🌷 शेवंती 🌷
रातीच्या कोरड्यासाला काय करावा येच्या यिचारात शेवंती व्हती त्योच तीला म्होरं सांबरीच्या श्येंगा दिसल्या...येचंच दानं काढून जरा पिठाचा रोंब घालून आम्टी बनवावा हा यिचार तिच्या मनात आला...
देवज्याला बहाळ्या बैलाना बांधावरून पाडला तव्हापासून त्यो कायमचाच कमरंत आधू झाला. घरातला कर्ता धर्ता मानूस धरनीला लागला आन् संम्दी जबाबदारी श्येवंतीवं पडली...प्वोरांचा करायचा...घरात्ला करायचा...श्येतात्ला करायचा...जनावरांचा श्यान-मुत करायचा...ह्या संम्दा करता करता तिची पार बांडी पडायची...तरीपन ती गड्या मानसावानी राबायची...जवळजवळ सहा महिनं व्होवून गेल्तं...ह्या आसाच रहाटगाडगा चालू व्हता...त्येच्यात भरीसभर म्हनून तिची ननंद धुरपी तिच्या बाळातपनासाठी मह्येरी आली व्हती...ती तं काय कामाला हातच लायीत नसं. कामावरून घरी आल्येवं कंधी द्वान घास आपल्या प्वोरांन्ली आन् नव-याला खाया घालीते आन् कंधी धरनीला आंग टाकित्येय आसा श्येवंतीला व्हयाचा...सहा मैयन्या पुरयी टवटयीत दिसानारी श्येवंती ह्या सहा मैन्यात पार उभ्या साबरीवानी वाळून ग्येली व्हती...नव-येच्या दवाखान्यापाय संम्दी जमीन गहान ठियेल व्हती...येक ववाभर आराच त्यो काय शिलकीला व्हता. त्येच्यातच तिना भिनूग आन् उलीसाक हुळावळा टाक्येल व्हता...भात कसायं बी म्वोलाना जाऊन जम्वायचा ह्या तिचा धोरान...यिचार करता करता गवनी कंधी आली ती श्येवंतीला कळलीच नाय...आसाव-या पाटीत ठियेल रिकामी कळशी डव्ह-यात बुडावली आन् तशीच घराकं निघाली...
घरी देवज्याना कसायं चुली म्होरं खुरडत येऊन श्येवंतीला हात पाय धिवाया पुरती पानी गराम करून ठियेल व्हता...श्येवंतीना त्याच पान्यात कळशीतला पानी इसान म्हनून घातला आन् कशीतरी आपली बुडबूड आंघूळ क्येली...तिला वायसा बरा वाटला. तेवढयात तिची प्वारा आली...धाकली सयती तिस्रीला व्हती तं बारखा मन्या आंगाणवाडीत...सयती कशीय बी हाताखाली मदत करायची...घोटभर क्वोरा चिहा प्येल्येवं श्येवंताना फाट्या म्होरं करून ढनाढना जाळ क्येला आन् काठवठ घेऊन पिठ मळाया लागली...देवज्या आन् सयती सांबरीच्या श्येंगा सोलाया बसले. मन्या मंधीच यियाचा आन् सुपाटातून सोल्येल दानं पळवायचा...सयती वैतागली आन् त्येच्या पाठीत दिला एक धपाटा...तसा मन्याना भ्वोकाड पसारला...ह्यो ख्येळ श्येवंतीची ननंद धुरपी पह्येत व्हती पन तिना काय ल्येकराला जवळ घ्येतला नाय...आदूगरच कामाना कावल्येल्या श्येवंतीला लय वंगाळ वाटला...धुरपीकं ह्येरीत..."संम्द्येन्ली आयता खाया लागाताय" आशी म्हनत मन्याला मांडीवं घ्येत आपली भाकरी थापाया लागली....कसाबसा ज्येवान आटापला...भांडीबासना धिवली आन् सकाळच्या आंघूळीला पानी ठिवाया लागल म्हनून मोठ्या भगुल्याचा राखाना बुड घ्येतला....
आथ्रूनात पडली खरी पन उंद्येच्या कोरड्यासाला काय करायचा...?....ह्या यिचाराना तिची झ्वाप उडाली.... त्या काळूखात तिच्या मनाची घालमेल तिच्या खेरीज कुनालाच दिसली नाय...उंद्या सकाळच्येला भाक्रीचा पिट नाय ह्या ध्यानात आला आन् सकाळी बिगिनच उठाया लागल ह्या यिचाराना श्येवंती झोपी ग्येली...क्वोंबडा आरवला...तरी गाव झ्वोपतच व्हता....पन श्येवंतीच्या जात्याची घरघर आन् तिच्या आवाजात संवसारावरचा येका गान्याचं बोल कानावं पडत व्हतं....
"माझा राजा-रानीचा संवसार...
आम्हां कह्येची नाही भरमार..."
- संतोष अनुसया दगडू मुठे.
No comments:
Post a Comment