सन्माननीय वाचक

Friday, May 22, 2020

" पाचयीचा पाटा पुंजान "

              🌾🦀 पाचयीचा पाटा पूंजान 🦀🌾




           बाळाच्या जलामल्येल्या दिसापसून पाच दिसांनी "पाचयी" रह्येत्येय. त्याला "पाट्याचा पूंजान" असाय म्हंत्यात. पाचयीला "सटवायची" पुंजा करीत्यात. बाळातनीच्या उश्येशी गायच्या श्येनाना बयदवार सारवून काढीत्यात. तिढंच पाचयीच्या पाट्याचा पुंजान करित्यात. समद्यात आगूदर घराच्या भितीवर "आकरा बळी" काढीत्यात. बळीचा ड्वोका शेंदूर नै तं गुलालाना काढीत्यात आन् खालचा धड तयेच्या नै तं दियेच्या क्वोजेळीने काढीत्यात. बाळातनीच्या उश्येशी असलेल्या भित्तीवं द्वान बळी काढीत्यात. पायेच्या बाजुच्या भित्तीवर व्दान बळी काढीत्यात. घराच्या चौकटीवर दोन्ही बाजुला योक - योक आसं मिळून द्वान बळी काढीत्यात. वस्रीच्या द्वान भित्तीवर योक-योक बळी तं तीन बळी न्हानीघराच्या इढं काढीत्यात.

         घरात्ली जानती सुरती बाय नै तं वळ्खीतली सुईन पाटा पूजीते. समद्यात आगूदर पाटा धिवून पुसून सारावलेल्या जाग्येवर ठियीत्यात. नागल्येच्या पिठाच्या पाच चनक्या करीत्यात. ऊलीसं गहू आणि हारभरं शिजून घुग-या बनित्यात. पाट्येवं कवदरीचा पान आथरून त्येच्येवं कुळसायच्या आन् सटवायच्या नावाना नागलीच्या दान्याचं द्वान बारखालं पुंजोळं घालित्यात. त्येच्याच म्होरं बाजारातून यिकात्री आन्येल वट्टीचा सामान ठियीत्यात. त्येच्यात हळद, कूक्कू, गुलाल, बुका, हाळकूंडा, सुपा-या, खारका, बदाम, जरदाळू आन् गंडादोरा रह्येतोय. नागल्येच्या पुंजोळ्यां म्होरं भाताची पाच मुटकी ठियीत्यात आन् योक भाताचा म्वोठा उंडा करीत्यात. त्या ऊंड्येवं दही आन् गुळ टाकीत्यात. त्या ऊंड्याला 'ठम' म्हंत्यात. शिजयेल घुग-यातून उलीश्या घुग-या पाट्येवं ठियीत्यात. नदीत्ली वाहाळू, दही, दुद, भुज्येल खेकड आन् मासं पाट्येवं ठियीत्यात. गव्हाच्या पिठाच्या पाच पनत्या बनून पाट्येच्या म्होरं पेट्यीत्यात. तिढंच योक दगडी दिवायं बी रह्येतोय. त्याला "दिपक्या" म्हंनतात. त्याला पाचयीला लय मान रह्येतोय. दाराजवळ, न्हानीजवळ आन् पाट्याजवळ दुभांगळी साबरा, बोरीच्या डहाळ्या, लव्हाळा, आंब्याचं डहाळं ठियीत्यात. सम्दा वगमान मांडून झाल्येवं बाळाला उघडा करून पाट्येच्या म्होरं कपड्येवं ठिवून पाया पाडीत्यात. बाळाच्या गळ्यात गंडा बांधीत्यात आन् मंग संम्दी पाया पडत्यात. बाळाचा मामा बाळाला नयी पांघ्रुना आनीतोय. संमद्येली घुग-या वाटीत्यात. हौशी गौशी ल्वोका हौसाना रातच्याला भज्यानयं बी ठियीत्यात.

       दुसऱ्या दिशी पाट्यावं ठियेल नागल्येंचं पुंजोळं सोडून संम्दा वग्मान वाहत्या पान्यात सोडून देत्यात. नागल्या घरातल्या कनगी - क्वोथळीतल्या दान्यात बरकत म्हणून टाकून देत्यात. भितीवं काढ्येल बळी...बाराया दिशी पुशीत्यात. त्याला "बारा बळी म्वोडलं" असा म्हंत्यात. सुईनीला चोळी बांगडी देत्यात. असा ह्या आदिवासी समाज्यात पाटा पुंजायचा कार्येकरम रह्येतोय. थोडक्यात काय तं आपल्या रोज्च्या ज्वेवनात ज्या रह्येताय त्याचाच निवद कुळसायला दाख्यीत्यात.


                         - संतोष अनुसया दगडू मुठे.



No comments:

Post a Comment