सन्माननीय वाचक

Showing posts with label गोस्टी. Show all posts
Showing posts with label गोस्टी. Show all posts

Friday, July 27, 2018

डांगाणातल्या पाच जेम्स बॉन्डांची गोट

शाहू म्हाराज मरल्यावं पुण्याला पेसवं राज चालवाया लागलं. सगळा राज पेसव्याना ताब्यात घिया सुरवादी क्येली. तेनली सह्याद्रीचं समदं किल्ल तेंच्या आमलात घियेचं व्हतं, तेवढ्यासाठी पेसयाना राजूराच्या अन कोतळाच्या कोळ्यांली संपर्क क्येला. तवा खाडे आन भांगरे ह्ये द्वान सरदार ह्या कामाला तयार झालं. मंग सगळ्यात आंधी तेंनी तिरमक किल्ला घियाचा ठरावला. पण तिरमक किल्ला व्हता मुघलांच्या ताब्यात. अन किल्ला जिखून घेणा लय आवघाड व्हता. पयली गोस्ट म्हंजी किल्ल्यावं येंघनाच आवघाड व्हता. अन येंघतानाच येवढा दमाया व्हयाचा का वर जाऊन लढाया बळच उरायचा नय. किल्लेच्या कड्यावून चढून वर जाया अन लढाया कितीय ताटम गडी आसला तऱ्ही त्येलाय शक्य नव्हता. 
मंग काय करावा?
तव्हा डांगाणात पाच पटेकर भाऊ व्हतं. पाचीच्या पाची एकदम रगाट गडी. लढाई खेळाया तं ते पटाईत व्हतंच, पण कंच्याय आवघाड परिस्थितीत कंचीय जिकिरीची कामगिरी करायची तं पाच पटेकर भावांशिवाय आख्या माराष्टात दुसरा कोन्ही नव्हता. हे पाचीच्या पाची गडी कंच्याय डोंगरावं अन कंच्याय कडेवं घोरपडीवानी सहाज येंघून जात. कोन्हाच्या नदरं न पडता कुढय पोहोचत. सोताकं काहीच हात्यार नसला तऱ्ही एकएकटा पाच साहा तलवारीवालेंली एकाच येळी गुंगारा देत. हे पाचीय भाव पाच पांडवासारखं शूरयीर तं व्हतंच, पण जेम्स बॉण्डसारखं चलाख अन चपळय बी व्हतं.
खाड्या अन भांगऱ्या सरदारानी जव्हा तीरमकाचा किल्ला जिखायचा इडा उचालला, तव्हा त्ये आपापलं सैनिक घेऊन तिरमकाच्या खाली गेलं अन किल्लेची पहाणी केली. किल्ला हेरल्यावं मातर तेंचं सैनिक काय लढाईला जाया तयार व्हईनात. लढायचा रह्यला लांब, ह्या किल्ल्यावं येंघता सुदा येणार नै, आसा त्ये म्हणाया लागलं. समदी म्हणत का आपु कसाय करून वर येंघलोच तऱ्ही लढायची ताकत काय रहेणार नय अन आपु समदी वाजीव मरू. म्हणून ही कामगिरी सोडून द्यावा आसा समदी म्हणाया लागली. समद्या सैनिकांमंधी आशी घालमेल झालेय ह्या पहून मंग पटेकर बंधू म्होरं आलं. त्ये म्हणालं आरं काय लढायच्या आंधीच आसं घाबरून जाता? आम्ही आसताना तुम्ही गड चढायची कह्याला काळजी करीतंत? ह्या जगात आसा कंचाय कडा नय जेच्यावं आम्ही पटेकर येंघून जाऊ शकत नय. आम्ही वर जाऊन सम्देनली वर घेऊ. अन मंग त्या मुघलांली आपु सहज कापून काढू. त्येंनी आसा म्हणला तरी सैनिकांचा भ्या काय जाईना. मंग मातर पाचातलं द्वान पटेकर सोताच निंघालं. त्या दोघांनीच गडावं चढाया सुरवादी क्येली. ह्ये द्वान पठ्ठे समोरचा उभाच्या उभा कडा सहज येंघून वर ग्येलं. येवढाच नय तं फक्त द्वानच तासात किल्ल्यावरल्या मजबूत सुरक्षेमंधून सम्देनली गुंगारा देऊन कोन्हाला न कळता थेट किल्ल्याच्या किल्लेदाराचा चांदीचा हुक्का घेऊन त्ये दोघंय खाली आलं. पटेकर भावांच्या ह्या कामगिरीना समदेंली लय फुराण चहढला अन समदी सैना पुरी जोमाना लढाया तयार झाली.
मंग लढायीची यवजना तयार झाली. खोटी खोटी फकिरा-बाबांची सोंगा घेऊन किल्ल्यावं गपचिपपना जाऊन पटेकर बंधूंनी किल्यावरचं काही आधिकारी अन किल्लेदाराच्या येका जवळच्या सहकाऱ्याला फितावला अन किल्लेची समदी माहिती काढून घ्येतली. 
मंग लढाईच्या दिशी तिरमक देवाला योक बोकड कापून कामगिरी सुरु झाली. सगळ्यात आंधी पटेकर बंधू कडा येंघून वर ग्येलं, अन मंग त्येंनी वरून दोराच्या शिड्या खाली सोडल्या. त्या शिड्यांवरून मंग ५०० जण किल्ल्यावं चढून ग्येलं. वर पोहोचताच समदेनी थेट किल्ल्याच्या मुख्य शिखरावं हल्ला करून तिढल्या मुघल सैनिकांली कापून काहाडला. अन आपला झेंडा लावून हर हर महादेवच्या घोषणा देत इजयाची शिंगा वाजावली. मंग त्ये किल्ल्यातल्या दुसऱ्या सैन्यावं चालून ग्येलं. अचानक येवढा आवघाड कडा चढून येवढं लय सैनिक वर आलं ह्या पहून मुघला जाम बेहेली. न लढताच कित्येक जण वाट फुटल तीढुन पळून ग्येलं. काहींनी कड्यावरून उड्या मारल्या अन ठेचून मेलं. कित्येक मुघला हातपाय मोडून जखमी झाली. जे मुघल किल्लेवं लढाया थांबलं तेंली सम्देनली मारून टाकण्यात आला. अन मंग किल्ला ताब्यात घेतला.
येवढा मोठा पराक्रम करून किल्ला जिखून घेतल्याबद्दल मंग पेशयांनी पटेकर भावांली चाळीस हजाराचा इनाम दिला. थोरल्या पटेकराला पालखीचा मान दिला. अन खेरुजी नाईकाला सुदा पालखीचा मान आन बारी ह्या गाव इनाम म्हणून दिला.
ह्याच वीर तुकडीना मंग रतनगड, कलाडगड, अलंग, कुलंग हे किल्लय बी जिखून घेतलं. रतनगडावंय बी तिरमक सारखंच वर जाऊन दोरीच्या शिड्या खाली सोडून द्वान-अडीचशे गडी येंघून गेलं. तव्हा जव्हारचा राजा अन त्येच्या घरची सगळी लोका रतनगडावंच व्हती. रतनगडावं लय मोठी लढाई झाली अन दोन्ही बाजूचं मिळून द्वानशे ल्वाक म्येलं. जव्हारचा राजा कसाबसा सुटून ग्येला. याबदल पेशयांनी ३० हजार रुपये बक्षीस दिलं आन यमाजी भांगरे ह्या सरदाराला पालखीचा मान अन साकीरवाडी ह्या गाव जहागीर म्हणून दिला.
तं आसं व्हतं आपल्या डांगणातलं ह्ये पाच जेम्स बॉण्ड म्हंजी पाच पटेकर बंधू. 



Wednesday, July 18, 2018

मही शाळा - जिवन शिक्षण विद्या मंदीर

पहाटचा कोंबडा आरला का म्हतारी आयला जाग एयची. मंग ती आग्पेटीची काडी वढून बत्ती लावयची. कवा आग्पेटी सादाळली असली का चुलीतला लाकूड खोरून खोरून फुकनिना फुकून जाळ करून प्याटवाया लागायची.. उजेड करून चूल पेटली का मोठ्या टोपात अंघूळीला पाणी ठिऊन म्हतारी माह्या 'बा'ला हाक मारायची , "बारख्या आरं ऊठ उजाडला आता".  मी बाबांच्या मांगं झोपलेला असायचो. बा उठला का आमचा नंबर, "गणपा ऊठ गड्या गुरा चारून आन तवर मी डेरीला दूध घालून येतो." मंग अंघूळी पांघोळी उरकून जेच्या तेच्या कामाला माणसा तयार असायची. महा उरकसतवर म्हैशी, गाया पाजून बा तयार असायचा. आयना कॅल्याला गुळाचा चिह्या म्हतारी पितळीत वतून ठियीस्तवर मी तयार..
डोकेव कागद लावेल तीन घुंगराची तिळीस आसल्याला घोंगडीचा घोंगता, कमरंला आकडी, हातात पांढरीची काठी..
मी राजावाणी दारात थांबणार. आय दोंन म्हशी, तीन गाया, एक कालवड, दोन बैल सोडून गवनीला काढून द्यानार. मंग आमी गुरांक जाणार. जाताना दरडावून सांगणार, दहाच्या अगुदर गुरा घरी आणायची, मी सयपाक करून ठिईते आलेव साळत जाया..
टायमाच्या आगुदर गुरा घरी. साळची लय आवड. हात पाय धुयाच, गरम दूधभात हातानी रेळ जासतवर खायाचा, खुटीवरचा दपतार, खतांच्या पिशवीचा घोंगता, घेऊन डुलत डुलत साळत हजर. पोरा लय इस्पिक, कोण कोणाची कापडं ओढीताय, कोण बोचकडताय, कोण हसताय त कोण रडतय एवढ्यात...
गुरुजी आलं लांबूनच दत्त्याना सांगितला, तशी वरांड्यात चिडीचीप..
शंकरना गुरुजींची सायकल भीतीच्या कडला लावली. गुर्जी पायरीव, पॉरा पुढं हजर. "दहाच मिनटात पाना, कागदा, गवात उचलायचा आन पार्थनेला उभं राह्यचा" गुरुजींचा आदेश..
मंग काय निसती भिरकीट ह्या तेच्या हातातला कागद ओढतोय, गवांत पळवितोय, साफसफाई पाचच मिनटात.! तिसपस्तिस पॉरानली किती टायम लागतो..
प्रार्थना चालू. मी आन वरल्या आळीचा चंदऱ्या पुढं म्हणणार, बाकीचेनी आमच्या माग म्हणायचा. "देई आम्हा वरदान शारदे देई आम्हा वरदान..'' मग परतीज्ञा "भारत माझा देश आहे..."
ओळींना आत जायचा. अगुदर पयली, दुसरी, तिसरी, मंग चौथी, शांतता..
हजेरी.. गुरुजींनी नाव घ्यातला का उठुन उभा राहायचा हात बांधायचे "हजर" म्हणायचा मगच बसायचा..
शिकवणी सुरू..उजळणी म्हणा, पाढे म्हणा, धडे वाचा, पाठांतर करा एवढा झाला का दुपारची ज्यावणाची सुट्टी. घंटा वाजली रे वाजली का पॉरा सुसाट.! कोण पडतंय, पाडतंय, वाडीकुंन येणाऱ्याच डब आमी घरी..
परत शाळा परत त्योच शिकण्याचा क्रम. 
एका वर्गाला शिकवीत असताना दुसऱ्या ओळीतल्यानचा आवाज येईल, मंग काय? आदरयुक्त भीती असायची. चारनंतर गाणी, गप्पा, गोष्टी, ख्याळ, पुन्ह्यांदी साळत, उंदयाचा अभ्यास, आन सगळ्यांचा शंकरकं ध्यान (लांब लचक उचपुरा असल्यामुळ). तो घंटा वाजवायचा ना. गुर्जीना शंकरला खुनावला तो उठला न दगुड घेतला घंटा वाजवली आन साळा सुटली उंदया परतुन भरायासाटी...
आशी आमची तवाची साळा...
जीवन शिक्षण विद्या मंदिर.



Thursday, July 12, 2018

आखाड्या

लेखक: तुळशीराम बांबळे

गाढ्ढीसा... मना न्याम्का ध्यान नैय, पर् मी तवा आम्च्याच् गावात् (माणिक्वोझ्राला) तिस्रीचव्थीला आस्ल...'आखाड्' निंगाल्या दिसापसून मही मोठ्याआय्य् मना म्हणाय्ची, तुम्या तळ्लारं आखाड् ...आम्या तळ्ला भवं, आन् मह्या हातावं "चुखुंड'' (चतकुर) भर माल्च्या ठिवाय्ची. माल्च्या हातावं पडताच् मी तिडून 'चिंगाट' धुम्म् ठ्वोकाय्चु. आन् आम्स्य्यावाल्य्या "कुय्टारी" (गवताने सेकारलेले) घराकं यय्यंचु. मंन्ग् त्यो 'चुखुंड' आमी पाच् भावांन्डा 'कुट्का-कुट्का' न भांन्डता 'वाटून-तिटुन' खाय्चु. आमी सम्दी पाच् "बईन-भावांन्डा" तेंच्यात् मी सम्द्यात् बारका हावु. त्या दिसी "आखाडी पूनवं" व्हती. म्या 'म्हाय्य'ला त्या संन्द्याकाळी 'आखाड तळ्-आखाड् तळ्' असा 'ठिंन्क्या' लाव्ला व्हता, आखाड् कसा तळीत्यात्? त्या ईचारला व्हता. तवा म्हाय्ना मना, 'भानवसीवं तयैवं तळ्लाय् पह्यै व्हय्' असा सांग्ला. आन् मंग् मना 'माल्च्या'च्या 'यड्याआस्याना' कुडं दम् निंगतुय्, म्या घाय्घाय्ना तयावरला ढाकान्न् उचाक्ला त् 'हिरय्यामिरच्या' तळ्यैल् व्हत्या . ती तळ्यैल् मिर्ची आमी भावांन्डा रोजच् खाय्चु. मंग मी हिरम्सून न् जेव्ताच् निज्लु.

निम्या रातीला म्हा'बा'ना मना येक्दम् झ्वापातुन् गध्गदा हाल्ईत जागी क्याला. असा मना म्हा'बा'ना झ्वापातुन् कदीच्च् उठाव्वला नवता. मना वाट्ला आथा खरीख्वोट् आखाड् तळ्ला आसल्. आन् मी ड्वोळं चोळीत् उठ्लू. तवर् म्हा'बा' कुडतरी निगून ग्याल्ता. मी ऊठून चुलीम्होरं श्याकाया बस्लो. म्हाय्य्ना चुल पेटून आंन्घुळीच्या टोपात पाणी तापात् ठिव्ला व्हता . पर् म्हाय्च्या ड्वोळ्यात् मना यग्ळीच् 'चमाक' त्या निम्या रातीला दिस्ली. काहीतरी भ्येटल्याचा उल्हास् 'म्हाय्य'च्या ड्वोळ्यामदी दिसोत व्हता. म्हाय्य् मना म्हण्ली ,"आरं आप्ल्या 'भुरीला' वास्रु झालाय्". आन् मी तसाच्च् 'सप्रीकं'(पडवी) पका रगीना पळालु.

