कुळसाय
तीन दिवसांपासून ढाळ-वांत्या होत असलेल्या हौशीला बावंज्या गभाल्याचा अंगारा लावून बघितला, रखम्या महाराचा वारा घेऊन बघितला तरी काही गुण येत नव्हता.म्हणून रावज्याने आज रामा भक्त्यालाच घरी बोलावले होते. रामा भक्त्याने गुढी लावून पाहीले तेव्हा कुळसायची अट सांगितली होती. आणि सात दिवस कुळसायला जाऊन पाणी घालायला सांगितले होते. त्याचबरोबर दोन दिवसांची दया ( अंगारा) लावण्यासाठी दिली होती.
ह्यावर्षी थोडा उशीराच पाऊस झाला होता. लोकांनी पेरणीसाठी लागणारे बी कधीचेच नीट करून ठेवले होते. संपूर्ण जून महीना कोरडाच चालला होता. साठवणीच्या पिण्याच्या टाक्यातील ( विहीर) पाण्याने तर केव्हाच तळ गाठला होता. शेतीलाही पाणी नाही आणि पिण्यालाही पाणी नाही अशा दुहेरी पेचात संपूर्ण खेतेवाडी गाव अडकला होता. अशातच दोन दिवसांपासून धो-धो पडायला सुरूवात झाली होती. गावातील पोहळ्यांतील (गटार) पाण्याचे लोट थेट विहीरीला जाऊन मिळाले होते. पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. शेतीला वापसा तयार झाल्यामुळे प्रत्येक जण रोपं टाकण्याच्या गडबडीत होता. अशा कामाच्या पलीत हौशीला पाण्यावाणी ढाळ सुरू झाले आणि त्यामुळे रावज्याची कामात आबाळ झाली होती. कुणी म्हणत होते की, बीयांची ओझी ऊचलून पोट दुखत असेल तर कुणी म्हणे रोमठा कुदळून नळगाठ सरली असेल तर कुणी म्हणे आखाडपांजी केली नसेल म्हणून शेतातील देव कोपला असेल. देवाची अडचण आहे की बाहेरची अडचण आहे ह्या दोन्ही हाजबी बाबी पडताळण्यासाठी रावज्या गावतल्या सगळ्या भक्तांकडे जाऊन आला होता. पण एकाकडूनही गुण न आल्याने आता त्याने रामा भक्त्याच्या सांगण्याप्रमाणे हौशीला कुळसायला घेऊन जायचे ठरविले. सतत होत असलेल्या ढाळांमुळे हातापायाचा गळ्हाटा झालेल्या हौशीला तर अंथरूणावरून उठवत ही नव्हते. आणि कुळसाय गावापासून दूर होती.आणि सात दिवस रोज तिला झोळी करून कुळसायला पाणी घालून परत आणणे शक्यही नव्हते. सर्वांची शेतीत पलीची ( गडबडीची) कामे चालू असल्यामुळे घे-घे म्हणता मोलकरी मिळत नव्हता आणि रावज्याचा देखील कामाचा खोळंबा होत होता. म्हणून त्याने हौशीला आठवडाभर कुळसायच्या जवळ गावक-यांनी मिळून बांधलेल्या कोपटातच रहायला तयार केली. तिला सोबत म्हणून स्वतःची लेक सुमी आणि मावसलेक भिमीला तयार केले.
शेतात एका दिवसाचा खोळंबा करून रावज्या आणि त्याचाही सोयरा कुसनाजी यांनी झोळी करून हौशीला घेऊन ते रानूबाईच्या बनाच्या दिशेने निघाले. रस्त्याने जाताना वाघ्याच्या खांडीत वाघ्यालापण त्यांनी हौशीच्या सलामतीसाठी नारळ कबूल केला. रस्त्यातच त्यांना महीनाअखेरीचे ( महीन्यातून एकदा गावोगाव फिरणारा डॉक्टर ) डॉ. घिगे भेटले. त्यांनी हौशीची दशा पाहून तिला लगेचच कोतुळच्या सरकारी दवाखान्यात दाखल करायला सांगितले. सोबतीला काही गोळ्या आणि पाण्यात मिसळून पिण्यासाठी ORS ची पाकीटे दिली. डॉक्टरांच्या अंदाजानुसार हौशीला अतीसाराचा त्रास तळ्यातील दुषित पाणी पिल्यामुळे झाला असावा. आणि म्हणूनच आज ते रुग्ण तपासणी बरोबरच तळ्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन जायला आले होते.हौशीला डॉक्टरकडे नेतो असे म्हणून रावज्याने बनाचीच वाट धरली. पोटात अन्नाचा कणही नसल्याने हौशीने तेवढे ORS चे पाकीट पाण्यासोबत संपविले होते. म्हणून तिला थोडी तरतरी आली होती. रानुबाईला पोहचल्यावर सर्वप्रथम रावज्याने गुळ-भाताचा निवद भरला आणि तोच भात प्रसाद म्हणून हौशीला खायला दिला. रानुबाईच्या बनातच पावसाच्या पाण्यामुळे अनेक पाण्याचे 'उभेड' निघाले होते. तेथूनच रावज्याने कळशी भरून आणली. पाणी खुपच थंड असल्याने त्याने पाण्याचा जराशी कड मोडला आणि मग हौशीला प्यायला दिले. मग हौशीने कुठूनतरी आराम मिळावा म्हणून रामा भक्त्याचा अंगारा, रानुबाईचा अंगारा आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या. रानुबाईच्या जवळच बांधलेल्या कोपटात रावज्याने चार-पाच दिवस पुरतील एवढया सरपणाची मोळी आणून टाकली. सोबत आणलेला शिधा हौशीच्या हवाली करून दोघे सोयरे परतीच्या वाटेला निघाले.
इकडे गावात आल्यावर बघितले तर प्रत्येक घरात एक माणूस आजारी पडला होता. फार वर्षापूर्वी अशीच पटकीची साथ आली होती. तसा प्रकार तर नाही ना...?...या विचाराने प्रत्येक गावकरी गर्भगिळीत झाला होता. या सर्वांपासून हौशीला वेळेतच दूर नेले म्हणून रावज्या खुष होता. इकडे हौशी रोज सकाळी अंघोळ करून कुळसायवर पाणी घालीत होती आणि नियमितपणे अंगारे व गोळ्या घेत होती. दोन दिवसांतच तिचे जुलाब थांबले . तसेच तिला आता डोंगरातून वाहणारे नैसर्गिक झ-याचे चांगले पाणी तेही उकळून पिण्यासाठी मिळत होते. तिची तर घरी परतण्याची घाई होती पण सात दिवस पाणी घालायचे असल्यामुळे तिला थांबावेच लागणार होते. इकडे डॉक्टरांनी तपासणीसाठी नेलेल्या पाण्याच्या नमुन्यात ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल आल्यामुळे लगेचच गावात टँकरची सुविधा केली होती. आणि डॉक्टरांचे एक पथक गावात दाखल झाले होते. सात दिवसांनी जेव्हा हौशी स्वतः तिच्या मुलींसोबत घरी आली तेव्हा सगळा गाव तिला बघायला जमला होता. कारण ती जगेल अशी कुणालाही भ्रांत नव्हती. बावंज्या गभाला, रखम्या महार, शंक-या भगत, रामा भगत आणि घिगे डॉक्टरही रावज्याच्या घरी जमले होते.प्रत्येक जण आपल्या अंगा-यामुळेच हौशीला गुण आला असे सांगत होता. कुळसायला पाणी घातला म्हणून ती वाचली असे रामा भगत म्हणत होता. तर अतीसारावर वेळीच गोळ्या-औषधे घेतली म्हणून हौशीचा जीव वाचला असे डॉक्टर म्हणत होता. बाहेर ओट्यावर बसलेल्या रावज्याला खराब पाण्यामुळेच आजार आल्याची खात्री पटली होती. त्याने वेळेतच तिला त्या पाण्यापासून दूर नेल्याने तिला बनातील शुद्ध पाणी मिळाले होते. तसेच डॉक्टरांच्या दवा-गोळ्यांनी सुद्धा तीला फरक पडल्याचे मानले होते. पण हौशीला वेळेतच बनात हलवायची सद्बुद्धी कुळसायनेच दिली म्हणून तो कुळसायच्या नावाने पाया पडत होता. सगळे आपापल्या घरी गेल्यावर रावज्या पेरणीसाठी पाभारीची बांधणी करीत होता. तर हौशी आधूलीने बी मोजीत होती. आठ दिवसांपूर्वी कोलमडलेला हौशी -रावज्याचा गाडा आता कुळसाईच्या आणि डॉक्टरांच्या कृपेने रुळावर येत होता...
- संतोष द. मुठे.

No comments:
Post a Comment