आदिवासी बोली भाषा जागृत ठेवणे. तसेच आदिवासी भाषेतील शब्द आणि त्यांचे अर्थ जाणून घेण्याची इच्छा असणा-यांसाठी लेखकाचा एक छोटासा प्रयत्न... सत्य घटनेवर आधारित आदिवासी बोली भाषेतील विनोदी लघुकथा..कथेतून आदिवासी बंधू भगिनींच्या तत्कालीन जीवनमानाचाही,अंधश्रद्धेचा व बालपणीच्या गमतीजमतीचा परिचय होईल.
वाडगा...
चन्दर पाटील,भदू काशिराम, नारायण येसू,सकाराम काशिराम आसे पकेलय म्होटे भावकीचा बॅहाडा...यकेच जागेवं कुयटीची घरा मान्धून रहेची...तेन्च्यात येसू म्हतारा म्हजी भक्त्या गडी व्हता..तॅना कॉकणातून काही इकून-तिकून मॉकार दॅव गॉळा करुन आनलं आसंत...घुमायचा गडी... पका आवतारायचा...दम दियाचा ...लॉखाली मारुन टाखील,जाळून टाखील...जर महे नादी यखान्दा लागला तं..उभा पेटील...तव्हाची माणसा गरीबीना हादरुन जायेल. कोण तेचे नादी लागाता..रगाट गडी तो.! हादराची लॉखा तॅला...गावात जर कह्यानाय यखान्दा माणूच मॅला.. जनवार मॅला... तं लॉखा म्हनायची येस्यानाच मारला बराका...ते भ्यावाना माणूच तेचे समुक सुदीक जात नसायचा...पार धाकावून गेल्थी लॉखा.. येस्येचे धाका भियाना.! चन्दर पाटील,भदू काशिराम,नन्हू पाटील,वाळू धोन्डू ही मन्डेळी घरा सोडून भिवन्जी पाटलाचे घराचे मान्गा पळून आली...मातर सकाराम काशिराम तिढंच मरम्हनून दम धरुन रयला आसं....मन्ग तेव्हडेन्चे पडके घरान्चा लय मॉठा वाडगा तयार झाला...मरनाचा घोस माजून गेला.. ज्या नय त्या झाडा येली उगावल्या.तिकडं दिवसा जायाला लॉखा बियेची..काही दिसाना येस्या म्हताराय मरुन गॅला.मन्ग सक्या म्हताराच यखला रह्याचा.सकेम्हतारेचं दोन मुल कुसना आन यक पन्ढरी... तेचेवं सक्या म्हताराय मॅला आन कुसनाना तो वाडगा मातर चान्गलाच सजावला...मॉकार फळझाडा,आवसेदी झाडा लावली. बरसादीला हावसाव म्हतारी दोडकं,डान्गरा,काकड्या मका,लवन्ग्या मिरच्या..आळवड,कडकीन्दं, चाया लावायची. मन्ग कुसना चहोकून भोतीना पका पकवाट काट्यांचा कुपाट इनून घियाचा..हावशायचा वाडगा म्हजी गावात यकच नम्बर...दिवसा सुधी कॉनाची जायेची टाप नव्हती...चोरीचा तं ईषयच सोडून द्या...इकडं भादयाचा टायीम झाला का पॉरान्ची काकड्या चोरायची चन्गळच ईयेची...वाळेबाचे तुळशायचा वाडगा,नेवट्यायचा वाडगा,गोप्यायचा वाडगा,बाबू आन्धळेची म्हतारी पारबतेआयचा वाडगा,ठके खोकलीचा वाडगा..आसं परतेकाचं वाडगं रह्याचं.सन्धेकाळी जॅवना-खावना झाली का,पॉरा कुढंतऱ्ही यके जागी जमायची.मन्ग तिढच आज कॉनाचा वाडगा लुटायचा आसा बेत आखायची..बास ठरल्या परमाना ते रातीला कॉन्हाला तरी लुटायची, का सकाळी आखे गावात बॉम्ब...! कन्चे भाडे भडेनी कवळ्या निवळ्या काकड्या नेल्या? पार यलान्चा चॉळा-मॉळा करुन ठिवला, खासभरेन्ली पॉटात काट्या नय भरता आल्या का...आसा स्यानचा पाणी पडायचा...पॉरा मातर पकी हाचायची...आन आसे वख्ती कुसना सकाराम नॅमकाच इकडं हिन्डत-हिन्डत इयाचा. का...म्हतारेलीय पका चिडून दियाचा, आन पॉरालीय दम दियाचा..म्हणायचा ,'लयीच चोर माजलत गाडीचं पर महे तावडीत सापडाया लागंतंत..जागेवरच चुताडीचं आन्धळं करुन टाखील..यक-यक काकडीचे यलालीच चिटकावून ठियील'' ....मन्ग पॉरा त्याला बियेची..पर तॅ रोज सारसादूस दम देवू लागला...तव्हा बयऱ्याचा लुख्या म्हजी लय आतरन्ग्या..! त्याना लय बार आयकूनच घॅतला आन यक दिवस ठरावलाचन काय...आज मातर काहीय व्होओ..पर चोरी यचेच इढं करायची...पर तॅला जोडी कुढं कोण तयार व्हताय...पॉरा बिहेची...तव्हा बाबूरावाचा ईशा आन मी तेचे पसी आसाच हिन्डत-हिन्डत गेलो..मन्ग काय.. तॅना मातर आम्हली दॉघान्ली वजं-वजं फचावलाच न काय..तो म्हनं तुम्ही काहीच करु नका, फक्त महे सन्गा मला जोडी म्हणून चला. तीढं माणूच यलाला चिटकाताय म्हणत्यात.. जर मी चिटाकलोच तं तुम्ह्या महे घरी जावून सान्गायचा. महीआय चान्गली हाये.ती मला भान्डनार नय पर सोडून घरी नेयील.ठरलाच मन्ग आमचा तिघान्चाय...लुख्या पुढं.. आम्ही तेचे मान्गा. भर झॉपाची येळ..लायटीचा तपाच नय. आन्धार बुडूक पडून जायेल..रात चिन-चिन करायची...बॅडका डराव-डराव करायची..चाफत-चाफत वाडग्यापसी गेलो.हाताला काटी लागली . वजचकून काटं मोडलं. धरायला जागा केली, आन जसा तीघानीय कातावून सन्गाच बळ कॅला..तं कह्याला ईचारीत्या..! मी खाली ,महेवरून ईशा,ईशेचे वरुन लुख्या ,आन आमचे तिघान्चे वरुन बाभळीची काटी..चान्गलेवानी कहाळून उठलो बॉ..माणसा झोपून जायेल व्हती, पर कुतरा मातर सावध व्हता.तेचे कानावं थॉडाबोह आमचा आवाज गेला व्हता, आन तॅ मातर आमचे जवळ येवून मॉकार डहान करीत व्हता..आम्ही ते आडचानात तसाच पडून रहेल..हालाया जावा तं कुतरा बॉकान्डी बसल..काटी तसीच उराडेवं पडेल..कुतरा लवकर घरात जाईना गडी पार गुदमारुन जायेल...पर कुतरा भुकला-भुकला पर तॅला काही हालवाग दिसली नय मन्ग तॅ निंघून गॅला...मन्ग आम्ह्या उराडेवरची काटी वजचकून कहाडली आन यक-यक जन उठून उभा रयलो..काकड्या चोरायला मातर वासनाच उरली नव्हती पर लुख्या पका नालाईक व्हता.तो म्हन्गाला ,'वाडग्या मन्धी चला ,नयतं मी पका म्होटम्होट्याना आरडंल. तुमची दॉघान्चीय नावा घेईल आन पळून जाईल...मन्ग सकाळी काय तुमची बरी गत नय व्हणार.' आम्ही नादानच...! आन्धीच घुन्गरे भुयन्गुनाना सेडकेल..मर म्हनून तेचे मान्गा वाडग्यात घुसलो....चाफून-चाफून पासा काकड्या उनागल्या. चिटकाताका काय व्हता आसा बेहून जायेल... पर तसीच चोरी करुन गेणूबाचे मोडके घरात आलो,तव्हा गेणूबा रानात रह्याला गॅल्था. घर मॉकळाच व्हता..तीढं त्या काकड्या थोडेस्या खाल्या. बाकीच्या तिढंच लपून ठिवल्या, आन गपचीत घरी येऊन झोपलो...
पर सकाळची मातर काहीच बोम्ब झाली नय...मन्ग काय झाला कानू बॉ. आझूनय मला समाजला नय....पर आथापोहत मी ईसारलो नय वाडगा...!
लेखन..
जगन गजाबाई सिताराम खोकले
मु.सोमज, इगतपुरी तालुका,जि.नाशिक.
मो. 9765457362.
शब्दार्थ...
बेहडा- समुह
भक्त्या-भगत
हादरुन-घाबरून
भ्यावाना-भितीना
यखला-एकटा
बरसादीला-पावसाळ्यात
कुपाट-कुंपन
टाप-ताकद
चन्गळ-मजा
बॉम्ब-पुकार
कहाळून-कन्हून
हालवाग- हालचाल
उनागल्या-शोधल्या