सन्माननीय वाचक

Sunday, May 16, 2021

☘️...भेट आखेदीची...🌿

☘️...भेट आखेदीची...🌿
ही गोठ अंदाजपंचे १९८१ सालची आसलं,म्या पाचईत व्हतो! चवथीला वचप्याच्या साळत केंद्रात पयला आलो व्हतो.म्हणूनशान,मंग मला पाचईत तालुकेच्या ठिकाणी आंबेगावच्या बोर्डिंग ला ठिवला व्हता.घरापसून लांब रहायचा पयलाच परसंग! कोणीं वळखी पाळखीचा नाय,सकाळूच गाडगीच्या नळाव गार पाण्याना,आंघुळी करायच्या.आण नेहरीचा भाकर तुकडा साळच्या टायमाला थेट ज्यावानच असायचा !त्यात माही येगळीच पंचाईत झाल्याली.
बाजरीच्या भाकरीना  मला वकाऱ्या व्हयाच्या.!! 
तव्हा माह्या म्हताऱ्या आयची बहेन तिथं आंबगावातच रह्याला असायची,तेंच्याक माह्या आयना, नाचण्याचा पीठ दिल्याला असायचा... रोज्च्याला द्वान टायमाच्या द्वान भाकरी तेंच्या घरींवून जाऊन आनाया लागायच्या.! 
पुढं परत ईरणक मावशी आमची सयपाकींन भाकर करुन देया लागली.
ज्यावणाच्या टायमाला पोरांबरबर बसून ज्यावायचा,आन् मंग चुलत्याना दिलेल्या शबनमच्या थैलीत,सारा दप्तार भरुन साळत जायचा.ह्या असा रोजचाच चालू व्हता.

आजा मास्तर व्हता,चुलताय बी मास्तर,एक चुलता गुरुप गरामपंचायतीचा उप-सरपंच,अन धाकला चुलता पुणेच्या हापिसात कारकून व्हता..

पण महा 'दादा' (म्हंजे माहा बाप तेन्ली चुलतं,मावळणी,भावकीतली सारीच मंडळी ही दादा म्हणायची.!तव्हा तिच सवय मलायबी बारीकपणी लागली,अजूनपोहोतोर हाये.म्हणून दादाच म्हणायचो!.) 
तव्हाच्याला घरीं श्यात करायला कोणी नसल्याना,तेच घरी रायलेलं.
म्हतारी आय एकदा म्हंगालेली मला चांगला आठवताय,समदीच पोरां शिकून नौकरकीच्या माग लागली तं ह्या वाडवडलांची जूमीन मोठ्या हिकमतीना टिकावलेली ४२ एकार जागा- कसायची कॉना.मंग ती जबाबदारी यांच्यावर आली...म्हंजे आमच्या दादांच्या खांद्यावर राह्यली.त्येन्ली चवथीच्या शिक्षणा पाठी,नांगराचा मुठ्या हातात धरावा लागला.तो आम्ही नौकरकीला लागस्तवर काय सोडला नाय.!!

तसा आमच्या गावात आमचा घर म्हंजे शिकला सवरलेला..
समजायची,लोकान्ली येगळा आदरभाव वाटायचा,आजही तो तसाच हाये! 

मी माह्या बापाच्या पोटी त्याचा चुलता म्हणून नावकरी जलमाला आलोय,
असा तव्हा सांगायची.आमच्या दादाच्या चुलत्याचा तेंचेव लय जीव व्हताss म्हणून मी तेंच्या पोटी जलामलो.!

आम्हाली बुधवार म्हंजे सणवार असल्यासारखा दिवस,त्या दिशी आंबगावचा बाजार असायचा! माहा दादा त्या दीशी हमखास गावाकुन दादा,नायतं आय बाजारा येयचीच.
आन् येतांना,कायतरी चांगला चुंगला खायाला घीऊन इयेची...लय आनंद वाटायचा,बाजाराच्यादिशी सकाळचीच शाळा असायची,ती ११.०० वाजता शाळा सुटली.का मंग दिवसभर बाजारकऱ्यांबराबर बाजारात,माग माग फिरायचा.घरी जाताना दादा,शेंगोळी,भेळ खायला द्यायचा.आन् २/- रुपये द्यायचा ते पुडच्या बुधवार परेंत पुरायचं,त्यातलं बी चारआठाने जवळ राह्यचं.सस्तायी व्हती तेव्हडी तव्हा!..परतेक सणासुदीला सुट्टी मिळायची,द्वान कोसाचं आंतर,आरदेक्षा तासात घरी पोचयचो आम्हीं,घरीं जायचा म्हणल्यावं, दम कोनालाहे आमी गावातलं चार-पाच जण पोरां व्हतो,जे पळतच निगायचो,,,कां दोन उड्यातच कळंबय गाठायची ! 

त्या साली बुधवारीच आखेदी आली व्हती,साळला सुट्टी व्हती ! मंगाळवारीच सांजच्याला शाळा सुटल्यावं,घर गाठला व्हता.घरी गेलाका एकतर पोरांबरूबर ख्याळायचा नैतर गुरांक जायचा ! त्या दीसी उठल्या उठल्याच आय म्हंगाली ..
'बा रं !'आता आज तुला सुटी हाय! त तू आज गुरांक जा,तुहा बाप बाजारा जाईल.!
म्या म्हणला - बरं बरं,जातो म्या गुरांक..!
गाया,म्हैशी,बैलां वासरा घीऊन गवणींना सायरमाळाक चाललो व्हतो,बरूबर अजून दोघ-तिघ गायखं दिसलं,म्हणला आता जोडीला हायेत, त्या बरा झाला...येळ चांगला तरी जाईल.गुरा माळच्या सवकं केली अन गप्पा माराय म्हणून तेंच्याक गेलो.! तं ते सारं गडी नई नई कापडां घालून आलेलं.म्हणून ईचारला काय रं साऱ्यांनी नई कापडा घातल्याथी ?
तवा कळला का ब्वा आज *आखेदी* हाये,,,म्या म्हणलो आसुंदया ! आन गडी लागलं ना चिडवायला..
आरं काय,आज सनसुद हाये,आमी बग कशी नई नई कापडा घातल्यात,तुला त कायबी नाही बी,तुला आणली बी नसतील बोहत्येक...
बराच येळ इच्यारात खाली मान घालून,काठी टेकवून,अंगठ्यानी रिंगाण करता करता एक पायाव उभा राहून ऐकून घेत व्हतो.आन् ते गडी चिडीला लायीत व्हते.
म्या तेन्ली सांगाटला ! माहा दादा गेल्यात बाजारां,तवा येतानी आण्णारेत रं ! वायीच दम काढा ! ह्या म्या आपला अंदाजपंचे ठोकून दिला.
आन मी बैल वर वालाकं आल्थी म्हणून वळवायला निघून गेलो.मनात इचार येत व्हतं,खरंच असा होईल,
दादा मला नई कापडा आणतील,
तेंच्याक एवढं पैसं आसतील कां?..असं एक ना अन्येक ईचार...
नेहरीचा वक्थाला,गुरा जोगावली व्हती-छबिल्या,मुंगळा,भोरी,पितांबरी म्हनस्तवर गुरांनी गवणीची वाट धरली व्हती...
आयना गुरा गोठ्यात बांधली,मला म्हणली 'बा' चल भूक लागली असलं ना हातपाय धिव अन जेवून घी!!. म्या तसा पडयच्या दारातूनच ईचारला,
आयेss 'दादा,आलाय काबाजाराकुंन' तसी ती म्हंगाली, हां... कवाच आलतं ते,चिमा नानाची तमाकू आनलेय ना ती देया गेलत...
मला कधी एकदा दादाला ईचारील असा झाला व्हता,मी पळतच बोळातून चिमानानाच्या घरी गेलो त तिथं 'दादा' नव्हता.हिरमुसला होऊन तसाच परत फिरलो.
पाटलांच्या दारात दादांच्या वहाणा दिसल्या,म्हणून कानोसा घेतला...
पाटील - मंग कवाशिक आला बाजाराकुंन,आणला ना समदा..
दादा - हां,आणला ना,जातो आता घरी पोरां ज्येवायची थांबली असतील..
म्या मागच्या दारात ठिवलेल्या बादलीतल्या पाण्यानी हातपाय धिवताना 'दादांला' घरात जाताना पायला.आई ज्यावणाची ताटा करीत व्हती.त्याचा आवाज बाहेर येत व्हता.
आणि आत जाऊन पाहतो तं काय नवालच; माह्यासाठी पाट ठिवला व्हता,निरांजान लावून ववाळायचा ताट पण केल्याला होता, आन् दादानं माह्यासाठी लांब हाताची तांबडी बंडी,,,आन् लेंगा आणला होता.
अगुदर म्हताऱ्या आयना,मग आईंना,दादांनी मला ववाळला,
मी नावकरी हाये ना.!पॉट भरुन पंगतीला पोळ्या खाल्या,जेवलो,नई कापडा घातली,आणि 'दादांना' 
कडकडून मिठी मारली...

त्यांचे मायेचे हात माझ्या पाठीवर फिरत होते.तोच स्पर्श मला सांगत होता जणू,खूप शिका,खुप मोठां व्हो!,सगेसोयरे,पाव्हनेरावळे जपा,
गरजूंच्या उपयोगी पडा,इतका आनंद झाला होता म्हणून सांगू,माह्या डोळ्यांतला आनंदाचा पाणी वघळत व्हता.त्ये काही केल्या थांबतनाच!.
आन् आम्हा बाप लेकांची भेट पाहून चुलीपाशी जेवताना आईचा पदर तिचेच डोळे टिपत होता...

सोतः काबाडकष्ट केलं आन् पोरान्ली,
शिक्षाण,कपडंलत्तं काही कमी पडू नये,म्हणून खस्ता खाणारा माहा 'बाप' म्या अनुभवत होतो...

स्वतःला काही नसलं तरी चालेल पण 
मुलांनी शिकलं पाहिजे,मुलांना शिकवलं पाहीजे,चांगले संस्कार केले पाहिजेत,अंगीकारले पाहिजेत,हिच संस्कृती आणि शिकवण जोपासण्याचा प्रयत्न मनापासून करतोय...

दरवर्षीप्रमाणे आजचाही दिवस खास दादांसाठी...
🙏💐💝💐🙏
गणपत ® कोंढवळे,कळंबई.©
🌼💐🌼💐🌼💐🌼💐🧡

स्नेहीजनंहो आपणांस अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...💐🙏💐



Tuesday, April 6, 2021

उभड

*ऊभड*
पहाटीचं चार पाच वाजलं आसतील. समदीकं आंधारभिनुक व्हता. आघोटीचा मयना असल्यामुळं मधीमधी बेडकाचा तं मधीमधी वाय्राचा आवाज घुमत व्हता. कालच पका पानी पडुन गेलता. मी आन महा भाव दिन्या वटीवं झोपलो व्हतो. घोंगडीच्या दुंद्या मुळं गार काय वाजत नवता. पन मदी मदी फुटलेल्या कवलातुन पानी खाली घराच्या भोईव पडत व्हता.
  तुमालि म्हणुन सांगतो, याच मागच्या मयन्यात आम्या गेटाच्यावाडीतून घर उस्तरुन वागमाळाला आनला व्हता. म्हंगालं चंद्र्या केड्याचा आन मा्हया घरच्यांचा पटंना म्हणून घर इकडं बांधला व्हता. 
 तुमालि काय सांगू, म्हंगालं सांचेपहार झाला का वाघमाळाला वाघ ईयचं. समद्या  बाजुला रान आन  महा एकट्याच मधी घर. सांचेपहार झाला का मंग मानुस काय जनवार पन नद्र पडायचा नाय. तेवडी पलीदा घेऊन खेकडा उजाडाया मानसा दिसली त दिसली. नाय तं निसता आंधारभिनुक. म्या आपला दिवस मावळाया गेला का मी चुल सोडयचोच नाय. आन आशा जागेत माह्या भावाना दम क्याला व्हता घर बांधायचा. आन गड्याना दाखावला ना बांधुन.
  हा तं मी वटीवं घोंगडीत मुर मारुन झोपलो व्हतो. आन अचानक महं पाय वलं वलं व्हया लागलं. म्या ईचार क्याला कवलातुन थ्वडा गळत आसंल पाणी. म्या पाय दुसरीक सारलं तं  लईच वला वला लागला. म्हणुन म्या तोंडावरची    गोदडी काडली. बायेर आजुनय पानी पडत व्हता.
मफल्याला भ्याव वाटला व्हता. तवर आमच्याकं लाईटय नवती गेली. समदा कारभार बत्तीवं. म्या आंधारतच आगपेटी उनगाया सुरु क्याला. उनगता उनगता माहा डोकाच भितीला आपाटला. पका मोठा गुळुंब आलता. म्या तसाच आगपेटी उनागली. तिथच बत्तीय व्हती. म्या पेटवली आन पघतो तं काय वटीवं भोईतुन पाणेचं ऊभड. आगंबाबव.... 
म्या आयला हाक मारली " आय पाणेचं उभंड निगालंत ऊखळापशी"
माही आय आली आन पायला तं पानी पार भाताच्या कनगीकं चालला व्हता.
आयना माह्या भावाला हाक मारली, " ये दिन्या उट, इथं समदं दानं भिजाया आलंत "
  महा भाव तडफड्याना उटला. त्याना पायला आन त्याला समाजला का जोत्यात भर कमी पडली म्हणुन पानी वर आला.
 माह्या आयना घमेला आन बुतारा घेतला आन पाणी भराया लागली.
माहा भाव ऊबडात एका हाताना दगड टाकित व्हता आन  एका हाताना पहारीना धाव बुजवीत व्हता. आन मी आपला भीजलेल्या भाताच्या कनगीकं पाहुन एका हाताना डोळं पुसीत व्हतो.

रामदास लोखंडे
आहुपे ता आंबेगाव जि पूणे
८०९७६२९०२८