सन्माननीय वाचक

Tuesday, July 10, 2018

थोडेसे ब्लॉगबद्दल

भाषा ही संस्कृतीचा अविभाज्य आणि  प्रभावशाली घटक आहे. भाषा हा समाजमानसाचा सर्वात सुयोग्य असा प्रातिनिधिक आरसा आहे. संस्कारातून संस्कृती जपण्याचे काम फक्त भाषा करू शकते. भाषा नसेल तर संस्कार हे फक्त अनुकरणातून केले जाऊ शकतात, त्याला प्रचंड मर्यादा आहेत. म्हणून संस्कृतीच्या चिरंतन अस्तित्वासाठी भाषा महत्वाची आहे. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात अनेक अडचणी आहेत. भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी निर्मिलेली साहीत्यकृती त्या भाषेत असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आपल्याकडे असा जुना असलेला फक्त एखाद दुसरा शिलालेख आहे. किंवा दुसऱ्या भाषांच्या ग्रंथांत मराठीचा उल्लेख आहे. या एवढ्या अर्ध्या हळकुंडाच्या जोरावर आपण अभिजात असण्याचे दुकान थाटू इच्छितो आहोत. भाषा श्रेष्ठ ठरावी म्हणून भाषेला अभिजात दर्जा मिळणे हे आवश्यक नाही. आणि तो दर्जा अधिकृतपणे मिळाला नाही म्हणून मराठी अभिजात नाही हेही खरे नाही. अधिकृत दर्जासाठी आवश्यक असलेली 'जुने लिखित साहीत्य असावे'' ही अट मराठी पूर्ण करू शकत नाही. कारण भाषा लिहीली जाणे गरजेचे आहे हे मराठीला कधी माहीतच नव्हते. मराठी भाषा इतर भाषांइतकीच किंबहुना काय घ्या संस्कृतपेक्षाही जुनी असेल, फक्त ती लिखित नव्हती. लिहिणे हे मराठी भाषेच्या परंपरेचा भागच नव्हते. ज्या भाषेला लिपीच नाही ती भाषा लिहिली कशी जाईल? ही जी देवनागरी लिपी आपण वापरतो ती आपण उसनी घेतलेली आहे. त्यापूर्वी मराठीचे लिखाण मोडी लिपीत चालत असे. त्याहीपूर्वी ब्राम्ही-प्राकृत लिपी होती. पण हे सर्व लिहिणे सहसा दरबारी आणि व्यावहारीक लिखाणापुरतेच मर्यादित होते. खरेतर मराठी भाषेचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तिचे कोणतेही एकच प्रमाण स्वरूप नाही. ती वेगवेगळ्या बोलींचा समूह आहे. आज आपण जिला प्रमाण मराठी मानतो, जिच्यात मी हे लिहीत आहे, ती फक्त एका प्रदेशातील, म्हणजे पुणे-मुंबई भागातील बोली आहे, भाषा नव्हे. मराठीची 'दर पाच कोसावर पाणी बदलते आणि बारा कोसावर भाषा बदलते' ही म्हण मराठीचे स्वरूप अतिशय समर्पकपणे प्रदर्शित करते. मराठी भाषा टिकणे म्हणजे फक्त ती पुण्या-मुंबईतील बोली टिकणे असे नाही, तर ही दर बारा कोसांवर बदलणारी प्रत्येक बोली टिकणे म्हणजे मराठी टिकणे.
मराठीची अशीच एक खूप मधाळ अशी बोलीभाषा आहे डांगाणी.! हिला मावळी बोली असेही म्हंटले जाते. मात्र डांगी आणि डांगाणी या वेगळ्या बोली आहेत. मौखिक साहित्याने समृद्ध अशी ही आदिवासी बोली लिखित स्वरूपात मात्र अजिबात अस्तित्वात नाही. अगदी अलीकडे या भाषेत अल्पसे लिखाण होऊ लागले आहे. ही भाषा प्रामुख्याने मावळ भाग आणि अहमदनगरचा अकोले तालुका तसेच नाशिकचा इगतपुरी भाग या प्रदेशात म्हणजे ढोबळपणे भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर या पट्ट्यात बोलली जाते. आज प्रमाण मानली जाणारी मराठी काहीशी साचेबद्ध वाटते, कोकणी आणि वऱ्हाडी बोली या प्रमाण मराठीपेक्षा खूप गोडवा असलेल्या आहेतच पण त्यांचे एक राकट रूपही आहे. कोल्हापुरी ही तर पूर्ण रांगडी बोली आहे. या पार्श्वभूमीवर डांगाणी ही खूप मधाळ आणि गोडवा असलेली भाषा आहे. तीत अजिबात रुक्षपणा नाही. अगदी क्रोधाने बोलण्याचे शब्दही खूप गोड आणि रसाळ आहेत. शब्द बहुतांश सार्वत्रिक मराठीचेच, पण ते उच्चारण्याची लकब त्या शब्दांत जो गोडवा आणते तो काही औरच होय. म्हणी आणि वाक्प्रचारांनी प्रचंड भरलेली ही बोली आहे. खूप निरनिराळे शब्द आहेत, शब्दांची वेगवेगळी स्वरूपे आहेत. इतर कुठेही न आढळणारे प्रादेशिक संदर्भांचे कित्येक शब्द आहेत. या भाषेत लोकगीतांचा प्रचंड साठा आहे. अनेक प्रसंगी गायली जाणारी लोकगीते, भारूड, तमाशा, भजने, बोहाडा या परंपरांशी निगडित प्रचंड मौखिक साहीत्य आहे. फक्त मौखिक स्वरूपात असल्याने आणि शिक्षणात शिकविली जाणारी मराठी काही वेगळी असल्याने आता या भाषेवर लिखित मराठीचा प्रभाव वाढतो आहे. कोणतीही बोली वा भाषा ही केवळ एक संभाषणाचे साधन नसते तर ती हजारो वर्षांची अखंडीत परंपरा असते. धर्म, जात या संकल्पनांच्याही हजारो वर्षे आधी तिचा उद्गम झालेला असतो, आणि पिढीदरपिढी ती विकसित होत गेलेली असते. आता आधुनिकतेच्या रेट्यात जगातील समस्त भाषा प्रभावित होऊन हळूहळू अस्तंगत होणार आहेत हे तर स्पष्टच आहे. मराठी किंवा डांगाणीही याला अपवाद नाही. पण होता होईल तेवढे या अद्भुत बोलीचे लिखित स्वरूपात संवर्धन व्हावे म्हणून हा एक अल्पसा प्रयत्न.



