सन्माननीय वाचक

Thursday, July 12, 2018

क्रांतिवीर राघोजी भांगरे गीत

सह्याद्रीचा वाघ - राघोजी भांगरे
अकोले तालुक्यातील देवगाव हे दोनशे ते तीनशे लोकांचे गाव असेल. शोण नदीच्या किना-यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. राघोजीच्या जन्मावेळी गायला गेलेला पोवाडा-

         “ रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान
                         मावळ मुलुखाचा राजा होईल महान !
          रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड
                        जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!”

सामान्य लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम राघोजी भांगरे करू लागल्याने त्याच्या विषयी कोणीही सरकारला माहिती देत नव्हते. राघोजीने नाशिक परिसरातही आपली सावकारांविरोधातील मोहीम सुरु ठेवली होती. नाशिक परिसरातील त्याच्या बंडाचे वर्णन पुढील ओव्यांतून आपणास दिसून येते.

झाडामधी झाड उंच पांगा-याचा
राघूनं केलं बंड नाव सांग भांग-याचा !!
राघूनं केलं बंड नितरोज हरघडी
कत्तल केली पोलिसांची मुंड्या लावल्या हो झाडो-झाडी !!
राघूनं केलं बंड कुलंग गडाच्या माळीला
गो-या साहेबांच्या टोप्या ह्या गुंतल्या हो जाळीला !!
राघूनं केलं बंड बंड घोटी खंबाळ्याला
धरणी काय आली कोंभाळण्याच्या बांबळ्याला !!
राघूनं  केलं बंड बंड तीरंगळ गडाला
यानं बसविला हादरा इगतपुरी या पेठाला !!
राघूनं  केलं बंड बंड गौराया पुराला
कापली गो-यांची नाकं कान टीळा रक्ताचा लावला !!
  राघूनं  केलं बंड सरकार बोलू लागला
कापाया नाक कान ईश्वरानं बंड नेमला !!
राघूनं  केलं बंड बंड टाके देवगावाला
वैरी त्रिंबक कांदडी यमसदनी धाडीला !!
राघूनं  केलं बंड अंजनेरी या गडाला
यानं बसविला हादरा गाव तिरमक पेठाला !!
राघूनं  केलं बंड बंड सुरगाणा पेठाला
कापलीया नाकं लुटलं सावकारशाहीला !!
राघूनं  केलं बंड बंड पेठ तालुक्याला
कापलीया नाकं चहू मुलुखी गाजला !!
राघूनं  केलं बंड सप्तशृंगीच्या गडाला
यानं बसविला हादरा दिंडोरी या पेठाला !!
राघूनं  केलं बंड नाशिक हवेली लुटली
काढून लग्नाची वरात नाकं वाण्याची कापली !!
राघूनं  केलं बंड हादरा नाशिक पेठाला
इंग्रज सरकारला याने धडा शिकविला !!

वरील गीतातून राघोजी भांगरे यांच्या सावकारशाहीविरोधातील नाशिक विभागातील  धडक मोहिमेचे वर्णन आपल्या नजरेसमोर उभे राहते.

- राजू ठोकळ
संदर्भ : १) ‘तुफानी वादळ’ – श्री निवृत्ती भिवा धोंगडे
२) ‘सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी’ – डॉ.गोविंद गारे
३) Gazetteer of India – Maharashtra State, Ahmednagar District



1 comment:

  1. राघोजी भांगरे यांचा गौरव गीत
    भाषेची अन इतिहासाचीय बी गोडी

    ReplyDelete