद्द पाहुन लाजला आसल.
    पटापट आवरुन आमी आसरम मधी आलो. जेवयच बेल झाली.( आश्रम शाळेतील जीवन यावर नंतर लिहायचा विचार करतोय).
हा त पटापट कामाठेनी वाडला आमी पटापट जेवलो. आमाली घाय होती पण पेपरची नाय घरी जायेची. जेऊन झालेव म्या पेटी उघडली.  माही थिगाळ लावलेली पिशई काढली. एक प्यांट आन एक बंडी तेच्यात भरली. माह्याक द्वान प्यांडी अन द्वान बंड्या व्हत्या. आम्या सरळगावावरुन लिलावाची आनली व्हती. तवा प्यांड पाच का सहा रुपये अन बंडी चार का पाच रुपयाला व्हती.
    हा त म्या कापडा भरली. तेवड्यात पेपरची बेल झाली.  माह्याक पेन नवता. एक नळी व्हती. आमच्या सरानी पेपर दिला. यकय प्रश्न ओळखीचा नवता. कय तरी मुंबई ची राजधानी कोणति अन दिलीचा देश कोणता. असा कायतरी आल्ता. म्या हा रपाटा लावला. पार पेपर खपावला.  पोरानली वाटला मि हुशार का काय. कारण म्या यक पुरवणी घेतली व्हती. मफल्याला एकच प्रश्न आवाडला. नदीचे कार्य लिहा. म्या समद कार्य लिवलं.  पार आमच्या गावातल्या लग्नाकार्याचा पण लिवला.  कारण आसाण्याला असताना पवार सरांनी सांगितलेला व्हता पुर्ण पेपर सोडवा.  कसातरी पांढर्याचा काळा करुन नीघालो.
     चार वाजता यसटी आली. आमी डिंब्यात चढलो. माह्याक तिकाटापुरती पैस व्हतं. सात वाजता घरी पोचलो. माह्या आयना पका भारि ज्यावान केल्ता.  नाचणेची भाकर अन कांद्याचा  कालवान. माहा रामा याणार म्हणुन आयना भागाबायच्या इकडुन कांद आणलं व्हतं. जेऊन घोंगडी टाकून झोपलो त सकाळीच उठलो.
   बायेर लगबाग चालली व्हती. हा ईळा लावलाय तो नाय असा चालला व्हता. 
मफल्याला ईलायती ईळा दिला. त्याना हात नाय कापत असा म्हणत्यात.  मंग आम्या वाघमाळातली जीर कापाय घेतली. मला यावढा पटापट नवता जमत. पण दुसरी माणसा पटापट कापीत व्हता. कापुन चांगल्या आळाशा घालित व्हती. मफल्या आळाशा कशापण असयच्या पण कोणीच मफल्याला नाय बोलला.
     दहा वाजलं असतील.  दांबाडशेग्यातुन  द्वान पोरी याताना दिसल्या. जवळ आल्याव कळला तीच पोर हाये. म्या पटापट कापाया सुरवात केली. तीला वाटावा रामा लय काम करतोय. पण मजेची गोट म्हणजे ती आमच्या खाचरापशी आलि अन माह्या आयला म्हंगाली, " सुंदरेआते माह्या बापाना आज तुमच्याक म्वालाना पाठावलाय."
  माहा आनंद गगनात मावत नवता. मी आपला यक चुड कापयचो अन तिच्याक पायचो. परत यक चुड कापयचो अन तिच्याक पायचो. असा करता करता समदा खाचार कापुन झाला...........
     
 आवफ्याचा
            रामा लोखांडा



Monday, November 5, 2018

हापसी

हापसी

भायेर पका ऊन व्हता. मी आपला बारीक जातेव नाचण्या दळीत व्हतो. तसा पायला त दळणा पोरीचा काम. पण आमच्या घरात आमी तीघ भाव. आमाली बईन नाय.
  मंग आय मला दळायला सांगयची अन महा मोठा भाव सोपन्याला कांडाया सांगायचि.  तेच्या मोठा भाव दिन्या तो आय बापाबरोबर बायेरच्या कामाला जायचा. फाट्या बिट्या आणाया.
        हा त त्या दिसी मी दळीत व्हतो.  अन तेवढ्यात शंकरची नंदा पाणी प्या आली. तिना पायला अन म्हंगाली, " रामा काका तु दळीतोय काय मला वाटला सुंदरीआजी दळीतेय का काय?".
तीना तिच्याबरोबर आलेल्या बायेनला सांगितला का बग पोरगा असुन दळीतोय.
    खर बोलायचा त शीरी-पुरुष समानता आमाकल्या आदिवासी भागातच हाये. समदी कामा समदेनी करयची. 
      सांच्यापहाराला आय आली . फाट्याचा भारा टाकला. मंग थोड्या बाता केल्या. बायेर ठेवलेला पाण्याचा हांडा पार खपला व्हता. पकी ल्वाका रानातुन आलेव आमच्याइथ पाणी प्या यची.
पाणी देणं पुण्याचं काम हाये असा माहा बाप सांगायचा.
   दिवस बुडाया आल्ता. आय म्हंगाली "दिन्या चल आपन याक ख्याप पानेचि आणू. बा रामा तु पण चल."
     आमाली पाणी मदल्यावाडीच्या हापसीव मिळायचा. खर पायला त त्या हापसीव गेटाचीवाडि, मधलीवाडी, जळकीवाडी आन आमी पान्याला जायाचू.  दिवसभर नंबर लावाया लागायचं. तवा कुट द्यान हांड मिळयच.
कंधि कंधि पकी भांडणा व्हयेची नंबरावरून.
    हा त मि आय आमी हाडं अन चुंबळी घेऊन निगालो. मधी रम्या सरपंच दिसला तो मफल्याला " ये राम तु कह्याला पाण्याला चाललाय, तु बारावी साईन्सला शिकतोय अन तु पाणी वाह्या लागला त आमच्या बायका आमाली पाण्याला नाय का पिटावणार."
  सरपंच माहा मेव्हणा लागत व्हता म्हणून मफल्याला चिडवित व्हता.  तसा मफला स्वभाव काॅमेडी आसल्या मुळ लय ल्वाका मफल्याला चिडवयची. मंग मी पण चिडवयचो.  पण या स्वबावामुळ मफल्याला कंधिच टेंशन नाय यत जीवनात.
    आसाच पुड चाललो व्हतो, मागुन आवाज आला" सुंदरे आते थांब मफल्याला यवदे पाण्याला".
 म्या माग वळुन पायला त ती पोर व्हती. आग बाबव पक्या आनंदाच्या उचमळ्या आल्या. मफल्याला स्मित हासाय आलि.  अंगात येगळीच हालचाल झाली. मी मुदाम माग माग राह्या लागलो.
    आमी हापसीव पोचलो . तिथ नंबर व्हतं.  मी बरोबर तीच्या समोर निरगुडी खाली बसलो. लय मोठा निरगुडीचा वंद व्हता.  मी तिच्याक पायचो.  तिना पायला का दुसरीक कुणीकतरि पायचो.
    तेवढ्यात आमचा नंबर आला. माही आय म्हंगाली बा रामा थ्वाडा हापस बर. मी हापसाया गेलो. एक नदार हापसीव अन नदार तीचेव. 
   तेवढ्यात याक आकरीत घडला. ती म्हंगाली " आते मी रामाला हापसु लागते".
 अग बाबव मफलं ह्रदय पका जोरात चालाय लागला. ती आली आन मफल्या हातापशी हात धरून हापसाया लागली. माह्या आयला ईशेश काय नाय वाटला.  पन मफल हात पाय टणटणा उडत व्हतं.
     कंधि हांडं भरलं, कंधि आमी नीगालो कळलाच नाय. आज माह्याक हांडेनची दुडि व्हती पण त्या वजान पावशेर हाये आसा वाटत व्हता. आज मफलं पाय तुरुतुरु चालत व्हतं.  माहा घर आला तवा मी भानावर आलो.......



Sunday, November 4, 2018

वाघबारस

पिपारगणेची वाघबारस
 
   सांच्यापहारचे चार पाच वाजलं असतील.  दिवस बुडाया आल्ता.  मी गुरा घेवुन घरी आल्तो.  तवा म्या पघितला.  माही आयबापा नईन कापडा घालुन. कुणीकतरी निघालती.  म्या ईचारला,"तुमी कुणीक चाल्यात".
 आय म्ण्हगाली " पिपारगण्याला बारशीला,  उद्या बारस हाये, आज आमी जागरणाला, अन भजनाला चाललोय".
  म्या ईचारला " म्या यव".
आय म्हंगाली" ऊंद्या ये वाराला "
   असा म्हणून माही आयबापा गेली. मी जावा का नाय जावा या ईचारात व्हतो.
 तेवढ्यात संत्या आला आन म्हंगाला " ये रामा , ती पोरगी येणारेय"
 अग बाबव , ती येणारेय म्हणल्यावर मफल्याला जायाच पायजे.
  ती म्हणजे ती पोरगी🙈🙈🙈🙈.  मफल्याला लय आवडायची. तीला मी आवडायचो का नाय माईत नाय. पण कुट वाटला भेटली आन अन माह्याक पाह्यला का. आग बाबव,  त्वांड महा लाजना पार लाल व्हयाचा. माही गुरा मी मुदाम तिच्या शेरड्याच्या जवळ नियचो. 
  अन ऊगाच काही ईचारयचो," केवढ किरव धरल, अमुक तमुक ". ती पन सांगयची.  मफल्याला वाटला ती माह्याव मरतेय.
      म्हणून म्या बारशीला जायाचा ठरावला.
   दुसर्या दिसी उजाडायाच मी उठलो. आमच्या पितळच्या तांब्यात इंगळ भरल अन कडाक ईस्तारि केली. मंग मी ,संत्या, नाम्या, संजिप, अन अजुन पकी प्वारा निगालो. 
   आयना काल जाताना पाच रुपये दिल्त ते चोर खिशात ठीव्ल. अन गवारटेर्याकुन दांडादांडाना आमी वाघयाला पोचलो.
    मंग हातईचकुन काठी आली. पक्या बायेंच देव आल्त. 
    कोंढवळची पण काठी आली. आमी पाया पडलो. अन समद्या खावांच्या दुकानासमोरुन फिरलो. पाच रुपयात काईच नवता येत. मंग म्या निसता खावाचा वास घ्यातला माहा प्वाट भरला.
      त्या पोरीला चईन घ्यावा म्हणला पण चईन धा रुपयाला. मंग मी भराडेच्या दुकानापसुनही पळालो.
     संध्याकाळी कुस्त्या पायल्या.  मी ख्याळणार व्हतो पण म्या लईच काडी पईलवान.  मफल्याला कोणीय बुदक्यान आपटील.  मंग मी मागच ऊभा रायलो. 
    सकाळी गेलो तवा आन याताना वाघयेच्या पाया पडलो.
  लोकांची पोरा भराड्याकडच्या शिट्या वाजईत नीगाली, म्या आपला फक्त त्यांचा आवाज आयकत आन चोरखिशातल पाच रुपये चाचपत घरी आलो.......
        रामा लोखांडा
                      आवफा



Saturday, November 3, 2018

डोंगरातला भैरोबा

डोंगरातला भैरोबा
मी वाघमाळाला रह्यतोय. गाव आमाकल्या घरापसुन लांब हाये. मफल्याला पिचेरची पकी आवड. तवा टिवी मदल्यावाडीत व्हती. पिचेर आट वाजता चालू व्हयाचा आन आन आकराला खपायचा.  मी आपला माग जावुन बसयचो.  ल्वका लावतील त्या पाह्यचो.
     त्यावढा पिचेर खपला का मी रातशीच निघयचो.  दांबाडशेग्यातुन यवस्थित जायचो. मी भुतानली लय भियेचो.  मंग भैरोबा भैरोबा म्हणीत आंधारात उड्या मारीत गेलो. हळूच कवाड उघडुन घरात जाऊन झोपलो.
      सकाळी ऊजेडायच्या आगुदर मफल्याला जाग आली. माहा आंग थ्वाडा तापला व्हता.  माह्या आयना माह्या बापाला सांगितला. महा बाप लगेच डोंगरात ग्याला खेतोबाक. गार्हाना लावला.  अन येताना सादडेच्या पानात आंगारा आणला. माह्यावरुन ऊतारला.  मला आंगारा लावला अन सुर्याच्या बाजुला फुकला.  सांच्यापाहारापरयन्त मला थ्वाडा बरा वाटाया लागला.
  सकारात्मक ईचार का भैरोबाचा गूण पण मी बरा झालो.
बा भैरोबा समद्यनली सुखाचा ठिव.



