सन्माननीय वाचक

Saturday, October 17, 2026

भुकेचा आखाड

 भुकेचा आखाड


आखाड ग्याला, सरवान ग्याला,

आभाळाच्या प्वॉटातून थेंब निंगांला नै, 

बानं मातीत पेरलेलं सपान

भाताच्या रोपाबरुबर करपून ग्याला!


कणगीत उंदरालाय् दाणा नै,

चुलीत इंगोळ, टॉपात कांजी नै,

म्हायच्या प्वॉटाला  बिलगून 

बारकं प्वॉरगं भाकरी मागतंय!


बा बांदावं बसून आभाळाकं पह्यतोय, 

म्हाय रानातली माती चाचपतेय, 

आन् भूक आमच्या घरात

सावकारासारखी पाय पसरून बस्लीय! 


आरं, आमच्या घामावं जगणाऱ्या देसा,

आमच्या प्वॉटातला इंगोळ दिसत नै का?

दुष्काळ आभाळात पडला,

पर् उपासमार आमच्याच वाट्याला का? 


आता प्वॉटासाठी देसात जावं लागंल,

प्वॉरांच्या हातातलं पुस्तुक सुटंल,

आन् पावसाची वाट पह्यता पह्यता

आख्खं आदिवासी जगणंच उघडं पडंल!  


रान आमचं, राबणं आमचं,

भूक आमची, मरण बी आमचंच!

मंग ह्या स्वतंत्र देसामंदी

आमच्या वाट्याला नक्की आलंय तरी काय?


- राजू ठोकळ




No comments:

Post a Comment