सन्माननीय वाचक

Wednesday, October 7, 2026

आसरमसाळा


आसरमसाळा

आसरमसाळंत अडचणी हायत,
कोन म्हणतं न्हाईत?

कंदी भाकर कमी पडती,
कंदी खोल्या भरून जाती,
कंदी मास्तर कमी पडत्यात,
कंदी आयची आठवण येऊन
प्वारं रातभर रडत्यात.

चुका हायत,
त्या दावल्याच पायजेत;
पन चुका हायत म्हून
आसरमसाळाच नको,
ह्यो कसला न्याय रं?

डोंगर अजून तिथंच हाय,
पाडा अजून दूर हाय,
ओढ्याला पूर अजून येतो,
रस्ता अजून मधातच थांबतो,
आन् कित्येक प्वारांच्या दारापर्यंत
साळा आज बी पोचत नाय.

मंग त्या प्वारानं
शिकाया जायाचं कुठं?

आय ईळभर रानात राबती,
बा प्वाटासाठी बाहेर जाती;
घरात अभ्यासाला जागा नाय,
कंदी दिव्याचा बी भरवसा नाय.

अशा प्वारासाठी
आसरमसाळा फकस्त साळा नाय

सकाळची भाकर हाय,
रातीचा निवारा हाय,
हातातलं पुस्तक हाय,
लिवायला धरलेला पेन हाय,
आन् डोंगरापल्याडचं जग
बघायची खिडकी हाय.

कंदी इथंच
प्वार पयल्यांदा आपलं नाव लिवतं,
कंदी पयल्यांदा नकाशात
आपलं गाव शोधतं;

आन् ज्या बाला
कागद वाचता येत नाय,
त्येचाच प्वारं एक दिस म्हणतं, 
“बा, थांब जरा,
आदी म्या वाचतो!”
ह्यो बदल ल्हान हाय का?

दोष हायत तर दोष काढा,
हिशोब चुकला तर हिशोब मागा,
प्वारं उपाशी हायत तर जाब इचारा,
मास्तर कमी हायत तर मास्तर वाढवा

पन घराला गळती लागली
म्हून घरच पाडत्यात का?

छप्पर शाकारत्यात,
भिंतीला टेकू देत्यात,
जे मोडलं ते बांधत्यात

घर पाडत नाय रं,
घर नीट करत्यात!

आसरमसाळंचं बी तसंच हाय.

ती मोडायची नाय,
ती नीट करायची हाय.

तिच्यातली भाकर वाढली पायजे,
मास्तर पुरे पायजेत,
प्वाराला माया मिळाली पायजे,
आन् शिक्षाण खरंखुरं मिळालं पायजे.

कारण आज बी
डोंगराच्या पल्याड
एक आय प्वाराचं दप्तर भरती,
त्येच्या डोक्यावं हात फिरवती
आन् म्हणती, 
“जा रं प्वारा, शीक...
म्या ईळभर रानात राबंल,
पन तू लिवाय-वाचायचं इसरू नको.
माझ्यावाणी तुया वाट्याला
अंगठा येऊ देऊ नको.”

त्या आयच्या डोळ्यात
मोठमोठ्या योजना नायत,
आकडे नायत,
अहवाल नायत

एकच आस हाय,
“माझं प्वार शिकावं.”

त्या आसेचं नाव
आज बी
आसरमसाळाच हाय!

म्हून परस्न इचारा,
चुका दावून द्या,
यवस्थेला जाब इचारा;

पन दोष काढता काढता
प्वाराच्या हातातनं
त्याची साळाच हिसकावू नका.

आसरमसाळा बंद कराया नको,
आसरमसाळा अजून चांगली पायजे!

कारण डोंगर तिथंच हाय,
पाडा तिथंच हाय,
गरिबी तिथंच हाय,
शिकायची आस बी तिथंच हाय

आन् डोंगरातल्या
शेवटच्या प्वाराच्या दारापर्यंत
चांगलं शिक्षाण पोचत नाय,

तोवर आसरमसाळेची गरज
संपत नाय!

- राजू ठोकळ 
(बोली - डांगाणी)