सन्माननीय वाचक

Tuesday, April 6, 2021

उभड

*ऊभड*
पहाटीचं चार पाच वाजलं आसतील. समदीकं आंधारभिनुक व्हता. आघोटीचा मयना असल्यामुळं मधीमधी बेडकाचा तं मधीमधी वाय्राचा आवाज घुमत व्हता. कालच पका पानी पडुन गेलता. मी आन महा भाव दिन्या वटीवं झोपलो व्हतो. घोंगडीच्या दुंद्या मुळं गार काय वाजत नवता. पन मदी मदी फुटलेल्या कवलातुन पानी खाली घराच्या भोईव पडत व्हता.
  तुमालि म्हणुन सांगतो, याच मागच्या मयन्यात आम्या गेटाच्यावाडीतून घर उस्तरुन वागमाळाला आनला व्हता. म्हंगालं चंद्र्या केड्याचा आन मा्हया घरच्यांचा पटंना म्हणून घर इकडं बांधला व्हता. 
 तुमालि काय सांगू, म्हंगालं सांचेपहार झाला का वाघमाळाला वाघ ईयचं. समद्या  बाजुला रान आन  महा एकट्याच मधी घर. सांचेपहार झाला का मंग मानुस काय जनवार पन नद्र पडायचा नाय. तेवडी पलीदा घेऊन खेकडा उजाडाया मानसा दिसली त दिसली. नाय तं निसता आंधारभिनुक. म्या आपला दिवस मावळाया गेला का मी चुल सोडयचोच नाय. आन आशा जागेत माह्या भावाना दम क्याला व्हता घर बांधायचा. आन गड्याना दाखावला ना बांधुन.
  हा तं मी वटीवं घोंगडीत मुर मारुन झोपलो व्हतो. आन अचानक महं पाय वलं वलं व्हया लागलं. म्या ईचार क्याला कवलातुन थ्वडा गळत आसंल पाणी. म्या पाय दुसरीक सारलं तं  लईच वला वला लागला. म्हणुन म्या तोंडावरची    गोदडी काडली. बायेर आजुनय पानी पडत व्हता.
मफल्याला भ्याव वाटला व्हता. तवर आमच्याकं लाईटय नवती गेली. समदा कारभार बत्तीवं. म्या आंधारतच आगपेटी उनगाया सुरु क्याला. उनगता उनगता माहा डोकाच भितीला आपाटला. पका मोठा गुळुंब आलता. म्या तसाच आगपेटी उनागली. तिथच बत्तीय व्हती. म्या पेटवली आन पघतो तं काय वटीवं भोईतुन पाणेचं ऊभड. आगंबाबव.... 
म्या आयला हाक मारली " आय पाणेचं उभंड निगालंत ऊखळापशी"
माही आय आली आन पायला तं पानी पार भाताच्या कनगीकं चालला व्हता.
आयना माह्या भावाला हाक मारली, " ये दिन्या उट, इथं समदं दानं भिजाया आलंत "
  महा भाव तडफड्याना उटला. त्याना पायला आन त्याला समाजला का जोत्यात भर कमी पडली म्हणुन पानी वर आला.
 माह्या आयना घमेला आन बुतारा घेतला आन पाणी भराया लागली.
माहा भाव ऊबडात एका हाताना दगड टाकित व्हता आन  एका हाताना पहारीना धाव बुजवीत व्हता. आन मी आपला भीजलेल्या भाताच्या कनगीकं पाहुन एका हाताना डोळं पुसीत व्हतो.

रामदास लोखंडे
आहुपे ता आंबेगाव जि पूणे
८०९७६२९०२८