Wednesday, August 8, 2018

दिवाळी गाणी (काळया वावरी बेलाचं झाड)

काळ्या वावरी बेलाचं झाड रं
काळ्या वावरी बेलाचं झाड

त्याचवर बसला सोंग्या मोर रं
त्याचवर बसला सोंग्या मोर

सोंग्या मोराचं लांब लांब पख रं
सोंग्या मोराचं लांब लांब पख

एक पख आखाडीला रं एक पख पखाडीला
एक पख आखाडीला रं एक पख पखाडीला

त्याला लावलाय गंभीरा नाडा रं
त्याला लावलाय गंभीरा नाडा

गंभीरा नाडाला पडला येडा रं
गंभीरा नाडाला पडला येडा

आमच्या गावाचा नाम्या येडा रं
आमच्या गावाचा नाम्या येडा

पाण्या पावसाची हाकीतो गाडा रं
पाण्या पावसाची हाकीतो गाडा

गाडा पळं गाडवाटाणं अनं नाम्या पळं आडवाटाणं
गाडा पळं गाडवाटाणं अनं नाम्या पळं आडवाटाणं




Saturday, August 4, 2018

हुकडी

हुकडी हा आपला आदिवासी पदारथ नसंल बरका. भुक लागली का प्वाॅटाची भुक मिटवाया लय भारी.यच्या 4/5 वड्या खाल्याका पक्का तांब्याभर पाणी पॅताय माणूस.मला वाटाताय याचा जल्म यखांद्या होस्टेलुत झाला असंल.कारण पूरबी होस्टेलुला तिन चपात्या अन वाटीभरच भात मिळायचा .लहानमोठ्याला समदेली सारखाच .म्हणून आपल्याच प्वाॅरांनी सोदून काढलेला पदारथ म्हंजी हुकडी.ह्या पदारथाची सुरूवात राजूर होस्टेलात झाली असा म्हणत्यात.मंग तिढून समदीकडं परसीदं.आमी होस्टुलात होतो तवाचा काळय भौ.अजुन ध्यान येताय .लय सादा , कमी टायमात , कमी पैशात तयार होणारा .आमाली तवा तॅल , साबाण , कटींगला महिन्याला 25 रू.मिळायचं .तवा आमी लय खुश व्हयचो.मंग आमी रातच्याला अभ्यास बिभ्यास करून झालेव 7/8 प्वाॅरा मिळून परत्येकानं 1रू 2रू वरगात काढायचू .अन त्या पैशाचा गुळ अन शेंगदाणे आणायचू .अन त्याला गव्हाचा पीट लागायचा ,तॅल लागायचा .मग ह्या समदा होस्टेलच्या सैपाकघरातुन आणायचा.ह्या समदा आणल्यावर वह्यांची रद्दी रहेचीच अमाच्याकं .मंग काय तिन दगडा मांडलेली रहेची .आमच्याकं टोप रह्याचाच .मंग आमी गप्पा मारत मारत कागद चॅटवायचू .टोप चूलीवर ठिवायचा .अन तॅल टाकून त्यात शेंगदानं टाकायचू.मंग तॅल त्यात गुळ टाकायचू .गुळाचा पाक व्हाॅयचा मंग थोडं थोडं त्यात पीट टाकयचू .जराश्याना झाली हुकडी तयार .तवर काही प्वाॅरा ताटाला तॅल लावायचू एक जण तांब्या किंवा गलास घेऊन सावद रह्याचा .मंग ह्या समदा माल ताटात उभरायचा अन मंग गलासाना सपाट करायचा .मंग त्येच्या बारीक बारीक वड्या करायच्या .याचा सुगंद तवर समदीकं जायाचा .मंग काई प्वाॅरा टपेलच रहेची .तयार झाली का लगीच हल्ला करायची.काई आंदीच दारा खिडक्या लावून घ्यायची .मंग समदी खाया बसायची .परत्येकाला 4/5 वड्या वाट्याला ययच्या पर समद्यांचा प्वाॅट भरायचा .लय आनंदाना खायचू भौ.मंग असा हा पदारथ करून आमी खायचू .म्हंजी यक परकारची शेंगदाण्याची चिक्कीच बरका.ह्या पदारथ खाऊन आज लय मोठमोठी लाॅका झाल्यात.त्यात कमिशनर ,डाक्टर मास्तर पोलीस अस्या हुद्यावं गेल्यात प्वाॅरा .तर काही शास्त्रज्ञ आपल्या राहुलदा सारखं.असा हा पदारथ .म्या अजूनही ध्यान आलेव करतोय बरका .पर भूकाला लय खास .पाणी लय पॅताय...
लेखक-मनोहर लांघी



Thursday, August 2, 2018

हाक गावाची

उंच डोंगरावरूनी, चांदाचा झुलतो झुला
आन चांदण्या जणूका, रानी पांगवली फुला

दूर हींडतो मज्याना, वारा म्वाकळं पाखरू
कोण थोपयील त्याला, आभाळच समदा खुला

आंगणात सांडयीते, रोजीला पिवळा सडा
पेटवून क्वोन ग्येला, आभाळी त्या ईस्तुला

बैल नांगरा वढीती, गायी पानवल्या घरी
रानमाळ तूडयीती, गूरांमांगं उभी मुला

आज पावसात काही, ग्येली भीजत ल्येकरा
कोण बोहयीत व्हता, वाढूळा त्या बाजुला

लांब चालली नदी, त्यीला जावून जरा म्हणा
त्वा मह्यार सोडला, म्वाठा सासार मिळो तुला

रोज गावच्या रस्त्याला, लायीती नजरा सदा
बा खतावला किती, आयीच्या बांध न आसुला

देवळात देव नाही, तू बी हारवला कुढं
यी फिरून रं घराला, सांगा 'आनंद' भाऊला





चांदाचा-चंद्राचा
ईस्तुला-विस्तवाला
बोहयीत- बोलवित
वाढुळा- बऱ्याच वेळेपासून
मह्यार-माहेर
खतावला-आठवणीने व्याकुळ झाला
आसुला-आसवांना



Tuesday, July 31, 2018

सागोतीचं ठाव

तिसऱ्या पहारी पडलो होतो चीचखाली घोंगडी टाकून पक्या माश्या तोंडाव घोंगघोनं करीत.. तरी पण तसाच पडून व्हतो. गार वारा सुटला तसा मार्त्यादाचा पक्या येऊन बिलागला.. आसा दिला कनाय तडाका ठिऊन, एक त झॉप मॉड केली. तसा वैनींना आवाज दिला ब्वा.. दाजीबा किती झॉपाता कायनू त्या तिकडं चोहंडीक ह्यारा किती लॉका जमल्यात ह्यारा.. डोळं चोळीतच उठून बटवा चापसाया लागलो त बंडीच्या खिशातय ह्या माया ध्यानात आला. इकडं तिकडं ह्यारला त पक्या मेहडीपशी फुसफूस करीत व्हता. त्याला हाक मारली... पका...तमाकू आन र बा मायीं तेवडी... तेवड्यात डाफारलाच पॉर.. मंगाशी मला माराया तवा कसा.. मी नय जा.. आर आन बाळा तुला न्हेतो ना चोहंडीक बाव आणाया. तवा कुड आणली त्याना तमाकू.. वैणीला काय म्हणायचाय ह्या माह्या ध्यानात आलाच व्हता. बटया बरबर पितळी आन कोयतायबी दिला व्हता तिना पक्याक.. तमाकू चोळीतच उठलो न चालाय लागलो त पॉर मागच पितळी वाजीत चालल्याला.. गेलेव समदी तयारी. बकरू कापला त कॉण सागळ काढाया त कॉण देड धिवाया, वाघ्याबा रक्ती शिजवाया, तासाभऱ्यात उराकला. भोऱ्यादाना येतानाच खराळाकून सागाची पाना आणलेली. खांडखुंड झालेव पाना आथारली.. नानांनी सांगितला पोराणली रक्ती द्या, तवर कारभारी येतील ते आलेव करतील ठाव... कारभारी आलं, तवर रक्ती खाऊन झाली व्हती. मंग वाटी वाटी भरून सागाच्या पानाव ठाव केलं. हाडका, मवशी, वजडी, काळजाच बारखानल तुकडं, प्रत्येकाना आपापला ठाव उच्याल्ला पितळीत ठिवला न झावळा पडस्तवर घरी गेलं गडी ठाव घेऊन.. आन पितळ्या भानवशिव ठिवल्या तिथून पूड मंग कांजी आन मंग ज्यावना...
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🙏
गणपत रामचंद्र कोंढवळे, कळंबई



