सन्माननीय वाचक

Wednesday, May 27, 2020

इवाईन

*इवाईन*✈️
       तवा मला मॉक्कार काम रयाचा. म्हजी सकाळूस उठलो का लवामांगच्या दगडा फॉडाया जायेच्या. त्या दगडांच्या पायी कितीन किती वखत बॉटा ठेसून घ्यतली व्हती त्याचा काई हिसाबच नई. नेहरीपोहत ह्याच काम. मंग नेहरी झाली का चिच्चाखाली जायाचा. आन आखी माती उलटी पालटी करून टाखायची. म्हंजी म्याकं ह्या करायला यक गाडी व्हती. लाकडी. ईटाचे आकाराची. आस्सा ऱ्यामटाळायचो ना गाडी दिवसभर चिच्चाखालून का पार माती ईकडूनची तिकडं आन् तिकडूनची ईकडं. आन् आवतार तं पार भुरकुंड्याच.
      म्हंजी तवा मी साळातंय जात नवथो म्हणून ह्या आश्शी कामा. तवा मला यका गोठीचा लय भ्याव वाटायचा. तसा लय गोठींचा वाटायचा पर तेच्यातली ही यक. *ईवाईन*. ईवायनाचा आवाज आला रं आला का मी चिंगाट झापाकं पळत सुटायचो. मंग पार गाडी कुडं तं काय कुडं. आन् ह्या घरातले समदेली माईत व्हता. मंग मला बॉलवायचा आसला का कोणीही मुद्दाम म्हणायचा,"जालिंदर, ईवाईन आला ईवाईन." मी काईच पयेचो नय. डायरेक झापात जाउन शिरायचो. मंदिच यखांदा म्हणायचा,'ईवायना ईवायना खाली ई, ज्यालेच्या आयला धरून नी.' आयला धरून न्याला तं मॉवाला कसा व्हईल ह्या ईच्यारानाच मी लय बेहचो. मला आठवाताय यकदा सांगईला लग्नाला गेलो व्हतो तवा आई क्वाणाच्या तरी दुसऱ्या पावणेंच्या ईडं गेली व्हती. मला क्वॉनातरी फसावला का त्वाय गेली तुला सोडून. तं मी यवडा रडंत व्हतो का क्वानाचाच आयकना. सगळी माणसा मला समजाईत पर मी काय रडायचा थांबना. कोण काय खायाला देई तं कोण काय ख्याळाया देई. शेवटी क्वानातरी मायला निरोप धाडला आन माय आली. तवा मी गप रयलो.
      आसाच यक दिवस माणसा खळ्यात प्यांढा मळीत व्हती. आन् मी आपला माती उलटी पालटी करायचा काम करीत व्हतो. तेवड्यात मय्या कानात ईवायनाचा आवाज आला. मी धुराट सुटलो आन् झापात जाऊन लपलो. खळ्यातून सगळेनी मला पयला. मंग मला घाबरावाया करताना दादा मुद्दाम म्हणला,"ईवायना ईवायना खाली ई, ज्यालेच्या आयला धरून नी." मला आस्सा राग आला ना. आस्सा कात काताऊन बहेर आलो. मायला धरून न्या म्हंत्यात याचा मला लय राग याचा. त्या रागाच्या भरात मी दादालाच म्हणलो,"आन्.. आन्.. तुह्याच... आयला... नि धरून."
      खळ्यात यकच हाश्या पिकला व्हता. पर तवापसुन यक गोठ झाली. मला कॉना ईवायनावरून घाबरावला नय का कोणी आयला धरून न्या म्हणला नय. आजूनय माय म्या बरबरंच हाये.

- *जालिंदर शांताबाई विठ्ठल गभाले*
   *वारंघुशी ता.अकोले जि.अहमदनगर*




No comments:

Post a Comment