सन्माननीय वाचक

Wednesday, August 8, 2018

दिवाळी गाणी (काळया वावरी बेलाचं झाड)

काळ्या वावरी बेलाचं झाड रं
काळ्या वावरी बेलाचं झाड

त्याचवर बसला सोंग्या मोर रं
त्याचवर बसला सोंग्या मोर

सोंग्या मोराचं लांब लांब पख रं
सोंग्या मोराचं लांब लांब पख

एक पख आखाडीला रं एक पख पखाडीला
एक पख आखाडीला रं एक पख पखाडीला

त्याला लावलाय गंभीरा नाडा रं
त्याला लावलाय गंभीरा नाडा

गंभीरा नाडाला पडला येडा रं
गंभीरा नाडाला पडला येडा

आमच्या गावाचा नाम्या येडा रं
आमच्या गावाचा नाम्या येडा

पाण्या पावसाची हाकीतो गाडा रं
पाण्या पावसाची हाकीतो गाडा

गाडा पळं गाडवाटाणं अनं नाम्या पळं आडवाटाणं
गाडा पळं गाडवाटाणं अनं नाम्या पळं आडवाटाणं




Saturday, August 4, 2018

हुकडी

हुकडी हा आपला आदिवासी पदारथ नसंल बरका. भुक लागली का प्वाॅटाची भुक मिटवाया लय भारी.यच्या 4/5 वड्या खाल्याका पक्का तांब्याभर पाणी पॅताय माणूस.मला वाटाताय याचा जल्म यखांद्या होस्टेलुत झाला असंल.कारण पूरबी होस्टेलुला तिन चपात्या अन वाटीभरच भात मिळायचा .लहानमोठ्याला समदेली सारखाच .म्हणून आपल्याच प्वाॅरांनी सोदून काढलेला पदारथ म्हंजी हुकडी.ह्या पदारथाची सुरूवात राजूर होस्टेलात झाली असा म्हणत्यात.मंग तिढून समदीकडं परसीदं.आमी होस्टुलात होतो तवाचा काळय भौ.अजुन ध्यान येताय .लय सादा , कमी टायमात , कमी पैशात तयार होणारा .आमाली तवा तॅल , साबाण , कटींगला महिन्याला 25 रू.मिळायचं .तवा आमी लय खुश व्हयचो.मंग आमी रातच्याला अभ्यास बिभ्यास करून झालेव 7/8 प्वाॅरा मिळून परत्येकानं 1रू 2रू वरगात काढायचू .अन त्या पैशाचा गुळ अन शेंगदाणे आणायचू .अन त्याला गव्हाचा पीट लागायचा ,तॅल लागायचा .मग ह्या समदा होस्टेलच्या सैपाकघरातुन आणायचा.ह्या समदा आणल्यावर वह्यांची रद्दी रहेचीच अमाच्याकं .मंग काय तिन दगडा मांडलेली रहेची .आमच्याकं टोप रह्याचाच .मंग आमी गप्पा मारत मारत कागद चॅटवायचू .टोप चूलीवर ठिवायचा .अन तॅल टाकून त्यात शेंगदानं टाकायचू.मंग तॅल त्यात गुळ टाकायचू .गुळाचा पाक व्हाॅयचा मंग थोडं थोडं त्यात पीट टाकयचू .जराश्याना झाली हुकडी तयार .तवर काही प्वाॅरा ताटाला तॅल लावायचू एक जण तांब्या किंवा गलास घेऊन सावद रह्याचा .मंग ह्या समदा माल ताटात उभरायचा अन मंग गलासाना सपाट करायचा .मंग त्येच्या बारीक बारीक वड्या करायच्या .याचा सुगंद तवर समदीकं जायाचा .मंग काई प्वाॅरा टपेलच रहेची .तयार झाली का लगीच हल्ला करायची.काई आंदीच दारा खिडक्या लावून घ्यायची .मंग समदी खाया बसायची .परत्येकाला 4/5 वड्या वाट्याला ययच्या पर समद्यांचा प्वाॅट भरायचा .लय आनंदाना खायचू भौ.मंग असा हा पदारथ करून आमी खायचू .म्हंजी यक परकारची शेंगदाण्याची चिक्कीच बरका.ह्या पदारथ खाऊन आज लय मोठमोठी लाॅका झाल्यात.त्यात कमिशनर ,डाक्टर मास्तर पोलीस अस्या हुद्यावं गेल्यात प्वाॅरा .तर काही शास्त्रज्ञ आपल्या राहुलदा सारखं.असा हा पदारथ .म्या अजूनही ध्यान आलेव करतोय बरका .पर भूकाला लय खास .पाणी लय पॅताय...
लेखक-मनोहर लांघी



Thursday, August 2, 2018

हाक गावाची

उंच डोंगरावरूनी, चांदाचा झुलतो झुला
आन चांदण्या जणूका, रानी पांगवली फुला

दूर हींडतो मज्याना, वारा म्वाकळं पाखरू
कोण थोपयील त्याला, आभाळच समदा खुला

आंगणात सांडयीते, रोजीला पिवळा सडा
पेटवून क्वोन ग्येला, आभाळी त्या ईस्तुला

बैल नांगरा वढीती, गायी पानवल्या घरी
रानमाळ तूडयीती, गूरांमांगं उभी मुला

आज पावसात काही, ग्येली भीजत ल्येकरा
कोण बोहयीत व्हता, वाढूळा त्या बाजुला

लांब चालली नदी, त्यीला जावून जरा म्हणा
त्वा मह्यार सोडला, म्वाठा सासार मिळो तुला

रोज गावच्या रस्त्याला, लायीती नजरा सदा
बा खतावला किती, आयीच्या बांध न आसुला

देवळात देव नाही, तू बी हारवला कुढं
यी फिरून रं घराला, सांगा 'आनंद' भाऊला





चांदाचा-चंद्राचा
ईस्तुला-विस्तवाला
बोहयीत- बोलवित
वाढुळा- बऱ्याच वेळेपासून
मह्यार-माहेर
खतावला-आठवणीने व्याकुळ झाला
आसुला-आसवांना