Friday, July 27, 2018

डांगाणातल्या पाच जेम्स बॉन्डांची गोट

शाहू म्हाराज मरल्यावं पुण्याला पेसवं राज चालवाया लागलं. सगळा राज पेसव्याना ताब्यात घिया सुरवादी क्येली. तेनली सह्याद्रीचं समदं किल्ल तेंच्या आमलात घियेचं व्हतं, तेवढ्यासाठी पेसयाना राजूराच्या अन कोतळाच्या कोळ्यांली संपर्क क्येला. तवा खाडे आन भांगरे ह्ये द्वान सरदार ह्या कामाला तयार झालं. मंग सगळ्यात आंधी तेंनी तिरमक किल्ला घियाचा ठरावला. पण तिरमक किल्ला व्हता मुघलांच्या ताब्यात. अन किल्ला जिखून घेणा लय आवघाड व्हता. पयली गोस्ट म्हंजी किल्ल्यावं येंघनाच आवघाड व्हता. अन येंघतानाच येवढा दमाया व्हयाचा का वर जाऊन लढाया बळच उरायचा नय. किल्लेच्या कड्यावून चढून वर जाया अन लढाया कितीय ताटम गडी आसला तऱ्ही त्येलाय शक्य नव्हता. 
मंग काय करावा?
तव्हा डांगाणात पाच पटेकर भाऊ व्हतं. पाचीच्या पाची एकदम रगाट गडी. लढाई खेळाया तं ते पटाईत व्हतंच, पण कंच्याय आवघाड परिस्थितीत कंचीय जिकिरीची कामगिरी करायची तं पाच पटेकर भावांशिवाय आख्या माराष्टात दुसरा कोन्ही नव्हता. हे पाचीच्या पाची गडी कंच्याय डोंगरावं अन कंच्याय कडेवं घोरपडीवानी सहाज येंघून जात. कोन्हाच्या नदरं न पडता कुढय पोहोचत. सोताकं काहीच हात्यार नसला तऱ्ही एकएकटा पाच साहा तलवारीवालेंली एकाच येळी गुंगारा देत. हे पाचीय भाव पाच पांडवासारखं शूरयीर तं व्हतंच, पण जेम्स बॉण्डसारखं चलाख अन चपळय बी व्हतं.
खाड्या अन भांगऱ्या सरदारानी जव्हा तीरमकाचा किल्ला जिखायचा इडा उचालला, तव्हा त्ये आपापलं सैनिक घेऊन तिरमकाच्या खाली गेलं अन किल्लेची पहाणी केली. किल्ला हेरल्यावं मातर तेंचं सैनिक काय लढाईला जाया तयार व्हईनात. लढायचा रह्यला लांब, ह्या किल्ल्यावं येंघता सुदा येणार नै, आसा त्ये म्हणाया लागलं. समदी म्हणत का आपु कसाय करून वर येंघलोच तऱ्ही लढायची ताकत काय रहेणार नय अन आपु समदी वाजीव मरू. म्हणून ही कामगिरी सोडून द्यावा आसा समदी म्हणाया लागली. समद्या सैनिकांमंधी आशी घालमेल झालेय ह्या पहून मंग पटेकर बंधू म्होरं आलं. त्ये म्हणालं आरं काय लढायच्या आंधीच आसं घाबरून जाता? आम्ही आसताना तुम्ही गड चढायची कह्याला काळजी करीतंत? ह्या जगात आसा कंचाय कडा नय जेच्यावं आम्ही पटेकर येंघून जाऊ शकत नय. आम्ही वर जाऊन सम्देनली वर घेऊ. अन मंग त्या मुघलांली आपु सहज कापून काढू. त्येंनी आसा म्हणला तरी सैनिकांचा भ्या काय जाईना. मंग मातर पाचातलं द्वान पटेकर सोताच निंघालं. त्या दोघांनीच गडावं चढाया सुरवादी क्येली. ह्ये द्वान पठ्ठे समोरचा उभाच्या उभा कडा सहज येंघून वर ग्येलं. येवढाच नय तं फक्त द्वानच तासात किल्ल्यावरल्या मजबूत सुरक्षेमंधून सम्देनली गुंगारा देऊन कोन्हाला न कळता थेट किल्ल्याच्या किल्लेदाराचा चांदीचा हुक्का घेऊन त्ये दोघंय खाली आलं. पटेकर भावांच्या ह्या कामगिरीना समदेंली लय फुराण चहढला अन समदी सैना पुरी जोमाना लढाया तयार झाली.
मंग लढायीची यवजना तयार झाली. खोटी खोटी फकिरा-बाबांची सोंगा घेऊन किल्ल्यावं गपचिपपना जाऊन पटेकर बंधूंनी किल्यावरचं काही आधिकारी अन किल्लेदाराच्या येका जवळच्या सहकाऱ्याला फितावला अन किल्लेची समदी माहिती काढून घ्येतली. 
मंग लढाईच्या दिशी तिरमक देवाला योक बोकड कापून कामगिरी सुरु झाली. सगळ्यात आंधी पटेकर बंधू कडा येंघून वर ग्येलं, अन मंग त्येंनी वरून दोराच्या शिड्या खाली सोडल्या. त्या शिड्यांवरून मंग ५०० जण किल्ल्यावं चढून ग्येलं. वर पोहोचताच समदेनी थेट किल्ल्याच्या मुख्य शिखरावं हल्ला करून तिढल्या मुघल सैनिकांली कापून काहाडला. अन आपला झेंडा लावून हर हर महादेवच्या घोषणा देत इजयाची शिंगा वाजावली. मंग त्ये किल्ल्यातल्या दुसऱ्या सैन्यावं चालून ग्येलं. अचानक येवढा आवघाड कडा चढून येवढं लय सैनिक वर आलं ह्या पहून मुघला जाम बेहेली. न लढताच कित्येक जण वाट फुटल तीढुन पळून ग्येलं. काहींनी कड्यावरून उड्या मारल्या अन ठेचून मेलं. कित्येक मुघला हातपाय मोडून जखमी झाली. जे मुघल किल्लेवं लढाया थांबलं तेंली सम्देनली मारून टाकण्यात आला. अन मंग किल्ला ताब्यात घेतला.
येवढा मोठा पराक्रम करून किल्ला जिखून घेतल्याबद्दल मंग पेशयांनी पटेकर भावांली चाळीस हजाराचा इनाम दिला. थोरल्या पटेकराला पालखीचा मान दिला. अन खेरुजी नाईकाला सुदा पालखीचा मान आन बारी ह्या गाव इनाम म्हणून दिला.
ह्याच वीर तुकडीना मंग रतनगड, कलाडगड, अलंग, कुलंग हे किल्लय बी जिखून घेतलं. रतनगडावंय बी तिरमक सारखंच वर जाऊन दोरीच्या शिड्या खाली सोडून द्वान-अडीचशे गडी येंघून गेलं. तव्हा जव्हारचा राजा अन त्येच्या घरची सगळी लोका रतनगडावंच व्हती. रतनगडावं लय मोठी लढाई झाली अन दोन्ही बाजूचं मिळून द्वानशे ल्वाक म्येलं. जव्हारचा राजा कसाबसा सुटून ग्येला. याबदल पेशयांनी ३० हजार रुपये बक्षीस दिलं आन यमाजी भांगरे ह्या सरदाराला पालखीचा मान अन साकीरवाडी ह्या गाव जहागीर म्हणून दिला.
तं आसं व्हतं आपल्या डांगणातलं ह्ये पाच जेम्स बॉण्ड म्हंजी पाच पटेकर बंधू. 



Wednesday, July 25, 2018

धशा





गळ

तसा गळांच बरचलय परकारयत पर मंग आपल्याक डांगाणात तिनच परकारच गळ वापरीत्यात म्हणून म्या मह्या आठवणीची गोठ सांगतोय.
       गळान मास धरायची पकी जूनीच कला हाय.
मला आठवाताय तसा आमच्याक त सगळी लाॅका ज्याम गळाव जात्यात. मोक्कार मास धरीत्यात बरका.
तसाच एकदा  मी बारीकच होतु सकाळची नेहरी झालेव मी चूल्हीमोहर शेकत बसलू व्हतु तेवढ्यत मह्या मोठ्या भावाना खळ्याक जाऊन हाक मारली आन् सांगातत्ला सित्या  टिकाव नथ कुडावना आनर मी झापाच्या बहेर निघालू आन् दारातल्या सपरीला टिकाव, कुडावना, व्हाता पर मंग म्या त्या नैय नेला कुदळीच नेली. इच्चरला कयाला लागतीय र त भाऊ?
म्हण गांडुळ खनाया आन् ते गांडुळ कयाला?
त म्हण गळाला लावाया.
आन् म्या परत इच्चारला गळ म्हंजे?
आर मासेली गळ लावयचा आन् ते मास गांडुळ खाया म्हणून येतत आन् गळच तेंच्या तोंडाला रूतुन जातोय आन् मासा पका तरफडोतोय मंग आपुन गळ ऊडऊन घ्याचा तो मासा पीसइत ठुवायचा तसाच करून करून पक मास धरायच आन् संद्याकाळी आय मास्यांचा कोरड्यास करील आपलेली खाया...
तीतक्यात मला भाव म्हण्ला पळत पळत व्होय र दात मंजनीचा रीकामा डबा आन.
मी पळत पळत घरी गुलू डबा आनुन दिल्हा मंग ते सगळ गांडुळ त्या डब्यात भरून, द्वान ऊडाव गळ घेऊन नदिक गोलो आम्ही दोघ भाव.
गळाला गांडुळ लाऊन टाकला. लगेच बाळोखी  लागली मह्या गळाला आन् ऊडावला गळ घेतली काढुण परत लावला आसायकरू एेक्याच जाग्याव मला सात मास लागल तवा पसुन भाऊ मला सारखच घेऊन जायाचा एका दिसी काय झाला मी एकटाच मासेली गेलू  व्हतू नदिचा पुर ओसारला व्हाता आन् गढुळीही कमीच व्हती म्या लावला गळ मासाच लवकर लागना मीइच्चारातच पडलू काय झाला बुव्वा?樂
मंग वजच गळ काढला हेरीतोत काय गांडोळा सगट खेकड घेऊन गेली मह्यावाला गळ. म्हन्ला आता परत घरी गेल्याव काॅलदांडाच...
पार हिंगमोड होऊन निघलू परत झापाक (घरी) चलता चलता वावराच्या मेंडाक ध्यान गॅला त पकीना आळींम व्हाती मंग ज्याम आळींम नेली घरी आयना मासेली वाटेल मिर्चीमसाला आळम्बीच्याच कालवाणात घातला व्हता. मास्याच्या आन् सागोतीच्या कालवाणा सरखाच लागला रातच्यायळी मह्या "बा" ना इच्चारला कायर शिकारी आज आळीमीची शिकार केली.? मंग म्या "बा" ला सांगात्ला मह्यावाला गळ खेकडीना खुडुन नेला ना .
तव्हा मव्हा "बा" सांगाया लाग्ला आर गाडीस्या आता उडाव गळाला मास नैय लाग्नार ह्या दिवसात खुटगळ लावाया लागतत.
त्यांचाय शिजन रह्याताय उडावगळ (छडी) , खुटगळ, चमक्यागळ आस तेन्च परकार रहेतत.
मंग म्या तीन्ही शिजनाच मास धर्ल त्याच सालापसुन मास धराया शिकलो...
मी. आर्जूना बांड्याचा सित्या



पानेची पहाळी...

जेठातला इजांचा कडाका चालूच व्हता,आन वाराय सुटला व्हता. म्हतारीआय चुलीपुढं इस्तू पेटइत व्हती. तसा मागचा दार धाडदिशी वाजला..
आय पळतच दाराक आली न पहेते त काय, आभाळ भरून आला व्हता.  कंच्याय टायमाला पाऊस येणार व्हता, तशी आय वराडली, बारख्या पॉंरा कुडयात पग जरा, तिला राहवलाच नय..
म्हतारी आली तवर मोठी पहाळी आली म्हणून आमी पोहळीला कोंबड्या बसत्यात तिथं बसलो ..
म्हतारीना पदराखाली धरून आमाली चुलीपुड बसवून पितळीत च्या पेया दिला ...
मंग दारामाग उभं राहून पाऊस हेरीत रयलो..
गणपत रामचंद्र कोंढवळे...



