सन्माननीय वाचक

Friday, September 18, 2020

साकारखांडीतला मोहाळ



एक दिवस साळा भरल्या भरल्या बाळ्याना बातमी आणली का"तिकडं मान्हे-याकं जाताना साकारखांडीत आंब्याला पका मोठा मोहाळ हाये, त्याला इतकी मॉध हाये का खालून हेरला तरी आशी चमचाम करीतेय. बाळ्याना तेच्या मामाच्या इकडं जाताना मोहाळ हेरला व्हता.
त्या आयकून आमच्या त्वाँडाला पाणीच आला कवा जावून मोहाळ काडीतोय आसा झाला व्हता.
मंग आमी सुटीच्या दिवसाची वाट पहेत रहिलो,नहीतं एखादा मधीच मोहाळ काढून न्याचा आशी शंका वाटायची.
शेवट आईतवार उजाडला बाळ्या, मी आन् शिवा ना जायेची तयारी केली .पण आमचा बोलना मव्हा धाकला भाऊ जाल्या ना आईकला आन् तो बी आमच्या मागं लागला. बरं त्याला नै नेवा,तं तो मव्हा नाव दादाला सांगल.मग दादा मव्हा ज्याम रोग काढील म्हणून जाल्यालाय संग घ्याचा ठरावला.
गावाबाहेर निघता निघता मधीच तुकामामाना ईचारला," पोरांनो कुढं चाल्ल्यात ईकडं?" तवा त्याला सांगितला का यरी आलोय इकडं ईलायती चिचा खाया.त्याला खरा सांगितला आस्ता तं त्याना लगेच दादाला सांगितला आस्ता तुही पोरा कुढं गेल्यात त्या.
शेवटी बराच लांब चालत गेलेवं त्या आंबेच्या झाडापशी पोचलो. वर पहिला तं मोक्कार मोठा मोहाळ.एवढा मोठ्ठा मोहाळ तवर आम्या पहिलाच नव्हता.तेची मॉध ऊन पडलेमुळं चमचाम करीत व्हती ( माश्या चमकायच्या पण तवा आमी लहान,काय कळाताय वाटला मॉधचंय).
बाळ्याना मोहाळ पहिल्यापसून तीनचार दिवस होवून गेलं तरी मोहाळ तसाच व्हता,कोणा काढला नही म्हंजे कोणा त्या पहिलाच नही,कोणाला दिसलाच नसंल म्हणून आमी खुशीत होतो.
तवा आंबेच्या झाडाला आंबं लागलं व्हतं, कोय बरीच मोठी झाली व्हती. बाळ्या न् शिवा डेरींग करून झाडावं यंगलं. तेनी आंब्यांचं तीनचार घड तोडून आमच्या हातामंधी दिलं. आन् जाल्या न् मी माश्या झोंबू नै म्हणून लांब जावून उभा रहिलो. बाळ्या म्होरं आन् शिवा तेच्या मांग गेला.बाळ्या डायरेक मोहाळापशी गेला पण मोहाळ कसा काढायचा ह्या त्याला समजंना.मंग त्याना डॉका लावला,आंब्याचा टघळा तोडला अन् त्याना माश्या हुसकाया लागला अन् जवा माश्या उठल्यात.
जशा माश्या पहिल्या तसा ज्याल्या न् मी चिंगाट सुटलो. हातातलं आंबं कुईकं तं काय कुईकं. बाळ्या न् शिवा तं आंबेवं खुटाकलंच. तेन्ली सुचंनाच काय करावा दिल्या निम्या भागातूनच उड्या हानून अन् जवा पळाल्यात. आमी पुढं पळतोय आन् माश्या आमचे डोक्यावं. बाळ्या ताटम व्हता तो आमच्या पुढं पळायचा.ज्याल्या बारीक तो मागं रह्याचा. त्याना आमच्या डोक्यावं पक्या माश्या फिरताना पहिल्या का घाबरून पका आरडायचा मंग बाळ्या त्याला घ्याला मागं जायाचा. पळता पळता वाटातच लहान्या नाच्या चा झाप लागला. तिथं लपाया गेलो तं मोहाळाच्या माश्या पहून त्यानाय आमाली श्या दिल्या, हुसकून दिला न् दार लावून घेतला.. परत गावाकं पळाया लागलो .वाटात एक म्हतारी भेटली तीनाय भाड्या भडव्या केला ,चारदोन श्या दिल्या. आमी पुढं पळतंच व्हतो. शेवटी मास्तर मामाच्या ईहीरीपशी आलो . तिथं मोकार निरगुड्या होत्या. पळता पळता निरगुडीचं टघळं तोडलं न् मग माश्या हुसाकल्या. पळून पळून मराठी शाळेत येवून दम खाल्ला तरी तिथवर तीनचार माश्या आल्या व्हंत्या. मग आपला काय चुकला येचेवं बोलना सुरू झाला. मी म्हणलो,"जर आपुन एक मोठी प्लास्टीकची पिशवी नेली आस्ती तं आक्ख्या माश्या पिशवीत धरल्या आस्त्या आन् मंग मॉध कढता आली आस्ती. मव्हा ईचार सगळेन्ली पटला. आन् बाळ्याना लगेच माश्या हुसकाया नव्हत्या लागत म्हणून सगळेनी त्याला येड्यात काढला.
     बाळेच्या कपाळावं आन शिवाचे व्हटावं यक यक माशी झोंबली व्हती. शिवाना जशीकाय तंबाकूच धरलेय त्वांडात आसा वाटायचा😂. आन बाळेच्या कपाळावं पक्का निबार टेंगूळ आला आसं. त्या पहून आमी पॉट धरूधरू हासलो व्हतो.मंग तेंच्या घरी जाऊन आम्या सगळेनी सांगितला का ह्या पडल्यात म्हणून. नयत घरचेनी सगळेलीच ज्याम कुथावला आसता. 😂 बाळ्यान शिवा तीन चार दिवस साळातच नय आलं.

लंय दिवस ही गोट आम्या कोणालाच सांगितली नै.🤦‍♂ काय सांगावा घरी माहीत झाला त आमाली कवाय हागवतील आसा वाटायचा.😤
थोडी समज आल्यावं समाजला का आपण त्या तवा आमी ज्या मोहाळ काढाया गेल्तो तशी मोहोळा लॉका रातच्या टायमाला काढाया जात्यात. आन् आमी दुसरी- तिसरी च्या वर्गात आसताना सकाळच्या पाहारी *आघा* काढाया गेलो व्हतो.😂😂😂

- ज्ञानेश्वर शांताबाई विठ्ठल गभाले (वारंघुशी)



No comments:

Post a Comment