सन्माननीय वाचक

Friday, May 22, 2020

" आनवा "

                             " आनवा "


       
        लय दिसांची गोठ हाये...तव्हा मी दुस्री-तिस्रीला आसल...शिवरात म्होरं आली का आणवाचं तानं जमिनीच्या वर निघायचं...साबरीचा लवान, घुबाडदरा, साधाडमाळी, खोकार यिहीर ही चार-पाच ठिकाना आशी व्हती का जनूकाय तिढं आनवाचं दळ्हंच पेरलं आसावं...आनवाचं कंद खनून आनून मह्या आयच्या हावाली क्येलं की ती बयादवार धिवून बटाट्यावानी उकडून दियाची...मंग आम्ही संम्दी भावांडा लायनीशीर बसायचो...मही आय आनवाच्या फ्वोडी परतिकाच्या ताटात वाढायची...आन् आम्ही ती पकी चयी-चयीना खायेचो...

   तं म्या सांगत व्हतो का...मी आन् महा बा सकाळू बिगीनच उठलो...त्वांड कसातरी मुरगाळला आन् पितळीभर गुळाचा चहा प्येलो आन् आनवा खनाया निघालो...आनवा खनाया मह्या बा ना टिकाव घ्येतला व्हता...आन् आनवा आनाया म्या तंगूसची पिशयी घ्येतली व्हती...तहान लागली तं पानी पिया बारक्शी पान्येची बाटली बी पिशयीत घ्येतली व्हती...दुपारच्या पहारा पोहोत आनवा प्वोटात ग्येली पायजेत आसा मव्हा बा म्हनाला तसा मव्हा हुरूप वाढला आन् मी पाय उश्येरून चालाया लागलो...मह्यावानीच गन्प्या, दिप्या, चिंट्या, लुम्या...संम्दी प्वोरा त्येंच्या-त्येंच्या बापासंग आनवा खनाया चाल्ली व्हती...त्येंन्ली पाह्यला तसा म्या मह्या बा ला म्हंन्ला....आरं बा...उडी मार नैतं ही मंड्येळी आपल्या म्होरं जाऊन संम्दी आनवा खनून नियेची...तसा महा बाप गालातल्या गालात हासला...आम्ही साधाडमाळीला पोचलो तं तिढं गावच्या ल्वोकांची उथळनच झाली व्हती...तिढाली जमीन खनुन खनून पार ख्येकडीच्या उकीरा जशी झाली व्हती...तिढं काय मिळनार नाय ह्या मह्या बापाना ताडून तो घुबाडद-याकं निघाला...वर कनाळाला येऊन खाली घूबाडद-याकं पाह्यला तं मुंग्यागत लोकांची उथळन...तसाच महा बाप फिरांडू खोकार येहरीकं जाया निघाला...चालून-चालून मह्या पायाचं तं पार तुकडं पडाया आलं व्हतं...उन्हाना पार तव्हारी आली व्हती...बाटलीत्ला पानी तं पार क्वोहमाट झाला व्हता...तसाच द्वोन घोट प्येलो आन् मह्यी त-हा मह्या बाना पाह्यली आन् त्येना मला खांद्येवं उचलून घ्येत्ला...तिढं पोचलो तं ख्वोकार येहरीत आजुबाजूच्या गावची ल्वोका तुटून पड्येल...

     त्या ह्येरून मह्या बा ना येक त्येंच्या नावाना शियी दिली...आन् आम्ही रिकाम्या हातीच घरी निघालो...महा पका हिरमोड झाला व्हता...रिकाम्या हाती घरी आलो तव्हा मही आय आमची मांडवात वाटच बघत व्हती...तिना आम्हा बाप ल्येकाली गार माठातला पानी पिया दिला आन् तशीच जात्याकं पळाली...शेरभर वरया पाखाडल्या आन् त्येची भगर करून भात घातला...घरच्या गायच्या दुधाचा तवलीभर दही व्हता...त्या वरून टाकला आन् पका तडस लागस्तवर खाल्ला...तव्हर सवसांजच्या चार वाजल्या आसतील...त्या शिवरातीला पका कडाक उपास घडला व्हता...आजयं आनवाची गोट काढली का शिवरात आन् त्यो उपास आपसूकच डोळ्यां म्होरं येतो....


                - डांगाणातून संतोस मुठे खेतवाडीकर



No comments:

Post a Comment