सन्माननीय वाचक

Thursday, October 15, 2026

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माणसाची जगण्याची वाट

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माणसाची जगण्याची वाट

जगाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावं बदलून टाकायचं सपान बघणारी कायी शास्त्रज्ञ माणसा आता डोंगरदऱ्यांत जाऊन शेती इकत घिया लागल्याच्या गोठी पुढं येत हायत. ज्या माणसांनी यंत्रांना इचार कराया शिकावला, माणसाच्या बुद्धीपेक्षा पुढं जाणारी बुद्धी तयार करायचा ध्यास घ्यातला, त्याच माणसांना आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी रानाचा आधार घ्यावासा वाटतोय. ही गोठ खरी किती आन त्यामागं भ्याव किती, याचा शोध घ्यायला हवा. पन यातनं एक मोठा परस्न उभा रह्यतो. माणसानं स्वतःच्या बुद्धीनं तयार केलेली यंत्रंच उद्या माणसाच्या जगण्याला धोका बनणार असतील, तर त्या इकासाला इकास तरी कसं म्हनायचं? 

आजवर माणसानं निसर्गाव मात करायची मोठी धडपड केली. डोंगर फोडलं, नद्या अडवल्या, रानं तोडली आन जमिनीच्या पोटातलं सारं काढून घेतलं. इज्ञानाच्या जोराव अख्खं जग आपल्या मुठीत आल्याचा त्याला अभिमान वाटाया लागला. पन आता त्याच माणसाला आपला जीव वाचवण्यासाठी पुन्हा डोंगरदऱ्यांची आठवण व्हयाला लागली, तर हा काळाचा केवढा मोठा विरोधाभास म्हनावा लागंल! ज्या रानात राहाणाऱ्या आदिवासी माणसाला जगानं मागासलेला म्हटलं, त्याच रानात उद्याच्या जगण्याचा आधार शोधायची येळ आधुनिक शास्त्रज्ञांवर आली, तर प्रगतीची आपली व्याख्याच पुन्हा तपासावी लागंल. 

पन कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला नक्कीच संपवून टाकणार हाय, असं आजच ठामपणानं सांगता येणार नय. तिच्यामुळं माणसाचं जगणं सोपं व्हण्याची शक्यताबी हाय आन तिचा ताबा सुटला, गैरवापर झाला, तर मोठं संकट उभं राहाण्याची शक्यताबी नाकारता येत नय. खरी चिंता यंत्र किती हुशार व्हणार याची नय, तर त्या यंत्राव कुणाचा ताबा राहाणार याची हाय. कारण बुद्धी कितीबी मोठी झाली, तरी तिच्यामागं माणसाच्या भल्याचा इचार नसंल, तर ती बुद्धी जगण्याला आधार देण्याऐवजी जगणंच उद्ध्वस्त करू शकते. 

आदिवासी माणसानं हजारो वरसं रानाशी भांडण करून नय, तर रानासंगं रहून आपलं जगणं टिकवलं. मातीत बी टाकलं, पावसाची वाट बघितली, रानातनं पोटापुरतं घेतलं आन पुढल्या पिढीसाठी काय तरी जपून ठेवलं. त्याच्याकडं मोठमोठी यंत्रं नव्हती, पन जगण्यासाठी लागणारं शहाणपण व्हतं. आजच्या काळात त्या शहाणपणाची किंमत पुन्हा समजून घ्याची गरज हाय.

उद्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भ्यावानं शास्त्रज्ञ खरोखरच डोंगरदऱ्यांत आश्रय घ्यायला आले, तरी नुसतं रानात जाऊन रह्यल्यानं ते सुरक्षित व्हतीलच असं नय. कारण संकट जर अख्ख्या मानवी समाजाव आलं, तर डोंगरात राहाणारा माणूसबी त्यातनं सुटणार नय. त्यासाठी यंत्रांच्या शक्तीवर मर्यादा ठेवणं, त्यांचा वापर माणसाच्या हितासाठी करणं आन निसर्गाशी असलेलं आपलं नातं टिकवणं गरजेचं हाय. 

शेवटी एक परस्न मनात टोकण्या लागतोच. माणसानं यंत्रांना माणसासारखं हुशार बनवायच्या नादात स्वतःचं माणूसपण तर गमावलं नय ना?

ज्या मातीतनं माणसाचा जन्म झाला, ज्या रानानं त्याला जगायला शिकवलं, त्याच मातीला आन रानाला मागासलेलं म्हनणारा माणूस आज स्वतःच्या बुद्धीच्या भ्यावानं परत तिथंच यायचा इचार करत असंल, तर इतिहासातली ही मोठी गंमत नय, तर माणसाच्या प्रगतीवर उभा रह्यलेला गंभीर परस्न हाये. कारण शेवटी माणसाला जगवणारं नुसतं कृत्रिम बुद्धिमत्तेचं ज्ञान नय, तर मातीशी, निसर्गाशी आन दुसऱ्या माणसाशी असलेलं त्याचं नातं हाय. हे नातंच तुटलं, तर माणूस चंद्राव जाऊन रह्यला तरी त्याचं जगणं सुरक्षित राहाणार नय.

- राजू ठोकळ



No comments:

Post a Comment