सन्माननीय वाचक

Thursday, May 21, 2020

" गावचा घर "

                 🏠 गावचा घर 🏠

      काल आसाच फ्यांड्री पिच्चेर बघितला आन् राती निजताना मला मप्ल्या गावच्या घराचा चितार आपसूकच डोळ्यां देखत उभा राह्यला...ती श्येनाना सारयेल भुई, राखाना लिप्येल भित्ती, आंगनातला भोसाचा मांडव....ह्या संम्दा सायसंगीन दिसत व्हंता...

      घाटाडी वरून नै तं...साबार टोका वरून नै तं...मांडयेच्या शिवावरून ख्यातवाडी गावाकं ह्येरला का गावाच्या खालच्या आंगाला पाच खनाचा द्वोन पाखी घर दिसंल...क्वोनालायं यिचारला का बाबा त्या तम्का घर क्वोनाचा....रंssss ?.... तं क्वोनीयं बी सांगल का त्या दगड्या मुठ्याचा घरयें....

       गावात शिरलो का मुठ्येंच्या पेठ्यात शिरतानाच येक भली मोठी पोहोळी लागत्येय...त्या पोहोळीला ख्येटूनच ववा - दिड ववा वर येक पवळी ये...त्येच्या वरच मह्यावाला घराचा आंगाण....आंगाण म्हंन्जे ह्या आसा भलाच्या - भला...ती येक म्हंनये.... "डांगान जसा का सोन्याचा आंगान".... मला सारखा वाटायचा का ही म्हन आमच्या आंगनावरून तं नाय पडयेल ना...?....आंगान येवढा म्वोठा का...चार मेढीत कंधीच मांडव झाला नैय...बरूबर आठ म्येढी लागायेच्या...भ्वोसाची पाच-सहा वझी आन् पंध्रा - यिस फ्वोकाट्या...ह्या संम्दा मह्या बा ना जमा करूनच ठिय्येल आसायचा...घराच्या पायेच्या वर तोडीच्या दगडांचा जोता ये...दाराच्या कवाडान्ली भल्या म्वोठाल्या बिजाग-या लायेल हायात...भित्ती राखाना सारयेल दिसतील...दाराच्या दोन्ही आंगाला तिरकोनी आकाराच्या द्वान बारखाल्या खिडक्या दिसतील...घराचं म्होरल्या पाख्याला आलेलं वासं दिसाया नकू म्हनून म्होरं नक्षी क-येल लाकडाच्या फळीचा पान लायेल हाये...मांडवावं भिनूगाचा मुगान ठियेल दिसाताय....

         घरात घुस्ला का वस्रीवंच उजया हाताला येक ऊखाळ हाये...त्येच्याच बाजूला द्वान जात्येच्या तळ्या ऊभ्या करून ठिवल्यात...कोपऱ्यात मुसाळयं बी हाये...तिढंच बाजूला कांडाणाचा वैचान आन् क्वोंडा पडलाय...सुरडाची शिराय आन् म्वोळाचा कुच्चा मुसळाच्याच बाजूला ठियेलयं... दाराच्या चौकटीच्या वरच्या कपाळ्यावं १९५९ ह्या घर बांधल्याचा वरीस क्वोरलाय...हिरडीच्या लाकडापसून बनयेल घराच्या तुळया आजूनयं बी शाबूत हायात...आंब्येच्या फळ्येंनी क्येलेली माळ्येची पाटयं चुलीच्या धुराना पार काळी व्हवून ग्येलेयं...पाटयंला कुढं-कुढं भेरूडयं बी लागलाय...माळ्येवं येंघाया ऊखळा जवळच येळाची शिडी लावून ठिवल्येय...माळ्येवं आघोटी भ-येल प्येंढायं आजून शिलक हाये...एका कोपऱ्यात मासं धरायच्या येहंडीचा गडा स्वोडून ठिवलाय...वापरात नस्येल बराच सामान माळ्येवं टाकलाय म्हनून वर पका आइचान झालाय...माळ्येवं उज्येड पडावा म्हनून द्वान कौला बाजूला सारून ठिवल्यात...पुढच्या पाख्याला पाभारीचा चाडा आन् नळ्या बांधून ठिवल्यात...घराची घरभरनी क्येली व्हती तव्हा लाल कपड्यात बांध्येल ना-योळ आजूनयं तसाच आड्याला बांधून ठिवलाय...मह्या लग्नाची काकाण-बाशिंगाय बी तिढंच बाजूला बांध्येल हायात..

        वस्रीवरून आत चुलीकं जाताना आजून येक चौकट लागत्येय...तिला बिजांग-या लायेल नाहीत....ती कुसू बनयेल हाये...त्या कवाडांच्या मागं येक पहार, येक फरशी कु-हाड, येक हाडबा आन् योक दांडा हाये...ही संम्दी हात्यारा हाताखाली आन् नदरंत आसायी म्हनून दाराच्याच आंगाला ठिवल्यात...डाया हाताला घडूशी ठियेल हाये...तिच्येवं द्वान-द्वान तांब्या- पितळ्येच्या हांड्येंच्या उतरंडी लागल्यात...भांडी ठिवाया येक फळी ठ्वोकलेयं....तिच्येवं काश्येची ताटा, तांब्ये, गल्लासा, बारखाल्या ताटल्या, चाटू, सांडशी...आशी बासना बयादवार लावून ठिवल्यात...घडूशीच्या खाली भली म्वोठी काठवठ भितीला उभी करून ठियेल हाये...ती गावातल्याच किसन्या सुताराना बनून दिलेय...घडवशीच्या डाया हातालाच योक उपारन्याना त्वांड बांध्येल रांजोन हाये...त्येच्यात पलीटल्या सालचा ल्वान्चाये...मधारल्या भितीला आतल्या बाजूना सहा मनाचा याक भला मोठा बलाद हाये...तं येका आंगाला साडे तीन मनाची येक कनग आन् द्वान बारखाल्या क्वोथळ्या हायात. द्वान तुळयेंच्या मधूमध येक द्वारखांड बांधलाय...त्येची वळंबन करून तिच्येवं आथ्रुना - पांघ्रुना ठियेल हायात...उजया कोपऱ्यात आऊलाची चुल हाये...भानवशीवं येक गाडगा दिसाताय...त्येच्यात मीठ ठियेल हाये...चुलीच्या धुराना वर निवसा तयार झालाय...याक बांडा मांजार फुकनी उश्याला घेवून चुलीच्या उबाला निजलाय...चुलीच्याच वरल्या आंगाला येक खुट्टीयं त्याला कंदील लटकावलाय....वातीच्या क्वोजेळीना त्येची काच पार काळी व्हवून गेल्येय...शिक्येवं दुधाचा ट्वोप ठिवलाय तं तुळयंला येक गांजवाभर कांदं गांजयात शिकाळून ठिवलंत.

    सैपाक घरातूनच मागील्या बाजूला दार पाडून येक पढयं कहाडल्येय...तिच्यात आंघूळी - पांघूळीसाठी मोरी बहांदल्येय...तिढंच द्वोन बैल बांधाया जागा क्येल्येय...बैलांच्या गव्हानीत कडबा टाकून ठियेल हाये...बैलांचा श्यान-ग्वोमतार काढाया येक खराटा आन् शिप्तारयं बी तिढंच मागील्या बाजूला ठिवलाय...औताची सरजामा जसा जुप, जू, आसूड, पास, फाळ, बट तुट्येल सुतकी, यिळं, क्वोयतं आसा काय बाह्य सामान तिढंच ठियेल हाये...

   घराच्या मागं याक वाडगा हाये...वाडग्याचा कुपान धायटीच्या झिट्येंनी घातलाय...योक दुभांगळ्या खाकोर वाडग्यात उभा क्येलाय...त्येच्येवं द्वोडक्याचा आन् घ्येवड्याचा येल ग्येलाय...मागच्या पढयंवं डांगराचा येल ग्येला व्हता...पन उन्हाना पार वाळून ग्येलाय...न्हानीचा पानी जिढं बह्येर पडाताय तिढं येक कोरपाडीचा झाड लायेल हाये...

ह्या संम्दा आजयं मला सायसंगीन दिसाताय...जनू का म्या दुर्गूनी [दुर्बिण] लावल्येय आन् तिच्यातून मला मह्यावाला घर दिसत सुटलाय आसाच वाटाताय...

                  - संतोष अनुसया द. मुठे.



1 comment: