सन्माननीय वाचक

Friday, July 20, 2018

आगोट

आगोट
मफल्याला अन्जुन आठावताय,
तवा मी सा-सात वरशाचा आसल.
मिरुग निगयच्या अगुदर ल्वाका भाता आन नाचन्या पेराया जायेचि.
मफल्याला मफली आय म्हनयची 
"  बा करपाचा बुतारा घ्ये आन तुया बापासंगा जा रोपा पेराया". म्या आपला पका गमज्या उडईत बापाच्या सन्गा जायचो. माहा बाप सरवा सरजाम आन आम्च द्वान बईल घेऊन दरीला जायाचो.
माहा बाप घमेल्यात वायसा प्यारायचा भात घेयाचा आन सम्द्या रोपात प्यारायचा. 
मन्ग माहा बाप यवसतीत आऊत जुपायचा अन मफल्याला म्हणायचा" बा तेवडी आरज्या बयलाची जोती चांगली बान्द ".
मी आजाबात भेत नवतो आमच्या आरज्या बईलाला, पका गरिब बईल व्हता. पन आमचा मिंडा सरज्या बईल लय बेकार व्हता,निसता माराया धावुन याचा. तो आला का म्या पडाळीक पळुन जायचो. बाबव लय भेयचो.
     माह्या बापाना औताना नांगारला का म्या लगीच बुतार्याना हिकडुन तिकड भात करयचो. माहा बाप म्हनायचा " बा र्हावदे तुफल्याला नाय जमायचा.