तट्कीच्या आंगाला दारामंदीच् 'भुरी' उबी व्हती आन् बाजुला नईन पाव्ना 'वास्रु'. भुरी वास्राला चाटीत व्हती आन् मदीमदी 'हुक्कारत' व्हती. मव्हा दादान्-बाय् (भाव-बहीण) तिढच् बाजुला बस्यैल व्हती. वास्रु वर उठायची क्वोसीस करीत् व्हता. मदी मदी पुना खाली पडत् व्हता. मना लै नवाल वाटत् व्हता. त्या वास्रु जलाम्ल्यावं काही तासामंदीचं उटून् उबा रात् व्हता.
'दिसा-मासा' वास्रु म्वोटा व्हत् ग्याला. तांम्डा रंग, खाली प्वोटाला भुरकट तांम्ब्डा, बोल्क् ड्वोळं, कपाळाच्या मदोमध् तांम्ड्या रंगाला सोड्वान् म्हणुनं ढवळा टिप्का, भवरं पण् येक्दम् किल्लैर, बेंम्ब्टात येक्दम् सड्सडीत. आखाडात् (आषाढ महीना) झाल्ता म्हनुन म्हा'बा' त्याला "आखाड्या" म्हणू लाग्ला. गुरा चराया ग्येली का मी "आखाड्या" बरूबर ख्येळाय्चु. त्याला 'आंन्जाराय्यचु-गोन्जांरायचु'. तेचेसी ब्वोलाय्चु. मी साळातुन् ययचो तवर् जनाव्रा घरी ययेल् नसायची. "आखाड्या यैय् आखाड्या" असा म्या आवाज् देतुय् कुडंत्त् आखाड्या लग्यैच उठून बसाय्चा आन् मह्याकं पहून बारीक्बारीक् आवाजामंन्दी हांम्ब्रायचा. मंग मी "आखाड्याचा" दावा सोडून त्याला आंग्नातुन् पळवायचो. मंग् त्योय् बी मह्या मांन्गा पका 'रगीना' पळाय्चा. आमी यक्दम् जीवाभावाचं 'मैतर' झाल्तो. आखाड्याला मही भास्या नेम्की सम्जायची. मी त्याला 'कव्ळी-कव्ळी' गवताची पेंढी कापून् आनायचु. आखाड्या त्या कव्ळाकाचा गवात येक्दम् मज्यामज्याना खाय्चा. गव्ताची येकय्य् काडी वाया जावु द्याय्चा नै. काही दिसाना आखाड्या गुरांमदी रानात् चराया जाया लाग्ला.