7 comments:

  1. नया वाटचालीसाठी पक्यालय शशुभे 🌷🌷🌷

    ReplyDelete
  2. ह्या लय भारी काम झालाय.
    आता मी लिवनारय यढाणी.

    ReplyDelete
  3. समदेंनी लिवायचा हाये

    ReplyDelete
  4. जाम भारी .... मला पण जमनार लिहायला
    मी पिवर डांगाणी

    ReplyDelete
  5. संवर्धन आपल्या भाषेचे ग्रुपवरील सर्व सदस्यांना जय आदिवासी,जय राघोजी...!

    आजपर्यंत सांस्कृतिक मुल्ये व मौखिक भाषा जपणा-या आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक म्हणजेच आज आपण blog ची निर्मिती करीत आहोत. भविष्यातही आपणांकडून असाच प्रतिसाद लाभेल यात तिळमात्रही शंका नाही.

    साहित्याची चळवळ ही माणसाला स्वत्वाची जाणीव करून देत असते. म्हणूनच साहित्याच्या चळवळीने जोर धरणे अपेक्षित असते. बदलत्या समाजरचनेबरोबरच आदिवासींच्या रुढी-परंपरा, ऐतिहासिक संस्कृती, सामाजिक एकात्मता व मौखिक संस्कृती लयास चालली आहे. अशावेळी आदिवासी बांधवांना आत्मसन्मानाची चळवळ वा-यावर सापडणार नाही. तिच्यासाठी स्वतःची संस्कृती, स्वतःचा इतिहास आपणच शोधून जगासमोर आणावा लागेल. हेच काम आपला *संवर्धन आपल्या भाषेचे* हा ग्रुप गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. आदिवासी बांधवांनी अनंत अत्याचार होऊनही जिला लिपी नाही अशी आपली भाषा, संस्कृती व इतिहास मौखिक पद्धतीने जपून ठेवला. याच मुक संस्कृतीला लिखित स्वरूप देण्याचे काम आपण करीत आहोत .

    साहित्य हा एक संस्कृतीचा उन्मेश आहे. संस्कृतीचेच प्रतिबिंब भाषा आणि साहित्य यामध्ये उतरत असते. समाजाला संस्कृतीला व भाषाला जिवंत ठेवायचे असेल तर आदिवासी आस्मितेशिवाय ते शक्य होणार नाही. आज सांस्कृतिक आक्रमण, सामाजिक आक्रमण, बहूभाषिक आक्रमण व आर्थिक शोषण असे चहूबाजूंनी घाला होत असताना आजचा तरूणवर्ग आशावादी आहे ही एक जमेची बाजू आहे. त्याला शिक्षणाची दिशा बदललेली हवीयं...त्याला शिक्षणाची नवी दृष्टी हवीयं...प्राथमिक शिक्षणात बोलीभाषेला स्थान असावे असा आग्रह होऊ लागलाय...मावळी, डांगाणी व महालदेशी भाषांतून संवाद साधून आपण एकप्रकारे मौखिक भाषेला नवसंजीवनी देण्याचे कामच करीत आहोत. त्याच बरोबर नवख्या शब्दांचा संग्रह करून किंवा त्या शब्दाची उकल करून अनभिज्ञ असलेल्या बांधवांना त्याचा अर्थ सांगण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. आज अनेक बोली भाषा नष्टत्वाच्या मार्गावर आहेत. पुढील वर्ष UNO या जागतिक संघटनेने *आदिवासी भाषा वर्ष* म्हणून जाहीर केलेले आहे. अशावेळी आपल्याकडूनही भाषा संवर्धनाचा जास्तीतजास्त प्रयत्न व उपयोगात आणणे गरजेचे आहे. नवीन blog साठी हार्दिक शुभेच्छा....!

    - संतोष अनुसया दगडू मुठे.

    ReplyDelete