Friday, July 20, 2018

आगोट

आगोट
मफल्याला अन्जुन आठावताय,
तवा मी सा-सात वरशाचा आसल.
मिरुग निगयच्या अगुदर ल्वाका भाता आन नाचन्या पेराया जायेचि.
मफल्याला मफली आय म्हनयची 
"  बा करपाचा बुतारा घ्ये आन तुया बापासंगा जा रोपा पेराया". म्या आपला पका गमज्या उडईत बापाच्या सन्गा जायचो. माहा बाप सरवा सरजाम आन आम्च द्वान बईल घेऊन दरीला जायाचो.
माहा बाप घमेल्यात वायसा प्यारायचा भात घेयाचा आन सम्द्या रोपात प्यारायचा. 
मन्ग माहा बाप यवसतीत आऊत जुपायचा अन मफल्याला म्हणायचा" बा तेवडी आरज्या बयलाची जोती चांगली बान्द ".
मी आजाबात भेत नवतो आमच्या आरज्या बईलाला, पका गरिब बईल व्हता. पन आमचा मिंडा सरज्या बईल लय बेकार व्हता,निसता माराया धावुन याचा. तो आला का म्या पडाळीक पळुन जायचो. बाबव लय भेयचो.
     माह्या बापाना औताना नांगारला का म्या लगीच बुतार्याना हिकडुन तिकड भात करयचो. माहा बाप म्हनायचा " बा र्हावदे तुफल्याला नाय जमायचा.

माह्या आयला ज्यावान कराया लय येळ लागायचा. कारन चुलीला लावयची फाट्या  पकी वांबाट आसयची, येळत पेटयचीच नाय. आम्हाकली फाट्या आमी लवलाच भरुन ठिवयचो. काई फाट्या आन काई हिलकं. हिलकं पाटकन पेटयचं. नाय पेटलं त कुईट टाकयची नायत कोया कारई. तवा कुट थ्वडी ईस्तु होयची. ईंगाळ पेटलं का मंग पटापट ईस्तु ववलातुन तामतोलीला लागयची आन कोरड्यास शिजायचा.
      सायेच्या भाकरीला येळ नवाता लागत पन निसत फोफ होयचं. मंग माही आय कवाडाला कडी पोंद्या लावुन ज्यावान घेऊन निघयची.
       आमी घराभवती झडाप करयचो म्हणुन कयाचाच भ्याव नसायचा. तसी झडाप कराया लय मंजा येची. मी झिटानली पार गवारटेर्याला जायचो, आन रामेठेची झिटा आणयचो. माहा भाव दरीला जावुन पेठ्या आणायचा. आमी वाख रानातुनच आणयचो, म्हणजे पॅक झडाप बांधता येते.  पात आणाया मातर लय लांब जाया लागायचा. आमी पातीला जाताना ईळा घेवुन पहाटीलाच निगयचो. मी चुंबळीला फाटकी चादर नाय त टाईल घेयचो. आमी पोचल्यावर माहा भाव, आय, बाप पटापट पात कापयच, आन मी पातीची यंगा वाटव नेवुन ठिवयचो.पण लय येळ लागायचा. अन जर का भानव ( मोठा डास) आलं तर लय बेकार. बाबव डसल ना भानव तर गांधीच येची अंगावर. 
 पातीच भार झालं का आमी पटापट घराक निगयचो. मला वाहाना नवत्या म्हणुन लवकर निगयचो, नाय त पायाला पक चटक बसयचं. घरी येवुन जेवयचो आन लगेच हिरडेनली निगयचो.
   आमचा प्वाट हिरड्यानवरच आसताय. म्या आकडा घेयचो आन माहा बाप सरा घेयाचा. मला हिरडीव चडता याचा पन शेंडेच्याबुंध्यावर नाय जाता याचा. मंग मी बारीक बारीक फोकाव जायचो आन आकड्यांना हिरडीची फांदी वाकवुन हिरड येचयचो. मी गळगोतीत येचयचो अन मंग पोताडीत नेवुन टाकयचो. माहा भावाचा परवट लय मोठा असायचा. तो शेंदर्या हिरडीव पार वर जायाच. माही पोतडी भरली का मंग मला बरा वाटायचा. 
 वरुन नाय हिरड याचता आल तर मी झोडलेल्या हिरडीक जायचो. माहा बाप हिरड सर्याना झोडायचा. पोतडी भरली का मी  पळयचो घरी दडोलोप्या ख्याळाया. 
        म्या घरी पोचलो का मह दोस्त ख्याळाया तयारच असयचं. मंग मी संत्या,नाम्या, धर्मा गिटा, पांड्या, होन्या आसी समदी प्वारा ख्याळाया असयची. 
मफल्याव लय येळ राज्य नसयची. कारन मफल्याला समद्या जागा पाट आसयच्या. लयकरुन प्वारा राह्याकाकुच्या घरामागच्या निरगुडीत दडयचि नायत ममत्या म्हतारीच्या घरामागच्या जांबाव दडयचि. मी हुडकयचो आन म्हणयचो " नाम्या ईस्टाप, संत्या ईस्टाप, पांड्या ईस्टाप". मंग माह्यावरची राज्य जायेचि. परत आमी समदं सुटयचो . आन होन्येव राज्य आली का बाबव पकी रेफळयची. आमी जनीच्या घरामांग दडयचो अन होन्या दिसला का मी पळत जायचो अन " थप्पी" मंग राज्य लय पोहंगळयची.  तो लय पिसाळयचा आन म्हणायचा, " मफल्याला तुमी लगेच थप्पी द्याता".  पन राज्य संपत नाय तवर ख्याळायाच लागाताय. कसातरी होन्यावरची राज्य फिटली का मंग तो गमज्या ऊडवीत मफल्याला म्हणायचा, " रामा तु पघच आता म्या कसी नाम्याव राज्य घुमवीतो ते". असा आमचा ख्येळ पार सात वाजपरयन्त चालायचा. 
  सात वाजलं का माह्या आयचा आवाज यायचा, " बा रामा खाया येतो का तिकड यव". मंग मी टिंगारीला पाय लाऊन घरी जायचो.
     घरात पोचलो तवा पार आंधार झाला व्हता. तसा माहा घर म्हन्जे लयीच सादा. पन मफल्याला लय आवडायचा . माह्या घराच्या वास्यांव कुईट टाकली व्हती. अन आडं पावळेनी शिवलं व्हतं. माळेव पेंडा भरला व्हता. परवाच्या दिशी तेच्यातच म्या आंब ऊबवणीत घातलं व्हतं. अन घराच्या बायेरुन कारईंचा कुड व्हता. तिथच बाजुला आमचा गोठा व्हता. मफल्याला कपेली गाय भारी वाटयची. शिंगा पकी मोठाली पण कधीच मारयची नाय. गोठ्याच्या कडला ऊखाळ व्हता. तेचेव माही आय भात कांडयची. कडला कनगीला टेकऊन मुसाळ ठिवयचो. दारापशी जाता असयचा. जातेव बाया दळाया येच्या. पहाटीला गाणा म्हणुन दळयच्या. असा माहा घर. 
    म्या घरात पोचलो अन पाह्यला माहा बाप हिरड तुडवित व्हता. राकेलची चिमनी बाजुला ठिवली व्हती. मंग म्या पन गेलो तुडवाया. तुडवलं का हिरड खोकं व्हती नाय. माह्या बापाना मफल्याला पायला अन म्हंगाला " बा रामा तुव केवडुस पाय, तुफल्याला नाय जमायचा".
पन म्या काय आयकतो. मी तसाच तुडवाया लागलो. तवर मफल दोनी भाव आल व्हता. मंग माह्या आयना हाक मारली " पोरांनो जेवुन घ्या आज घायपाताची भाजी केलेय". 
माह्या आयना याताना घायपाक भाजी आणली व्हती. मंग आमी जेवलो. माहा बाप मफल्याला घेऊन मोत्या लोखंडेच्या घरी ग्याला. तिथ पकी ल्वाका व्हती. मंग तेनी पते काढलं आन मेंढीकोट खेळाया लागलं. मफल्याला यत व्हता थ्वाडा थ्वाडा मेंढीकोट, पन बारीक प्वाराला क्वान घ्यानार. पघता पघता म्या नींजुन जायचो. माह्या बापाच्या मांडीव. मंग माहा बाप मफल्याला पांगोठी टाकुन आनायचा.
क्रमशः



Wednesday, July 18, 2018

मही शाळा - जिवन शिक्षण विद्या मंदीर

पहाटचा कोंबडा आरला का म्हतारी आयला जाग एयची. मंग ती आग्पेटीची काडी वढून बत्ती लावयची. कवा आग्पेटी सादाळली असली का चुलीतला लाकूड खोरून खोरून फुकनिना फुकून जाळ करून प्याटवाया लागायची.. उजेड करून चूल पेटली का मोठ्या टोपात अंघूळीला पाणी ठिऊन म्हतारी माह्या 'बा'ला हाक मारायची , "बारख्या आरं ऊठ उजाडला आता".  मी बाबांच्या मांगं झोपलेला असायचो. बा उठला का आमचा नंबर, "गणपा ऊठ गड्या गुरा चारून आन तवर मी डेरीला दूध घालून येतो." मंग अंघूळी पांघोळी उरकून जेच्या तेच्या कामाला माणसा तयार असायची. महा उरकसतवर म्हैशी, गाया पाजून बा तयार असायचा. आयना कॅल्याला गुळाचा चिह्या म्हतारी पितळीत वतून ठियीस्तवर मी तयार..
डोकेव कागद लावेल तीन घुंगराची तिळीस आसल्याला घोंगडीचा घोंगता, कमरंला आकडी, हातात पांढरीची काठी..
मी राजावाणी दारात थांबणार. आय दोंन म्हशी, तीन गाया, एक कालवड, दोन बैल सोडून गवनीला काढून द्यानार. मंग आमी गुरांक जाणार. जाताना दरडावून सांगणार, दहाच्या अगुदर गुरा घरी आणायची, मी सयपाक करून ठिईते आलेव साळत जाया..
टायमाच्या आगुदर गुरा घरी. साळची लय आवड. हात पाय धुयाच, गरम दूधभात हातानी रेळ जासतवर खायाचा, खुटीवरचा दपतार, खतांच्या पिशवीचा घोंगता, घेऊन डुलत डुलत साळत हजर. पोरा लय इस्पिक, कोण कोणाची कापडं ओढीताय, कोण बोचकडताय, कोण हसताय त कोण रडतय एवढ्यात...
गुरुजी आलं लांबूनच दत्त्याना सांगितला, तशी वरांड्यात चिडीचीप..
शंकरना गुरुजींची सायकल भीतीच्या कडला लावली. गुर्जी पायरीव, पॉरा पुढं हजर. "दहाच मिनटात पाना, कागदा, गवात उचलायचा आन पार्थनेला उभं राह्यचा" गुरुजींचा आदेश..
मंग काय निसती भिरकीट ह्या तेच्या हातातला कागद ओढतोय, गवांत पळवितोय, साफसफाई पाचच मिनटात.! तिसपस्तिस पॉरानली किती टायम लागतो..
प्रार्थना चालू. मी आन वरल्या आळीचा चंदऱ्या पुढं म्हणणार, बाकीचेनी आमच्या माग म्हणायचा. "देई आम्हा वरदान शारदे देई आम्हा वरदान..'' मग परतीज्ञा "भारत माझा देश आहे..."
ओळींना आत जायचा. अगुदर पयली, दुसरी, तिसरी, मंग चौथी, शांतता..
हजेरी.. गुरुजींनी नाव घ्यातला का उठुन उभा राहायचा हात बांधायचे "हजर" म्हणायचा मगच बसायचा..
शिकवणी सुरू..उजळणी म्हणा, पाढे म्हणा, धडे वाचा, पाठांतर करा एवढा झाला का दुपारची ज्यावणाची सुट्टी. घंटा वाजली रे वाजली का पॉरा सुसाट.! कोण पडतंय, पाडतंय, वाडीकुंन येणाऱ्याच डब आमी घरी..
परत शाळा परत त्योच शिकण्याचा क्रम. 
एका वर्गाला शिकवीत असताना दुसऱ्या ओळीतल्यानचा आवाज येईल, मंग काय? आदरयुक्त भीती असायची. चारनंतर गाणी, गप्पा, गोष्टी, ख्याळ, पुन्ह्यांदी साळत, उंदयाचा अभ्यास, आन सगळ्यांचा शंकरकं ध्यान (लांब लचक उचपुरा असल्यामुळ). तो घंटा वाजवायचा ना. गुर्जीना शंकरला खुनावला तो उठला न दगुड घेतला घंटा वाजवली आन साळा सुटली उंदया परतुन भरायासाटी...
आशी आमची तवाची साळा...
जीवन शिक्षण विद्या मंदिर.



Sunday, July 15, 2018

उलाटान

मी पार बारीक होतु. त्यासाली ज्याम पाणी जोरात रमला होता. सगळा रानच उप्याळुन ग्याला होता. जीकं हेरील तिकं पाणीच पाणी नद्र पडायचा. बऱ्याच वावरांचा बांध फुटला होता. आमच्या त पार गव्हाळीतुच नदी दोन, तीन दिवस उतारलीच नैय. दुसऱ्या दिवशी नदीचा पूर कमी झालेव खाली नदीकं हेरला त ज्याम झुंज्या मुज्याच पकी लाॅका नदीकं पळत सुटली आसत. म्या आईला ईच्चारला, आयव हा सख्याआजा कुनीकं ग्याला गं? तव्हा आईना सांगातला, नदीला उलाटान आलाय आन् नदीतलं मासं झुरेनी वर येतत. चढान लागलाय. पकं मासं चढतंत त्यांच्या पाॅटातली आंडी सोडाया. गवतातुन मंग जरूशाना मुक्काट गेलु मी नदीकं, तं पक्या मळया लावल्या होत्या झुर्याला, आन् थोड्यच आंतरावं बसुन चार पांच जन म्हणत व्हतं, दोन ओझर भरल बरका मह्या मळईचं.  तीतक्यात त्याना आनली काढुन मळय आन् किरकिंड्यात ओतली. मला तव्हा कळाला का ह्या मळयीमंदी मासं धरीत्यात. मी मुकाट हेरीतच ऊभा रहीलु आन् मह्याक पैैला आन् त्या रोह्यामामाना मना मह्या बंडीत मासं बांधून दिलं.  घरी जा, इक तीक नकु हिंडु चिखला पान्यात. मंग मी ते मासं घेऊन घरी गेलू तं मी हारावलू म्हणून ज्याम गवशीत होती घरची मान्सा. तेव्हढ्यात मह्या बा ना हेरला मला येताना.  आर्रर्र हा तं उलाटानाव गॅलता.!  घरात गेलू न मला नसता गॅला म्हणून काॅलदांड्याची सजा दिली होती. तवापसुन मला उलाटानाचा काॅलदांडा म्हणूनच चिडवाची सगळी भावांडा.
ही मह्यावाली उलाटानाची आठवण...

-म्या आर्जूना बांड्याचा सित्या



दिवाळीची दीवटी

मह्या हातात ह्या काय हाये, कोन्हाला माहीत हाये का?




डांगाणी म्हणी

ऐकेल डांगाणी म्हणी (अलिखीत होत्या)

१ ) गावचा गाव बळी अन् परगावाचा गाढव वळी
अर्थ : गावातला माणुसच गावचा राजकारण करू शकतो, परगावच्या माणसाने शहाणपण दाखऊ नये.

२ ) बडा घर पोकूळ वासा, अन वारा जाई भसाभसा
अर्थ : मोठ्या असामीचा नुसता मोठेपणाच पाहून घ्यावा

३ ) खताळीचं गाढव माळरानावं चराया गेलं.
अर्थ : कायम दरिद्री माणूस चांगल्या ठिकाणी दिसणे

४ ) फुकाटची कढी अन धाऊ धाऊ वाढी
अर्थ : दुसऱ्याच्या जीवावर खर्च करणे

५ ) शिवराई पायी निजाया गेली अन आच्छेर त्याल मांजर पेली
अर्थ : थोडया कमाई साठी जाऊन जास्त नुकसान होणे

६ ) व्हायाचं ते व्हणार अन शिपणी पशी सोनार
अर्थ : कितीही केल तरी लबडाची गाठ लबाडाशीच

७ ) पायातल पायताण डोक्यावं घेवून हिंडणे
अर्थ : कमी दर्जाच्या व्यक्तीला जास्त महत्व देणे

८ ) नेम नेसुटा अनं मोकळा कासुटा
अर्थ : राहणीमान कडक नियमात पण वागणं व्याभीचारी

९ ) आजार हेल्याला अन आवषध पखालीला
अर्थ :मुळ बाब सोडून भलतीकडेच खर्च करणे

१० ) जिथं वरमाई शिंदळ तिथं वऱ्हाड शिंदळ
अर्थ : गावचा प्रमुख नालायक असेल तर पुर्ण गावच नालायक ठरतं

संग्राहक : गणेश मैड सर खडकी बु ॥ (राजूर)



Saturday, July 14, 2018

म्हण

खिशात नैय होहरा आन् आया-बायांना म्ह्नतुय चला बांगड्या भरा



मोडा

आवणीच्या दिसात माॅडा(सुट्टीचा दिवस आपल्या शेतकरी बांधवांसाठी) पाळतात.या दिसी शॅतातला कंचाच काम नय करती.परतीक गावात यगयगळा वार असतो.आमच्या गावातली लाॅका दाॅन मोडं पाळीत्यात.सनवार अन मंगाळवार .मंगाळवार रतनुबाईचा वार अन सनवार मारूतीचा वार.या दोनमंधून मंगाळवार लय कडक धरीत्यात.पर सनवारी जरासी कामा करीत्यात बरका पर औत नय धरती.
पर लाॅका हे दिस वाया नय जाऊन देत.ह्या दिसी सामराद कोलटेंबा इकडं आवाया जातात.फक्त सिव वलांडायची.मंग त्या गावचं मोठं धनी दाळ गुळ साखार अन बोकडाचा वाटा यचेव माणसा आवाया  नेत्यात.
त्या गावाची लाॅका बी तेंच्या मोड्याला या गावात आवाया यत्यात .म्हंजी खदली बदली .
मंग दमाना का होईना समद्या लाॅकांची आवणी पुरी होतं .
माॅडा हा कुळसाईचा वार .
म.सो.लांघी.रतानवाडी




मांडव..


सवसांजच्या टायमाला भावकीतलीच दौन पोरा आन चार गडी पहारी घेऊन मोठोबाच्या देवळाक निगाली व्हती म्या नानाला ईचारला ही काय कर्त्यात त नाना म्हंगाला उंदया मुक्यादादाचा मांडव ये. मला त कळनाच काय. मंग म्या नानाच्या बंडीला धरून मागमाग गेलू त गडी पहारीना दर खणीत होत दर खणून झालेव चार कोपऱ्याव चार मेहडी रवल्या त एकजण म्हंगाला आर अजून एक रवा मावळत बाजूला देवाक बांधाया लागल म्हणून अजून एक मेहड रवली तवर अजून सात आठ पोरा आली अन लांबाल कळक आणून मेहडींव ठीवल बाकीचेनी फोकाट्या आणून कळकाव लावल्या म्या बारीक होतो त कुड दराची माती लोट, काथ्या दे,सुतळी दे,कोणाला पाणी दे अशी हालकी कामा करीत होतो असा करता करता मांडव तयार झाला. मंग दादांच्या घराकुन समद्यानला गुळाचा चहा आणला न पितळीनी वाटला चया पेवून सगळी घरी गेली.
दुसऱ्या दिशी सकाळूच उठून अर्ध्या बादलीत अंगुळ केली पेटीतली जतरची नई कापड आयकून घेऊन घातली अन पळतच मोठोबाच्या देवळाक गेलो त सगळ्या मांडवात पोरा,माणसा,बाया जमलेली मंडप बांधला व्हता,लाऊसपिकर आणल्याला जाम्बोरीकुन मेहडीला भोंगी बांधायचा काम चालू व्हता तेवड्यात म्हतारा वराडला
सगळं गडी चलर डगळ आणाया कोयत घेऊन या.. अन बायेणी तवर मांडव सारवून घ्या डगळ अनिस्तवर... असं म्हणस्तवर पोरा ढोल लेझिम घेऊन,मोठी माणसा दौन कोयत घेऊन निगाली. सगळी बनात पोचली. 
आंब्याचं, जांभळीच्, उंबराच्, पिपळाच, लिंबाचं, बोरीची काटी अस कवळीत माहतील तेवढ आणलं अन तेव्हड्यात पाटलाची बैलगाडी आली त्या गाडीत डगळ ठिऊन काही खांद्याव घिऊन वाजतगाजत,लेजिम खेळत,देवळाक निगाली पोचलेव तिथं आमची काकू हळदी कुकाचा ताट घेऊन ऊबीच व्हती सगळ्यांला कुकू लावला,नानांनी बैलांच्या शिंगाला पागोटा बांधला अन माणसांनी डगळ मांडवाव टाकलं..
मोठ्याबान दयावकाला,पाच पालईच डगळ,मुसाळ,नाचणीचा पीठ,तेचेव दगडाचा दिवा ठीऊन,दिव्याखाली भाकर,माग सूप बांधून,जोत्या कासर्यांनी देवाक बांधल। गुरजी तवर माईक घेऊन तय्यार सगळ्यां पाव्हन्या रावळ्यांच स्वागत करीत व्हत.
एकदाची सगळी मंडळी मांडवात बसली. 
अगुदर सरव्या भावकीला टायलटोपी देऊन सतकार केला. मंग वरची आळी, खालची आळी, मागली आळी, चावडीकली सगळ्यांचा मानपान देऊन सतकार केला. 
अन परत एकदा सगळेंली गुळाचा चहा दिला, पोखत्या गड्यांनला ईडीकाडी, तंबाकू, खाणारेनला पान सुपारी देऊन, बाळगोपालांला वराणभात, वडपापूड जेवाय देऊन मांडव उष्टावला ...
आन मंग नवरदेवाच्या हळदीची तयारी कराया काकू बोलावना कराया गेली...
ह्या मी जोतेव बसून निस्ताच बगत व्हतो..
माह्या भावाचा आठवणीतला मांडव..
🌿🌿🌿🙏🌿🌿🌿

गणपत रामचंद्र कोंढवळे, ZP, सातारा



Friday, July 13, 2018

आपल्यावाल्या काही म्हणी


1) पयाचा गावाकं आन् चलायचा देवाकं
एखाद्याच आपल्या कामाकडे लक्ष नसेल तर  असे म्हणायचं . बर्याचदा  एखादा दुर्लक्षामुळे पडला असे म्हटले जाते.

2) पैसा ना आडका न जीव घेई धडका 
काही तरी खरेदी करायची खूप ईच्छा मनात असायची पण पैसे नसल्यामुळे घेता येत नसेल तर जीवाची घालमेल होते. 

3) रूपया मैयना (महिना ) न कवायका होयना 
एखादं कामं खूप दिवस लांबलं कि ते किती का निंवातपणे चालत असेल तर वैतागून असे बोलतात.

4) उशाला पोळी न झोपी जाईना कोळी
कोळ्याला पोळी कधीतरीच भेटते. ती खाण्यास तो एकदम उतावीळ होतो. तसं एखाद्या गोष्टीसाठी एखादा खूप उतावीळ झाला तर असं म्हणतात.

5) सोताचा  ठिवायचा झाकून आण दुसऱ्याचा पयाचा वाकून
साधारण द्वीअर्थी असली तरी मुख्य अर्थ म्हणजे आपली चूक असेल तर ती लपवून ठेवायची मात्र दुसर्याची चूक दिसली की ती दाखवणारा जो असेल त्याला उपहासाने अस म्हणतात.

6) चोराला का सांगावा पर पोराला सांगू नय
एखादे काम लहान मुलाला, किंवा बालीश माणसाला सांगितले की तो नेमका ते चूकवणार किंवा काही तरी घोळ घालणार तेव्हा उगाच याला काम सांगून चूक केली हे वैतागून सांगताणा.

7)  खाजवून खरूज नय काढायची
खरूज झाल्यावर  जर ती खाजवली तर अजून  खाज सुटते tya मुळे ती खाजवू नये. तसेच  एखाद्याने विषय  किंवा  भांडण मिटलं   असताणा तो विषय पुन्हा काढून ताप केला , किंवा तो विषय काढू नको असं सांगताना.

8) कुंभारा पेक्षा गाढाव हुशार
एखादे काम करताना मोठ्या माणसांना जर लहाणांनी काही सल्ला दिला आणि तो चूकीचा असला की लहान जणांना टोमणा हाणताना.

9) मोठा घर पोकाळ वासा
एखाद्याच्या मोठेपणा तला फोलपणा सांगताना. बरेचदा गावातल्या मातब्बरांची किंमत काढताणा.

10) नाचता येईना आंगाण वाकडा, सैपाक येईना ओली लाकडा
 -- 



पावसाचा गाणा

भाताची आवणी करीत आस्ताना ह्या गाणा म्हन्लाय एका आजीना. गाव-वरची खडकी. मराठी भाशीमंधी पावसाची गाणीच नैत. थ्वोडीफार आसतील तं त्या लोकगीता आथा संपायाच लागल्यात. ह्या आजीना जशा मोकळ्या गळ्याना मनापसून ह्या गाणा म्हणलाय तसा कोण्ही गायक स्टुडीवमंधी गाऊ शकत नय. ह्या आसा गाना तवाच गळ्यातून निघाताय जवा पाय चिखलपाण्यात भिजेल आसतील अन आंगावं पावसाच्या धारांनी भिजून बारीकसा काटा येयेल आसंल. म्हणून ह्या खरा खुरा मातीतला, मातीशी जोडेल अन आभाळातल्या पावसासंगा नाता जोडणारा गाणा हाये. 





Thursday, July 12, 2018

क्रांतिवीर राघोजी भांगरे गीत

सह्याद्रीचा वाघ - राघोजी भांगरे
अकोले तालुक्यातील देवगाव हे दोनशे ते तीनशे लोकांचे गाव असेल. शोण नदीच्या किना-यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. राघोजीच्या जन्मावेळी गायला गेलेला पोवाडा-

         “ रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान
                         मावळ मुलुखाचा राजा होईल महान !
          रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड
                        जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!”

सामान्य लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम राघोजी भांगरे करू लागल्याने त्याच्या विषयी कोणीही सरकारला माहिती देत नव्हते. राघोजीने नाशिक परिसरातही आपली सावकारांविरोधातील मोहीम सुरु ठेवली होती. नाशिक परिसरातील त्याच्या बंडाचे वर्णन पुढील ओव्यांतून आपणास दिसून येते.

झाडामधी झाड उंच पांगा-याचा
राघूनं केलं बंड नाव सांग भांग-याचा !!
राघूनं केलं बंड नितरोज हरघडी
कत्तल केली पोलिसांची मुंड्या लावल्या हो झाडो-झाडी !!
राघूनं केलं बंड कुलंग गडाच्या माळीला
गो-या साहेबांच्या टोप्या ह्या गुंतल्या हो जाळीला !!
राघूनं केलं बंड बंड घोटी खंबाळ्याला
धरणी काय आली कोंभाळण्याच्या बांबळ्याला !!
राघूनं  केलं बंड बंड तीरंगळ गडाला
यानं बसविला हादरा इगतपुरी या पेठाला !!
राघूनं  केलं बंड बंड गौराया पुराला
कापली गो-यांची नाकं कान टीळा रक्ताचा लावला !!
  राघूनं  केलं बंड सरकार बोलू लागला
कापाया नाक कान ईश्वरानं बंड नेमला !!
राघूनं  केलं बंड बंड टाके देवगावाला
वैरी त्रिंबक कांदडी यमसदनी धाडीला !!
राघूनं  केलं बंड अंजनेरी या गडाला
यानं बसविला हादरा गाव तिरमक पेठाला !!
राघूनं  केलं बंड बंड सुरगाणा पेठाला
कापलीया नाकं लुटलं सावकारशाहीला !!
राघूनं  केलं बंड बंड पेठ तालुक्याला
कापलीया नाकं चहू मुलुखी गाजला !!
राघूनं  केलं बंड सप्तशृंगीच्या गडाला
यानं बसविला हादरा दिंडोरी या पेठाला !!
राघूनं  केलं बंड नाशिक हवेली लुटली
काढून लग्नाची वरात नाकं वाण्याची कापली !!
राघूनं  केलं बंड हादरा नाशिक पेठाला
इंग्रज सरकारला याने धडा शिकविला !!

वरील गीतातून राघोजी भांगरे यांच्या सावकारशाहीविरोधातील नाशिक विभागातील  धडक मोहिमेचे वर्णन आपल्या नजरेसमोर उभे राहते.

- राजू ठोकळ
संदर्भ : १) ‘तुफानी वादळ’ – श्री निवृत्ती भिवा धोंगडे
२) ‘सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी’ – डॉ.गोविंद गारे
३) Gazetteer of India – Maharashtra State, Ahmednagar District



झोपडी


या झोपडीत माझ्या
असे स्वर्ग सुखाची जाणीव
टीपं गळती पाण्याची जरी
नसे ओल्या सुखाची उणीव

असे गवताचे छप्पर
परी त्याला महालाची सर
चाले पाऊस वाऱ्यासंग लढा
पाठी उभा असे सह्यकडा

शेणं मातीनं सारवल्या भिंती
त्याचा सुगंध दरवळे आसमंती
दारी गवतफुले सजली
आत माझी सानुली निजली
      - रv Dagale



गठूडं - कविता

गठुडं

तुह्या रक्ताचं कोडं
मह्या नात्याचं सोड
हे जगणं झालं जड़
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं 

तुही असल मजल 
रीत थोड़ी बदल 
बंगल्यातल्या ताटात
सुटातल्या थाटात 
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं 

थोड़ा तुझा हात दे
माझा सारा खांदा घे
जाण ऋण पाठीवरचं 
बघ फोड़ हातावरचं 
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं 

प्वारं सिकली
नोकरी लागली
कुणाचं आरक्षण
कोणाला संरक्षण
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं

तू बांधला बंगला
म्या झोपडीत चांगला
पर काळ कसा सोकावला
अज्ञानात समाज लुटला
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं

- Raju Thokal




कवी तुकाराम धांडे-1

डांगाणी भाष्येचं सगळ्यात भारी कवी, रानकवी तुकाराम धांडे येंच्या कईता तेंच्याच आवाजात. 




हिडीव सहाय्य  - Artizens 



आखाड्या

लेखक: तुळशीराम बांबळे

गाढ्ढीसा... मना न्याम्का ध्यान नैय, पर् मी तवा आम्च्याच् गावात् (माणिक्वोझ्राला) तिस्रीचव्थीला आस्ल...'आखाड्' निंगाल्या दिसापसून मही मोठ्याआय्य् मना म्हणाय्ची, तुम्या तळ्लारं आखाड् ...आम्या तळ्ला भवं, आन् मह्या हातावं "चुखुंड'' (चतकुर) भर माल्च्या ठिवाय्ची. माल्च्या हातावं पडताच् मी तिडून 'चिंगाट' धुम्म् ठ्वोकाय्चु. आन् आम्स्य्यावाल्य्या "कुय्टारी" (गवताने सेकारलेले) घराकं यय्यंचु. मंन्ग् त्यो 'चुखुंड' आमी पाच् भावांन्डा 'कुट्का-कुट्का' न भांन्डता 'वाटून-तिटुन' खाय्चु. आमी सम्दी पाच् "बईन-भावांन्डा" तेंच्यात् मी सम्द्यात् बारका हावु. त्या दिसी "आखाडी पूनवं" व्हती. म्या 'म्हाय्य'ला त्या संन्द्याकाळी 'आखाड तळ्-आखाड् तळ्' असा 'ठिंन्क्या' लाव्ला व्हता, आखाड् कसा तळीत्यात्? त्या ईचारला व्हता. तवा म्हाय्ना मना, 'भानवसीवं तयैवं तळ्लाय् पह्यै व्हय्' असा सांग्ला. आन् मंग् मना 'माल्च्या'च्या 'यड्याआस्याना' कुडं दम् निंगतुय्, म्या घाय्घाय्ना तयावरला ढाकान्न् उचाक्ला त् 'हिरय्यामिरच्या' तळ्यैल् व्हत्या . ती तळ्यैल् मिर्ची आमी भावांन्डा रोजच् खाय्चु. मंग मी हिरम्सून न् जेव्ताच् निज्लु.

निम्या रातीला म्हा'बा'ना मना येक्दम् झ्वापातुन् गध्गदा हाल्ईत जागी क्याला. असा मना म्हा'बा'ना झ्वापातुन् कदीच्च् उठाव्वला नवता. मना वाट्ला आथा खरीख्वोट् आखाड् तळ्ला आसल्. आन् मी ड्वोळं चोळीत् उठ्लू. तवर् म्हा'बा' कुडतरी निगून ग्याल्ता. मी ऊठून चुलीम्होरं श्याकाया बस्लो. म्हाय्य्ना चुल पेटून आंन्घुळीच्या टोपात पाणी तापात् ठिव्ला व्हता . पर् म्हाय्च्या ड्वोळ्यात् मना यग्ळीच् 'चमाक' त्या निम्या रातीला दिस्ली. काहीतरी भ्येटल्याचा उल्हास् 'म्हाय्य'च्या ड्वोळ्यामदी दिसोत व्हता. म्हाय्य् मना म्हण्ली ,"आरं आप्ल्या 'भुरीला' वास्रु झालाय्". आन् मी तसाच्च् 'सप्रीकं'(पडवी) पका रगीना पळालु.

