सन्माननीय वाचक

Showing posts with label आनभव. Show all posts
Showing posts with label आनभव. Show all posts

Tuesday, November 6, 2018

मह्यावाली पारध

पारध

मी दाव्हीची परीक्षा दिली व्होती आन् बिगीनाच सुट्या लागल्या साळत्ली गन्मानी मास्तरांक दिल्या जामा करूण आन् निघालू ज्याचत्याच्या  गावाच्या वाटाना जाता जाता रातच झाली व्होती. धरल्या मुक्काम गाड्या....
   मह्या झापाच्या (घराच्या) जळच येत व्हतु  त तेव्हढ्या कह्याचातरी खरबाडल्या वाणी आवाज आला. म्या त बॅहलूच व्हतु पर तीतक्या आमच्याच जवळ माळाव राहणारा एक मामा आला आन् म्हण कोणयर जवळ आला आन् म्हण सिताजी तुम्हीयत काय.. म्हन्ला हा तुह्या मुळ शिक्कार गेली ना..
म्या  म्हन्ला कयची आर मी बगेव बसलो  व्हतु पर तु अला तिकुन चौताळत गेली शिकमकार... मला म्हण लाग्ल्या का सुट्या म्हन्ला हा ऊंद्याक चल परधीव जाव म्या लगेचच हा म्हन्लु  आन गेलू घरी...
सकाळुच झावळ्याच तो मामा उठुन शिक्कारीच माग हेरीत हेरीत आला बुव्वा आमच्या झापाव
आन् मला म्हण लवकर भाकर खाऊन तयेरीत रहे आम्ही आलोच... आर्ध्या तासात आली बुव्वा पकीलैय जना  वाघुर, करंड्या, डंडे, हाडब, काठ्या घेउनच आली व्होती.. म्याय मह्या "बा" ला इचारला "बा" मी जाव का पारधीव बा म्हन्ला तुला काय जमाताय त्या पारधीचा काम लैय वंगाळ काट्या-कुट्यातुन हिडाया लागाताय. नैय बा म्या जाइलच म्हनलु आन् गेलू त्यांच्या संगा जाळीच्या देवाच्या पाया पडुलन म्होठ्या आडवाला घातल्या वाघुरी दोघजन ठुवल  वाघुरीव बाकीच आम्ही पार मांग गेलू आन पैल्यांदा लाईन लाऊन घेत्ली मला मंधी ठुवला. केली खोडायला सुर्वात
टनटन्या बारीक सारीक झुरमुंडा गुडग्या एवढ्याल्या गवतातुन हा. हो. व्हा करीत करीत मोहर मोहर चलत रैलो वरून दोन नंबर गड्याच्या पाथाव   उठली शिक्कार व्हा.. हा  व्हा...हा व्हा....हा आसा करीत करीत व्हती पर मला काय उम्जना.?
तितक्यात मह्याच मोहर आली शिक्कार तव्हा मला म्हन आर दटाव आन पळ त्याच्या मांग शेपाट त्याला मंग काय म्याय ज्याम व्हा... व्हा... व्हा करीत मर म्हणून पळालू डारीक वाघुरीत नेऊन पाडला वाघुरीवाल दोन गडी आल आन मोडला जागेवच...
     नेला नदिव खडकाव केल वाट वाघुरीचा वाटा काढला दोन कुत्र्यांचा एक वाटा काढला मंग आमच पारध्यांच वाट कढला  पार झावळा पडला व्हता गेलू तसाच झापाक आन दिली सगोती आयना नदिकुन खराट्याच्या हिरय्या काड्या आनुन चूल्हीच्या डहारात भुजून मिर्चीमसाला वाटला मंग बाज्रीचा रोम आन तांदळाची कणी करून जोरात कोरड्यास केला व्हाता त्याची चव आजही मला सारखीच आठवण करूण देतीय आशिझाली मह्या जिवनात्ली शिकारीची सुरवात
धन्यवाद
म्या अर्जूना बांड्याचा दुंद्या उर्फ (सित्या) मो. 9881141685




याटाळणी

याटाळणी

   आज आम्हाकला आकराईचा लास्टचा पेपर व्हता. सामाय परीक्षा एवडी महत्वाची नवती.  आमाली पेपरची नाय घरची ओड लागली व्हती. म्या उजाडायाच गोहेच्या ओढेव टाईल घेउन गेलो.
     पका गारठा व्हता. गारठेचच दिवस व्हत. पाटकन जाउन कडुलिंबाची काडी आणली. पटापट दात घासलं.  दसर्या वडकर आगुदरच पाण्यात उडाल्ता. 
म्या ईचारला" पाणि गार ये कारे?". तो म्हंगाला नाय.
   तसा पायला त आमाली समद्या आदिवासी पोरांनली एवढुसा आसल्या पसुन गार पाणेची आन पोहेची सवय. मास जेवढ येळ पाण्यात नसतील तेवढी यळ आमची प्वारा पाण्यात आसत्यात.
   हा त म्या पाण्यात हात घातला. मंग ती ब्वाटा कानात घातली. अन धापकान उडी मारली. तवर समदी प्वारा आलती.  मी शेलन मारीत दसर्याला शिवाया गेलो.  दसर्या कुतार पोहन्याना पुढ पळाला. आमाकला शिवाशिवीचा ख्येळ पका टाईम चालला.
   गारठा आमची जिद्द पाहुन लाजला आसल.
    पटापट आवरुन आमी आसरम मधी आलो. जेवयच बेल झाली.( आश्रम शाळेतील जीवन यावर नंतर लिहायचा विचार करतोय).
हा त पटापट कामाठेनी वाडला आमी पटापट जेवलो. आमाली घाय होती पण पेपरची नाय घरी जायेची. जेऊन झालेव म्या पेटी उघडली.  माही थिगाळ लावलेली पिशई काढली. एक प्यांट आन एक बंडी तेच्यात भरली. माह्याक द्वान प्यांडी अन द्वान बंड्या व्हत्या. आम्या सरळगावावरुन लिलावाची आनली व्हती. तवा प्यांड पाच का सहा रुपये अन बंडी चार का पाच रुपयाला व्हती.
    हा त म्या कापडा भरली. तेवड्यात पेपरची बेल झाली.  माह्याक पेन नवता. एक नळी व्हती. आमच्या सरानी पेपर दिला. यकय प्रश्न ओळखीचा नवता. कय तरी मुंबई ची राजधानी कोणति अन दिलीचा देश कोणता. असा कायतरी आल्ता. म्या हा रपाटा लावला. पार पेपर खपावला.  पोरानली वाटला मि हुशार का काय. कारण म्या यक पुरवणी घेतली व्हती. मफल्याला एकच प्रश्न आवाडला. नदीचे कार्य लिहा. म्या समद कार्य लिवलं.  पार आमच्या गावातल्या लग्नाकार्याचा पण लिवला.  कारण आसाण्याला असताना पवार सरांनी सांगितलेला व्हता पुर्ण पेपर सोडवा.  कसातरी पांढर्याचा काळा करुन नीघालो.
     चार वाजता यसटी आली. आमी डिंब्यात चढलो. माह्याक तिकाटापुरती पैस व्हतं. सात वाजता घरी पोचलो. माह्या आयना पका भारि ज्यावान केल्ता.  नाचणेची भाकर अन कांद्याचा  कालवान. माहा रामा याणार म्हणुन आयना भागाबायच्या इकडुन कांद आणलं व्हतं. जेऊन घोंगडी टाकून झोपलो त सकाळीच उठलो.
   बायेर लगबाग चालली व्हती. हा ईळा लावलाय तो नाय असा चालला व्हता. 
मफल्याला ईलायती ईळा दिला. त्याना हात नाय कापत असा म्हणत्यात.  मंग आम्या वाघमाळातली जीर कापाय घेतली. मला यावढा पटापट नवता जमत. पण दुसरी माणसा पटापट कापीत व्हता. कापुन चांगल्या आळाशा घालित व्हती. मफल्या आळाशा कशापण असयच्या पण कोणीच मफल्याला नाय बोलला.
     दहा वाजलं असतील.  दांबाडशेग्यातुन  द्वान पोरी याताना दिसल्या. जवळ आल्याव कळला तीच पोर हाये. म्या पटापट कापाया सुरवात केली. तीला वाटावा रामा लय काम करतोय. पण मजेची गोट म्हणजे ती आमच्या खाचरापशी आलि अन माह्या आयला म्हंगाली, " सुंदरेआते माह्या बापाना आज तुमच्याक म्वालाना पाठावलाय."
  माहा आनंद गगनात मावत नवता. मी आपला यक चुड कापयचो अन तिच्याक पायचो. परत यक चुड कापयचो अन तिच्याक पायचो. असा करता करता समदा खाचार कापुन झाला...........
     
