सन्माननीय वाचक

Wednesday, July 10, 2024

हुमान

 [ १० जुलै २०१८ रोजी सुरू केलेल्या ' मही बोली - मही भाषा ' या ब्लॉगला आज जवळजवळ ६ वर्ष पूर्ण झाली...त्या निमित्ताने...]


" हूमान "


मौखिकता हे आदिवासी लोकसाहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मौखिक रूपातच हे साहित्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. परंतू विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात आणि आजच्या आधुनिक पिढीची अनास्था...यामुळे मौखिक साहित्याचे लिखित स्वरूपात जतन न झाल्यामुळे या साहित्याचा ऱ्हास होत आहे. 


हुमान म्हणजे शब्दकोडे...ज्यात अनुप्रास, यमक, उपमा, अतिशयोक्ती अशा अलांकराचा तसेच विचारलेल्या प्रश्नांशी साधर्म्य असलेल्या उदाहरणांचा समावेश असतो. यातील यमक जुळणी व समर्पक वाक्य रचना कुण्या अभ्यासू व्यक्तीने केलेली नसते...तर ती समाजातीलच सर्वसामान्य लोकाच्या बोलण्यातून निर्मित झालेली असते. आजच्या घडीला बोलीभाषेतील शब्दकोश, म्हणी, हूमने, वाक्प्रचार इ. चा लिखित संग्रह तयार होणे अपेक्षित आहे. संवर्धन आपल्या भाषेचे हा एक WhatsApp group डांगाणी/मावळी/महालदेशी या सह्याद्रीत बोलल्या जाणाऱ्या कोळी महादेव जमातीच्या बोलीभाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहे...त्या निमित्ताने आदिवासी समाजात बोलल्या जाणाऱ्या हुमान या शब्दकोडे प्रकारची काही उदाहरणे...


१. ऊठ रं चिंदा आन त्योच धंदा...

    ~ येवून - जाऊन एकच काम परत परत करणे.

२. काळया रानी उभी तलवार...

~ काळे रान म्हणजे केस आणि तलवार म्हणजे केसातील भांग.

३. सूपभर लाह्या, त्यात एक रुपया...

~ सुपभर लाह्या म्हणजे आकाशातील चांदण्यां, आणि एक रुपया म्हणजे पौर्णिमेचा चंद्र.

४. उपडा तांब्या, बोंब मारी...

~ घंटा (घंटेचा आकार उपड्या तांब्या सारखा असतो...आणि आपण वाजवितो तेव्हा आवाज येतो म्हणून बोंब मारी असे म्हंटले आहे...)

५. तिखट,मीठ,मसाला...चार शिंग कशाला...?

~ लवंग (लवंगेच्या टोकाला चार टोकदार शिंगाप्रमाने आकार असतो.)

६.नदीच्या कडेला धांगडधिंगा, आठ पाय आन द्वान शिंगा...

~ खेकड ( दोन शिंगे म्हणजे दोन शिंगडे )

७. आगात नाही, बागात नाही, पाच जिन्नशी जगात नाही...

~ नदीला झाकण नाही, तळहाताला केस नाही, आभाळाला खांब नाही, घोड्याला शिंग नाही, जिभेला हाड नाही.

८. हरीण पळं, दूध गळं...

~ जात्याला हरणाची उपमा दिली आहे, तर दळताना त्यातून पडणाऱ्या पिठाला दुधाची उपमा दिली आहे.

९. ईवलीशी ननुबाई, साऱ्या वाटेने गाणे गाई...

~ जनावराच्या गळ्यातील घंटी.

१०. सीतेची गादी, कधीच भिजत नाय...

~ अळूचे पान ( अळूच्या पानावर पाण्याच्या थेंब कधीच थांबत नाही.)


                         - संतोष द. मुठे.




1 comment: