सन्माननीय वाचक

Saturday, May 2, 2020

वझा

``                              `वझा```
वैशाखाचा मयना आसंल.  आमाली साळतुन सुटी लागली व्हती. कोंबडा आरावला तसा माहा बाप आन माहा भाव डोळ चोळीत जागं झालं. म्या आपली दिली व्हती ताणुन. माहा बाप मोठ्या मोठ्येनी कहाळुन माह्या भावाला सांगत व्हता" बा दिन्या तो मेसाचा सरा घे, आन तुफल्याला गळगोती घे. आन चल वले लवकर.
   म्या वळाखला हे दोघं हिरडेनली निगालेत.  म्या आपली गोदडी मुदाम तोंडाव घेतली आन झोपायचा ढ्वांग घ्यातला. तेनी कवाड उचकल्याचा आवाज आला अन मफल्याला समाजला, हे दोघं गेलं. मफल्याला झ्वाप येत नवती पण तसाच पडुन रायलो.
    थ्वड्या येळाना आयना उठुन कुयीट आणली आन त्यात राकेल टाकुन चुल पेटवली. मंग मी पण उठुन बसलो.
असा तंगड्या लावुन चुलीपशी बसलो व्हतो. आय म्हंगाली " बा रामा आपलेली लवकर दरीला जाया लागल. तुह्या बापाना हिरड झोडली आसंल.आपलेली जाया लागल लवकर."
     आयना ज्यावान क्याला तवर म्या एक द्वान फाटक्या पोतड्या गवसुन ठिवल्या.  आयना पटापट ज्यावान बांधला आन आमी जळकेवाडीकुन पुढं वागमाळाला गेलो. तिथं दुंद्या लोखांडा दिसला. तो म्हंगाला " सुंदरे काकू दरीला हिरड झोडुन झालेय, तुमाली लवकर बोलावलाय"
   आमी पटापट निगालो. गेलोतं पायला हिरड झोडुन झालेय. पाला पण तेनी पेटवुन दिला व्हता.  म्या गळगोती घ्येतली आन पटापट येचाया लागलो. आम्या समदेनी हिरड येचुन द्वान पोतड्या भरवल्या.  मफल्याला हिरडीव यवडा चडता येत नाय. पण खालून खालुन येचितोय.
     गावातली प्वारा पार शेंडेव जाऊन येचित्यात. ल्वाका म्हणीत व्हती गवार्याचा सोमा पार कशीय हिरड आसुद्याना, परवट भरल्या शीवाय खाली उतरत नाय. कुमा मामा पण पार शेंडेव जाऊन आकड्याना वल्हवुन हिरड येचितोय.
     सांच्यापहार झाली आसल. आमची हिरडेची वझी झाली व्हती.  आमी वझी उचालणारच व्हतो तं आय म्हंगाली " आज घरातला समदा बाजार खपलाय  . या वझ्यातला याक वझा ऊंद्या आडर्याला घेउन जाया लागल."
    माहा बाप म्हंगाला ऊंद्याचा  ऊंद्या पघू. पण आज पोरानली खाया काही आहे काय. माह्या आयच्या डोळ्यात पाणी आला आन हळु आवाजात बापाला सांगितला " लांघेच्या तिकुन आणलेला भातय खपलाय. आन कणगीत काहीच नाय. रातीपुरता सातपुतेच्या तिकुन कायतरी आणुन पोरानली देव आन आपला बघू काय मिळल त्या खाव"
     म्या आयिकला आन बंडीला डोळ पुसित वझा उचालला आन घराकं निगालो
         
रामदास लोखंडे
आहुपे ता आंबेगाव जि पुणे



1 comment: