सन्माननीय वाचक

Thursday, July 12, 2018

आखाड्या

लेखक: तुळशीराम बांबळे

गाढ्ढीसा... मना न्याम्का ध्यान नैय, पर् मी तवा आम्च्याच् गावात् (माणिक्वोझ्राला) तिस्रीचव्थीला आस्ल...'आखाड्' निंगाल्या दिसापसून मही मोठ्याआय्य् मना म्हणाय्ची, तुम्या तळ्लारं आखाड् ...आम्या तळ्ला भवं, आन् मह्या हातावं "चुखुंड'' (चतकुर) भर माल्च्या ठिवाय्ची. माल्च्या हातावं पडताच् मी तिडून 'चिंगाट' धुम्म् ठ्वोकाय्चु. आन् आम्स्य्यावाल्य्या "कुय्टारी" (गवताने सेकारलेले) घराकं यय्यंचु. मंन्ग् त्यो 'चुखुंड' आमी पाच् भावांन्डा 'कुट्का-कुट्का' न भांन्डता 'वाटून-तिटुन' खाय्चु. आमी सम्दी पाच् "बईन-भावांन्डा" तेंच्यात् मी सम्द्यात् बारका हावु. त्या दिसी "आखाडी पूनवं" व्हती. म्या 'म्हाय्य'ला त्या संन्द्याकाळी 'आखाड तळ्-आखाड् तळ्' असा 'ठिंन्क्या' लाव्ला व्हता, आखाड् कसा तळीत्यात्? त्या ईचारला व्हता. तवा म्हाय्ना मना, 'भानवसीवं तयैवं तळ्लाय् पह्यै व्हय्' असा सांग्ला. आन् मंग् मना 'माल्च्या'च्या 'यड्याआस्याना' कुडं दम् निंगतुय्, म्या घाय्घाय्ना तयावरला ढाकान्न् उचाक्ला त् 'हिरय्यामिरच्या' तळ्यैल् व्हत्या . ती तळ्यैल् मिर्ची आमी भावांन्डा रोजच् खाय्चु. मंग मी हिरम्सून न् जेव्ताच् निज्लु.

निम्या रातीला म्हा'बा'ना मना येक्दम् झ्वापातुन् गध्गदा हाल्ईत जागी क्याला. असा मना म्हा'बा'ना झ्वापातुन् कदीच्च् उठाव्वला नवता. मना वाट्ला आथा खरीख्वोट् आखाड् तळ्ला आसल्. आन् मी ड्वोळं चोळीत् उठ्लू. तवर् म्हा'बा' कुडतरी निगून ग्याल्ता. मी ऊठून चुलीम्होरं श्याकाया बस्लो. म्हाय्य्ना चुल पेटून आंन्घुळीच्या टोपात पाणी तापात् ठिव्ला व्हता . पर् म्हाय्च्या ड्वोळ्यात् मना यग्ळीच् 'चमाक' त्या निम्या रातीला दिस्ली. काहीतरी भ्येटल्याचा उल्हास् 'म्हाय्य'च्या ड्वोळ्यामदी दिसोत व्हता. म्हाय्य् मना म्हण्ली ,"आरं आप्ल्या 'भुरीला' वास्रु झालाय्". आन् मी तसाच्च् 'सप्रीकं'(पडवी) पका रगीना पळालु.

तट्कीच्या आंगाला दारामंदीच् 'भुरी' उबी व्हती आन् बाजुला नईन पाव्ना 'वास्रु'. भुरी वास्राला चाटीत व्हती आन् मदीमदी 'हुक्कारत' व्हती. मव्हा दादान्-बाय् (भाव-बहीण) तिढच् बाजुला बस्यैल व्हती. वास्रु वर उठायची क्वोसीस करीत् व्हता. मदी मदी पुना खाली पडत् व्हता. मना लै नवाल वाटत् व्हता. त्या वास्रु जलाम्ल्यावं काही तासामंदीचं उटून् उबा रात् व्हता.
'दिसा-मासा' वास्रु म्वोटा व्हत् ग्याला. तांम्डा रंग, खाली प्वोटाला भुरकट तांम्ब्डा, बोल्क् ड्वोळं, कपाळाच्या मदोमध् तांम्ड्या रंगाला सोड्वान् म्हणुनं ढवळा टिप्का, भवरं पण् येक्दम् किल्लैर, बेंम्ब्टात येक्दम् सड्सडीत. आखाडात् (आषाढ महीना) झाल्ता म्हनुन म्हा'बा' त्याला "आखाड्या" म्हणू लाग्ला. गुरा चराया ग्येली का मी "आखाड्या" बरूबर ख्येळाय्चु. त्याला 'आंन्जाराय्यचु-गोन्जांरायचु'. तेचेसी ब्वोलाय्चु. मी साळातुन् ययचो तवर् जनाव्रा घरी ययेल् नसायची. "आखाड्या यैय् आखाड्या" असा म्या आवाज् देतुय् कुडंत्त् आखाड्या लग्यैच उठून बसाय्चा आन् मह्याकं पहून बारीक्बारीक् आवाजामंन्दी हांम्ब्रायचा. मंग मी "आखाड्याचा" दावा सोडून त्याला आंग्नातुन् पळवायचो. मंग् त्योय् बी मह्या मांन्गा पका 'रगीना' पळाय्चा. आमी यक्दम् जीवाभावाचं 'मैतर' झाल्तो. आखाड्याला मही भास्या नेम्की सम्जायची. मी त्याला 'कव्ळी-कव्ळी' गवताची पेंढी कापून् आनायचु. आखाड्या त्या कव्ळाकाचा गवात येक्दम् मज्यामज्याना खाय्चा. गव्ताची येकय्य् काडी वाया जावु द्याय्चा नै. काही दिसाना आखाड्या गुरांमदी रानात् चराया जाया लाग्ला.

आता मी मराटी साळातुन् राजुरा सर्वदय् हास्कूल्ला जात व्हतु . येक्दीव्सी म्हा'बा'ना मला राजुरातुन 'यसन'(वेसन) आनाया सांगित्ली. आन् त्याच दिसी संद्याकाळी आखाड्यैच्या नाकात 'ववली'. आखाड्या पार वाक्डातिक्डा झाल्ता. त्या टाय्माला यसन् ट्वोच्ताना आखाड्याचं हाल् पहून मना पका 'वंगाळ' वाट्ला. मीय् आखाड्याबरुबर लै रड्लो. तिनच् वरषात म्हा'बा'ना आखाड्याला औताला जुप्ला. आखाड्याला औताला जुपेल् पहून मना मेल्यावुनमेल्यासारका झाल्ता. मरणासन्न यातना व्हत व्हत्या. तवा मी लै आडकाठी क्येली होती "बा" बरूबर. पण उपेग झाला नय्य्. म्हा'बा'ना तेच्या 'ठिवणी'त्ली येक् "निबार् शी" हाड्सून मना बाजुला क्याला व्हता. आखाड्या जवा नांगोर वडायचा तवा मना लै "यद् ना"( वेदना) व्हयच्या . पर् "बा" च्या म्होरं मवा ईलाज खुटाय्चा. आन् मंग् मी मुकाट बांदावं पुस्तुक् वाचीत् बसाय्चो.
आखाड्या आता म्वाठा 'बईल्ल्' झाल्ता. म्हाबाचा सग्ळा अन्याय तो गपचीत 'चहन' (सहन) करीत् व्हता. तरी बी आम्च्या दोघांन्ची मैत्री काय्मव्हती. 'बा'ना आवुत् सोड्ला की मी त्यांना 'आड्व'ला राखनीच्या गवतात् चराया न्येयचु . अग्दी आंन्धार् पडत्तोर् मी जोडीला चारायचु. दुस्र्या बैईल्लापक्षी मी मुटभरकाव्हय्ना आखाड्याला "क्वांडा/चंन्दी" जास्ती चारायचु. पर् मंन्ग 'आखाड्या' आता जास्तीच् "चेहना" झाल्ता. तो त्याच्या जोडीवाल्यैची पण काळजी घ्यैयचा. त्याला जास्ती घालेल् वैरण, क्वोंडा-चंदी तो तेच्या पाटनरला सिलक् ठिवाय्चा. नाईलाजाना मला मंग ती वैरण् क्वोंडा तेच्या ज्वोडीदाराकं सरकावाया लागायची. मुक्या जन्वाराला किती 'समज' रह्यैतेय् ह्या तवा मला समाज्ला. माणसाना तेंच्याकून काई शिकावा आसा.
त्या साली जनाव्राली "खताची" (जनावरांचा संसर्गजन्य आजार) साथ् आली व्हती. त्या साथीत "आखाड्याचा" ज्वडीदार दगाव्ला. बरीच गाय्वास्रा पण त्या सातीत म्येली. आता "आखाड्या" आन् द्वनच्यार गाया उरल्या व्हत्या फक्ती. आम्ची बरीच हानी झाल्ती. काही गावांमंदी त् गोठ्च-ग्वोठ्च सुनाट् पड्ल. त्याच् साली मह्या आक्काचा(बहीण) बी लगीन् जम्ला. आता लग्नाच्या खर्चीचा कराय्चा काय? असा ईषेय् घरात सुरू झाला. क्वोंम्ब्ड्या आन् सेळ्या 'कट्वून' (ईकूण) बी लग्नाचा खर्च मिटत् नवता. मग सग्ळी ब्वाटा "आखाड्याकं" वळाली.
जसा आखाड्याचा ईषेय् निघाला त्या दिसापसून त्वांडावं गोदी पांघ्रून, मी म्हा'बा'चा आन् म्हाय्चा सम्दा ब्वोल्ना आय्कायचु. आखाड्या वपाय्चा??? आखाड्या वपाय्चा???

राजूरचा परद्क्क्षान (बईल्ल् बाजार) पंध्रा दिसवं आल्ता . त्या आट् दिवस् म्या आजाराचा ढ्वांग् घ्येवुन् साळाला दांडी मार्ली. मागून नाताळाच्या सुटया लाग्ल्या. मी रोजीला आखाड्याला घ्येवुन् राजुरच्या सिवारात् "वंग्नाच्या डवर्‍यावं" जावुन आंगुळ् घालाय्चो. त्याला आंधारपडस्तवर मोढ्याला चारायचु. कंदी कदी भावना येक्दम् दाटून् ययच्या. मंग आखाड्याच्या गळ्यात पडुन गळा काडून हाम्सून-हाम्सून् रडायचु. किती समज व्हती त्याला बी तो मही पाठण् चाटायचा. जास्ती येळ् झाला का मंग् हाळुहाळु घराकं निंगायचा. मी येत् नै पहुन् पुना माग् फिराय्चा. आन् मला शिंगाना हाळूच् ल्वाटायचा...

सेवटी तो दिवस आलाच्. रैवार सरला आन् सोम्वार् उज्याड्ला. आज राजुरचा 'परद्क्क्षान' "बा" ना घुंगरमाळा 'आखाड्या'च्या गळ्यात बांदल्या. 'माटवठ' कपाळावं बांदली. कास्रा लावला. म्हाय्यना सुपात "तांबकुडयचा" भात "आखाड्याला" खाया आन्ला. आखाड्याना भात् फक्ती हुंगला, खाला नय्य्.
बाना "आखाड्या" आरोळी द्याताचं तो जड पावलानी चलाया लाग्ला. मला 'बा' ना आदिच् तागीद् देवुन् ठिव्ली व्हती. " त्वा परदक्क्षानाला ययचा नै "...
आखाड्याला सोडाया, 'म्हाय्य'नं मी लपत-लपत् आर्ध्या वाटापोत् गेल्तो. मुरंबाटी सोड्ली.... आन् आखाड्या हंम्बराया लाग्ला. ती वाट् त्याला नईन व्हती. तसा आखाड्याचा चालणा मंदाव्ला. मागं फिरून हांम्ब्रायचा. धाईस् पाव्ला ग्यालान् चलाय्चाच् थांब्ला. "बा" चाब्काचं फट्कं आखाड्याच्या पायांन्व् हानाया लाग्ला. पण आखाड्या चलच्ना. आखाड्या तिड्च् बस्ला. बाना आखाड्याच्या सेप्टीला चाव्ला तरी त्यो उठना. मला ह्या सम्दा देख्वत/ हेरव्त् नवता... आन् मी आय्यला न् सांग्ताच्च् मुरंबटीकं पाचपाय्यरेच्या तेढानी 'चिंगाट' उडी ठोक्ली. मला हेरताच् 'आखाड्या' उठून् बस्ला. 'बा' पार घामागूम झाल्ता. न सांन्गताच् म्या बाच्या हातातुन कास्र्या घ्यात्ला. तसा 'आखाड्या' मह्या मांग-मांग् चलू लाग्ला. मगं देसमुखवाडीच्या दुदकेंन्द्राच्या ईहरीवं आखाड्याला पाणी पाज्ला. ईस्-पंचीईस् मीन्टात् आमी परदक्क्षानामदी पोह्चलु. खुटा ठोकीतोय्य् कुढं त् गिर्‍हाईकांचा आखाड्या भोती "भिरकिंन्डा" पड्ला.

आखाड्याला नासिकच्या तिकं 'सटाने'च्या गिर्‍हाईकांनी खरेदी केल्ता. मव्हा "आखाड्या" आता ल्वोकाचा झाल्ता. ती ल्वाका आग्दी खुशीत व्हती. 'बा' नं पैसं मोजून क्वोप्रीच्या खिस्यात घात्लं. आता आखाड्याला त्या ल्वाकांन्च्या गाडीपोत सोडायचा व्हता. तेंन्ची गाडी तिकं पिपारकना रोडला व्हती. पण त्या ल्वाकांकं कास्रा नवता. ते कासर्यासह आखाड्याला मागत् होते. हुज्जैत् खात व्हती. तव्हा म्हा'बा' गरजला... "कास्र्या आमी द्यैणार नै, यव्हार म्वाड्ला तरी बेहत्तर". मंग त्या ल्वाकांनी कुडून्तरी कास्र्या आन्ला. तवर् आमी आखाड्याला घ्येवुन् गाडीपोत् पिपारकना रोडला पोच्लु. 'बा' घुंगरमाळा आन् माटवठ सोडीत् व्हता. मह्याकं कास्र्या फेकून त्यो माणूस् म्हण्ला, "बांन्दरे भाव्ड्या ह्यो कास्र्या". ह्या सम्द्या गडबाडीत मवा आखाड्याकं ध्यानच् नवता. जवा कासर्या 'सोडाया-बांदाया' गेलु त् मलाच् रडाया आला. आखाड्याच्या दोन्हीय्य् डोळ्यातुन आस्रू वाहात् व्हतं... आखाड्या 'रडत' व्हता. 'बा' च्या पण ह्या ध्यानात यया यळ् नै लाग्ला. आता आम्ही तिघेही आवाज् न् कर्ता रडत् व्हतो. 'आखाड्या, बा आन् मी'.... शेवटी 'बा' ना आखाड्याच्या पाठीवरून सेवटचा हात फिराव्ला, आखाड्येच्या पाया पड्ला.... आन् खांद्येवरच्या उपारण्यात "हुंन्दका" लप्ईत् म्हण्ला...
"जा 'बा' तुला 'वतान' नै, जीढं जासील् तीढं सुकी रह्यै"

"आखाड्येची खरीखोट् गोट्"

शब्दांकन- निसर्गवासी - धोंन्ड्या बांम्बळ्याचा तुळ्शा
"लांब् डांन्गाणात"




4 comments:

  1. लयच भारी ... म्या दोन येळा वाचला

    ReplyDelete
  2. डांगाणी भाष्याची आज पोहोतची सगळ्यात भारी गोट.
    आज पोहोतची यवढ्यासाठी म्हंला का तुम्ही आजून भारी लिहू शकत्या. पुढं त्या लिवालच ही खात्री हाये

    ReplyDelete
  3. आयीच्यान्न भव..._/\_
    धन्यवाद

    ReplyDelete