सन्माननीय वाचक

Friday, May 22, 2020

" चांदावा "

                           " चांदावा "


          महा बा रिटर [सेवानिवृत्त] झाला आन् आम्ही संम्दी गावाला ग्येलो. गावची प्वोरा पकी आप्रुपावानी मह्याकं पह्याची. म्हतारी क्वोतारी बाssssss तु क्वोनाचा रंssss आसा म्हनून जवळ बोल्वायची आन् पकं मुकं घ्यीयाची. आन् वरून मव्हं गाल पुसून काढायची. तव्हा मला तंबाखू - मिस्रीचा पका वास यियाचा. मागून-मागून तं मी म्हता-या लोकांच्या जवळ जातच नसं. त्येंची भाषाच मला उमजत नसं... इकं-तिकं, ह्यार, गवासला, तुव्हा-मव्हा, इढं-तिढं....आसं सबुद मला उमजायला येळ ग्येला. तव्हा महा गाईड म्हनला तं मही आजी व्हती...तिच मला कह्याला काय म्हनायचा त्या सांगायची. 

      येकदा आसाच आमच्या पेठ्यात येक लगीन व्हता. मी आपला आजीच्या मागं-म्होरंच लुडबूड करीत होतो. नव-येच्या चीलत्याना द्येवाक घ्येतला आन् पानवठ्याकं निघाला. त्येंच्या डोक्यावं द्वान प्वोरांनी गुलाबी श्याल धरली व्हती. तव्हा म्या आजीला यिचारला....

"आज्ये वर ऊन नाय मंग त्येंच्यावर कह्याला कपड्येची सावली धरल्येय गं...?"

तव्हा आजी म्हंगाली...

'आरं बा.... आज त्येंचा मान हाये...म्हनून त्येंच्या डोक्यावं कापाड धरून त्येंची वाजत गाजत निरवनूक काढीत्यात. त्येंन्ली नयी कापडा घालीत्यात. त्याला *चांदावा धरला* आसा म्हंत्यात'.

तव्हा म्या मह्या आजीला यिचारला...

'आजे तुह्या लगनातयं आसाच चांदावा धरला व्हता का गं....?'

आजी म्हंगाली, 

'बाबा तव्हा कह्याचा चांदावा न् बिंदावा...टिचभर कापाड मिळायची भरांता आसायची. मव्हा लगीनयं मला आठवत नाय. मी तव्हा लय बारीक व्हती'.

गावाला आय-बापा परीस आज्या-नाताचा नाताच जादा रह्येताय. तसाच मव्हा व्हता. 

मह्वा आजा लवकरच वारला व्हता. म्हनून आजीला कंधीच देवकाचा मान मिळाला नव्हता. मी मह्या आजीला सारखा म्हनायचो का , 

'आज्ये मह्या लगानात मी तुलाच देवाक आनाया लावून तुह्या डोक्येवं चांदावा धरायचा मान देनार हाये'

आजी मह्या बोलीला हासायची...

पन मी सायी-सातयीला आसतानाच मह्या आजीच्या आंगावरून वारा ग्येला आन् ती जी आथरूनाला खिळली ती परत उठलीच नाय. तव्हा पका पावसाचा धोदाना लागला व्हता. आजीला पुराया खासं पोहोत नियाला बी पाऊस उघडत नव्हता. मंग तव्हा मह्या मामाना ड्वोका लावला आन् खाटल्येच्या वर ताडपत्री धरून कसाबसा मह्या आजीला न्येला. 

चौघांनी ताडपत्री धरल्येली बघून आजीवं जनू का चांदावाच धरलाय आसा मला वाटू लागला. मला पका भरून आला. म्या मह्यावाली टोपी त्वोंडात खुपासली आन् मह्या आयच्या पदरा मागं पका रडलो. आजीला शेवटच्या घडीला चांदायात जायाला मिळाला व्हता. 

"आज जवळजवळ तीस-येक वरसांनी आमच्या आज्या-नाताची चांदायाची ही गोठ मी तुम्हांली सांगुशी वाटली"


                                  

                               - संतोष अनुसया द. मुठे.



No comments:

Post a Comment