सन्माननीय वाचक

Thursday, May 28, 2020

बाबा - त्वा परत या पयजे

*बाबा - त्वा परत या पयजे*

       साळाला सुट्या लागल्या. मी ज्याम खुस. आजेच्या मांग नळीकून फिरता यईल म्हणून. आज्याबरबर फिराया मला पुरी मज्या येची. कंदी यकदाश्या सुट्या लागथील आसा मला व्हयाचा. मी आमच्या घरात समद्यात बारीक. मंग आजाय मला पक्का जीव लावायचा. रानातून काई आणला का पयला मला द्याचा. आन मी नसलो तं मया वाट्याचा काडून ठुवायचा. आमचा आजाय लय उदेगी. सदानीत काई ना कई करीत रयाचा. म्हतारा झाला आसं पण कामाला लय ताटम. मला कयाचा कळाताय पण सगळीच लॉखा म्हणायची. मी काय पयलीला आसं तवा.
     आमाली भातय कमीच व्हयाचा तवा. नळीकं नागलीचा आन वरयचा दळा रयाचा. पोंडीचे आंब्याकूण नागली रयेची आन शेंदरे आंबेचे बाजूला वरय.
      राच्ची ज्यावना चाल्ली व्हती. आईना तयेवरलं भजे केलं आसंत. मला ज्याम आवडायचं. मी ज्याम चईना खाई आन भाव तेच्यातला कांदा काडून टाखायचे मांग लागला आसं. त्याला कांदा आजीबात नसं आवडंत. ज्यावता ज्यावत म्या बाबाला म्हणला, "बाबा, उंद्या मला नळीक नी भरका त्वे बरबर." बाबा म्हणाला, "हा." मी ज्याम खुस झालो. आन मया डोक्यात उंद्याचा पिचेर सुरू झाला. 'उंद्याकं मी बाबचे मांग नळीक जाईल. कडवान कराया लाकूड आनील. गलवरीला ख्वाड आनील. आन बाबाना मॉळ काडला का पक्की मॉद खाईल. म्हजी मला पिशी नेया लागंल. नयतं टोपीतच आणू. नयतं किटलीच घेवून जातो.' पिचेर पाता पाता हात थाटात तसास पार सुकत आला. तेवड्यात आय ह्यापाकली,''काय मटक्यावानी करीतोय. घी ना खाऊन त्या. '' मवा पिचरच मॉडला. थाटातला दाळ भात आन यक रयेल भज्या खपावला आन मोरीत जाऊन हात धिवलं. सगळेंची ज्यावना झाली आन आमी गोद्या टाखून कलांडलो. आन गोधडीतंच मवा परत आपुरा पिचेर सुरु झाला. पिचेर पाता पाता कवा झॉप लालगी कळालाच नय...
         कप बश्यांचा आवाज या लागला आन मी खाडबाडून ऊठलो. 'च्या' संपून जाता का काय म्हणून. आईचा ध्यानंच म्याक, "व्हय त्या त्वांड धिवून ई. चाला लगेस च्या प्याला." घाई घाईत मोरीत ग्येलो. टॉपात पानी व्हताच.कसातरी त्वांड मुरथाळावला आन च्या प्याला चुलीपुडं यवून बसलो. च्या मंदी राच्ची चपाती खाली. आन तेवड्यात मॉवाल्या ध्यानात आला, बाबा तं काय कुडं दिसंना... बयेर जावून पयला... नय... लवालाय पयला... नय... चिचाखाली ग्येलो... तिडंय नय... मी पार रडीवं आलो आन परत घरात ग्येलो. आयला ईच्यारला, "आई, बाबा कुडंय?" "नळीकं" यका सब्दात आयना सांगितला. "आन मला न्यानार व्हता ना नळीकं?" मी आयला परस्न कराया लागलो. आय सैपाकाच्याच नादात व्हती. म्या परत ईच्यरला,"कयाला ग्यालाय?" "आन ती दगडीच्या पानेची पोंडी वडाया घेतलेय ती." मॉवाला राच्चा पिचेर सुरू व्हयेचे आंदिच 'खपला' म्हणून नाव आला. मॉवाला पार हुरदाच भरून आला. पण कोणी पयेल म्हणून मी लवाला जाऊन मुकाटच बसलो. मवालं डोळं पार पाण्याना भरलं आसंत. बरास टाईम मी लवालाच बसलो आसं. आईना वळाखला याला काय झालाय त्या. आन मला हाक मारली,"जालिंदर, नळीकं जायेचे का?" मी चपापलो आन आईकं पयला. "त्वा दादा जाथंत नळीकं जायेचे का?" म्या लगेस हा म्हणून दिला आन दादाचे मांगं नळीकं निंगालो. शेवटी पिचेरची सुरवादी झाली.
        लाल रंगाची मईवाली हाप ईजार. ती ढिगुळ म्हणून करगोट्याला काडीचा पिरगुटा देयेल. मांगचे बाजूना पार ईरत आली आसं. यकदा चिचाखाली पडलो व्हतो तवा डाये बाजूला यक ढोगुरा पडेल. तेचेवं आईना यक ठिगाळ देयेल. वर पिवळे रंगाची हाप हाताची बंडी. गुरतूल्याला गुतून गुतून तिचं पार दोरं निंगेल. आन निम्मा ऊसयेल खिसा खाली लोंबत चाला आसं. वर डोक्यात म्हॉटाली लॉखा घालीत्यात ती ट्वपी. ती तिरपी व्हयेची म्हनून सारखी सावरायचो. मॉहाळ काडाया लागंल म्हणून हातात मयावाली बारीकी कुऱ्हाड. दादा नय म्हणं पण म्या बळास घेतली आसं. आन भुईचं मुकं घेत चालेल नागवं पाय... आसा मॉवाला आवतार घ्येऊन मी दादाचे संग नळीकं चाल्लो आसं. कवा यकदाशी बाबाबरबर नळीचे रानात फिराया जाईल आसा झाला आसं मला.
          यकदाचा दगडीच्या पाणेच्या पोंडीत पोचलो. मवा बाबा आन लोल्या आजा पोंडीतली यक म्होटी दगड काडीत व्हती. वरच्या आंगाना पोंडी पक्की खनून काडली आसं. दादा म्हणत व्हता औता यनाराती. त्या यईसतवंर माती पाडून ठिवाया लागंल. दादाना मला हिरडीखाली बसावला. आन दादाय ग्याला माती खनाया. आन मया डोक्यात नुसता बाबा कवा नेईल मला फिराया. शेवटी मला काय रावंना. बाबाला ईच्यारलास म्या, "बाबा, रानात कवा जायाचा आपण?" दगड हालावता हालावता बाबा नुसता 'जाऊ ना' यवडाच म्हणला. मंग काय बसलो तेंची मज्या पयेत मुकाट. बाबानांन तेनी दगड पलटी कराया बळ क्याला का ईकडं मीच पक्का कान्या कान्या व्हयेचो. जसाकाय मीच दगडा लोटीतोय. बाबा तिडंच काम करीत व्हता मंग काय मावाला डोक्यातला पिचेरंय चालू व्हयना. मांगून मलाय करमंना मंग म्या केली सुरवाद माती ख्याळाया. नेहरीच्या वक्ख्ताला औता आली. आईनाय भाकरीची पाटी आनली. आम्या नेहऱ्या केल्या. आण परत सगळी कामाला लागली. मी मंदी मंदी बाबाला ईच्यारायचो, "बाबा सांग ना कवा जायाचा रानात फिराया?" बाबा नुसता म्हणायचा, 'जाऊ ना'. आसा जाऊ ना करता करता द्वोन हापतं ऊलागलं पण काय बाबा मला रानात नेईना फिराया. रोज नळीकं जायेचो, कवा मातीत ख्याळायचो, कवा खोऱ्याना ऊली ऊली माती वडायचो, तं कवा कवा यरीस ताकत दाखवाया म्हॉटाल्या दगडी ऊसलुन पयेचो.
