सन्माननीय वाचक

Thursday, May 21, 2020

" मोह "

                         " मोह"


 

     सकाळू-सकाळू रामा-धर्माच्या पहारी कावळ्येंच्या कलकलाटाना गिरजीची झ्वापच उडाली. कावळ्येंच्या कोकन्याना, घुबडाच्या घुगन्याना, आन् कोल्ह्या-कुत्र्येंच्या रात्ती-आपराती इवाळन्याना गिरजीचा जीव घाबरा-घुबरा व्हयाचा. दरावज्याचा कवाड उघडून गिरजी बाह्रये आली आन् घरा म्होरल्या मोहाच्या झाडावं बश्येल कावळ्येंली तिना हाकलला. तसं संम्दे कावळे उडून मोहाच्या बनाकं गेलं. त्या कावळ्यांकं ह्येरता-ह्येरता तिची नदार एका दगडी चि-यावं बश्येल एकांट्या कावळ्यावं थिरावली....जणूका त्यो कावळा तिला मागं घड्येल घटनाची आठवन करून दियाच आला व्हता का काय आसा तिला वाटाया लागला...

         बांबळेवाडीपसून येका उडीच्या अंतरावं असलेल्या मोहाच्या बनात भाग्या आन् गिरजी गुण्या-गोविंदाना नांदत व्हती. कुणाच्या आध्यात ना मध्यात नसल्याने त्येंच्या संवसाराचा गाडा नीटन्येटका चालू व्हता. दाट बनावानी चहुकून  येढ्येल मव्हांच्या झाडात भाग्येची पडाळ एखाद्या चिरेबंदी वाड्यावानी दिसायची. मव्हाची फुला लागायच्या हंगामात तं फुलांच्या घमकाराना वातावरण पार भुलून जायाचा. संम्द्या नह्रायेत भाग्याचा बन सोडून कुढयं बी एवढी मव्हाची झाडा नव्हती. ह्यो बन भाग्याच्या तीन पिढ्या अगूदर पासून व्हता. मव्हाला झाडाला कल्पवृक्ष मानना-या भाग्याच्या खानदानीन बनात एक मोहदेवाच्या नावाना चिरा उभा क्येला व्हता. रोज न चुकता त्याला मोहाची फुला / मोहाची शिपभर दारू / मोहट्या ( मोहाच्या बिया) पसून काढयेल त्येलाचा दिवा लावला जायाचा. ईतभर शेतीचा आरा आसलेल्या भाग्याचा गुदारा या बनावंच चालायचा. माहू - शिमग्याचा महीना आला का, भाग्येची धावपळ सुरु व्हयेची....भाग्या, गिरजी, पाचयीत शिकनारा त्येचा ल्योक धोंड्या आणि सातयीत शिकनारी रुपा संम्दीजना कामाला झटायची. झाडांन्ली यियेल फुला खाली पाचोळ्यात पडली तं सापडत नसत... म्हनून भाग्या मव्हाच्या झाडाखालची जागा झाडून झटकून काढी...तिढं श्यानकाला घालून भुई बयादवार सारवून सूरवून काढी...मोव्हाची फुला ही दिवसा झाडावरून पडत नसत....ती पहाटी-पहाटी पडत. म्हनून मंग रातभर राखाण कराया लागायचा. गावात्ली बेंडगूळा आन् प्येताड कंपनी फुला चोराया यियेची...भाग्या रातभर खंड्या कुत्र्याला घेऊन बनाचा राखान करीे आन् सकाळूच संम्दीजना मिळून झाडाखाली पडयेला संम्दी फुला येचून अंगणात घोंगडीवं सुकयीत....फुलांचा मौसम सुरू झाला का, तळीरामांचा ल्वोंढा बनाकं निघायचा.. भाग्या एका लिमिट मंधीच हातभट्टीची मोहाची दारू काढी... ग्येलंसालच्या जुन्या फुलांचा उपेग दारू काढाया करी. कारन ज्येवढी सुक्येल आन् जुनी फुला तेवढी दारू जास्त आन् चवदार बनं... नव्याना सुकयेल फुलांतील उलीशी फुला म्होरल्या सालच्या भट्टीसाठी ठिवून बाकी बाजारात नेऊन येपा-यांन्ली वपी...

       मव्हाची फुला आन् दारू ह्या द्वान गोठी भागाच्या नदरंत आपल्या आदिवासी रितीभातीचा भागयं बी व्हता. ज्येच्या घरात मव्हाची दारू नसं त्येची श्येताची कामा ख्वोळांबली म्हनून समजा...ह्या भाग्याला ठाव व्हता. इरजूक म्हंन्ली का, दारू-कोंबड्यांचा ज्येवान आसं. सनासुदीला घरी यियेल पाव्हन्या - रावळ्याला जसा चिहा-फराळ देत्यात तसा मव्हाचा पाहूनचार भाग्येच्या घरी व्हयाचा. म्हनून भाग्येच्या आवनीच्या, येटाळनीच्या कामाचा कंधीच ख्वोळंबा होत नसं. पावसाळा तोंडावं आला का, भाग्येची दोन्ही प्वोरा मव्हाच्या ब्या गोळा कराया बनात पळायेची.. तं गिरजी आन् भाग्या मव्हाच्या फुलांचा राप घालून ठ-येल ४-५ गॕलन दारू काढायेची तयारी करीत. घरात दारूची भट्टी व्हती तरी भाग्या दारूच्या येसनाच्या आहारी कंधी गेला नव्हता. मातर आजारपनात, सणासुदीला नै तं मोहदेवाला निवद दावताना त्यो स्वता आन् त्येपल्या प्वोरान्ली योक-योक चमच्या दारू पाजी. घोटभर पिवर दारू  प्येल्येवं रोगरायं बाधत नाय आसा त्याचा म्हंनना व्हता. आन् ह्या खरायं व्हता. त्येंच्या ज्येवनात भुज्येल मव्हाची फुला आन् आंबील रह्याचा आन् संम्दीजना त्या ग्वाड मानून खायेची. प्वोरांन्नी बनातून येचून आन्येल मोहट्या आन् फळा अंगणात घोंगडीवं वाळत घालीत. हिरया फळांच्या साली काढून त्या वाळयीत. पावसाळ्यात गरम पाण्यात त्या वाळयेल साली उमवून त्येची चवदार भाजी बनयीत. तं मोहट्या दगडांनी फोडून आतील शेंगदाण्यावानी ज्यो गर रह्येतोय त्यो काढून ठियीत. आघोट तोंडावं आल्येवं ह्याच बिया तालुक्याच्या बाजारी नेवून अर्ध्या यिकून मीठ-मिरची तं अर्ध्या बियांचा खायाचा त्याल काढीत.

      ह्या साली मोहाला नेमका जरा कमीच  बार आला व्हता. भाग्याचा ड्वोका सालभराच्या पोटपाण्याची चिंता करू- करू पार आऊट व्हयेची येळ आली व्हती . त्येच्यातच राजूरपेठंतील एका वान्येच्या प्वोराच्या वरातीकरता चार बॕरल दारूची आडर भाग्याला मिळाली व्हती. गेल्यासालची आन् यंदाची फुला मिळूनयं बी चार बॕरल भर दारू गळनार नाय याचा भाग्याला अंदाज व्हता. तसाच बाजारहाटाला आन् शिलकीला फुला ठिवना बी व्हताच. काय करावा त्या भाग्याला सुचच ना....त्येच्या डोक्याचा पार गोयंदा झाला व्हता. पन हातची आडर जाता कामा नाय आसायं बी त्याचा येक मन सांगत व्हता. जव्हापसून बांबळेवाचा गज्या बांबळा आणि किसन पाटलाने भाग्याला दारु वाढवायची आसल तं तिच्यात नवसागर आन् धोत-येच्या बियेंची भेसळ कर आसा फुकाटचा सल्ला दिला व्हता तव्हापसून त्याच्या डोस्क्यात भेसळीचाच भुंगा घुमत होता. त्याना आपला हा यिचार गिरजीलायं बोलून दाखावला व्हता.. पण तिला ह्या काय पटला नव्हता. भाग्येची पिव्वर मव्हाची दारु त्येंच्या खानदानाची शान म्हणून वळखली जायेची. आन् आसा काहीबाही क्येला तं मोहदेव कोपाय-बिपायचा आसा भ्यावयं बी तिना बोलून दावला व्हता.भाग्याना हो-हो करून येळ मारून नेली...

     वान्येच्या प्वोराचा लगीन येका हप्त्यावं येवून ठ्येपला व्हता. इकं भाग्याना भट्टीचा राप लावला व्हता. रापातून कशीबशी दोन-सव्वाद्वान बॕरलच दारू गळली व्हती. तेवढीच देऊन येतो असा सांगून भाग्या राजूराच्या बाजाराच्या दिशी वाण्याच्या घरी जाया निघाल्ता. वाटतंच साकिरवाडीला त्येच्या मावसबहीनीच्या पडाळावं त्यो न्येहरीला ग्येला. तिढं त्याना गिरजीची नदार चुकयीत आन्येल द्वान रिकामी बॕराल,नवसागर, धोत-याच्या बीयेंची भुकटी काढली आन् त्या द्वान बॕरल भर्येल दारूत मिसाळली. आत्ता  द्वान बॕरलची चार बॕरल झाली व्हती. ती चार बॕराल घेऊन त्यो राजूराकं निघाला. दारू वान्येच्या हावाली करून त्याना पैसं घ्येतलं, बाजारहाट क्येला आन् भाग्या घराला आला. पन आज भाग्याचा कह्यातच मन लागत नव्हता. त्येच्या मनात कह्येचीतरी चलबिचेल चाल्ली व्हती. लग्नात जे व्हाया नकू व्हता न्येमका त्याच झाला. राती वरात नाचवाताना व-हाड्येंन्नी भेसळीची पकी दारू ढोसली आन् संम्द्यांन्ली ढाळ-वांत्यां व्हया लागल्या. हा-हा म्हनता बातमी पोलिस ठेस्नापोहोत ग्येली आन् सकाळूच पोलिस भाग्येच्या पडाळीवं धडाकले. भाग्याला काय घडला आसल त्या लगेचच उमाजला...म्हनून गप गुमाना काहीही न आळोख्ये-पिळोख्ये न घ्येता त्येना आपला गुन्हा कबूल क्येला आन् पोलिसांच्या सवाध्यान झाला.. देवाची किरपा म्हना का काय पन नशीब कोनाच्या जीवावं ब्येतला नव्हता. म्हनून फक्त दंड भरून भाग्येची सुटका झाली. पिढ्यान्पिढ्या चालत यियेल परंपरेत भाग्याना ढवळाढवळ क्येली म्हनून मव्हादेवानेच त्याला चाचनूक दावल्येची त्याला जाणिव झाली व्हती. म्हनून इथून पुढं तरी असा उलटापालटा कारभार करायचा नाय आशी मव्हादेवाम्होरं आनच घ्येतली. 'मोहा'तून द्वान पैकं कमवायच्या 'मोहा'पायी त्येच्येवं हा प्ररसंग गुदारला व्हंता.

    मव्हादेवाच्या चि-येवं बसून कावळा वरडत होता. त्येच्या द्वाडावानी वरडण्याना कायतरी द्वाडवानी घडू नये म्हनून गिरजी त्याला हाकलीत व्हती...तं भाग्या आपल्या प्वोरान्ली घेऊन मोहट्यांच्या बिया फोडायचा काम करीत व्हता......
    

                    - संतोष अनुसया दगडू  मुठे.



1 comment: