सन्माननीय वाचक

Friday, May 22, 2020

" रखम्याय "

                       
                          🙏🏻 रखम्याय 🙏🏻




           ग्येलंसाली मी आज्वोळा गेल्तो...त्या खेपाला रखम्यायला भ्येटलो तीच काय आमची शेवटची भ्येट....

     मला आजयं ध्यानात ये...तिला दिसाया निट दिसत नव्हता तरीबी मला येष्टीत बसून दिया पार टँड कं आल्ती. जातानी खाली हातना नाय जाती म्हनून मला ऊलीसा ऊळा आन् भुज्येह हुळावळ्याचा पिठ वानाव्ळा म्हनून घेऊन आल्ती. म्या तिला शंभराची नोट देव केली तव्हा ती मह्याच हाती क्वोंबून म्हंगाल्ती....'बा...मला पैसं नकू...पुढच्या ख्येपाला येताना मला द्वान मोरांची चितरा आस्येल कमरंची पिशयी घेऊन यी...'

        येष्टी हालस्तवर पकी त्वांड भरून बोलत व्हती. येष्टी निघाली तव्हा मह्यावालं पटापट मुकं घ्येतलं आन् वरून त्येपल्याच पदराना मह्यावाला त्वांड पुसून काढला...."जपून जा...प्वोरान्ली जीव लाव...खुश्येली कळयीत जा..." ती आसा म्हनंस्तवर येष्टी सुरू झाली आन् रखम्याय बरुबरच मव्हा आजूळ सोडून मी ममयकं निघालो....

      रखम्याय तशी मह्यी चुलात आजी...पन सख्या आजीपरीस जास्तीचा तिचा मह्यायीखी लळा आसायचा. रखम्यायला येकच नात...जनी.....पन तिला दूर देसात दियेल आन् तिच्या मागं प्वोरांचा, घरदाराचा सम्दाच लचांड....तिला काय सनावाराला यियाला जमायचाच नाय. जनी जव्हा तीन येक वरसाची आसल तव्हा मव्हा मामा पान लागून म्येला...जनी आन् मी वयाना सारखाच. मी आजूळा ग्येलो का जनी आन् मी रखम्यायसंगच रह्येचो. तसा बघाया ग्येला तं म्या तिला आजी म्हनाया पैजे व्हता...पन जनी म्हनायची म्हनून मंग मीय बी रखम्यायच म्हनाया लागलू...मह्या मामीचा न् तिचा लय पटत नसायचा म्हनुन मंग तिना आपला बाड बिस्तारा पढयंला हाल्येल व्हता. तिच्या ऊलीश्या संवसारात मी आन् जनी आसायचो. आम्हाली तलाप आली का चुलीवं क्वोरा गुळाचा चेहा काय बनायचा...पितळ्येंतून फुरकं मारीत आम्ही च्येहा काय पियेचो...तं रातीशी रखम्याय आम्हाली गोठी काय सांगायची...ती आमची चाल्ती बोल्ती येक साळाच व्हती. जनी म्वोठी झाली आन् रखम्यायच्याच वळखीना जनीला दूर घ्वाड नह्येरी दिला. संम्दीच म्हनत व्हती 'वळख ना पाळख आन् आश्या लांब मुलखात जनीला कह्याला दिला...?'

   पन मामा आसतानी त्येची येक मान्येल बहीन तिकं तिरापाडाकं रह्येत व्हती म्हनून तिच्याच प्वोराला जनीला देऊन टाकला व्हता...पण प्वार मानुस्कीला लयभारी व्हता. पका त्वांडभरून बोलायचा...

      हा...तं म्या काय सांगत व्हतो....जनीला जरी जमला नाय तरी वरचेवर मी गावाला ग्येलो का रखम्यायचा हाक हावाल यिचारुनच जायेचो. ह्या खेपंला शिमग्यात ग्येलो तव्हा तिना मह्या प्वोरान्ली गाठ्या आन् कडं घेऊन ठियेल व्हतं. आन् तव्हाच फिरांडू निघाल्तो तिच आमची काय ती गळाभेट झाली....ममयला आल्येवं पंध्रायेक दिसाना समाजला का रखम्याय हिरड येचाया गेल्ती आन् वरून मानमेंढ्येवं पडून जागच्या जागीच  खल्लास झालती. मह्या मनाला लय दुक झाला. रखम्यायच्या मौतीला जाया नाय जमला पन मंग दसपिंडाला ग्येलो. जाताना म्वोराची चितरा काढ्येल कमरंची पिशयी घेऊन ग्येलो. पन त्येचा काय ऊपेग नव्हता...पिश्यी लावनारीच नव्हती रह्यली.आता चारपाच दिसापुरयी ती मह्या सपनात आल्ती...मला म्हंगाली 'बा...त्वा तं आज्वोळी यियाचा पारच बंद करून टाकलाय...येत जा वरच्यावर...' तिचाय म्हन्ना खरा व्हंता....पन तिला कसा सांगू का...

त्या पडक्या पढयं कं जाया मव्हा मनच धजावनार नाय...

                             - संतोष अनुसया द. मुठे.



No comments:

Post a Comment