तट्कीच्या आंगाला दारामंदीच् 'भुरी' उबी व्हती आन् बाजुला नईन पाव्ना 'वास्रु'. भुरी वास्राला चाटीत व्हती आन् मदीमदी 'हुक्कारत' व्हती. मव्हा दादान्-बाय् (भाव-बहीण) तिढच् बाजुला बस्यैल व्हती. वास्रु वर उठायची क्वोसीस करीत् व्हता. मदी मदी पुना खाली पडत् व्हता. मना लै नवाल वाटत् व्हता. त्या वास्रु जलाम्ल्यावं काही तासामंदीचं उटून् उबा रात् व्हता.
'दिसा-मासा' वास्रु म्वोटा व्हत् ग्याला. तांम्डा रंग, खाली प्वोटाला भुरकट तांम्ब्डा, बोल्क् ड्वोळं, कपाळाच्या मदोमध् तांम्ड्या रंगाला सोड्वान् म्हणुनं ढवळा टिप्का, भवरं पण् येक्दम् किल्लैर, बेंम्ब्टात येक्दम् सड्सडीत. आखाडात् (आषाढ महीना) झाल्ता म्हनुन म्हा'बा' त्याला "आखाड्या" म्हणू लाग्ला. गुरा चराया ग्येली का मी "आखाड्या" बरूबर ख्येळाय्चु. त्याला 'आंन्जाराय्यचु-गोन्जांरायचु'. तेचेसी ब्वोलाय्चु. मी साळातुन् ययचो तवर् जनाव्रा घरी ययेल् नसायची. "आखाड्या यैय् आखाड्या" असा म्या आवाज् देतुय् कुडंत्त् आखाड्या लग्यैच उठून बसाय्चा आन् मह्याकं पहून बारीक्बारीक् आवाजामंन्दी हांम्ब्रायचा. मंग मी "आखाड्याचा" दावा सोडून त्याला आंग्नातुन् पळवायचो. मंग् त्योय् बी मह्या मांन्गा पका 'रगीना' पळाय्चा. आमी यक्दम् जीवाभावाचं 'मैतर' झाल्तो. आखाड्याला मही भास्या नेम्की सम्जायची. मी त्याला 'कव्ळी-कव्ळी' गवताची पेंढी कापून् आनायचु. आखाड्या त्या कव्ळाकाचा गवात येक्दम् मज्यामज्याना खाय्चा. गव्ताची येकय्य् काडी वाया जावु द्याय्चा नै. काही दिसाना आखाड्या गुरांमदी रानात् चराया जाया लाग्ला.

आता मी मराटी साळातुन् राजुरा सर्वदय् हास्कूल्ला जात व्हतु . येक्दीव्सी म्हा'बा'ना मला राजुरातुन 'यसन'(वेसन) आनाया सांगित्ली. आन् त्याच दिसी संद्याकाळी आखाड्यैच्या नाकात 'ववली'. आखाड्या पार वाक्डातिक्डा झाल्ता. त्या टाय्माला यसन् ट्वोच्ताना आखाड्याचं हाल् पहून मना पका 'वंगाळ' वाट्ला. मीय् आखाड्याबरुबर लै रड्लो. तिनच् वरषात म्हा'बा'ना आखाड्याला औताला जुप्ला. आखाड्याला औताला जुपेल् पहून मना मेल्यावुनमेल्यासारका झाल्ता. मरणासन्न यातना व्हत व्हत्या. तवा मी लै आडकाठी क्येली होती "बा" बरूबर. पण उपेग झाला नय्य्. म्हा'बा'ना तेच्या 'ठिवणी'त्ली येक् "निबार् शी" हाड्सून मना बाजुला क्याला व्हता. आखाड्या जवा नांगोर वडायचा तवा मना लै "यद् ना"( वेदना) व्हयच्या . पर् "बा" च्या म्होरं मवा ईलाज खुटाय्चा. आन् मंग् मी मुकाट बांदावं पुस्तुक् वाचीत् बसाय्चो.
आखाड्या आता म्वाठा 'बईल्ल्' झाल्ता. म्हाबाचा सग्ळा अन्याय तो गपचीत 'चहन' (सहन) करीत् व्हता. तरी बी आम्च्या दोघांन्ची मैत्री काय्मव्हती. 'बा'ना आवुत् सोड्ला की मी त्यांना 'आड्व'ला राखनीच्या गवतात् चराया न्येयचु . अग्दी आंन्धार् पडत्तोर् मी जोडीला चारायचु. दुस्र्या बैईल्लापक्षी मी मुटभरकाव्हय्ना आखाड्याला "क्वांडा/चंन्दी" जास्ती चारायचु. पर् मंन्ग 'आखाड्या' आता जास्तीच् "चेहना" झाल्ता. तो त्याच्या जोडीवाल्यैची पण काळजी घ्यैयचा. त्याला जास्ती घालेल् वैरण, क्वोंडा-चंदी तो तेच्या पाटनरला सिलक् ठिवाय्चा. नाईलाजाना मला मंग ती वैरण् क्वोंडा तेच्या ज्वोडीदाराकं सरकावाया लागायची. मुक्या जन्वाराला किती 'समज' रह्यैतेय् ह्या तवा मला समाज्ला. माणसाना तेंच्याकून काई शिकावा आसा.
त्या साली जनाव्राली "खताची" (जनावरांचा संसर्गजन्य आजार) साथ् आली व्हती. त्या साथीत "आखाड्याचा" ज्वडीदार दगाव्ला. बरीच गाय्वास्रा पण त्या सातीत म्येली. आता "आखाड्या" आन् द्वनच्यार गाया उरल्या व्हत्या फक्ती. आम्ची बरीच हानी झाल्ती. काही गावांमंदी त् गोठ्च-ग्वोठ्च सुनाट् पड्ल. त्याच् साली मह्या आक्काचा(बहीण) बी लगीन् जम्ला. आता लग्नाच्या खर्चीचा कराय्चा काय? असा ईषेय् घरात सुरू झाला. क्वोंम्ब्ड्या आन् सेळ्या 'कट्वून' (ईकूण) बी लग्नाचा खर्च मिटत् नवता. मग सग्ळी ब्वाटा "आखाड्याकं" वळाली.
जसा आखाड्याचा ईषेय् निघाला त्या दिसापसून त्वांडावं गोदी पांघ्रून, मी म्हा'बा'चा आन् म्हाय्चा सम्दा ब्वोल्ना आय्कायचु. आखाड्या वपाय्चा??? आखाड्या वपाय्चा???

राजूरचा परद्क्क्षान (बईल्ल् बाजार) पंध्रा दिसवं आल्ता . त्या आट् दिवस् म्या आजाराचा ढ्वांग् घ्येवुन् साळाला दांडी मार्ली. मागून नाताळाच्या सुटया लाग्ल्या. मी रोजीला आखाड्याला घ्येवुन् राजुरच्या सिवारात् "वंग्नाच्या डवर्‍यावं" जावुन आंगुळ् घालाय्चो. त्याला आंधारपडस्तवर मोढ्याला चारायचु. कंदी कदी भावना येक्दम् दाटून् ययच्या. मंग आखाड्याच्या गळ्यात पडुन गळा काडून हाम्सून-हाम्सून् रडायचु. किती समज व्हती त्याला बी तो मही पाठण् चाटायचा. जास्ती येळ् झाला का मंग् हाळुहाळु घराकं निंगायचा. मी येत् नै पहुन् पुना माग् फिराय्चा. आन् मला शिंगाना हाळूच् ल्वाटायचा...

सेवटी तो दिवस आलाच्. रैवार सरला आन् सोम्वार् उज्याड्ला. आज राजुरचा 'परद्क्क्षान' "बा" ना घुंगरमाळा 'आखाड्या'च्या गळ्यात बांदल्या. 'माटवठ' कपाळावं बांदली. कास्रा लावला. म्हाय्यना सुपात "तांबकुडयचा" भात "आखाड्याला" खाया आन्ला. आखाड्याना भात् फक्ती हुंगला, खाला नय्य्.
बाना "आखाड्या" आरोळी द्याताचं तो जड पावलानी चलाया लाग्ला. मला 'बा' ना आदिच् तागीद् देवुन् ठिव्ली व्हती. " त्वा परदक्क्षानाला ययचा नै "...
आखाड्याला सोडाया, 'म्हाय्य'नं मी लपत-लपत् आर्ध्या वाटापोत् गेल्तो. मुरंबाटी सोड्ली.... आन् आखाड्या हंम्बराया लाग्ला. ती वाट् त्याला नईन व्हती. तसा आखाड्याचा चालणा मंदाव्ला. मागं फिरून हांम्ब्रायचा. धाईस् पाव्ला ग्यालान् चलाय्चाच् थांब्ला. "बा" चाब्काचं फट्कं आखाड्याच्या पायांन्व् हानाया लाग्ला. पण आखाड्या चलच्ना. आखाड्या तिड्च् बस्ला. बाना आखाड्याच्या सेप्टीला चाव्ला तरी त्यो उठना. मला ह्या सम्दा देख्वत/ हेरव्त् नवता... आन् मी आय्यला न् सांग्ताच्च् मुरंबटीकं पाचपाय्यरेच्या तेढानी 'चिंगाट' उडी ठोक्ली. मला हेरताच् 'आखाड्या' उठून् बस्ला. 'बा' पार घामागूम झाल्ता. न सांन्गताच् म्या बाच्या हातातुन कास्र्या घ्यात्ला. तसा 'आखाड्या' मह्या मांग-मांग् चलू लाग्ला. मगं देसमुखवाडीच्या दुदकेंन्द्राच्या ईहरीवं आखाड्याला पाणी पाज्ला. ईस्-पंचीईस् मीन्टात् आमी परदक्क्षानामदी पोह्चलु. खुटा ठोकीतोय्य् कुढं त् गिर्‍हाईकांचा आखाड्या भोती "भिरकिंन्डा" पड्ला.

आखाड्याला नासिकच्या तिकं 'सटाने'च्या गिर्‍हाईकांनी खरेदी केल्ता. मव्हा "आखाड्या" आता ल्वोकाचा झाल्ता. ती ल्वाका आग्दी खुशीत व्हती. 'बा' नं पैसं मोजून क्वोप्रीच्या खिस्यात घात्लं. आता आखाड्याला त्या ल्वाकांन्च्या गाडीपोत सोडायचा व्हता. तेंन्ची गाडी तिकं पिपारकना रोडला व्हती. पण त्या ल्वाकांकं कास्रा नवता. ते कासर्यासह आखाड्याला मागत् होते. हुज्जैत् खात व्हती. तव्हा म्हा'बा' गरजला... "कास्र्या आमी द्यैणार नै, यव्हार म्वाड्ला तरी बेहत्तर". मंग त्या ल्वाकांनी कुडून्तरी कास्र्या आन्ला. तवर् आमी आखाड्याला घ्येवुन् गाडीपोत् पिपारकना रोडला पोच्लु. 'बा' घुंगरमाळा आन् माटवठ सोडीत् व्हता. मह्याकं कास्र्या फेकून त्यो माणूस् म्हण्ला, "बांन्दरे भाव्ड्या ह्यो कास्र्या". ह्या सम्द्या गडबाडीत मवा आखाड्याकं ध्यानच् नवता. जवा कासर्या 'सोडाया-बांदाया' गेलु त् मलाच् रडाया आला. आखाड्याच्या दोन्हीय्य् डोळ्यातुन आस्रू वाहात् व्हतं... आखाड्या 'रडत' व्हता. 'बा' च्या पण ह्या ध्यानात यया यळ् नै लाग्ला. आता आम्ही तिघेही आवाज् न् कर्ता रडत् व्हतो. 'आखाड्या, बा आन् मी'.... शेवटी 'बा' ना आखाड्याच्या पाठीवरून सेवटचा हात फिराव्ला, आखाड्येच्या पाया पड्ला.... आन् खांद्येवरच्या उपारण्यात "हुंन्दका" लप्ईत् म्हण्ला...
"जा 'बा' तुला 'वतान' नै, जीढं जासील् तीढं सुकी रह्यै"

"आखाड्येची खरीखोट् गोट्"

शब्दांकन- निसर्गवासी - धोंन्ड्या बांम्बळ्याचा तुळ्शा
"लांब् डांन्गाणात"




Wednesday, July 11, 2018

संदेस - संतोष अनुसया दगडू मुठे

संवर्धन आपल्या भाषेचे ग्रुपवरील सर्व सदस्यांना जय आदिवासी, जय राघोजी...!

आजपर्यंत सांस्कृतिक मुल्ये व मौखिक भाषा जपणा-या आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक म्हणजेच आज आपण blog ची निर्मिती करीत आहोत. भविष्यातही आपणांकडून असाच प्रतिसाद लाभेल यात तिळमात्रही शंका नाही.

साहित्याची चळवळ ही माणसाला स्वत्वाची जाणीव करून देत असते. म्हणूनच साहित्याच्या चळवळीने जोर धरणे अपेक्षित असते. बदलत्या समाजरचनेबरोबरच आदिवासींच्या रुढी-परंपरा, ऐतिहासिक संस्कृती, सामाजिक एकात्मता व मौखिक संस्कृती लयास चालली आहे. अशावेळी आदिवासी बांधवांना आत्मसन्मानाची चळवळ वा-यावर सापडणार नाही. तिच्यासाठी स्वतःची संस्कृती, स्वतःचा इतिहास आपणच शोधून जगासमोर आणावा लागेल. हेच काम आपला संवर्धन आपल्या भाषेचे हा ग्रुप गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. आदिवासी बांधवांनी अनंत अत्याचार होऊनही जिला लिपी नाही अशी आपली भाषा, संस्कृती व इतिहास मौखिक पद्धतीने जपून ठेवला. याच मुक संस्कृतीला लिखित स्वरूप देण्याचे काम आपण करीत आहोत .

साहित्य हा एक संस्कृतीचा उन्मेश आहे. संस्कृतीचेच प्रतिबिंब भाषा आणि साहित्य यामध्ये उतरत असते. समाजाला संस्कृतीला व भाषाला जिवंत ठेवायचे असेल तर आदिवासी आस्मितेशिवाय ते शक्य होणार नाही. आज सांस्कृतिक आक्रमण, सामाजिक आक्रमण, बहूभाषिक आक्रमण व आर्थिक शोषण असे चहूबाजूंनी घाला होत असताना आजचा तरूणवर्ग आशावादी आहे ही एक जमेची बाजू आहे. त्याला शिक्षणाची दिशा बदललेली हवीयं...त्याला शिक्षणाची नवी दृष्टी हवीयं...प्राथमिक शिक्षणात बोलीभाषेला स्थान असावे असा आग्रह होऊ लागलाय...मावळी, डांगाणी व महालदेशी भाषांतून संवाद साधून आपण एकप्रकारे मौखिक भाषेला नवसंजीवनी देण्याचे कामच करीत आहोत. त्याच बरोबर नवख्या शब्दांचा संग्रह करून किंवा त्या शब्दाची उकल करून अनभिज्ञ असलेल्या बांधवांना त्याचा अर्थ सांगण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. आज अनेक बोली भाषा नष्टत्वाच्या मार्गावर आहेत. पुढील वर्ष UNO या जागतिक संघटनेने आदिवासी भाषा वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. अशावेळी आपल्याकडूनही भाषा संवर्धनाचा जास्तीतजास्त प्रयत्न व उपयोगात आणणे गरजेचे आहे. नवीन blog साठी हार्दिक शुभेच्छा....!

- संतोष अनुसया दगडू मुठे.



Tuesday, July 10, 2018

थोडेसे ब्लॉगबद्दल

भाषा ही संस्कृतीचा अविभाज्य आणि  प्रभावशाली घटक आहे. भाषा हा समाजमानसाचा सर्वात सुयोग्य असा प्रातिनिधिक आरसा आहे. संस्कारातून संस्कृती जपण्याचे काम फक्त भाषा करू शकते. भाषा नसेल तर संस्कार हे फक्त अनुकरणातून केले जाऊ शकतात, त्याला प्रचंड मर्यादा आहेत. म्हणून संस्कृतीच्या चिरंतन अस्तित्वासाठी भाषा महत्वाची आहे. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात अनेक अडचणी आहेत. भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी निर्मिलेली साहीत्यकृती त्या भाषेत असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आपल्याकडे असा जुना असलेला फक्त एखाद दुसरा शिलालेख आहे. किंवा दुसऱ्या भाषांच्या ग्रंथांत मराठीचा उल्लेख आहे. या एवढ्या अर्ध्या हळकुंडाच्या जोरावर आपण अभिजात असण्याचे दुकान थाटू इच्छितो आहोत. भाषा श्रेष्ठ ठरावी म्हणून भाषेला अभिजात दर्जा मिळणे हे आवश्यक नाही. आणि तो दर्जा अधिकृतपणे मिळाला नाही म्हणून मराठी अभिजात नाही हेही खरे नाही. अधिकृत दर्जासाठी आवश्यक असलेली 'जुने लिखित साहीत्य असावे'' ही अट मराठी पूर्ण करू शकत नाही. कारण भाषा लिहीली जाणे गरजेचे आहे हे मराठीला कधी माहीतच नव्हते. मराठी भाषा इतर भाषांइतकीच किंबहुना काय घ्या संस्कृतपेक्षाही जुनी असेल, फक्त ती लिखित नव्हती. लिहिणे हे मराठी भाषेच्या परंपरेचा भागच नव्हते. ज्या भाषेला लिपीच नाही ती भाषा लिहिली कशी जाईल? ही जी देवनागरी लिपी आपण वापरतो ती आपण उसनी घेतलेली आहे. त्यापूर्वी मराठीचे लिखाण मोडी लिपीत चालत असे. त्याहीपूर्वी ब्राम्ही-प्राकृत लिपी होती. पण हे सर्व लिहिणे सहसा दरबारी आणि व्यावहारीक लिखाणापुरतेच मर्यादित होते. खरेतर मराठी भाषेचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तिचे कोणतेही एकच प्रमाण स्वरूप नाही. ती वेगवेगळ्या बोलींचा समूह आहे. आज आपण जिला प्रमाण मराठी मानतो, जिच्यात मी हे लिहीत आहे, ती फक्त एका प्रदेशातील, म्हणजे पुणे-मुंबई भागातील बोली आहे, भाषा नव्हे. मराठीची 'दर पाच कोसावर पाणी बदलते आणि बारा कोसावर भाषा बदलते' ही म्हण मराठीचे स्वरूप अतिशय समर्पकपणे प्रदर्शित करते. मराठी भाषा टिकणे म्हणजे फक्त ती पुण्या-मुंबईतील बोली टिकणे असे नाही, तर ही दर बारा कोसांवर बदलणारी प्रत्येक बोली टिकणे म्हणजे मराठी टिकणे.
मराठीची अशीच एक खूप मधाळ अशी बोलीभाषा आहे डांगाणी.! हिला मावळी बोली असेही म्हंटले जाते. मात्र डांगी आणि डांगाणी या वेगळ्या बोली आहेत. मौखिक साहित्याने समृद्ध अशी ही आदिवासी बोली लिखित स्वरूपात मात्र अजिबात अस्तित्वात नाही. अगदी अलीकडे या भाषेत अल्पसे लिखाण होऊ लागले आहे. ही भाषा प्रामुख्याने मावळ भाग आणि अहमदनगरचा अकोले तालुका तसेच नाशिकचा इगतपुरी भाग या प्रदेशात म्हणजे ढोबळपणे भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर या पट्ट्यात बोलली जाते. आज प्रमाण मानली जाणारी मराठी काहीशी साचेबद्ध वाटते, कोकणी आणि वऱ्हाडी बोली या प्रमाण मराठीपेक्षा खूप गोडवा असलेल्या आहेतच पण त्यांचे एक राकट रूपही आहे. कोल्हापुरी ही तर पूर्ण रांगडी बोली आहे. या पार्श्वभूमीवर डांगाणी ही खूप मधाळ आणि गोडवा असलेली भाषा आहे. तीत अजिबात रुक्षपणा नाही. अगदी क्रोधाने बोलण्याचे शब्दही खूप गोड आणि रसाळ आहेत. शब्द बहुतांश सार्वत्रिक मराठीचेच, पण ते उच्चारण्याची लकब त्या शब्दांत जो गोडवा आणते तो काही औरच होय. म्हणी आणि वाक्प्रचारांनी प्रचंड भरलेली ही बोली आहे. खूप निरनिराळे शब्द आहेत, शब्दांची वेगवेगळी स्वरूपे आहेत. इतर कुठेही न आढळणारे प्रादेशिक संदर्भांचे कित्येक शब्द आहेत. या भाषेत लोकगीतांचा प्रचंड साठा आहे. अनेक प्रसंगी गायली जाणारी लोकगीते, भारूड, तमाशा, भजने, बोहाडा या परंपरांशी निगडित प्रचंड मौखिक साहीत्य आहे. फक्त मौखिक स्वरूपात असल्याने आणि शिक्षणात शिकविली जाणारी मराठी काही वेगळी असल्याने आता या भाषेवर लिखित मराठीचा प्रभाव वाढतो आहे. कोणतीही बोली वा भाषा ही केवळ एक संभाषणाचे साधन नसते तर ती हजारो वर्षांची अखंडीत परंपरा असते. धर्म, जात या संकल्पनांच्याही हजारो वर्षे आधी तिचा उद्गम झालेला असतो, आणि पिढीदरपिढी ती विकसित होत गेलेली असते. आता आधुनिकतेच्या रेट्यात जगातील समस्त भाषा प्रभावित होऊन हळूहळू अस्तंगत होणार आहेत हे तर स्पष्टच आहे. मराठी किंवा डांगाणीही याला अपवाद नाही. पण होता होईल तेवढे या अद्भुत बोलीचे लिखित स्वरूपात संवर्धन व्हावे म्हणून हा एक अल्पसा प्रयत्न.