सन्माननीय वाचक

Friday, July 27, 2018

डांगाणातल्या पाच जेम्स बॉन्डांची गोट

शाहू म्हाराज मरल्यावं पुण्याला पेसवं राज चालवाया लागलं. सगळा राज पेसव्याना ताब्यात घिया सुरवादी क्येली. तेनली सह्याद्रीचं समदं किल्ल तेंच्या आमलात घियेचं व्हतं, तेवढ्यासाठी पेसयाना राजूराच्या अन कोतळाच्या कोळ्यांली संपर्क क्येला. तवा खाडे आन भांगरे ह्ये द्वान सरदार ह्या कामाला तयार झालं. मंग सगळ्यात आंधी तेंनी तिरमक किल्ला घियाचा ठरावला. पण तिरमक किल्ला व्हता मुघलांच्या ताब्यात. अन किल्ला जिखून घेणा लय आवघाड व्हता. पयली गोस्ट म्हंजी किल्ल्यावं येंघनाच आवघाड व्हता. अन येंघतानाच येवढा दमाया व्हयाचा का वर जाऊन लढाया बळच उरायचा नय. किल्लेच्या कड्यावून चढून वर जाया अन लढाया कितीय ताटम गडी आसला तऱ्ही त्येलाय शक्य नव्हता. 
मंग काय करावा?
तव्हा डांगाणात पाच पटेकर भाऊ व्हतं. पाचीच्या पाची एकदम रगाट गडी. लढाई खेळाया तं ते पटाईत व्हतंच, पण कंच्याय आवघाड परिस्थितीत कंचीय जिकिरीची कामगिरी करायची तं पाच पटेकर भावांशिवाय आख्या माराष्टात दुसरा कोन्ही नव्हता. हे पाचीच्या पाची गडी कंच्याय डोंगरावं अन कंच्याय कडेवं घोरपडीवानी सहाज येंघून जात. कोन्हाच्या नदरं न पडता कुढय पोहोचत. सोताकं काहीच हात्यार नसला तऱ्ही एकएकटा पाच साहा तलवारीवालेंली एकाच येळी गुंगारा देत. हे पाचीय भाव पाच पांडवासारखं शूरयीर तं व्हतंच, पण जेम्स बॉण्डसारखं चलाख अन चपळय बी व्हतं.
खाड्या अन भांगऱ्या सरदारानी जव्हा तीरमकाचा किल्ला जिखायचा इडा उचालला, तव्हा त्ये आपापलं सैनिक घेऊन तिरमकाच्या खाली गेलं अन किल्लेची पहाणी केली. किल्ला हेरल्यावं मातर तेंचं सैनिक काय लढाईला जाया तयार व्हईनात. लढायचा रह्यला लांब, ह्या किल्ल्यावं येंघता सुदा येणार नै, आसा त्ये म्हणाया लागलं. समदी म्हणत का आपु कसाय करून वर येंघलोच तऱ्ही लढायची ताकत काय रहेणार नय अन आपु समदी वाजीव मरू. म्हणून ही कामगिरी सोडून द्यावा आसा समदी म्हणाया लागली. समद्या सैनिकांमंधी आशी घालमेल झालेय ह्या पहून मंग पटेकर बंधू म्होरं आलं. त्ये म्हणालं आरं काय लढायच्या आंधीच आसं घाबरून जाता? आम्ही आसताना तुम्ही गड चढायची कह्याला काळजी करीतंत? ह्या जगात आसा कंचाय कडा नय जेच्यावं आम्ही पटेकर येंघून जाऊ शकत नय. आम्ही वर जाऊन सम्देनली वर घेऊ. अन मंग त्या मुघलांली आपु सहज कापून काढू. त्येंनी आसा म्हणला तरी सैनिकांचा भ्या काय जाईना. मंग मातर पाचातलं द्वान पटेकर सोताच निंघालं. त्या दोघांनीच गडावं चढाया सुरवादी क्येली. ह्ये द्वान पठ्ठे समोरचा उभाच्या उभा कडा सहज येंघून वर ग्येलं. येवढाच नय तं फक्त द्वानच तासात किल्ल्यावरल्या मजबूत सुरक्षेमंधून सम्देनली गुंगारा देऊन कोन्हाला न कळता थेट किल्ल्याच्या किल्लेदाराचा चांदीचा हुक्का घेऊन त्ये दोघंय खाली आलं. पटेकर भावांच्या ह्या कामगिरीना समदेंली लय फुराण चहढला अन समदी सैना पुरी जोमाना लढाया तयार झाली.
मंग लढायीची यवजना तयार झाली. खोटी खोटी फकिरा-बाबांची सोंगा घेऊन किल्ल्यावं गपचिपपना जाऊन पटेकर बंधूंनी किल्यावरचं काही आधिकारी अन किल्लेदाराच्या येका जवळच्या सहकाऱ्याला फितावला अन किल्लेची समदी माहिती काढून घ्येतली. 
मंग लढाईच्या दिशी तिरमक देवाला योक बोकड कापून कामगिरी सुरु झाली. सगळ्यात आंधी पटेकर बंधू कडा येंघून वर ग्येलं, अन मंग त्येंनी वरून दोराच्या शिड्या खाली सोडल्या. त्या शिड्यांवरून मंग ५०० जण किल्ल्यावं चढून ग्येलं. वर पोहोचताच समदेनी थेट किल्ल्याच्या मुख्य शिखरावं हल्ला करून तिढल्या मुघल सैनिकांली कापून काहाडला. अन आपला झेंडा लावून हर हर महादेवच्या घोषणा देत इजयाची शिंगा वाजावली. मंग त्ये किल्ल्यातल्या दुसऱ्या सैन्यावं चालून ग्येलं. अचानक येवढा आवघाड कडा चढून येवढं लय सैनिक वर आलं ह्या पहून मुघला जाम बेहेली. न लढताच कित्येक जण वाट फुटल तीढुन पळून ग्येलं. काहींनी कड्यावरून उड्या मारल्या अन ठेचून मेलं. कित्येक मुघला हातपाय मोडून जखमी झाली. जे मुघल किल्लेवं लढाया थांबलं तेंली सम्देनली मारून टाकण्यात आला. अन मंग किल्ला ताब्यात घेतला.
येवढा मोठा पराक्रम करून किल्ला जिखून घेतल्याबद्दल मंग पेशयांनी पटेकर भावांली चाळीस हजाराचा इनाम दिला. थोरल्या पटेकराला पालखीचा मान दिला. अन खेरुजी नाईकाला सुदा पालखीचा मान आन बारी ह्या गाव इनाम म्हणून दिला.
ह्याच वीर तुकडीना मंग रतनगड, कलाडगड, अलंग, कुलंग हे किल्लय बी जिखून घेतलं. रतनगडावंय बी तिरमक सारखंच वर जाऊन दोरीच्या शिड्या खाली सोडून द्वान-अडीचशे गडी येंघून गेलं. तव्हा जव्हारचा राजा अन त्येच्या घरची सगळी लोका रतनगडावंच व्हती. रतनगडावं लय मोठी लढाई झाली अन दोन्ही बाजूचं मिळून द्वानशे ल्वाक म्येलं. जव्हारचा राजा कसाबसा सुटून ग्येला. याबदल पेशयांनी ३० हजार रुपये बक्षीस दिलं आन यमाजी भांगरे ह्या सरदाराला पालखीचा मान अन साकीरवाडी ह्या गाव जहागीर म्हणून दिला.
तं आसं व्हतं आपल्या डांगणातलं ह्ये पाच जेम्स बॉण्ड म्हंजी पाच पटेकर बंधू. 



6 comments:

  1. इतिहास लय भारी ध्यानात ठिवलाय ब्वा

    ReplyDelete
  2. पका भारी लिवलाय👌👌👌

    ReplyDelete
  3. ज्याम भारी लिवलाय👌👌

    ReplyDelete
  4. वाचून एकदम फुरांनच चढला अंगात

    ReplyDelete