 आवफ्याचा
            रामा लोखांडा



Monday, November 5, 2018

हापसी

हापसी

भायेर पका ऊन व्हता. मी आपला बारीक जातेव नाचण्या दळीत व्हतो. तसा पायला त दळणा पोरीचा काम. पण आमच्या घरात आमी तीघ भाव. आमाली बईन नाय.
  मंग आय मला दळायला सांगयची अन महा मोठा भाव सोपन्याला कांडाया सांगायचि.  तेच्या मोठा भाव दिन्या तो आय बापाबरोबर बायेरच्या कामाला जायचा. फाट्या बिट्या आणाया.
        हा त त्या दिसी मी दळीत व्हतो.  अन तेवढ्यात शंकरची नंदा पाणी प्या आली. तिना पायला अन म्हंगाली, " रामा काका तु दळीतोय काय मला वाटला सुंदरीआजी दळीतेय का काय?".
तीना तिच्याबरोबर आलेल्या बायेनला सांगितला का बग पोरगा असुन दळीतोय.
    खर बोलायचा त शीरी-पुरुष समानता आमाकल्या आदिवासी भागातच हाये. समदी कामा समदेनी करयची. 
      सांच्यापहाराला आय आली . फाट्याचा भारा टाकला. मंग थोड्या बाता केल्या. बायेर ठेवलेला पाण्याचा हांडा पार खपला व्हता. पकी ल्वाका रानातुन आलेव आमच्याइथ पाणी प्या यची.
पाणी देणं पुण्याचं काम हाये असा माहा बाप सांगायचा.
   दिवस बुडाया आल्ता. आय म्हंगाली "दिन्या चल आपन याक ख्याप पानेचि आणू. बा रामा तु पण चल."
     आमाली पाणी मदल्यावाडीच्या हापसीव मिळायचा. खर पायला त त्या हापसीव गेटाचीवाडि, मधलीवाडी, जळकीवाडी आन आमी पान्याला जायाचू.  दिवसभर नंबर लावाया लागायचं. तवा कुट द्यान हांड मिळयच.
कंधि कंधि पकी भांडणा व्हयेची नंबरावरून.
    हा त मि आय आमी हाडं अन चुंबळी घेऊन निगालो. मधी रम्या सरपंच दिसला तो मफल्याला " ये राम तु कह्याला पाण्याला चाललाय, तु बारावी साईन्सला शिकतोय अन तु पाणी वाह्या लागला त आमच्या बायका आमाली पाण्याला नाय का पिटावणार."
  सरपंच माहा मेव्हणा लागत व्हता म्हणून मफल्याला चिडवित व्हता.  तसा मफला स्वभाव काॅमेडी आसल्या मुळ लय ल्वाका मफल्याला चिडवयची. मंग मी पण चिडवयचो.  पण या स्वबावामुळ मफल्याला कंधिच टेंशन नाय यत जीवनात.
    आसाच पुड चाललो व्हतो, मागुन आवाज आला" सुंदरे आते थांब मफल्याला यवदे पाण्याला".
 म्या माग वळुन पायला त ती पोर व्हती. आग बाबव पक्या आनंदाच्या उचमळ्या आल्या. मफल्याला स्मित हासाय आलि.  अंगात येगळीच हालचाल झाली. मी मुदाम माग माग राह्या लागलो.
    आमी हापसीव पोचलो . तिथ नंबर व्हतं.  मी बरोबर तीच्या समोर निरगुडी खाली बसलो. लय मोठा निरगुडीचा वंद व्हता.  मी तिच्याक पायचो.  तिना पायला का दुसरीक कुणीकतरि पायचो.
    तेवढ्यात आमचा नंबर आला. माही आय म्हंगाली बा रामा थ्वाडा हापस बर. मी हापसाया गेलो. एक नदार हापसीव अन नदार तीचेव. 
   तेवढ्यात याक आकरीत घडला. ती म्हंगाली " आते मी रामाला हापसु लागते".
 अग बाबव मफलं ह्रदय पका जोरात चालाय लागला. ती आली आन मफल्या हातापशी हात धरून हापसाया लागली. माह्या आयला ईशेश काय नाय वाटला.  पन मफल हात पाय टणटणा उडत व्हतं.
     कंधि हांडं भरलं, कंधि आमी नीगालो कळलाच नाय. आज माह्याक हांडेनची दुडि व्हती पण त्या वजान पावशेर हाये आसा वाटत व्हता. आज मफलं पाय तुरुतुरु चालत व्हतं.  माहा घर आला तवा मी भानावर आलो.......



Sunday, November 4, 2018

वाघबारस

पिपारगणेची वाघबारस
 
   सांच्यापहारचे चार पाच वाजलं असतील.  दिवस बुडाया आल्ता.  मी गुरा घेवुन घरी आल्तो.  तवा म्या पघितला.  माही आयबापा नईन कापडा घालुन. कुणीकतरी निघालती.  म्या ईचारला,"तुमी कुणीक चाल्यात".
 आय म्ण्हगाली " पिपारगण्याला बारशीला,  उद्या बारस हाये, आज आमी जागरणाला, अन भजनाला चाललोय".
  म्या ईचारला " म्या यव".
आय म्हंगाली" ऊंद्या ये वाराला "
   असा म्हणून माही आयबापा गेली. मी जावा का नाय जावा या ईचारात व्हतो.
 तेवढ्यात संत्या आला आन म्हंगाला " ये रामा , ती पोरगी येणारेय"
 अग बाबव , ती येणारेय म्हणल्यावर मफल्याला जायाच पायजे.
  ती म्हणजे ती पोरगी🙈🙈🙈🙈.  मफल्याला लय आवडायची. तीला मी आवडायचो का नाय माईत नाय. पण कुट वाटला भेटली आन अन माह्याक पाह्यला का. आग बाबव,  त्वांड महा लाजना पार लाल व्हयाचा. माही गुरा मी मुदाम तिच्या शेरड्याच्या जवळ नियचो. 
  अन ऊगाच काही ईचारयचो," केवढ किरव धरल, अमुक तमुक ". ती पन सांगयची.  मफल्याला वाटला ती माह्याव मरतेय.
      म्हणून म्या बारशीला जायाचा ठरावला.
   दुसर्या दिसी उजाडायाच मी उठलो. आमच्या पितळच्या तांब्यात इंगळ भरल अन कडाक ईस्तारि केली. मंग मी ,संत्या, नाम्या, संजिप, अन अजुन पकी प्वारा निगालो. 
   आयना काल जाताना पाच रुपये दिल्त ते चोर खिशात ठीव्ल. अन गवारटेर्याकुन दांडादांडाना आमी वाघयाला पोचलो.
    मंग हातईचकुन काठी आली. पक्या बायेंच देव आल्त. 
    कोंढवळची पण काठी आली. आमी पाया पडलो. अन समद्या खावांच्या दुकानासमोरुन फिरलो. पाच रुपयात काईच नवता येत. मंग म्या निसता खावाचा वास घ्यातला माहा प्वाट भरला.
      त्या पोरीला चईन घ्यावा म्हणला पण चईन धा रुपयाला. मंग मी भराडेच्या दुकानापसुनही पळालो.
     संध्याकाळी कुस्त्या पायल्या.  मी ख्याळणार व्हतो पण म्या लईच काडी पईलवान.  मफल्याला कोणीय बुदक्यान आपटील.  मंग मी मागच ऊभा रायलो. 
    सकाळी गेलो तवा आन याताना वाघयेच्या पाया पडलो.
  लोकांची पोरा भराड्याकडच्या शिट्या वाजईत नीगाली, म्या आपला फक्त त्यांचा आवाज आयकत आन चोरखिशातल पाच रुपये चाचपत घरी आलो.......
        रामा लोखांडा
                      आवफा



Saturday, November 3, 2018

डोंगरातला भैरोबा

डोंगरातला भैरोबा
मी वाघमाळाला रह्यतोय. गाव आमाकल्या घरापसुन लांब हाये. मफल्याला पिचेरची पकी आवड. तवा टिवी मदल्यावाडीत व्हती. पिचेर आट वाजता चालू व्हयाचा आन आन आकराला खपायचा.  मी आपला माग जावुन बसयचो.  ल्वका लावतील त्या पाह्यचो.
     त्यावढा पिचेर खपला का मी रातशीच निघयचो.  दांबाडशेग्यातुन यवस्थित जायचो. मी भुतानली लय भियेचो.  मंग भैरोबा भैरोबा म्हणीत आंधारात उड्या मारीत गेलो. हळूच कवाड उघडुन घरात जाऊन झोपलो.
      सकाळी ऊजेडायच्या आगुदर मफल्याला जाग आली. माहा आंग थ्वाडा तापला व्हता.  माह्या आयना माह्या बापाला सांगितला. महा बाप लगेच डोंगरात ग्याला खेतोबाक. गार्हाना लावला.  अन येताना सादडेच्या पानात आंगारा आणला. माह्यावरुन ऊतारला.  मला आंगारा लावला अन सुर्याच्या बाजुला फुकला.  सांच्यापाहारापरयन्त मला थ्वाडा बरा वाटाया लागला.
  सकारात्मक ईचार का भैरोबाचा गूण पण मी बरा झालो.
बा भैरोबा समद्यनली सुखाचा ठिव.



Saturday, August 4, 2018

हुकडी

हुकडी हा आपला आदिवासी पदारथ नसंल बरका. भुक लागली का प्वाॅटाची भुक मिटवाया लय भारी.यच्या 4/5 वड्या खाल्याका पक्का तांब्याभर पाणी पॅताय माणूस.मला वाटाताय याचा जल्म यखांद्या होस्टेलुत झाला असंल.कारण पूरबी होस्टेलुला तिन चपात्या अन वाटीभरच भात मिळायचा .लहानमोठ्याला समदेली सारखाच .म्हणून आपल्याच प्वाॅरांनी सोदून काढलेला पदारथ म्हंजी हुकडी.ह्या पदारथाची सुरूवात राजूर होस्टेलात झाली असा म्हणत्यात.मंग तिढून समदीकडं परसीदं.आमी होस्टुलात होतो तवाचा काळय भौ.अजुन ध्यान येताय .लय सादा , कमी टायमात , कमी पैशात तयार होणारा .आमाली तवा तॅल , साबाण , कटींगला महिन्याला 25 रू.मिळायचं .तवा आमी लय खुश व्हयचो.मंग आमी रातच्याला अभ्यास बिभ्यास करून झालेव 7/8 प्वाॅरा मिळून परत्येकानं 1रू 2रू वरगात काढायचू .अन त्या पैशाचा गुळ अन शेंगदाणे आणायचू .अन त्याला गव्हाचा पीट लागायचा ,तॅल लागायचा .मग ह्या समदा होस्टेलच्या सैपाकघरातुन आणायचा.ह्या समदा आणल्यावर वह्यांची रद्दी रहेचीच अमाच्याकं .मंग काय तिन दगडा मांडलेली रहेची .आमच्याकं टोप रह्याचाच .मंग आमी गप्पा मारत मारत कागद चॅटवायचू .टोप चूलीवर ठिवायचा .अन तॅल टाकून त्यात शेंगदानं टाकायचू.मंग तॅल त्यात गुळ टाकायचू .गुळाचा पाक व्हाॅयचा मंग थोडं थोडं त्यात पीट टाकयचू .जराश्याना झाली हुकडी तयार .तवर काही प्वाॅरा ताटाला तॅल लावायचू एक जण तांब्या किंवा गलास घेऊन सावद रह्याचा .मंग ह्या समदा माल ताटात उभरायचा अन मंग गलासाना सपाट करायचा .मंग त्येच्या बारीक बारीक वड्या करायच्या .याचा सुगंद तवर समदीकं जायाचा .मंग काई प्वाॅरा टपेलच रहेची .तयार झाली का लगीच हल्ला करायची.काई आंदीच दारा खिडक्या लावून घ्यायची .मंग समदी खाया बसायची .परत्येकाला 4/5 वड्या वाट्याला ययच्या पर समद्यांचा प्वाॅट भरायचा .लय आनंदाना खायचू भौ.मंग असा हा पदारथ करून आमी खायचू .म्हंजी यक परकारची शेंगदाण्याची चिक्कीच बरका.ह्या पदारथ खाऊन आज लय मोठमोठी लाॅका झाल्यात.त्यात कमिशनर ,डाक्टर मास्तर पोलीस अस्या हुद्यावं गेल्यात प्वाॅरा .तर काही शास्त्रज्ञ आपल्या राहुलदा सारखं.असा हा पदारथ .म्या अजूनही ध्यान आलेव करतोय बरका .पर भूकाला लय खास .पाणी लय पॅताय...
लेखक-मनोहर लांघी



Tuesday, July 31, 2018

सागोतीचं ठाव

तिसऱ्या पहारी पडलो होतो चीचखाली घोंगडी टाकून पक्या माश्या तोंडाव घोंगघोनं करीत.. तरी पण तसाच पडून व्हतो. गार वारा सुटला तसा मार्त्यादाचा पक्या येऊन बिलागला.. आसा दिला कनाय तडाका ठिऊन, एक त झॉप मॉड केली. तसा वैनींना आवाज दिला ब्वा.. दाजीबा किती झॉपाता कायनू त्या तिकडं चोहंडीक ह्यारा किती लॉका जमल्यात ह्यारा.. डोळं चोळीतच उठून बटवा चापसाया लागलो त बंडीच्या खिशातय ह्या माया ध्यानात आला. इकडं तिकडं ह्यारला त पक्या मेहडीपशी फुसफूस करीत व्हता. त्याला हाक मारली... पका...तमाकू आन र बा मायीं तेवडी... तेवड्यात डाफारलाच पॉर.. मंगाशी मला माराया तवा कसा.. मी नय जा.. आर आन बाळा तुला न्हेतो ना चोहंडीक बाव आणाया. तवा कुड आणली त्याना तमाकू.. वैणीला काय म्हणायचाय ह्या माह्या ध्यानात आलाच व्हता. बटया बरबर पितळी आन कोयतायबी दिला व्हता तिना पक्याक.. तमाकू चोळीतच उठलो न चालाय लागलो त पॉर मागच पितळी वाजीत चालल्याला.. गेलेव समदी तयारी. बकरू कापला त कॉण सागळ काढाया त कॉण देड धिवाया, वाघ्याबा रक्ती शिजवाया, तासाभऱ्यात उराकला. भोऱ्यादाना येतानाच खराळाकून सागाची पाना आणलेली. खांडखुंड झालेव पाना आथारली.. नानांनी सांगितला पोराणली रक्ती द्या, तवर कारभारी येतील ते आलेव करतील ठाव... कारभारी आलं, तवर रक्ती खाऊन झाली व्हती. मंग वाटी वाटी भरून सागाच्या पानाव ठाव केलं. हाडका, मवशी, वजडी, काळजाच बारखानल तुकडं, प्रत्येकाना आपापला ठाव उच्याल्ला पितळीत ठिवला न झावळा पडस्तवर घरी गेलं गडी ठाव घेऊन.. आन पितळ्या भानवशिव ठिवल्या तिथून पूड मंग कांजी आन मंग ज्यावना...
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🙏
गणपत रामचंद्र कोंढवळे, कळंबई



Wednesday, July 25, 2018

गळ

तसा गळांच बरचलय परकारयत पर मंग आपल्याक डांगाणात तिनच परकारच गळ वापरीत्यात म्हणून म्या मह्या आठवणीची गोठ सांगतोय.
       गळान मास धरायची पकी जूनीच कला हाय.
मला आठवाताय तसा आमच्याक त सगळी लाॅका ज्याम गळाव जात्यात. मोक्कार मास धरीत्यात बरका.
तसाच एकदा  मी बारीकच होतु सकाळची नेहरी झालेव मी चूल्हीमोहर शेकत बसलू व्हतु तेवढ्यत मह्या मोठ्या भावाना खळ्याक जाऊन हाक मारली आन् सांगातत्ला सित्या  टिकाव नथ कुडावना आनर मी झापाच्या बहेर निघालू आन् दारातल्या सपरीला टिकाव, कुडावना, व्हाता पर मंग म्या त्या नैय नेला कुदळीच नेली. इच्चरला कयाला लागतीय र त भाऊ?
म्हण गांडुळ खनाया आन् ते गांडुळ कयाला?
त म्हण गळाला लावाया.
आन् म्या परत इच्चारला गळ म्हंजे?
आर मासेली गळ लावयचा आन् ते मास गांडुळ खाया म्हणून येतत आन् गळच तेंच्या तोंडाला रूतुन जातोय आन् मासा पका तरफडोतोय मंग आपुन गळ ऊडऊन घ्याचा तो मासा पीसइत ठुवायचा तसाच करून करून पक मास धरायच आन् संद्याकाळी आय मास्यांचा कोरड्यास करील आपलेली खाया...
तीतक्यात मला भाव म्हण्ला पळत पळत व्होय र दात मंजनीचा रीकामा डबा आन.
मी पळत पळत घरी गुलू डबा आनुन दिल्हा मंग ते सगळ गांडुळ त्या डब्यात भरून, द्वान ऊडाव गळ घेऊन नदिक गोलो आम्ही दोघ भाव.
गळाला गांडुळ लाऊन टाकला. लगेच बाळोखी  लागली मह्या गळाला आन् ऊडावला गळ घेतली काढुण परत लावला आसायकरू एेक्याच जाग्याव मला सात मास लागल तवा पसुन भाऊ मला सारखच घेऊन जायाचा एका दिसी काय झाला मी एकटाच मासेली गेलू  व्हतू नदिचा पुर ओसारला व्हाता आन् गढुळीही कमीच व्हती म्या लावला गळ मासाच लवकर लागना मीइच्चारातच पडलू काय झाला बुव्वा?樂
मंग वजच गळ काढला हेरीतोत काय गांडोळा सगट खेकड घेऊन गेली मह्यावाला गळ. म्हन्ला आता परत घरी गेल्याव काॅलदांडाच...
पार हिंगमोड होऊन निघलू परत झापाक (घरी) चलता चलता वावराच्या मेंडाक ध्यान गॅला त पकीना आळींम व्हाती मंग ज्याम आळींम नेली घरी आयना मासेली वाटेल मिर्चीमसाला आळम्बीच्याच कालवाणात घातला व्हता. मास्याच्या आन् सागोतीच्या कालवाणा सरखाच लागला रातच्यायळी मह्या "बा" ना इच्चारला कायर शिकारी आज आळीमीची शिकार केली.? मंग म्या "बा" ला सांगात्ला मह्यावाला गळ खेकडीना खुडुन नेला ना .
तव्हा मव्हा "बा" सांगाया लाग्ला आर गाडीस्या आता उडाव गळाला मास नैय लाग्नार ह्या दिवसात खुटगळ लावाया लागतत.
त्यांचाय शिजन रह्याताय उडावगळ (छडी) , खुटगळ, चमक्यागळ आस तेन्च परकार रहेतत.
मंग म्या तीन्ही शिजनाच मास धर्ल त्याच सालापसुन मास धराया शिकलो...
मी. आर्जूना बांड्याचा सित्या



पानेची पहाळी...

जेठातला इजांचा कडाका चालूच व्हता,आन वाराय सुटला व्हता. म्हतारीआय चुलीपुढं इस्तू पेटइत व्हती. तसा मागचा दार धाडदिशी वाजला..
आय पळतच दाराक आली न पहेते त काय, आभाळ भरून आला व्हता.  कंच्याय टायमाला पाऊस येणार व्हता, तशी आय वराडली, बारख्या पॉंरा कुडयात पग जरा, तिला राहवलाच नय..
म्हतारी आली तवर मोठी पहाळी आली म्हणून आमी पोहळीला कोंबड्या बसत्यात तिथं बसलो ..
म्हतारीना पदराखाली धरून आमाली चुलीपुड बसवून पितळीत च्या पेया दिला ...
मंग दारामाग उभं राहून पाऊस हेरीत रयलो..
गणपत रामचंद्र कोंढवळे...



Friday, July 20, 2018

आगोट

आगोट
मफल्याला अन्जुन आठावताय,
तवा मी सा-सात वरशाचा आसल.
मिरुग निगयच्या अगुदर ल्वाका भाता आन नाचन्या पेराया जायेचि.
मफल्याला मफली आय म्हनयची 
"  बा करपाचा बुतारा घ्ये आन तुया बापासंगा जा रोपा पेराया". म्या आपला पका गमज्या उडईत बापाच्या सन्गा जायचो. माहा बाप सरवा सरजाम आन आम्च द्वान बईल घेऊन दरीला जायाचो.
माहा बाप घमेल्यात वायसा प्यारायचा भात घेयाचा आन सम्द्या रोपात प्यारायचा. 
मन्ग माहा बाप यवसतीत आऊत जुपायचा अन मफल्याला म्हणायचा" बा तेवडी आरज्या बयलाची जोती चांगली बान्द ".
मी आजाबात भेत नवतो आमच्या आरज्या बईलाला, पका गरिब बईल व्हता. पन आमचा मिंडा सरज्या बईल लय बेकार व्हता,निसता माराया धावुन याचा. तो आला का म्या पडाळीक पळुन जायचो. बाबव लय भेयचो.
     माह्या बापाना औताना नांगारला का म्या लगीच बुतार्याना हिकडुन तिकड भात करयचो. माहा बाप म्हनायचा " बा र्हावदे तुफल्याला नाय जमायचा.