        मंग यक दिवस आसास ऊठलो आन पातोय तं बाबा खळ्यात चऱ्हाट वळीत बसला आसं. मला लय नवाल वाटला आन बाबाकं ग्येलो, "बाबा, आज नय ग्याला का नळीकं?" बाबा म्हंतो, "आज आऊतकरेंनी सुट्टी घ्येतलेय." "मंग आज नेशील ना मला फिराया?" म्या ईच्यारला. "जाऊ ना" बाबाना रॉजचा ठरेल उत्तार दिला. म्या परत ईय्यारला,"खरा खरा सांग, तू आस्साच फसईतोय मला सुट्या लागल्यात तश्या." "नय रं बाबा जाऊ आज." बाबाचा ऊत्तर. आथा मातर मला खरा वाटला आन मी मॉवाला पिचेर पया सुरवादी केली. श्येवटी नेहऱ्या झाल्या आन बाबान मी निंगालो नळीचे रानात फिराया. आवतार तोच, सदानकदा ठरेल. लाल रंगाची मईवाली हाप ईजार...
           बाबाचे हातात कॉयता आसं. आन मया हातात कुऱ्हाड. तिचा काई कामंय नसं पण मला पक्की हाऊस. रानातंच फिराया जायाचा व्हता मंग बाबा रोच्च्या वाटाना नय निंगाला. वामन मामाच्यान तेंच्या मोड्याना वर निंगाला. वाटाना जाताना कुडं मॉळ बिळ दिसाताय का नय त्या हेरीत चाल्ला आसं. मला आस्सा वाटायचा का बाबाचे आंदी मलाच दिसावा. पोंडीचे आंबेचे पुडं ग्येलो. वाटाचे म्याराला यक निंबारेची काडी झाली आसं. मया हातात कुऱ्हाड. म्या हानली नेम धरून त्या काडीवं. "आरं रं रंं र रं... काय क्याला त्वा." बाबा ह्याबाकलाच बॉ ज्वारात. कुऱ्हाडीला धारंय नसं जास्त. तेचेमुळं ती निंबारेचे काडीत निम्मीच घुसली. बाबा ज्वारातंच मयेपशी आला आन कुऱ्हाड वर हिसाकली. निंबारेची काडी यका बाजूला कान्या झाली आसं. बाबाना कुऱ्हाड जशी मांग हिसाकली तसा मीही मांगचे बाजूला व्हलपाटलोच पार. *आरं बाबा हातात कुऱ्हाड दिली म्हणून कयावंय नय हानायची* बाबा जरा राग कमी करीत म्हणला. म्या मंग बाबाला म्हणाया लागलो, "का बरं, झाडंच तं हायेना त्या!?" बाबा फेटेच्या धाट्याना निंबारेची काडी मांदता मांदता सांगाया लागला.
"आरं बाबा, झाडा हायात म्हणून तं आपु हाये.ह्याच तं आपलेली जगईत्यात. वल्या काडीवं कंदी कुऱ्हाड, क्वॉयता नय हानायचा. क्वॉनताय झाड आसो पण वल्ला झाड नय त्वॉडायचा." बाबाना आजून पक्का काय काय सांगितला. पण तेच्यातून मला यक समाजला का, वल्ली काडी त्वॉडायची नय. तवापसुन झाड त्वॉडाया मॉ जीवंच व्हत नय.
           आज्याला पक्की झाडपालेची आवषादा माईत व्हती. हिंडता हिंडता श्यांबाडांमदून पक्का निरखून पयाचा. यखांदा तेचे आवषाद उपेगी झाड हाये का नय त्या पयेत आसंल बोतेक. धवळ्या आंबेच्या झुऱ्याना वर जात व्हतो. तेवड्यात बाबा गपक्यान जागेवं मुकाट उभा रयला. मी चालता चालता बाबाचे थ्वॉडा पुडं निंगून ग्येलो. पण बाबा जागेवंच मुकाट उभा रयला आसं. मंग मीय बाबाकं पयेत थांबलो. बाबा कयाचा तरी आवाज आयकत व्हता. जराश्याना बाबा चलाया लागला आन् म्या बाबाला ईच्यारला,"कयाला थांबला व्हता रं बाबा?" बाबा म्हणला,"आरं मोहरीच्या माश्या आयेटी घालून जाथ्यात. ईडं कुडंतरी मोहर आसंल." बाबा तिडलं बाजूचं मोहरीचं घरं पया लागला. बाजुलाच झुरमूडात यक बाँडाऱ्याचा पक्का म्हॉटा झाड व्हता. बाबा कसातरी तेच्या ख्वॉडात पॉचला. बाँडारेच्या ख्वॉडात यक ढोगुरा व्हता. बाबाना तेच्यात फुकून पयला. जसा फुकला तसा ढोगुऱ्यातून माशांचा भनका ऊठला. बाँडारेच्या ख्वॉडात मोहर व्हती. मोहर हाये ह्या ह्यरून मी ज्याम खुस झालो. आथा बाबा मोहर काडील आन् मी पक्का मॉद खाईल. आन् बाकीची ट्वपीत भरून नेईल घरी. मी घाई घाईत बाबापशी ग्येेलो. बाबाना थ्वाडा नेहळून पयला आन सहजच म्हणला,"जाऊदी चाल." म्या म्हणला, "म्हंजी?" बाबा म्हणतो,"रऊंदी, आथा नय काडायची." मॉवाला तं पार मुडंच हाप झाला. म्हणला आथा पक्की मॉद खाया भेटल. पण कयाचा... निंगता निंगता बाबाला ईच्यरला,"काय रं बाबा, मोहर का नय काडली?" बाबा सांगाया लागला...
           "आरं बाबा नईनय ती."
           "मंग तिला काय झाला, आपल्या पुरती तं मॉद सापाडली आसती ना..."
           "तसा नय जालू... ती मोहर आथाच बशेलंय, आथाच आंडी घातल्यात, त्या आंडेंच्या थोड्या माशा व्हऊंदी. म्हंजे त्येंची पैदास वाढंल. मंग मागून आपण ती मोहर काडू. न्हजी मंग मोहरी जगतील आन आपाली मॉदय भ्येटंल. तुमच्याय पॉराली भ्येटली पयजे का नय मॉद.!"
              तवा बाबाचा आसा सांगायचा बेत काय व्हता त्या नय कळला पर मई पॉरा आयकून मी चपापलोच आन म्हंगालो," पळ बाबा, मी नय लगीन करनार." बाबा ऊलीसा हासला आन पुडं चाल्या लागला.
              काट्याकुट्यातून बाबा वाट काडीत चालला आसं. मई बंडी आंदीच फाटेल वरून गुरतूल्याला आन जाळीला आटकून पक्क दोरं निंगत. बाबा मोहरीचं घरं पहात पहात पटापट पार पुडं ग्याला आसं आन मी गुरतूल्यातून वाट गवशित कडेच्या आंगाना चाल्लो आसं. त्यवड्यात वाटाच्या खालच्या आंगाला पाचोळ्या पक्का ज्वारात काय खरबाडला. मी जवा दचाकलोय, आन जवा ज्वारात पळत सुटलोय, मंग गुरतूला नय पयला का काईच नय. डायरेक बाबापशी जाऊन थांबलो. मॉक्कार आडचण पण यवडा पटक्यान बाबापशी पोचलो ना का काय सांगू. हातन पाय पार गुरतुल्याना वरखाडलं आसंत. बाबाना वळाखला काय झाला त्या. "काय व्हता रं?" बाबा.
 "काईच नय!" म्या खॉटा खॉटा सांगीतला. वर कड्याना बसेल वांदरा म्याकं पऊन जशीकाय हासंत व्हती. आसा यक यक गॉटा घालून पाडावाना खाली आसा वाटला आसं. पण मॉवाला ग्वाटा कयाचा जाथाय यवड्या लांब.
          कडेच्या खालच्या दांडाना आमी पुडं ग्येलो. आथा बाबाला म्या सॉडलाच नय. पुडं वाघ्यापशी यऊन थांबलो. बाबाना वाघ्याम्होरली पानटा बाजूला केली. दगडीमांग ठियेल उदबत्ती आन काडेपेटी काडली. वाघ्याला उदबत्ती लावली आन वाघेच्या पाया पडला. बाबाचा पऊन मीय पाया पडलो. पर मया सवयीपरमाना म्या बाबाला ईच्यारला, "बाबा, आपू वाघेची पुजा कयाला करीतोय."
         बाबा सांगाया लागला, "आरं बाबा तो देवंय आपला."         "कसाकाय? आन तो आपल्या शेळ्या कयाला खातोय मंग?" "आरं जालू तोय जगला पयजेल. त्याचा खानंय त्या. तो जगला तं आपला रान जगंल. आन रान जगला तं आपू जगू. आपला रान जगला पयजेल."
"पण मंग तेची पुजा कयाला करीतोय मंग आपण."
"तोवालं लय परस्नं बाबा, आरं ह्या रान जसा आपलंय तसा त्याचाय हाये. म्हॉटाले माणसा काणसांचा कसा आपू आदर करीतोय तसा तेच्या रानात गेलेवं त्याचाय आदर कराया पयजेल का नय. म्हणून आपू तेची पुजा करीतोय. वाघबारस करीतोय. आन त्याला सांगतोय का बाबा आमच्या गुरा ढॉराली, शेळ्या बकरेली, कोंबड्या कितडेली काई करू नको."
" आन मंग तो आईकतोय का?"
" नय रं जालू़, त्याला काय माईत आपू काय करीतोय त्या. पर यक मातर खरा. तो वाचला तं आपू वाचू. नयतं आपली काई लॉखा रानात यक झाड ठुनार नईत. नुसता फुपाटा रयेल यडानी."
       बाबाला आजून सांगायचा व्हता पर बाबा कयाचा तरी आवाज आयकून गपक्यान थांबला. जरूश्याना म्याच ईच्यारला,"काय रं बाबा?"
       "काय नय रं मोहरीच्या माश्या आयेटी घालून जात व्हत्या त्या आयकत व्हतो."
       थॉडासा कानोसा घ्यऊन बाबामांग मीय चालू पडलो. पण यवड्यात वाघ्याचा आजून ईच्यारायचा मी ईसरूनंच ग्येलो. बाबाकं पाणेची बाटली व्हती. चलता चलता पाणी पिलो. पक्की तहान लागली आसं. तसा झाडांचे सावलीनाच हिंडत व्हतो पर लय तहान लागली आसं. चलता चलता झुरेतल्या म्होट्या येहळ्यापशी जाऊन पोचलो. बाबा येहळेच्या खॉडातल्या घऱ्यात मोहर आलेय का नय त्या फुकून पयेत व्हता. पर काय तेच्यातंय मोहर नवथी. आथा मातर मला कटाळा याला लागला. सर्येय आथा धिंदाळमाळाकं झुकला आसं. पर बाबाला कसा सांगू का मला कटाळा आलाय. मलाच हाऊस ना.
       बाबा पुडं निंगाला का मी पळंतच बाबामांग निंगायचो. बाबा सारखा ईच्यारीत रयाचा,"जालू, आला का?" माला सारखा म्हणाया लागायचा, "आलो आलो." पण कवा कवा आशी आडचणीची वाट येयची ना का मीय जरूसा घाबरायचोच. मंग बिगीबिगी बाबापोहत जायेचो. काई श्यंबाडा तं यवडी दाट का ईच्यारता सोय नय. तेच्यात वाघ बिघ हाये का काय आस्सा वाटून जायाचा. बाबा चलताना परतेक मोहरीचे घरं पऊन घ्याचा. आन परतेक घरा आस्सा पयाचा का पयलाच घरा पयेतोय. धायटीच्या कड्याखालून जाता जाता मंदीच ऊभा रयाचा आन डोळेवं हात ठिऊन उन्हाचे तिरमीत कुडं माशा पडत्यात का त्या पयाचा.
       पुडं ढगाखाली (कड्याचा ढग) आलो. तिडं बाबाला तिरमीत माशा पडताना दिसल्या. "जालू, ईडं माशा पडत्यात हेर." माय तिरमीत माश्या पडताना पयल्या. वरून येच्या आन यका पक्क्या म्होट्या दगडाखाली जायेच्या. ईडंतं नक्कीच मोहर आसंल आसा बाबा म्हणला. दगडीपशी जायाला पक्की आडचण व्हती. बाबा वाट करीत करीत दगडीपोहत ग्याला. बाबाकं कातडेच्या वाहाना व्हत्या आन मया पायात काईच नसं. बाबाना दगडीखाली ड्वाकाऊन पयला आन म्हनला,"हाये रं मोहर." काय सांगू मी ज्याम खुस झालो. काटं पयलं नय का दगडी पयल्या नय. मीय बाबाच्या मांग ग्येलो दगडीपशी. दगडीच्या खालच्या बाजूला पक्का म्हॉटा धाव आसं. त्या धावातच मोहर आसं. बाबाना धावात फुक मारली तशी मोहरीच्या माश्या भानभान करीत ऊठल्या.
          माश्या ऊठल्या तशा चावत्या का काय म्हणून म्या मांग सरालो. आतमंदला काईच दिसत नवथा. बाबाना बाजूची माती कोयत्याना खनली. माती बाजूला केली तश्या मोहरीच्या ईऱ्या दिसाया लागल्या. सात ईऱ्या आसंत. त्याय पुऱ्या मॉधाना भरेल. म्हंजी मोहर काडाया यकदम न्यामातंय आस्सा बाबा म्हणला.
          मोहर काडायची म्हंजी तसा लय आवघाड काम. धावात नयतं झाडाच्या पॉकाळ खॉडात हात घालून ईऱ्या काडाया लागत्यात. सगळं हात मॉधाना आन् माशेनी भरून जाथंत. पर मयावाल्या बाबाईखी लय सॉप्पा काम ह्या. बाबा लय सहज सहज त्या ईऱ्या काडीतोय. 
          बाबाना जागा मोकळी करून यक ईरी तोडून बहेर काडली. आन् मॉद घ्याला काय तं पलास्टीकची साकरीची पिशी. यका ईरीतंच पिशी भरून गेली. मॉद घ्यालाच काई नसं. मंग काय, काडली डोकेतली ट्वपीन काय. ईरी तोडून बहेर काडली का तेचेबरबर पक्क्या माशा येच्या. मी त्या माशा काडीना बाजूला करायचो आन् थॉडा थॉडा ईरीचा तुकडा तोडून तॉंडात घालायचो. मॉद थोडी कडसूर लागत व्हती. बाबाला ईच्यारला कयाना आशी तं बाबा म्हणं, "आरं ही हिरडीची मॉदय, कडसार लागलंच. पर आवषादाला हिच लय भारी."डोक्यावरून माश्या भानभान करीत व्हत्या. कवाकवा डोळ्येवं तं कवा व्हटावं यत व्हत्या. कवा चावतील काई भरवसा नवथा. काय बात व्हती काणू, बाबाच्या माश्याच तावत नवथ्या. आन् चावल्या तरी बाबाचे सुजतंय नवथा.
           सहा ईऱ्या काडून झाल्या. यक ईरी तशीच रयली व्हती. तेवढ्यात बाबा म्हणला,"चाल आथा बास झाला."
 "आन् ती यक ईरी??"
 "ती रऊंदी तेलीच."
