सन्माननीय वाचक

Wednesday, July 11, 2018

संदेस - संतोष अनुसया दगडू मुठे

संवर्धन आपल्या भाषेचे ग्रुपवरील सर्व सदस्यांना जय आदिवासी, जय राघोजी...!

आजपर्यंत सांस्कृतिक मुल्ये व मौखिक भाषा जपणा-या आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक म्हणजेच आज आपण blog ची निर्मिती करीत आहोत. भविष्यातही आपणांकडून असाच प्रतिसाद लाभेल यात तिळमात्रही शंका नाही.

साहित्याची चळवळ ही माणसाला स्वत्वाची जाणीव करून देत असते. म्हणूनच साहित्याच्या चळवळीने जोर धरणे अपेक्षित असते. बदलत्या समाजरचनेबरोबरच आदिवासींच्या रुढी-परंपरा, ऐतिहासिक संस्कृती, सामाजिक एकात्मता व मौखिक संस्कृती लयास चालली आहे. अशावेळी आदिवासी बांधवांना आत्मसन्मानाची चळवळ वा-यावर सापडणार नाही. तिच्यासाठी स्वतःची संस्कृती, स्वतःचा इतिहास आपणच शोधून जगासमोर आणावा लागेल. हेच काम आपला संवर्धन आपल्या भाषेचे हा ग्रुप गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. आदिवासी बांधवांनी अनंत अत्याचार होऊनही जिला लिपी नाही अशी आपली भाषा, संस्कृती व इतिहास मौखिक पद्धतीने जपून ठेवला. याच मुक संस्कृतीला लिखित स्वरूप देण्याचे काम आपण करीत आहोत .

साहित्य हा एक संस्कृतीचा उन्मेश आहे. संस्कृतीचेच प्रतिबिंब भाषा आणि साहित्य यामध्ये उतरत असते. समाजाला संस्कृतीला व भाषाला जिवंत ठेवायचे असेल तर आदिवासी आस्मितेशिवाय ते शक्य होणार नाही. आज सांस्कृतिक आक्रमण, सामाजिक आक्रमण, बहूभाषिक आक्रमण व आर्थिक शोषण असे चहूबाजूंनी घाला होत असताना आजचा तरूणवर्ग आशावादी आहे ही एक जमेची बाजू आहे. त्याला शिक्षणाची दिशा बदललेली हवीयं...त्याला शिक्षणाची नवी दृष्टी हवीयं...प्राथमिक शिक्षणात बोलीभाषेला स्थान असावे असा आग्रह होऊ लागलाय...मावळी, डांगाणी व महालदेशी भाषांतून संवाद साधून आपण एकप्रकारे मौखिक भाषेला नवसंजीवनी देण्याचे कामच करीत आहोत. त्याच बरोबर नवख्या शब्दांचा संग्रह करून किंवा त्या शब्दाची उकल करून अनभिज्ञ असलेल्या बांधवांना त्याचा अर्थ सांगण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. आज अनेक बोली भाषा नष्टत्वाच्या मार्गावर आहेत. पुढील वर्ष UNO या जागतिक संघटनेने आदिवासी भाषा वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. अशावेळी आपल्याकडूनही भाषा संवर्धनाचा जास्तीतजास्त प्रयत्न व उपयोगात आणणे गरजेचे आहे. नवीन blog साठी हार्दिक शुभेच्छा....!

- संतोष अनुसया दगडू मुठे.



1 comment:

  1. पक्यालैय म्हजे म्वाकारच सनकेवं मनपुर्वक आदिम शुभेच्छा 💐

    ReplyDelete