माह्या आयला ज्यावान कराया लय येळ लागायचा. कारन चुलीला लावयची फाट्या  पकी वांबाट आसयची, येळत पेटयचीच नाय. आम्हाकली फाट्या आमी लवलाच भरुन ठिवयचो. काई फाट्या आन काई हिलकं. हिलकं पाटकन पेटयचं. नाय पेटलं त कुईट टाकयची नायत कोया कारई. तवा कुट थ्वडी ईस्तु होयची. ईंगाळ पेटलं का मंग पटापट ईस्तु ववलातुन तामतोलीला लागयची आन कोरड्यास शिजायचा.
      सायेच्या भाकरीला येळ नवाता लागत पन निसत फोफ होयचं. मंग माही आय कवाडाला कडी पोंद्या लावुन ज्यावान घेऊन निघयची.
       आमी घराभवती झडाप करयचो म्हणुन कयाचाच भ्याव नसायचा. तसी झडाप कराया लय मंजा येची. मी झिटानली पार गवारटेर्याला जायचो, आन रामेठेची झिटा आणयचो. माहा भाव दरीला जावुन पेठ्या आणायचा. आमी वाख रानातुनच आणयचो, म्हणजे पॅक झडाप बांधता येते.  पात आणाया मातर लय लांब जाया लागायचा. आमी पातीला जाताना ईळा घेवुन पहाटीलाच निगयचो. मी चुंबळीला फाटकी चादर नाय त टाईल घेयचो. आमी पोचल्यावर माहा भाव, आय, बाप पटापट पात कापयच, आन मी पातीची यंगा वाटव नेवुन ठिवयचो.पण लय येळ लागायचा. अन जर का भानव ( मोठा डास) आलं तर लय बेकार. बाबव डसल ना भानव तर गांधीच येची अंगावर. 
 पातीच भार झालं का आमी पटापट घराक निगयचो. मला वाहाना नवत्या म्हणुन लवकर निगयचो, नाय त पायाला पक चटक बसयचं. घरी येवुन जेवयचो आन लगेच हिरडेनली निगयचो.
   आमचा प्वाट हिरड्यानवरच आसताय. म्या आकडा घेयचो आन माहा बाप सरा घेयाचा. मला हिरडीव चडता याचा पन शेंडेच्याबुंध्यावर नाय जाता याचा. मंग मी बारीक बारीक फोकाव जायचो आन आकड्यांना हिरडीची फांदी वाकवुन हिरड येचयचो. मी गळगोतीत येचयचो अन मंग पोताडीत नेवुन टाकयचो. माहा भावाचा परवट लय मोठा असायचा. तो शेंदर्या हिरडीव पार वर जायाच. माही पोतडी भरली का मंग मला बरा वाटायचा. 
 वरुन नाय हिरड याचता आल तर मी झोडलेल्या हिरडीक जायचो. माहा बाप हिरड सर्याना झोडायचा. पोतडी भरली का मी  पळयचो घरी दडोलोप्या ख्याळाया. 
        म्या घरी पोचलो का मह दोस्त ख्याळाया तयारच असयचं. मंग मी संत्या,नाम्या, धर्मा गिटा, पांड्या, होन्या आसी समदी प्वारा ख्याळाया असयची. 
मफल्याव लय येळ राज्य नसयची. कारन मफल्याला समद्या जागा पाट आसयच्या. लयकरुन प्वारा राह्याकाकुच्या घरामागच्या निरगुडीत दडयचि नायत ममत्या म्हतारीच्या घरामागच्या जांबाव दडयचि. मी हुडकयचो आन म्हणयचो " नाम्या ईस्टाप, संत्या ईस्टाप, पांड्या ईस्टाप". मंग माह्यावरची राज्य जायेचि. परत आमी समदं सुटयचो . आन होन्येव राज्य आली का बाबव पकी रेफळयची. आमी जनीच्या घरामांग दडयचो अन होन्या दिसला का मी पळत जायचो अन " थप्पी" मंग राज्य लय पोहंगळयची.  तो लय पिसाळयचा आन म्हणायचा, " मफल्याला तुमी लगेच थप्पी द्याता".  पन राज्य संपत नाय तवर ख्याळायाच लागाताय. कसातरी होन्यावरची राज्य फिटली का मंग तो गमज्या ऊडवीत मफल्याला म्हणायचा, " रामा तु पघच आता म्या कसी नाम्याव राज्य घुमवीतो ते". असा आमचा ख्येळ पार सात वाजपरयन्त चालायचा. 
  सात वाजलं का माह्या आयचा आवाज यायचा, " बा रामा खाया येतो का तिकड यव". मंग मी टिंगारीला पाय लाऊन घरी जायचो.
     घरात पोचलो तवा पार आंधार झाला व्हता. तसा माहा घर म्हन्जे लयीच सादा. पन मफल्याला लय आवडायचा . माह्या घराच्या वास्यांव कुईट टाकली व्हती. अन आडं पावळेनी शिवलं व्हतं. माळेव पेंडा भरला व्हता. परवाच्या दिशी तेच्यातच म्या आंब ऊबवणीत घातलं व्हतं. अन घराच्या बायेरुन कारईंचा कुड व्हता. तिथच बाजुला आमचा गोठा व्हता. मफल्याला कपेली गाय भारी वाटयची. शिंगा पकी मोठाली पण कधीच मारयची नाय. गोठ्याच्या कडला ऊखाळ व्हता. तेचेव माही आय भात कांडयची. कडला कनगीला टेकऊन मुसाळ ठिवयचो. दारापशी जाता असयचा. जातेव बाया दळाया येच्या. पहाटीला गाणा म्हणुन दळयच्या. असा माहा घर. 
    म्या घरात पोचलो अन पाह्यला माहा बाप हिरड तुडवित व्हता. राकेलची चिमनी बाजुला ठिवली व्हती. मंग म्या पन गेलो तुडवाया. तुडवलं का हिरड खोकं व्हती नाय. माह्या बापाना मफल्याला पायला अन म्हंगाला " बा रामा तुव केवडुस पाय, तुफल्याला नाय जमायचा".
पन म्या काय आयकतो. मी तसाच तुडवाया लागलो. तवर मफल दोनी भाव आल व्हता. मंग माह्या आयना हाक मारली " पोरांनो जेवुन घ्या आज घायपाताची भाजी केलेय". 
माह्या आयना याताना घायपाक भाजी आणली व्हती. मंग आमी जेवलो. माहा बाप मफल्याला घेऊन मोत्या लोखंडेच्या घरी ग्याला. तिथ पकी ल्वाका व्हती. मंग तेनी पते काढलं आन मेंढीकोट खेळाया लागलं. मफल्याला यत व्हता थ्वाडा थ्वाडा मेंढीकोट, पन बारीक प्वाराला क्वान घ्यानार. पघता पघता म्या नींजुन जायचो. माह्या बापाच्या मांडीव. मंग माहा बाप मफल्याला पांगोठी टाकुन आनायचा.
क्रमशः



11 comments:

  1. मस्त झालाय, पुडचं भाग लवकर येऊंद्या

    ReplyDelete
  2. पक्का भारी भौ
    म्या महा बा संगा राॅपा पॅराया जायचू .मला आठवला.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. मी थोडी लिहीतो आणी post करतो म्हणून वेळ लागतोय.
    क्षमस्व

    ReplyDelete
  5. 🌱👌👌

    बारा मयन्येंची 'पोडगी' हिरड .
    म्होरला भाग बीगीबीगी यंवन्द्या लोखंडे बवा _/\_

    ReplyDelete
  6. आभारी हाये सर. परयत्न करतोय बांबळे साहेब

    ReplyDelete