सन्माननीय वाचक

Friday, May 22, 2020

दीड रुपाया


आज ऐतवार व्हता.  कॉलेजला सुट्टी व्हती. म्हणुन हास्टेलची आमी समदी प्वारा उशिरानाच उठयचो. म्या आदिवासी वस्तीग्रुह कोटमर्याला व्हतो. तेचीय लय गंमत हाये. म्या मंचरच्या हास्टेलला फाम भरला व्हता. पण मफल्याला मार्क कमी व्हत म्हणुन मला नाय घ्यातला मंचरला. मफल्याला वाटला आता समदा खपला.
    कालेजला तं आडमिशन घ्यातला व्हता. रायाचा कुटं,  इशय डोक्याबायर गॅला व्हता. माहा दोस्त दशरथ वडेकर आन रामचंद्र मदगे येनी कसातरी मंचरच्या हास्टेलला संभाळला.  पण जर का पंढुरे सरानली कळला तर तेनली तरास व्हयील. म्हणुन इचार कॅला, माहा चुलता मंचरातच राह्याला व्हता. त्याला इचारावा, अन तांदुळ बिंदुळ दिलं आसत.
    मी माह्या चुलतेच्या घरात गेलो. अन म्हणला '' सख्या तात्या माहा हास्टेलला नंबर लागल तवर ठिवशील का तुह्याकं."
ठिवायचा लांबच रायला तो म्हंगाला
" कह्याला कालेज करतो, आयटी याला आडमिशन घे"
   म्या त्याच पावली डोळं पुशीत निगालो. घरी जावा त शिक्शान व्हणार नाय. आन इत राहणार कुटं . आसा कातरीत सापडलो व्हतो. शवटचा परयाय म्हणून कोटमदर्याला इचाराया गेलो.
   तिथं गेलो तं बायरच महाद्या मावळ्याचा दत्ता दिसला. म्या पाहुन नाय पायल्यासारखा कॅला. कारण तेच्या बापाचा आन माह्या धोंड्या तात्याचा म्हंगालं भांडाण झालता. दत्ता बोलणार नाय म्हणुन मी जांभुळकर सरानच्या हाफीसकडं निगालो.
   तेवड्यात मागाहुन आवाज आला" आरे रामा ईकडं कुणीकं?" म्या त्याला सांगितला का आडमिशन घिया आलोय. दत्ताची अन जांभुळकर सरानची चांगली व्हती. दत्ताच्या शबदावं मफल्याला सरानी हास्टेलला ठिवला अन माह्या जीवात जीव आला.
     हा त असा आडमिशन मिळाला. हा तं मी सांगत व्हतो की रयवार व्हता आमी असंच बसलो व्हतो. तेवड्यात आमड्याचा बाळु असवले आला अन मला म्हंगाला " रामा येतो का गावाला?"
मॅ म्हणला "कह्याला?"
बाळू म्हंगाला " संक्रातीची सुट्टी हाये चल जाव"
मॅ म्हणला" नकु."
कारण मॅ दिवाळी अन मे मयना सोडला तं कंदीच घरी जात नवतो.
 मफल्याला पण वाटला जावा कायनू घरी. पण पेटीत पायलं तं पयसं कमी व्हतं.
मॅ बाळुला म्हटला का मी नाय येत घरी मफल्याला काम हाये कालेजचा.  खरं तं माह्याकं तिकीटाएवडं पयसं नवतं. मॅ मान खाली घातली अन माह्या जागेव जाऊन बसलो. मफल्याला पका गयवरून आलता. पण म्या दाखावला नाय
     बाळुला समाजला का येच्याक पयसं नाय. तो माह्या जवळ आला अन म्हंगाला " रामा खरं सांग पयसं नाय ना?"
मॅ पाणावलेल्या डोळेनी तेच्याकं पायला अन म्हणला " हायेत पण आवफ्याला जाईल यवडं नाहीत"
तेना तेचं मोजलं तं तेचा तिकीट आन माहा तिकिट काडला तं दीड रुपया कमी पडत व्हता.
     मॅ म्हणला " तुच जा"
तो म्हंगाला " नाय जायाचा तं दोघानिय".
तो म्हंगाला" मी मागच्या स्टाॅपचा ( आडिवरेचा) तिकीट काढीतो. अन माह्याकडचं दीड रुपये तुला देतो.
बोलत तो व्हता अन डोळं महं पानावलं व्हतं

रामदास लोखंडे
आहुपे ता आंबेगाव जि पुणे
8097629028



" इनिस्पेक्शन "

                      "इनिस्पेक्शन"