           तेलीच का रवून द्येची त्या कॉडा काय मला उमागला नय. पर यक ईरी ठुली तशीच. यखांद यळ नईन निंगेल माशेंनली ती ठुवली आसंल बाबाना. पर मॉद धरायच्या नादात म्या काय त्या बाबाला ईच्यारलाच नय. ट्वपी आख्खी मॉधाच्या ईरेनी भरली आसं. बाबाचं हातंय पार मॉधाना भरलं आसंत. बाबाच्या हाताला दोन माश्या चावल्या व्हत्या. बाबाना निंगायची घाई केली. तसा निंगता निंगता यक गरा तोंडात टाखावा आसा ईच्यार आला. तसा यक मॉधाना भरेल गरा तोंजात टाखला. तसा मया जीभीला कडक्यान काईतरी झॉंबला. तस्सा मी बॉंबलाया लागलो. बाबाना ह्यारला तं मया जीभीला मोहरीच्या माशीचा सुक घुसला आसं. बाबाना पटक्यान सुक ऊपाटला. पण जीभीला आस्सा चुनचन करी. थोड्या यळातंच जीभ पक्की जड पडली.(पुडं दोन दिस मला निट बॉलताय यत नसं)
            मॉद भेटली तं मला गलवरीच्या खॉडाचा आन् कडवानाचा ध्यानातय नय रयला. बाबाचे मांग मीय कनाट निंगालो झापाचे वाटाना. मया हातात मॉधाची टोपी आन् बाबाकं बाकी सगळा. पुडं घाटाला लागलो तं घाटाना कडकी सीत्या मामी आन् दुंद्या गावात चाल्ली आसंत. मला वाटला आथा येली मॉद द्या लागंल म्हणून मी मांगच रयलो. मुद्दाम वजं वजं चलाया लागलो. तेवड्यात बाबाना हाक मारली,"जालू, चाल लवकर." तसा मी जॉरात आलो तं बाबापशी दुंद्या आन् कडकी सित्या मामी थांबेल आसं. सीत्या मामीला बाबाना वर(डॉंगराला) काय कामा चाल्ल्यात त्या ईच्यारला आन् मला आडर दिली,"जालू, दुंदाला यक ईरी दि काडून." मॉवाला मन नव्हता पण बाबाना लय मोकळ्या मनाना मॉद द्या सांगीतली. दुंद्याकंय घ्याला काईच नव्हथा. मंग काय तिडूनंच धामनाची दोन पाना घेऊन डॉमा क्याला आन् तेच्यात यक ईरी दिली. बाबाकं पऊन मंग म्याय मोकळ्या मनाना काडून दिली. चलता चलता हातावं ययेल मॉद हाताना चाटीत व्हतो आन् परत टोपीखाली हात लाईत व्हतो. यकदाचा झापाकं पोचलो. समदेनी मॉद खाली आन् आईना काई मॉद बाटलीत भरून ठुवली. आजंय आवषादाला घरात थोडी तरी मॉद रयेतेच.
          आज वसरीवरचा बाबाचा फटू पयला का आशा लय गोठी डोळ्याम्होरून जाथ्यात. पर यक रुखरुख सारखी लागून रयेतेय मनाला. ता रुखरुख परतेक यळाला बाबाचे फटूकं पयला का बाबाला सांगून दाईतोय.
          *"बाबा, तू लय लवकर मातीत ग्याला. तुह्याकून लय काय काय माईत करून घ्याचा व्हता. झाडपालेची आवषादा, आपलं देवदिक, सणवार, पाखरा-जनावरा काय सांगत्यात त्या... लय काय काय. पर त्या माईत करून घेच्या आंदिच तू आमाली टाखून ग्याला. आथाची लॉखा म्हंत्यात का आथाची माणसा लय हुशार. पर नय. खरा नेनीक तं तुच. आरं खायाला आन नव्हता घरात तवा तुमाली कसा जगावा ह्या माईत व्हता. आन् तुमी जगलंय बी, त्याय बिगर आजाराचं. आथा ह्या लॉखाली कसंन कसं रोग व्ह सुटलंत. ह्या समद्या गोठी सांगाया त्वा परत या पयजे.*
                                                                                  *खऱ्याना सांगतो बाबा, त्वा परत या पयजे.*


          - *जालिंदर शांताबाई विठ्ठल गभाले*
             *वारंघुशी ता.अकोले जि.अ.नगर*



No comments:

Post a Comment