सन्माननीय वाचक

Friday, May 22, 2020

" इनिस्पेक्शन "

                      "इनिस्पेक्शन"


        पिपारवाडीच्या गंगा मास्तरची आज जरा तारांबळच उड्येल व्हती. गनमानीत इकून-तिकं भुंड्येवं हात ठिवून नि-ह्या चकरा मारीत व्हता...गुरुजींली काय झालाय त्या प्वोरान्ली बी कळंना...तेवढ्यात पडाळीवं वस्तीला राहानारा खमा पाटलाचा धोंड्या हातात कायतरी घेऊन आला...वरून ध्वोतराना झाक्येल व्हता म्हनून काय आन्येल व्हता त्या प्वोरान्ली दिसंच ना...तेवढयात धोंड्येच्या हातातला ध्वोतार मास्तराना वर क्येला आन् त्येच्या खालून क्वाॕsssक आसा आवाज आला. ध्वोंड्याचा येताळाला कापाया ठियेल क्वोंबडा मास्तराना आरजेंट मागितला व्हता म्हनून त्यो क्वोंबडा धोंड्याना ध्वोतार वल्ला करून त्येच्या खाली झाकून आनला व्हता. वल्ल्या कपड्याखाली क्वोंबडा कोकत नसतो ह्या त्याला ठाव व्हता...क्वोंबड्याचा बंदोबस्त झाला ह्या पाहून गंग्या मास्तराच्या जीवात जीव आला...आता उद्येच्या पाहूनचाराची भरांता मिटली व्हती...मास्तराना त्यो क्वोंबडा तेपल्या घरी नेवून ठिवाया साळंतीलच गुलब्याला पाठावला...आत्ता मास्तराचा मोर्च्या पोरांकं वळला...प्वोरांन्ली दुसऱ्या दिशी येताना दिवाळी नंतर शिकयेल मराठी आन् इतियासाचं द्वान-द्वान धडं आन् द्वान कयिता पाठ करून यिया सांगितल्या. चांगल्या  आंघूळी-पांघूळी करून, क्येसांन्ली त्याल चोपडून यिया सांगित्ला आन् पांघरूना धिवून-धावून काढाया दुपारूच साळा स्वोडून दिली...

         
         त्याचा काय झाल्ता का २०१४ साली त्या तावड्येंच्या यिनोदाना लय म्वोठा यिनोद करून ठिवला व्हता. ज्या साळंचा हाज्रीचा पट २० पेक्षा कमीये त्या साळा बंद करायचा फतवा काढला आन् पिपारवाडीच्या संम्द्याच गावक-येंची पाचावं धारन बसली. गावच्या साळंत पैली ते चौथीची संम्दी प्वोरा मिळून इन-मिन १९ प्वोरा...त्येच्यातयं तीनचार जना दांडी मारनारी...साळा तशी लयजुनी...पन आस्रमसाळंत घालायचा फ्याड निघाला म्हनून संम्दी प्वोरा तिकंच साळत धाड्येल...गावातली साळा कशीबशी तग धरून व्हती तं ह्या आसा फतवा निघाला. साळा तं बंद व्हया नकू म्हनून मागच्या बस्तारवारी चावडीवं संम्द्या गावक-येंची बैठक बसली व्हती. त्यात गंगा मास्तर, कमा पाटील, रामा कोत्वाल, सोमा कारभारी संम्दी मंडळी हाजर व्हती. संम्द्यांचा येकच ठ्वोका व्हता का कायबी करून गावात्ली साळा अपुऱ्या पटामुळं बंद व्हवू दियेची नाय. मंग त्येच्यासाठी पार मामलेदारा पोहोत जायेची येळ आली तरी चालल आसाच संम्द्यांचा होरा व्हता. त्येच्यातच द्वोन बुका शिक्येल दिल्या आसावल्याना त्याचा आसा म्हंन्ना मांडला का आपून पयला शिक्षान आधिका-याला जावून भेटायचा आन् त्याला ह्या पटून दियाचा का...


१. आपल्या गावापसून शिक्शानाची सोय ७-८ कि.मी वं शिंदंवाडीला हाये...पन तिढील्ला मास्तर तं साळंतच येत नाय...प्वोराच साळा भरीत्यात आन् स्वोडून देत्यात. मंग आमची प्वोरा तिढं काय शिकनार....?
२. आमच्या गावचा गंगा मास्तर प्वोरांन्ली चांगलं धडं देनारा मानूसयं. त्येच्या हाताखाली शिक्येल प्वोरा आज कंपनीत, मास्तर, डाक्तर, इंजनेर, सरकारी नोकर म्हनून कामाला हायेत.
३. साळंतील प्वोरा हुश्यार हायेत. त्येन्ली कंचाय धडा काढाया सांगितला तरी त्ये काढतील आसा आमचा ईश्वास हाये.
४. संम्द्या गावक-येंच्या सह्यासकट गंगा मास्तरना गट शिक्षानआधिका-याला येक पत्र दियाचा आन् त्येन्ली गावात साळंला भ्येट दिया बोलवायचा...आन् त्याच भ्येटीत त्येन्ली आपला मास्तर आन् आपली प्वोरा किती हुश्यार हायाती त्या पटून दियाचा...


        झाला...दिल्या आसावल्यानाच को-या कागदावं लेटर लिव्हला...सक्कीरवारी सकाळी देवज्या सुपा जव्हा दुद घालाया ड्येरीला जाईल तव्हा त्याना तसाच म्होरं आकोल्याला जाऊन लेटर हातोहात गट शिक्षान आधिका-याला देवून यियाचा आसा ठरला. त्या गाडी-उताराला पाच-पन्नास रुपये बी दिलं. दुसऱ्या दिशी देवज्या त्येपला काम  करून आला. आला तव्हा येक चांगली बातमी घेवून आला. आकोल्याला त्याला खुद गट शिक्षान आधिकारीच भ्येटलं व्हतं. त्येन्नी म्होरल्या सक्कीरवारी म्हनजे आठादिसाना साळंचा इनिस्पेक्शन कराया येतो आसा शब्द दिला व्हता...आन् म्हणूनच उंद्या सायेब येनार म्हनून संम्द्येंचीच तारांबळ उड्येल व्हती.


          दिल्या आसावला चारबुका शिक्येल व्हता म्हनून त्योय बी प्वोरांचं पाढंच घी, कयिताच म्हनून घी, गनिताच सोडून घी...आश्या कामाला लागला व्हता. गडी-बाप्या मानसांनी उधघाळ्येल भुई तांबड्या मुरूमाना चांगला घातली...बायकांनी चांगल्या चिकान श्येनानी साळंची भुय सारवून काढली...मास्तराच्या घरी क्वोम्बड्याचा ज्येवान व्हनार म्हनुन कालवानात घालाया येसाव म्हतारीकून बाजरीच्या पिठाची कनी करून घेतली व्हती.

      दुस-या दिशी प्वोरा येकदम कडाक इस्तारी मंधी साळत हाजर...बंड्येली निळ दियेल बंडीच्या तुट्येल गुंड्या बयादवार लायेल आन् भुंड्येवं इरेल पाटलूनीला थिगळा लायेल...आशा परकारचा प्वोरांचा थाट तं प्वोरीन्नी द्वान-द्वान येन्या घाल्येल कपाळावं टिकल्या लायेल व्हत्या. सकाळूच प्रार्थना झाल्येवं मास्तरांनी परत येक दफा पोरांची परेड घ्येतली. बरोबर १० च्या ठोक्याला धवळी- धवळी जीपगाडी धुराळा उडयित साळाच्या पटांगनत उभी रह्यली. गाडीतून तिघं जन उतारलं...त्येच्यात योक केंद्र प्रमुख, योक गट शिक्षान आधिकारी वळखीचा व्हता पन तिसरा गडी नवखाच व्हता. त्येची चौकशी क्येली तं त्यो खास तावड्याना धाडलाय आसा समाजला. कायबी करून आसल्या साळा बंदच करायच्या आसाच त्याला सांगून धाडला व्हता. ह्या आइकून तं ड्वोका झोडून घियेची येळ आली व्हती. साळंच्या आजुबाजूच्या पवळ्या, आंगना गावक-येंन्नी भरून ग्येली व्हती. गावच्या जत्रंला, सप्त्याला नै तं इलेक्शनालायं येवढी पब्लिक द्येवळाकं जमत नव्हती.

          प्वोरांची वळख पर्येड झाल्येवं त्या तावड्याना धाडलेल्या मानसाना हाज्री घियाचा  नोंदबुक, मुल्येमापनचा बुक....आशी आनखीन काहीबाही बुका तपासली. गंगा मास्तर आन् दिल्या आसावला ज्याम खुश व्हता...कारन त्या ज्वोडीना कायिता, प्वोरांच्या त्वांडपाट करून घ्येतल्या व्हत्या. पन न्येम्का झाला उलटाच...तावड्याना जानूनबूजून म-हाटी आन् गनित यिषय न घ्येता इतियासाचा पुस्ताक मागावला...गंगा मास्तराचा त्वांड तं पार काळवांडला...पन दिल्या आसावला मातर गालातल्या गालत हासत व्हता ह्या ह्येरून गंगा मास्तर मातर च्याट झाला. दिल्या आसावल्याना मास्तराला ड्योळ्यानाच खुनावला का आत्ता फकस्त गंमत पह्ये....तावड्या ज्यो परश्न यिचारी त्याचा उत्तार सांगाया संम्द्या वर्गाचा हात वर व्हयी...प्वोरा उत्तारा सांगताना पार प्वोप्टावानी बोलत...तानड्यायं बी च्याट झाला....

       त्याचा झाल्ता आसा का, न्येम्का इनिस्पेक्शनला काय यिचारतील त्या क्वोनालाच ठाव नव्हता...म्हनून मंग दिल्या आसावल्याना संम्द्या यिशयाचं द्वोन-द्वोन, तीन-तीन धडं शिकवुन ठियेल व्हतं....श्येवटी ना ईलाजाना तावड्याला चांगला श्येरा मारावा लागला...आन् कमीतकमी २० यिद्यार्थ्यांची आट पूर्न व्हया येक यिद्यार्थी कमी आसूनयं बी साळा बंद करायची गरज  नाय आसा श्येरा देवून टाकला...
       
          इनिसपेक्शन उराकल्येवं साहेब ल्वाक गंगा मास्तराच्या घराकं ग्येलं...तिकं बाजरीची कनी आन् पिठाचा रोंब घालून बनयेल क्वोंबड्येच्या रश्याचा पार वस्रीवं घमकार सुटला व्हता. ज्येवान-खावान उराकल्येवं साहेब धुराळा उडयीत जसं आलं तसंच धुराळा उडयीत ग्येलं....आज सम्द्या गावना दिल्या आसावल्याला उचलून घ्यात्ला व्हता...त्याना जास्तीचा आभ्यास करून नस्ता घ्येतला तं प्वोरा गनमानली आस्ती. ह्या संम्द्येली उमाजला व्हता. गावतल्या संम्द्येंनी मारवतीच्या मंदीरात आन घ्येतली का इढून म्होरं आपल्या गावातली प्वोरा दुसरीकं साळत न टाकता गावातच टाकायेची आन् आपला पट कंधीच यीसच्या खाली येऊ दियाचा नाही....

                 

                      - संतोष अनुसया द. मुठे.



No comments:

Post a Comment