सन्माननीय वाचक

Thursday, February 28, 2019

ऊरुस

*ऊरूस*
  सकाळच  आट नव वाजलं आसतील , मी आन सुप्याचा संत्या ऊंबराखाली बसलो व्हतो.  ऊंबरा पिकली व्हती. त्याना पाच सा आन म्या पाच ऊंबरा ग्वाळा केली. आन खायाला सुरवात क्यली.
   तुमाली काय सांगू ऊंबरा खाया किती मजा यतेय ती. म्या त ऊंबरामंदली पाखरा ऊडवयचो आन मंग खायचो. पण संत्या ऊंबार हातात घियाचा आन दोन्या हातानी फिरवयचा.  तो म्हणायचा" आरे रामा , आसा फिरावला का मंग तेच्यातुन त्याल निगाताय".
    तेवड्यात माह्या आयना हाक मारली " बा रामा आमी गायचोंडीव (  नदिचा ठिकान)कपड धिवाया निगालोय, पाटकन य." म्या घरी गेलो.
   आयना म्वाठा ब्वाचका बांदला व्हता कपड्यांचा. म्या आयला म्हणला " आय कह्याला यवडी कपडा घ्यतल्यात धिवाया." माही आय म्हंगाली " बा आपला आवफ्याचा ऊरूस हाये आज."
   आग बाबव मफल्याला पका आनंद झाला. आमी कपडा धिवाया गायचोंडीव ग्यलो.  कपड म्हणजी माह्या बापाचा आन भावांचा एकेक डिरेस आन माही फाटलेली चडी आन बंडी. माह्या बापाना सरळगाव च्या बाजारातुन लिलावाची बंडी आणली व्हती. लिलावाची म्हणजी जुन्यातली बरा का.
 हा त आम्या पटापट कपडा धिवली आन वाळावली.  आन मंग परत ब्वाचका बांधून  घरी आलो.
  सांच्या पाराला माह्या आयना हारबरेची डाळ घातली पोळ्या कराया. मी कह्याला घरात थांबतोय. पळालो बनाक.  तितच आमचा ऊरुस भराताय.
    पार नव धा वाजता पोखरीचा भारोड सुरु झाला. तसी आम्या पुडच जागा धरली व्हती. पक गमत्या केल्या दोरपाळानी. मफल्याला लय हासाय लागाताय. म्या हासायचो त समदी ल्वाका मफल्याकच पाहेची, भारोड पाह्याचा सोडुन. मफल्याला आजुन सवय हाये पका हासयची.  आसा म्हणीत्यात का पका हासला का बरा आसाताय.  त्या जावद्या, भारोड खपाया आन उजाडाया यकच टाईम झाला.
   म्या घरी ग्यलो पटापट आंघुळ क्यली. आन काल धिवलेली कपडा घातली.
म्या माह्या आयक पायला. मला वाटला आय मफल्याला आटआणे तरी देईल. माह्या आयला समाजला माहा प्वार पयशासाटी थांबलाय.  पन माह्या आयक काईच नवता त काय देयील.  माह्या  आयच्या डोळ्यात पाणी आला. मफल्याला काय समजायचा त्या समाजलो.  म्या आपली तशीच काळआंब्याकुन ऊडी मारली आन हाजेरीचा भारोड पाह्या गेलो.
   म्या भारोड पाह्यत व्हतो. यक नदार बाजुला टाकली, प्वारा रेवड्या ईकात घ्यत व्हती . काही प्वारा लाडु घ्यत व्हती. मला वाटला जावा पन लगेच आठावला आपल्याक पयस नाय. माह्या आयचा चेहरा आठवला आन माह्या डोळ्यात पाणी आला. म्या डाया हाताना डोळ पुसलं आन हजेरीच्या भारोडाक पायला. भारोडात परधानजी म्हणत व्हता" काईच कायमस्वरुपी नसताय,  आपली संकाटासुदा." मनाला धिर आला. म्या परत त्या खावाच्या दुकानाक पायलाच नाय
   आवफ्याचा
रामा लोखांडा



Saturday, February 23, 2019

*वलट*
  माह्याचा मयना खपला व्हता, शिमग्याचा मयना आल्ता. शिमगेच पाच दिवस मोडा व्हता. मोडा म्हणजी तुमाक जसी सुटी आसते तसी सुटी.
    आमाली पोरानली काय मोडा न फोडा.
आमाली समद दिवस सारखच.  सकाळी उटायचा आन कोणाच्या तरी दारात जाउन ख्याळायचा.
   आज मातर महा भाव लवकरच उटला.  यक दगड घ्यतला आन तेचेव कोयता घासाय लागला. म्या म्हणला " कयाला कोयता अन फरशी घासितोय?."
तो म्हंगाला " आता चार पाच दिस मोडा हाये, आपुन समदी फाटेच भारं आणाया जायाचा."
    मी बारीक व्हतो पन महा भाव मफल्याला घ्यतल्याशिवाय कुणीक जात नसं. भले म्या कमी काम क्याला तरी.
    माह्या भावाना आकडी घ्यतली,त्यात घासलेला कोयता टाकला.  माह्या आयना मफल्याला चुंबळिला यक फाटका टाईल घ्यातला. माह्या बापाना फरशी(छोटी कुर्हाड) घ्यतली. आम्या कवाड पुड क्याला,अन निगालो.
    माडखासला(जंगलाचे नाव) आमी गेलो. याक मळयाचा ( झाडाचा नाव) झाड पडला व्हता. मंग लगेच माह्या बापाना फरशीना हिलक कराया घ्यतलं.  माह्या भावाने आकडीतुन कोयता काडला. आन फाट्या तोडाया सुरवात क्यली.  आमी आदिवासी ओली फाट्या कदिच तोडती नाय. रान आमचा देव हाये
    मग पटापट भार बांधलं. भार बांधाया रानातुनच वाक आणलं. तवर दिवस डोकेव आल्ता. ऊन म्हणतो मी. आमाकल्या कोणाच्याच पायात वहाना नवत्या. वहाना आणाया यवड पयस कुणीकुण आणयच. वहाना नवत्या पन तसा माह्या पायेनी मफल्याला कंदिच सांगितला नाय. माह्या पायेनली माही परिस्थिती माईत व्हती,म्हणुन कदिच पायाना कुरकुर क्यली नाय.
     मंग आमी भर ऊनात आमी भार घेऊन घरी पोचलो. आमची वलट आमच्या दारापुडच व्हती. लोकानपेकशा आमची वलट कमी व्हती. जनाबायची आन चंद्र्या मामाची वलट मोटी व्हती.
    माहा भारा बारीक व्हता. म्हणुन तो लगेच चुलीला लावाया आणला. थ्वडा आमी बसलो.
   माह्या आयना पानेची कळशी बायेर आणलि. यक सांगु, काम क्यलेव, दमलेव पाणी यावडा ग्वाड लागाताय का सांगु नका......
      आवफ्याचा
       रामा लोखांडा