आता मी मराटी साळातुन् राजुरा सर्वदय् हास्कूल्ला जात व्हतु . येक्दीव्सी म्हा'बा'ना मला राजुरातुन 'यसन'(वेसन) आनाया सांगित्ली. आन् त्याच दिसी संद्याकाळी आखाड्यैच्या नाकात 'ववली'. आखाड्या पार वाक्डातिक्डा झाल्ता. त्या टाय्माला यसन् ट्वोच्ताना आखाड्याचं हाल् पहून मना पका 'वंगाळ' वाट्ला. मीय् आखाड्याबरुबर लै रड्लो. तिनच् वरषात म्हा'बा'ना आखाड्याला औताला जुप्ला. आखाड्याला औताला जुपेल् पहून मना मेल्यावुनमेल्यासारका झाल्ता. मरणासन्न यातना व्हत व्हत्या. तवा मी लै आडकाठी क्येली होती "बा" बरूबर. पण उपेग झाला नय्य्. म्हा'बा'ना तेच्या 'ठिवणी'त्ली येक् "निबार् शी" हाड्सून मना बाजुला क्याला व्हता. आखाड्या जवा नांगोर वडायचा तवा मना लै "यद् ना"( वेदना) व्हयच्या . पर् "बा" च्या म्होरं मवा ईलाज खुटाय्चा. आन् मंग् मी मुकाट बांदावं पुस्तुक् वाचीत् बसाय्चो.
आखाड्या आता म्वाठा 'बईल्ल्' झाल्ता. म्हाबाचा सग्ळा अन्याय तो गपचीत 'चहन' (सहन) करीत् व्हता. तरी बी आम्च्या दोघांन्ची मैत्री काय्मव्हती. 'बा'ना आवुत् सोड्ला की मी त्यांना 'आड्व'ला राखनीच्या गवतात् चराया न्येयचु . अग्दी आंन्धार् पडत्तोर् मी जोडीला चारायचु. दुस्र्या बैईल्लापक्षी मी मुटभरकाव्हय्ना आखाड्याला "क्वांडा/चंन्दी" जास्ती चारायचु. पर् मंन्ग 'आखाड्या' आता जास्तीच् "चेहना" झाल्ता. तो त्याच्या जोडीवाल्यैची पण काळजी घ्यैयचा. त्याला जास्ती घालेल् वैरण, क्वोंडा-चंदी तो तेच्या पाटनरला सिलक् ठिवाय्चा. नाईलाजाना मला मंग ती वैरण् क्वोंडा तेच्या ज्वोडीदाराकं सरकावाया लागायची. मुक्या जन्वाराला किती 'समज' रह्यैतेय् ह्या तवा मला समाज्ला. माणसाना तेंच्याकून काई शिकावा आसा.
त्या साली जनाव्राली "खताची" (जनावरांचा संसर्गजन्य आजार) साथ् आली व्हती. त्या साथीत "आखाड्याचा" ज्वडीदार दगाव्ला. बरीच गाय्वास्रा पण त्या सातीत म्येली. आता "आखाड्या" आन् द्वनच्यार गाया उरल्या व्हत्या फक्ती. आम्ची बरीच हानी झाल्ती. काही गावांमंदी त् गोठ्च-ग्वोठ्च सुनाट् पड्ल. त्याच् साली मह्या आक्काचा(बहीण) बी लगीन् जम्ला. आता लग्नाच्या खर्चीचा कराय्चा काय? असा ईषेय् घरात सुरू झाला. क्वोंम्ब्ड्या आन् सेळ्या 'कट्वून' (ईकूण) बी लग्नाचा खर्च मिटत् नवता. मग सग्ळी ब्वाटा "आखाड्याकं" वळाली.
जसा आखाड्याचा ईषेय् निघाला त्या दिसापसून त्वांडावं गोदी पांघ्रून, मी म्हा'बा'चा आन् म्हाय्चा सम्दा ब्वोल्ना आय्कायचु. आखाड्या वपाय्चा??? आखाड्या वपाय्चा???

राजूरचा परद्क्क्षान (बईल्ल् बाजार) पंध्रा दिसवं आल्ता . त्या आट् दिवस् म्या आजाराचा ढ्वांग् घ्येवुन् साळाला दांडी मार्ली. मागून नाताळाच्या सुटया लाग्ल्या. मी रोजीला आखाड्याला घ्येवुन् राजुरच्या सिवारात् "वंग्नाच्या डवर्‍यावं" जावुन आंगुळ् घालाय्चो. त्याला आंधारपडस्तवर मोढ्याला चारायचु. कंदी कदी भावना येक्दम् दाटून् ययच्या. मंग आखाड्याच्या गळ्यात पडुन गळा काडून हाम्सून-हाम्सून् रडायचु. किती समज व्हती त्याला बी तो मही पाठण् चाटायचा. जास्ती येळ् झाला का मंग् हाळुहाळु घराकं निंगायचा. मी येत् नै पहुन् पुना माग् फिराय्चा. आन् मला शिंगाना हाळूच् ल्वाटायचा...

सेवटी तो दिवस आलाच्. रैवार सरला आन् सोम्वार् उज्याड्ला. आज राजुरचा 'परद्क्क्षान' "बा" ना घुंगरमाळा 'आखाड्या'च्या गळ्यात बांदल्या. 'माटवठ' कपाळावं बांदली. कास्रा लावला. म्हाय्यना सुपात "तांबकुडयचा" भात "आखाड्याला" खाया आन्ला. आखाड्याना भात् फक्ती हुंगला, खाला नय्य्.
बाना "आखाड्या" आरोळी द्याताचं तो जड पावलानी चलाया लाग्ला. मला 'बा' ना आदिच् तागीद् देवुन् ठिव्ली व्हती. " त्वा परदक्क्षानाला ययचा नै "...
आखाड्याला सोडाया, 'म्हाय्य'नं मी लपत-लपत् आर्ध्या वाटापोत् गेल्तो. मुरंबाटी सोड्ली.... आन् आखाड्या हंम्बराया लाग्ला. ती वाट् त्याला नईन व्हती. तसा आखाड्याचा चालणा मंदाव्ला. मागं फिरून हांम्ब्रायचा. धाईस् पाव्ला ग्यालान् चलाय्चाच् थांब्ला. "बा" चाब्काचं फट्कं आखाड्याच्या पायांन्व् हानाया लाग्ला. पण आखाड्या चलच्ना. आखाड्या तिड्च् बस्ला. बाना आखाड्याच्या सेप्टीला चाव्ला तरी त्यो उठना. मला ह्या सम्दा देख्वत/ हेरव्त् नवता... आन् मी आय्यला न् सांग्ताच्च् मुरंबटीकं पाचपाय्यरेच्या तेढानी 'चिंगाट' उडी ठोक्ली. मला हेरताच् 'आखाड्या' उठून् बस्ला. 'बा' पार घामागूम झाल्ता. न सांन्गताच् म्या बाच्या हातातुन कास्र्या घ्यात्ला. तसा 'आखाड्या' मह्या मांग-मांग् चलू लाग्ला. मगं देसमुखवाडीच्या दुदकेंन्द्राच्या ईहरीवं आखाड्याला पाणी पाज्ला. ईस्-पंचीईस् मीन्टात् आमी परदक्क्षानामदी पोह्चलु. खुटा ठोकीतोय्य् कुढं त् गिर्‍हाईकांचा आखाड्या भोती "भिरकिंन्डा" पड्ला.

आखाड्याला नासिकच्या तिकं 'सटाने'च्या गिर्‍हाईकांनी खरेदी केल्ता. मव्हा "आखाड्या" आता ल्वोकाचा झाल्ता. ती ल्वाका आग्दी खुशीत व्हती. 'बा' नं पैसं मोजून क्वोप्रीच्या खिस्यात घात्लं. आता आखाड्याला त्या ल्वाकांन्च्या गाडीपोत सोडायचा व्हता. तेंन्ची गाडी तिकं पिपारकना रोडला व्हती. पण त्या ल्वाकांकं कास्रा नवता. ते कासर्यासह आखाड्याला मागत् होते. हुज्जैत् खात व्हती. तव्हा म्हा'बा' गरजला... "कास्र्या आमी द्यैणार नै, यव्हार म्वाड्ला तरी बेहत्तर". मंग त्या ल्वाकांनी कुडून्तरी कास्र्या आन्ला. तवर् आमी आखाड्याला घ्येवुन् गाडीपोत् पिपारकना रोडला पोच्लु. 'बा' घुंगरमाळा आन् माटवठ सोडीत् व्हता. मह्याकं कास्र्या फेकून त्यो माणूस् म्हण्ला, "बांन्दरे भाव्ड्या ह्यो कास्र्या". ह्या सम्द्या गडबाडीत मवा आखाड्याकं ध्यानच् नवता. जवा कासर्या 'सोडाया-बांदाया' गेलु त् मलाच् रडाया आला. आखाड्याच्या दोन्हीय्य् डोळ्यातुन आस्रू वाहात् व्हतं... आखाड्या 'रडत' व्हता. 'बा' च्या पण ह्या ध्यानात यया यळ् नै लाग्ला. आता आम्ही तिघेही आवाज् न् कर्ता रडत् व्हतो. 'आखाड्या, बा आन् मी'.... शेवटी 'बा' ना आखाड्याच्या पाठीवरून सेवटचा हात फिराव्ला, आखाड्येच्या पाया पड्ला.... आन् खांद्येवरच्या उपारण्यात "हुंन्दका" लप्ईत् म्हण्ला...
"जा 'बा' तुला 'वतान' नै, जीढं जासील् तीढं सुकी रह्यै"

"आखाड्येची खरीखोट् गोट्"

शब्दांकन- निसर्गवासी - धोंन्ड्या बांम्बळ्याचा तुळ्शा
"लांब् डांन्गाणात"