रानवेडी
*रानकई मोठेबा*
रानकई तुकाराम धांडे म्हंजी आपले समद्यांचा आवडता मोठेबा. मोठेबा म्हंजी रान जगणारा आण त्या आपल्या सब्दांमंदी यकदम सवंसारखा उतरावनारा यक आवलियाच बॉ. जसा रान कंदी मेकक(मेकप) बिकक करीत नय तरी यकदम द्याखना, साधासुधा पन लय द्याखणा. तसाच आपला रानकई म्हंजी मोठेबा लय साधा. लय म्हंजी लय साधा. यवडा साधा का आजूनंय मोठेबा कुडं हिंडायचा आसला का सायकल नयतं पायीच. पायी जात आसला तं कॉनला हात नय करणार का काय नय. चाल्लाय आपला टुकूटुकू. तेची कपडीय यकदम सादीसुदीच. धवळी ल्यांघा, धवळीच नेहरू बंडी आन धवळा उपारणा. काखात आपली नेमीची पिशी आटकायेल. पायात साद्यासुद्या वाहाना आन मोठेबा म्हंतोय तसं निसर्गानाच आपाप वाढयेल कुरूळं कुरूळं लांब केस. पण तेच्या सब्दांमंदी आस्सी जादू का काय सांगत्या. तेचं सबुद यकदम साधं-सुधं पण लय देखणं. आथा ह्याच पहा बरं...
आम्ही सश्याच्या येगाणं
जाऊ डोंगर यंगून
हात लाऊन गगनाला
यऊ चांदण्या घेऊन...
काय ते सबुद🫡 आ.. हा... हा...
मन लाऊन आईकला तं माणूस यडाच व्हईल. म्हंजी त्या सब्दांचे पेरमातच पडंल. मी तं पडलोय भौ. जवा म्या रानयेडी कईताचा ज्या पुस्कुतात नय त्या कडवा पंल्यांदा आईकला व्हता तवा. त्या आसा पा बरंका...
बारीकपनापसून रानावनात रयेल, जगेल, फिरेल त्या पोरीचा जवा लगीन व्हताय आन ती लगीन करून चेहरात जाथेय तवा तिला त्या डोंगराचं, झाडाचं, झापाचं आठव यऊन कसा वाठाताय त्या आस्सा...
तिचं मन डोंगरात, तिला दिलं शहरात
आता गच्चीवर जाते दुर डोंगर न्याहाळीते
त्याचा आठव येऊन येतो हुंदका दाटून
त्याला हात जोडताना दोन आसवे ढाळली
डोंगरावं भाळली पोरं डोंगरावं भाळली
ह्या कडवा जवा म्या पंल्यांदा आईकला व्हता तवा खरंच मॉवाला हुरदाच भरून आला व्हता. आपले गावापसून लांब जाणाऱ्या परतेकाची आशीच आवस्था व्हतोय नयंका..😢
हि कईता आईकली आन मी मोठेबाचा डायरेक फॅनच झालो. मी तं जाऊंद्या मोठेबाचं लय मॉठमॉठालं कई, लेखक, पिचेरमंदलं हिरो लय फॅनंत. लय म्हजे लय फॅनत. रानकईचं सबुद ऐकायला भ्याटावं म्हणून मोठेबाला पेशल ममय-पुन्याला ४-६ मैन्यान्या बॉलाऊन घेत्यात. त्याय आख्खा खर्च त्याच करीत्यात. आपले मराठीमंदलं कई, लेखक येंच्यात मोठेबाला लय मानंय. लय मानीत्यात बॉ मोठेबाला.
त मंग मला आस्सा म्हणायचेेय का मोठेबा यवडा म्हॉटा माणूसंय... पण लय साधा. पण आपले समदे समाजाला भेटेल यक हिराचंय बॉ मोठेबा. यरीच नय मोठेबाला रानकई म्हणंत. मोठेबाना आपल्या सब्दांमंदी आस्सा काई रान उतरावलांय का आंधळ्याला सुदीक निसर्ग दिसंल आन तो सुदा ते निसर्गाचे पेरमात पडंल.
म्या रानयेडी कईता आईकली आन मी यडाच झालो. मोठेबाचा कुडंय कारेकरम आसला का मी तिडं जाया लागलो. यक यक नईन कईता आयकायला मिळाया लागल्या. आम्ही डोंगर राजाची, साहेब, पुनर्वसन, बाप डोंगरी नांदतो, माता आणि माती, तुकोबा आणि आजोबा... काय त्या कईता. रानयेडी कईता तं मला यवडी आवाडली का म्या ठरावला ईचा हिडीव काडायचा.
आता हिडीव काडायचा ठरावला पण क्वानाचा काडायचा ह्या परिस्न व्हता. कसातरी म्या वृषालीला तयार क्याला बॉ. मंग सुरवादी पसून तं पार लगीन बिगीन दखवोस्तवर हिडीवला ४-५ साला लागून गेली. लय मेयनत लागली हिडीव कराया. यकदाचा हिडीव तयार झाला. कुडून तरी मोठेबाना तो पयला. आन यके दिशी मलाच मोठेबाचा फोन आला आन मोठेबा म्हतो कसा,"अरे जालूदादा, काय कईता केलेय त्वा. मी काय बोलू आथा. काय ती कईता, काय तो द्याखावा, काय ती रानयेडी... मानला रे भौ तुमाली. आज खऱ्या आर्थाना रानयेडी कईतेचा चीज क्याला त्वा." मोठेबाचंच आसं सबुद आयकून मी यवडा खुस झालो का काय सांगू. यवडी ४-५ साला घातली त्या काय वाया नय गेली यचा समाधान वाटला. थोडे दिसाना मोठेबाच झापाकं वृषालीला, मला भ्याटायला आला. तो दिवस तं मी कंदीच नय ईसारनार. वाईट याकंच वाटाताय का तवा आई नवथी. आई आसती तं तिलाय लय आनंद झाला आसता.
मोठेबाच्या गप्पा आयकायच्या म्हंजे लय आगळा यगळा आनुभव. कितीय आयकंत बसा माणूस कटाळनारंच नय. तुमालीय कंदी निवांत रानकईंच्या गप्पा आयकायला भेटल्या तं नक्की आयका. त्या निखम गप्पा नय रहात तं परतेक सब्दात जादू रयेतेय.😊 आख्खा निसर्गच तेंच्या सब्दांमदी ग्वाळा व्हऊन आलाय आसा वाठाताय.😍 रानकई म्हंजी यक हिराच हाये.
- जालिंदर शांताबाई विठ्ठल गभाले (जालू)
वारंघुशी ता.अकोले जि.अ.नगर
No comments:
Post a Comment