माह्या आयला ज्यावान कराया लय येळ लागायचा. कारन चुलीला लावयची फाट्या  पकी वांबाट आसयची, येळत पेटयचीच नाय. आम्हाकली फाट्या आमी लवलाच भरुन ठिवयचो. काई फाट्या आन काई हिलकं. हिलकं पाटकन पेटयचं. नाय पेटलं त कुईट टाकयची नायत कोया कारई. तवा कुट थ्वडी ईस्तु होयची. ईंगाळ पेटलं का मंग पटापट ईस्तु ववलातुन तामतोलीला लागयची आन कोरड्यास शिजायचा.
      सायेच्या भाकरीला येळ नवाता लागत पन निसत फोफ होयचं. मंग माही आय कवाडाला कडी पोंद्या लावुन ज्यावान घेऊन निघयची.
       आमी घराभवती झडाप करयचो म्हणुन कयाचाच भ्याव नसायचा. तसी झडाप कराया लय मंजा येची. मी झिटानली पार गवारटेर्याला जायचो, आन रामेठेची झिटा आणयचो. माहा भाव दरीला जावुन पेठ्या आणायचा. आमी वाख रानातुनच आणयचो, म्हणजे पॅक झडाप बांधता येते.  पात आणाया मातर लय लांब जाया लागायचा. आमी पातीला जाताना ईळा घेवुन पहाटीलाच निगयचो. मी चुंबळीला फाटकी चादर नाय त टाईल घेयचो. आमी पोचल्यावर माहा भाव, आय, बाप पटापट पात कापयच, आन मी पातीची यंगा वाटव नेवुन ठिवयचो.पण लय येळ लागायचा. अन जर का भानव ( मोठा डास) आलं तर लय बेकार. बाबव डसल ना भानव तर गांधीच येची अंगावर. 
 पातीच भार झालं का आमी पटापट घराक निगयचो. मला वाहाना नवत्या म्हणुन लवकर निगयचो, नाय त पायाला पक चटक बसयचं. घरी येवुन जेवयचो आन लगेच हिरडेनली निगयचो.
   आमचा प्वाट हिरड्यानवरच आसताय. म्या आकडा घेयचो आन माहा बाप सरा घेयाचा. मला हिरडीव चडता याचा पन शेंडेच्याबुंध्यावर नाय जाता याचा. मंग मी बारीक बारीक फोकाव जायचो आन आकड्यांना हिरडीची फांदी वाकवुन हिरड येचयचो. मी गळगोतीत येचयचो अन मंग पोताडीत नेवुन टाकयचो. माहा भावाचा परवट लय मोठा असायचा. तो शेंदर्या हिरडीव पार वर जायाच. माही पोतडी भरली का मंग मला बरा वाटायचा. 
 वरुन नाय हिरड याचता आल तर मी झोडलेल्या हिरडीक जायचो. माहा बाप हिरड सर्याना झोडायचा. पोतडी भरली का मी  पळयचो घरी दडोलोप्या ख्याळाया. 
        म्या घरी पोचलो का मह दोस्त ख्याळाया तयारच असयचं. मंग मी संत्या,नाम्या, धर्मा गिटा, पांड्या, होन्या आसी समदी प्वारा ख्याळाया असयची. 
मफल्याव लय येळ राज्य नसयची. कारन मफल्याला समद्या जागा पाट आसयच्या. लयकरुन प्वारा राह्याकाकुच्या घरामागच्या निरगुडीत दडयचि नायत ममत्या म्हतारीच्या घरामागच्या जांबाव दडयचि. मी हुडकयचो आन म्हणयचो " नाम्या ईस्टाप, संत्या ईस्टाप, पांड्या ईस्टाप". मंग माह्यावरची राज्य जायेचि. परत आमी समदं सुटयचो . आन होन्येव राज्य आली का बाबव पकी रेफळयची. आमी जनीच्या घरामांग दडयचो अन होन्या दिसला का मी पळत जायचो अन " थप्पी" मंग राज्य लय पोहंगळयची.  तो लय पिसाळयचा आन म्हणायचा, " मफल्याला तुमी लगेच थप्पी द्याता".  पन राज्य संपत नाय तवर ख्याळायाच लागाताय. कसातरी होन्यावरची राज्य फिटली का मंग तो गमज्या ऊडवीत मफल्याला म्हणायचा, " रामा तु पघच आता म्या कसी नाम्याव राज्य घुमवीतो ते". असा आमचा ख्येळ पार सात वाजपरयन्त चालायचा. 
  सात वाजलं का माह्या आयचा आवाज यायचा, " बा रामा खाया येतो का तिकड यव". मंग मी टिंगारीला पाय लाऊन घरी जायचो.
     घरात पोचलो तवा पार आंधार झाला व्हता. तसा माहा घर म्हन्जे लयीच सादा. पन मफल्याला लय आवडायचा . माह्या घराच्या वास्यांव कुईट टाकली व्हती. अन आडं पावळेनी शिवलं व्हतं. माळेव पेंडा भरला व्हता. परवाच्या दिशी तेच्यातच म्या आंब ऊबवणीत घातलं व्हतं. अन घराच्या बायेरुन कारईंचा कुड व्हता. तिथच बाजुला आमचा गोठा व्हता. मफल्याला कपेली गाय भारी वाटयची. शिंगा पकी मोठाली पण कधीच मारयची नाय. गोठ्याच्या कडला ऊखाळ व्हता. तेचेव माही आय भात कांडयची. कडला कनगीला टेकऊन मुसाळ ठिवयचो. दारापशी जाता असयचा. जातेव बाया दळाया येच्या. पहाटीला गाणा म्हणुन दळयच्या. असा माहा घर. 
    म्या घरात पोचलो अन पाह्यला माहा बाप हिरड तुडवित व्हता. राकेलची चिमनी बाजुला ठिवली व्हती. मंग म्या पन गेलो तुडवाया. तुडवलं का हिरड खोकं व्हती नाय. माह्या बापाना मफल्याला पायला अन म्हंगाला " बा रामा तुव केवडुस पाय, तुफल्याला नाय जमायचा".
पन म्या काय आयकतो. मी तसाच तुडवाया लागलो. तवर मफल दोनी भाव आल व्हता. मंग माह्या आयना हाक मारली " पोरांनो जेवुन घ्या आज घायपाताची भाजी केलेय". 
माह्या आयना याताना घायपाक भाजी आणली व्हती. मंग आमी जेवलो. माहा बाप मफल्याला घेऊन मोत्या लोखंडेच्या घरी ग्याला. तिथ पकी ल्वाका व्हती. मंग तेनी पते काढलं आन मेंढीकोट खेळाया लागलं. मफल्याला यत व्हता थ्वाडा थ्वाडा मेंढीकोट, पन बारीक प्वाराला क्वान घ्यानार. पघता पघता म्या नींजुन जायचो. माह्या बापाच्या मांडीव. मंग माहा बाप मफल्याला पांगोठी टाकुन आनायचा.
क्रमशः



Wednesday, July 18, 2018

मही शाळा - जिवन शिक्षण विद्या मंदीर

पहाटचा कोंबडा आरला का म्हतारी आयला जाग एयची. मंग ती आग्पेटीची काडी वढून बत्ती लावयची. कवा आग्पेटी सादाळली असली का चुलीतला लाकूड खोरून खोरून फुकनिना फुकून जाळ करून प्याटवाया लागायची.. उजेड करून चूल पेटली का मोठ्या टोपात अंघूळीला पाणी ठिऊन म्हतारी माह्या 'बा'ला हाक मारायची , "बारख्या आरं ऊठ उजाडला आता".  मी बाबांच्या मांगं झोपलेला असायचो. बा उठला का आमचा नंबर, "गणपा ऊठ गड्या गुरा चारून आन तवर मी डेरीला दूध घालून येतो." मंग अंघूळी पांघोळी उरकून जेच्या तेच्या कामाला माणसा तयार असायची. महा उरकसतवर म्हैशी, गाया पाजून बा तयार असायचा. आयना कॅल्याला गुळाचा चिह्या म्हतारी पितळीत वतून ठियीस्तवर मी तयार..
डोकेव कागद लावेल तीन घुंगराची तिळीस आसल्याला घोंगडीचा घोंगता, कमरंला आकडी, हातात पांढरीची काठी..
मी राजावाणी दारात थांबणार. आय दोंन म्हशी, तीन गाया, एक कालवड, दोन बैल सोडून गवनीला काढून द्यानार. मंग आमी गुरांक जाणार. जाताना दरडावून सांगणार, दहाच्या अगुदर गुरा घरी आणायची, मी सयपाक करून ठिईते आलेव साळत जाया..
टायमाच्या आगुदर गुरा घरी. साळची लय आवड. हात पाय धुयाच, गरम दूधभात हातानी रेळ जासतवर खायाचा, खुटीवरचा दपतार, खतांच्या पिशवीचा घोंगता, घेऊन डुलत डुलत साळत हजर. पोरा लय इस्पिक, कोण कोणाची कापडं ओढीताय, कोण बोचकडताय, कोण हसताय त कोण रडतय एवढ्यात...
गुरुजी आलं लांबूनच दत्त्याना सांगितला, तशी वरांड्यात चिडीचीप..
शंकरना गुरुजींची सायकल भीतीच्या कडला लावली. गुर्जी पायरीव, पॉरा पुढं हजर. "दहाच मिनटात पाना, कागदा, गवात उचलायचा आन पार्थनेला उभं राह्यचा" गुरुजींचा आदेश..
मंग काय निसती भिरकीट ह्या तेच्या हातातला कागद ओढतोय, गवांत पळवितोय, साफसफाई पाचच मिनटात.! तिसपस्तिस पॉरानली किती टायम लागतो..
प्रार्थना चालू. मी आन वरल्या आळीचा चंदऱ्या पुढं म्हणणार, बाकीचेनी आमच्या माग म्हणायचा. "देई आम्हा वरदान शारदे देई आम्हा वरदान..'' मग परतीज्ञा "भारत माझा देश आहे..."
ओळींना आत जायचा. अगुदर पयली, दुसरी, तिसरी, मंग चौथी, शांतता..
हजेरी.. गुरुजींनी नाव घ्यातला का उठुन उभा राहायचा हात बांधायचे "हजर" म्हणायचा मगच बसायचा..
शिकवणी सुरू..उजळणी म्हणा, पाढे म्हणा, धडे वाचा, पाठांतर करा एवढा झाला का दुपारची ज्यावणाची सुट्टी. घंटा वाजली रे वाजली का पॉरा सुसाट.! कोण पडतंय, पाडतंय, वाडीकुंन येणाऱ्याच डब आमी घरी..
परत शाळा परत त्योच शिकण्याचा क्रम. 
एका वर्गाला शिकवीत असताना दुसऱ्या ओळीतल्यानचा आवाज येईल, मंग काय? आदरयुक्त भीती असायची. चारनंतर गाणी, गप्पा, गोष्टी, ख्याळ, पुन्ह्यांदी साळत, उंदयाचा अभ्यास, आन सगळ्यांचा शंकरकं ध्यान (लांब लचक उचपुरा असल्यामुळ). तो घंटा वाजवायचा ना. गुर्जीना शंकरला खुनावला तो उठला न दगुड घेतला घंटा वाजवली आन साळा सुटली उंदया परतुन भरायासाटी...
आशी आमची तवाची साळा...
जीवन शिक्षण विद्या मंदिर.



Sunday, July 15, 2018

उलाटान

मी पार बारीक होतु. त्यासाली ज्याम पाणी जोरात रमला होता. सगळा रानच उप्याळुन ग्याला होता. जीकं हेरील तिकं पाणीच पाणी नद्र पडायचा. बऱ्याच वावरांचा बांध फुटला होता. आमच्या त पार गव्हाळीतुच नदी दोन, तीन दिवस उतारलीच नैय. दुसऱ्या दिवशी नदीचा पूर कमी झालेव खाली नदीकं हेरला त ज्याम झुंज्या मुज्याच पकी लाॅका नदीकं पळत सुटली आसत. म्या आईला ईच्चारला, आयव हा सख्याआजा कुनीकं ग्याला गं? तव्हा आईना सांगातला, नदीला उलाटान आलाय आन् नदीतलं मासं झुरेनी वर येतत. चढान लागलाय. पकं मासं चढतंत त्यांच्या पाॅटातली आंडी सोडाया. गवतातुन मंग जरूशाना मुक्काट गेलु मी नदीकं, तं पक्या मळया लावल्या होत्या झुर्याला, आन् थोड्यच आंतरावं बसुन चार पांच जन म्हणत व्हतं, दोन ओझर भरल बरका मह्या मळईचं.  तीतक्यात त्याना आनली काढुन मळय आन् किरकिंड्यात ओतली. मला तव्हा कळाला का ह्या मळयीमंदी मासं धरीत्यात. मी मुकाट हेरीतच ऊभा रहीलु आन् मह्याक पैैला आन् त्या रोह्यामामाना मना मह्या बंडीत मासं बांधून दिलं.  घरी जा, इक तीक नकु हिंडु चिखला पान्यात. मंग मी ते मासं घेऊन घरी गेलू तं मी हारावलू म्हणून ज्याम गवशीत होती घरची मान्सा. तेव्हढ्यात मह्या बा ना हेरला मला येताना.  आर्रर्र हा तं उलाटानाव गॅलता.!  घरात गेलू न मला नसता गॅला म्हणून काॅलदांड्याची सजा दिली होती. तवापसुन मला उलाटानाचा काॅलदांडा म्हणूनच चिडवाची सगळी भावांडा.
ही मह्यावाली उलाटानाची आठवण...

-म्या आर्जूना बांड्याचा सित्या



Saturday, July 14, 2018

मोडा

आवणीच्या दिसात माॅडा(सुट्टीचा दिवस आपल्या शेतकरी बांधवांसाठी) पाळतात.या दिसी शॅतातला कंचाच काम नय करती.परतीक गावात यगयगळा वार असतो.आमच्या गावातली लाॅका दाॅन मोडं पाळीत्यात.सनवार अन मंगाळवार .मंगाळवार रतनुबाईचा वार अन सनवार मारूतीचा वार.या दोनमंधून मंगाळवार लय कडक धरीत्यात.पर सनवारी जरासी कामा करीत्यात बरका पर औत नय धरती.
पर लाॅका हे दिस वाया नय जाऊन देत.ह्या दिसी सामराद कोलटेंबा इकडं आवाया जातात.फक्त सिव वलांडायची.मंग त्या गावचं मोठं धनी दाळ गुळ साखार अन बोकडाचा वाटा यचेव माणसा आवाया  नेत्यात.
त्या गावाची लाॅका बी तेंच्या मोड्याला या गावात आवाया यत्यात .म्हंजी खदली बदली .
मंग दमाना का होईना समद्या लाॅकांची आवणी पुरी होतं .
माॅडा हा कुळसाईचा वार .
म.सो.लांघी.रतानवाडी




Thursday, July 12, 2018

आखाड्या

लेखक: तुळशीराम बांबळे

गाढ्ढीसा... मना न्याम्का ध्यान नैय, पर् मी तवा आम्च्याच् गावात् (माणिक्वोझ्राला) तिस्रीचव्थीला आस्ल...'आखाड्' निंगाल्या दिसापसून मही मोठ्याआय्य् मना म्हणाय्ची, तुम्या तळ्लारं आखाड् ...आम्या तळ्ला भवं, आन् मह्या हातावं "चुखुंड'' (चतकुर) भर माल्च्या ठिवाय्ची. माल्च्या हातावं पडताच् मी तिडून 'चिंगाट' धुम्म् ठ्वोकाय्चु. आन् आम्स्य्यावाल्य्या "कुय्टारी" (गवताने सेकारलेले) घराकं यय्यंचु. मंन्ग् त्यो 'चुखुंड' आमी पाच् भावांन्डा 'कुट्का-कुट्का' न भांन्डता 'वाटून-तिटुन' खाय्चु. आमी सम्दी पाच् "बईन-भावांन्डा" तेंच्यात् मी सम्द्यात् बारका हावु. त्या दिसी "आखाडी पूनवं" व्हती. म्या 'म्हाय्य'ला त्या संन्द्याकाळी 'आखाड तळ्-आखाड् तळ्' असा 'ठिंन्क्या' लाव्ला व्हता, आखाड् कसा तळीत्यात्? त्या ईचारला व्हता. तवा म्हाय्ना मना, 'भानवसीवं तयैवं तळ्लाय् पह्यै व्हय्' असा सांग्ला. आन् मंग् मना 'माल्च्या'च्या 'यड्याआस्याना' कुडं दम् निंगतुय्, म्या घाय्घाय्ना तयावरला ढाकान्न् उचाक्ला त् 'हिरय्यामिरच्या' तळ्यैल् व्हत्या . ती तळ्यैल् मिर्ची आमी भावांन्डा रोजच् खाय्चु. मंग मी हिरम्सून न् जेव्ताच् निज्लु.

निम्या रातीला म्हा'बा'ना मना येक्दम् झ्वापातुन् गध्गदा हाल्ईत जागी क्याला. असा मना म्हा'बा'ना झ्वापातुन् कदीच्च् उठाव्वला नवता. मना वाट्ला आथा खरीख्वोट् आखाड् तळ्ला आसल्. आन् मी ड्वोळं चोळीत् उठ्लू. तवर् म्हा'बा' कुडतरी निगून ग्याल्ता. मी ऊठून चुलीम्होरं श्याकाया बस्लो. म्हाय्य्ना चुल पेटून आंन्घुळीच्या टोपात पाणी तापात् ठिव्ला व्हता . पर् म्हाय्च्या ड्वोळ्यात् मना यग्ळीच् 'चमाक' त्या निम्या रातीला दिस्ली. काहीतरी भ्येटल्याचा उल्हास् 'म्हाय्य'च्या ड्वोळ्यामदी दिसोत व्हता. म्हाय्य् मना म्हण्ली ,"आरं आप्ल्या 'भुरीला' वास्रु झालाय्". आन् मी तसाच्च् 'सप्रीकं'(पडवी) पका रगीना पळालु.

तट्कीच्या आंगाला दारामंदीच् 'भुरी' उबी व्हती आन् बाजुला नईन पाव्ना 'वास्रु'. भुरी वास्राला चाटीत व्हती आन् मदीमदी 'हुक्कारत' व्हती. मव्हा दादान्-बाय् (भाव-बहीण) तिढच् बाजुला बस्यैल व्हती. वास्रु वर उठायची क्वोसीस करीत् व्हता. मदी मदी पुना खाली पडत् व्हता. मना लै नवाल वाटत् व्हता. त्या वास्रु जलाम्ल्यावं काही तासामंदीचं उटून् उबा रात् व्हता.
'दिसा-मासा' वास्रु म्वोटा व्हत् ग्याला. तांम्डा रंग, खाली प्वोटाला भुरकट तांम्ब्डा, बोल्क् ड्वोळं, कपाळाच्या मदोमध् तांम्ड्या रंगाला सोड्वान् म्हणुनं ढवळा टिप्का, भवरं पण् येक्दम् किल्लैर, बेंम्ब्टात येक्दम् सड्सडीत. आखाडात् (आषाढ महीना) झाल्ता म्हनुन म्हा'बा' त्याला "आखाड्या" म्हणू लाग्ला. गुरा चराया ग्येली का मी "आखाड्या" बरूबर ख्येळाय्चु. त्याला 'आंन्जाराय्यचु-गोन्जांरायचु'. तेचेसी ब्वोलाय्चु. मी साळातुन् ययचो तवर् जनाव्रा घरी ययेल् नसायची. "आखाड्या यैय् आखाड्या" असा म्या आवाज् देतुय् कुडंत्त् आखाड्या लग्यैच उठून बसाय्चा आन् मह्याकं पहून बारीक्बारीक् आवाजामंन्दी हांम्ब्रायचा. मंग मी "आखाड्याचा" दावा सोडून त्याला आंग्नातुन् पळवायचो. मंग् त्योय् बी मह्या मांन्गा पका 'रगीना' पळाय्चा. आमी यक्दम् जीवाभावाचं 'मैतर' झाल्तो. आखाड्याला मही भास्या नेम्की सम्जायची. मी त्याला 'कव्ळी-कव्ळी' गवताची पेंढी कापून् आनायचु. आखाड्या त्या कव्ळाकाचा गवात येक्दम् मज्यामज्याना खाय्चा. गव्ताची येकय्य् काडी वाया जावु द्याय्चा नै. काही दिसाना आखाड्या गुरांमदी रानात् चराया जाया लाग्ला.

आता मी मराटी साळातुन् राजुरा सर्वदय् हास्कूल्ला जात व्हतु . येक्दीव्सी म्हा'बा'ना मला राजुरातुन 'यसन'(वेसन) आनाया सांगित्ली. आन् त्याच दिसी संद्याकाळी आखाड्यैच्या नाकात 'ववली'. आखाड्या पार वाक्डातिक्डा झाल्ता. त्या टाय्माला यसन् ट्वोच्ताना आखाड्याचं हाल् पहून मना पका 'वंगाळ' वाट्ला. मीय् आखाड्याबरुबर लै रड्लो. तिनच् वरषात म्हा'बा'ना आखाड्याला औताला जुप्ला. आखाड्याला औताला जुपेल् पहून मना मेल्यावुनमेल्यासारका झाल्ता. मरणासन्न यातना व्हत व्हत्या. तवा मी लै आडकाठी क्येली होती "बा" बरूबर. पण उपेग झाला नय्य्. म्हा'बा'ना तेच्या 'ठिवणी'त्ली येक् "निबार् शी" हाड्सून मना बाजुला क्याला व्हता. आखाड्या जवा नांगोर वडायचा तवा मना लै "यद् ना"( वेदना) व्हयच्या . पर् "बा" च्या म्होरं मवा ईलाज खुटाय्चा. आन् मंग् मी मुकाट बांदावं पुस्तुक् वाचीत् बसाय्चो.
आखाड्या आता म्वाठा 'बईल्ल्' झाल्ता. म्हाबाचा सग्ळा अन्याय तो गपचीत 'चहन' (सहन) करीत् व्हता. तरी बी आम्च्या दोघांन्ची मैत्री काय्मव्हती. 'बा'ना आवुत् सोड्ला की मी त्यांना 'आड्व'ला राखनीच्या गवतात् चराया न्येयचु . अग्दी आंन्धार् पडत्तोर् मी जोडीला चारायचु. दुस्र्या बैईल्लापक्षी मी मुटभरकाव्हय्ना आखाड्याला "क्वांडा/चंन्दी" जास्ती चारायचु. पर् मंन्ग 'आखाड्या' आता जास्तीच् "चेहना" झाल्ता. तो त्याच्या जोडीवाल्यैची पण काळजी घ्यैयचा. त्याला जास्ती घालेल् वैरण, क्वोंडा-चंदी तो तेच्या पाटनरला सिलक् ठिवाय्चा. नाईलाजाना मला मंग ती वैरण् क्वोंडा तेच्या ज्वोडीदाराकं सरकावाया लागायची. मुक्या जन्वाराला किती 'समज' रह्यैतेय् ह्या तवा मला समाज्ला. माणसाना तेंच्याकून काई शिकावा आसा.
त्या साली जनाव्राली "खताची" (जनावरांचा संसर्गजन्य आजार) साथ् आली व्हती. त्या साथीत "आखाड्याचा" ज्वडीदार दगाव्ला. बरीच गाय्वास्रा पण त्या सातीत म्येली. आता "आखाड्या" आन् द्वनच्यार गाया उरल्या व्हत्या फक्ती. आम्ची बरीच हानी झाल्ती. काही गावांमंदी त् गोठ्च-ग्वोठ्च सुनाट् पड्ल. त्याच् साली मह्या आक्काचा(बहीण) बी लगीन् जम्ला. आता लग्नाच्या खर्चीचा कराय्चा काय? असा ईषेय् घरात सुरू झाला. क्वोंम्ब्ड्या आन् सेळ्या 'कट्वून' (ईकूण) बी लग्नाचा खर्च मिटत् नवता. मग सग्ळी ब्वाटा "आखाड्याकं" वळाली.
जसा आखाड्याचा ईषेय् निघाला त्या दिसापसून त्वांडावं गोदी पांघ्रून, मी म्हा'बा'चा आन् म्हाय्चा सम्दा ब्वोल्ना आय्कायचु. आखाड्या वपाय्चा??? आखाड्या वपाय्चा???

राजूरचा परद्क्क्षान (बईल्ल् बाजार) पंध्रा दिसवं आल्ता . त्या आट् दिवस् म्या आजाराचा ढ्वांग् घ्येवुन् साळाला दांडी मार्ली. मागून नाताळाच्या सुटया लाग्ल्या. मी रोजीला आखाड्याला घ्येवुन् राजुरच्या सिवारात् "वंग्नाच्या डवर्‍यावं" जावुन आंगुळ् घालाय्चो. त्याला आंधारपडस्तवर मोढ्याला चारायचु. कंदी कदी भावना येक्दम् दाटून् ययच्या. मंग आखाड्याच्या गळ्यात पडुन गळा काडून हाम्सून-हाम्सून् रडायचु. किती समज व्हती त्याला बी तो मही पाठण् चाटायचा. जास्ती येळ् झाला का मंग् हाळुहाळु घराकं निंगायचा. मी येत् नै पहुन् पुना माग् फिराय्चा. आन् मला शिंगाना हाळूच् ल्वाटायचा...

सेवटी तो दिवस आलाच्. रैवार सरला आन् सोम्वार् उज्याड्ला. आज राजुरचा 'परद्क्क्षान' "बा" ना घुंगरमाळा 'आखाड्या'च्या गळ्यात बांदल्या. 'माटवठ' कपाळावं बांदली. कास्रा लावला. म्हाय्यना सुपात "तांबकुडयचा" भात "आखाड्याला" खाया आन्ला. आखाड्याना भात् फक्ती हुंगला, खाला नय्य्.
बाना "आखाड्या" आरोळी द्याताचं तो जड पावलानी चलाया लाग्ला. मला 'बा' ना आदिच् तागीद् देवुन् ठिव्ली व्हती. " त्वा परदक्क्षानाला ययचा नै "...
आखाड्याला सोडाया, 'म्हाय्य'नं मी लपत-लपत् आर्ध्या वाटापोत् गेल्तो. मुरंबाटी सोड्ली.... आन् आखाड्या हंम्बराया लाग्ला. ती वाट् त्याला नईन व्हती. तसा आखाड्याचा चालणा मंदाव्ला. मागं फिरून हांम्ब्रायचा. धाईस् पाव्ला ग्यालान् चलाय्चाच् थांब्ला. "बा" चाब्काचं फट्कं आखाड्याच्या पायांन्व् हानाया लाग्ला. पण आखाड्या चलच्ना. आखाड्या तिड्च् बस्ला. बाना आखाड्याच्या सेप्टीला चाव्ला तरी त्यो उठना. मला ह्या सम्दा देख्वत/ हेरव्त् नवता... आन् मी आय्यला न् सांग्ताच्च् मुरंबटीकं पाचपाय्यरेच्या तेढानी 'चिंगाट' उडी ठोक्ली. मला हेरताच् 'आखाड्या' उठून् बस्ला. 'बा' पार घामागूम झाल्ता. न सांन्गताच् म्या बाच्या हातातुन कास्र्या घ्यात्ला. तसा 'आखाड्या' मह्या मांग-मांग् चलू लाग्ला. मगं देसमुखवाडीच्या दुदकेंन्द्राच्या ईहरीवं आखाड्याला पाणी पाज्ला. ईस्-पंचीईस् मीन्टात् आमी परदक्क्षानामदी पोह्चलु. खुटा ठोकीतोय्य् कुढं त् गिर्‍हाईकांचा आखाड्या भोती "भिरकिंन्डा" पड्ला.

आखाड्याला नासिकच्या तिकं 'सटाने'च्या गिर्‍हाईकांनी खरेदी केल्ता. मव्हा "आखाड्या" आता ल्वोकाचा झाल्ता. ती ल्वाका आग्दी खुशीत व्हती. 'बा' नं पैसं मोजून क्वोप्रीच्या खिस्यात घात्लं. आता आखाड्याला त्या ल्वाकांन्च्या गाडीपोत सोडायचा व्हता. तेंन्ची गाडी तिकं पिपारकना रोडला व्हती. पण त्या ल्वाकांकं कास्रा नवता. ते कासर्यासह आखाड्याला मागत् होते. हुज्जैत् खात व्हती. तव्हा म्हा'बा' गरजला... "कास्र्या आमी द्यैणार नै, यव्हार म्वाड्ला तरी बेहत्तर". मंग त्या ल्वाकांनी कुडून्तरी कास्र्या आन्ला. तवर् आमी आखाड्याला घ्येवुन् गाडीपोत् पिपारकना रोडला पोच्लु. 'बा' घुंगरमाळा आन् माटवठ सोडीत् व्हता. मह्याकं कास्र्या फेकून त्यो माणूस् म्हण्ला, "बांन्दरे भाव्ड्या ह्यो कास्र्या". ह्या सम्द्या गडबाडीत मवा आखाड्याकं ध्यानच् नवता. जवा कासर्या 'सोडाया-बांदाया' गेलु त् मलाच् रडाया आला. आखाड्याच्या दोन्हीय्य् डोळ्यातुन आस्रू वाहात् व्हतं... आखाड्या 'रडत' व्हता. 'बा' च्या पण ह्या ध्यानात यया यळ् नै लाग्ला. आता आम्ही तिघेही आवाज् न् कर्ता रडत् व्हतो. 'आखाड्या, बा आन् मी'.... शेवटी 'बा' ना आखाड्याच्या पाठीवरून सेवटचा हात फिराव्ला, आखाड्येच्या पाया पड्ला.... आन् खांद्येवरच्या उपारण्यात "हुंन्दका" लप्ईत् म्हण्ला...
"जा 'बा' तुला 'वतान' नै, जीढं जासील् तीढं सुकी रह्यै"

"आखाड्येची खरीखोट् गोट्"

शब्दांकन- निसर्गवासी - धोंन्ड्या बांम्बळ्याचा तुळ्शा
"लांब् डांन्गाणात"