        पिपारवाडीच्या गंगा मास्तरची आज जरा तारांबळच उड्येल व्हती. गनमानीत इकून-तिकं भुंड्येवं हात ठिवून नि-ह्या चकरा मारीत व्हता...गुरुजींली काय झालाय त्या प्वोरान्ली बी कळंना...तेवढ्यात पडाळीवं वस्तीला राहानारा खमा पाटलाचा धोंड्या हातात कायतरी घेऊन आला...वरून ध्वोतराना झाक्येल व्हता म्हनून काय आन्येल व्हता त्या प्वोरान्ली दिसंच ना...तेवढयात धोंड्येच्या हातातला ध्वोतार मास्तराना वर क्येला आन् त्येच्या खालून क्वाॕsssक आसा आवाज आला. ध्वोंड्याचा येताळाला कापाया ठियेल क्वोंबडा मास्तराना आरजेंट मागितला व्हता म्हनून त्यो क्वोंबडा धोंड्याना ध्वोतार वल्ला करून त्येच्या खाली झाकून आनला व्हता. वल्ल्या कपड्याखाली क्वोंबडा कोकत नसतो ह्या त्याला ठाव व्हता...क्वोंबड्याचा बंदोबस्त झाला ह्या पाहून गंग्या मास्तराच्या जीवात जीव आला...आता उद्येच्या पाहूनचाराची भरांता मिटली व्हती...मास्तराना त्यो क्वोंबडा तेपल्या घरी नेवून ठिवाया साळंतीलच गुलब्याला पाठावला...आत्ता मास्तराचा मोर्च्या पोरांकं वळला...प्वोरांन्ली दुसऱ्या दिशी येताना दिवाळी नंतर शिकयेल मराठी आन् इतियासाचं द्वान-द्वान धडं आन् द्वान कयिता पाठ करून यिया सांगितल्या. चांगल्या  आंघूळी-पांघूळी करून, क्येसांन्ली त्याल चोपडून यिया सांगित्ला आन् पांघरूना धिवून-धावून काढाया दुपारूच साळा स्वोडून दिली...

         
         त्याचा काय झाल्ता का २०१४ साली त्या तावड्येंच्या यिनोदाना लय म्वोठा यिनोद करून ठिवला व्हता. ज्या साळंचा हाज्रीचा पट २० पेक्षा कमीये त्या साळा बंद करायचा फतवा काढला आन् पिपारवाडीच्या संम्द्याच गावक-येंची पाचावं धारन बसली. गावच्या साळंत पैली ते चौथीची संम्दी प्वोरा मिळून इन-मिन १९ प्वोरा...त्येच्यातयं तीनचार जना दांडी मारनारी...साळा तशी लयजुनी...पन आस्रमसाळंत घालायचा फ्याड निघाला म्हनून संम्दी प्वोरा तिकंच साळत धाड्येल...गावातली साळा कशीबशी तग धरून व्हती तं ह्या आसा फतवा निघाला. साळा तं बंद व्हया नकू म्हनून मागच्या बस्तारवारी चावडीवं संम्द्या गावक-येंची बैठक बसली व्हती. त्यात गंगा मास्तर, कमा पाटील, रामा कोत्वाल, सोमा कारभारी संम्दी मंडळी हाजर व्हती. संम्द्यांचा येकच ठ्वोका व्हता का कायबी करून गावात्ली साळा अपुऱ्या पटामुळं बंद व्हवू दियेची नाय. मंग त्येच्यासाठी पार मामलेदारा पोहोत जायेची येळ आली तरी चालल आसाच संम्द्यांचा होरा व्हता. त्येच्यातच द्वोन बुका शिक्येल दिल्या आसावल्याना त्याचा आसा म्हंन्ना मांडला का आपून पयला शिक्षान आधिका-याला जावून भेटायचा आन् त्याला ह्या पटून दियाचा का...


१. आपल्या गावापसून शिक्शानाची सोय ७-८ कि.मी वं शिंदंवाडीला हाये...पन तिढील्ला मास्तर तं साळंतच येत नाय...प्वोराच साळा भरीत्यात आन् स्वोडून देत्यात. मंग आमची प्वोरा तिढं काय शिकनार....?
२. आमच्या गावचा गंगा मास्तर प्वोरांन्ली चांगलं धडं देनारा मानूसयं. त्येच्या हाताखाली शिक्येल प्वोरा आज कंपनीत, मास्तर, डाक्तर, इंजनेर, सरकारी नोकर म्हनून कामाला हायेत.
३. साळंतील प्वोरा हुश्यार हायेत. त्येन्ली कंचाय धडा काढाया सांगितला तरी त्ये काढतील आसा आमचा ईश्वास हाये.
४. संम्द्या गावक-येंच्या सह्यासकट गंगा मास्तरना गट शिक्षानआधिका-याला येक पत्र दियाचा आन् त्येन्ली गावात साळंला भ्येट दिया बोलवायचा...आन् त्याच भ्येटीत त्येन्ली आपला मास्तर आन् आपली प्वोरा किती हुश्यार हायाती त्या पटून दियाचा...


        झाला...दिल्या आसावल्यानाच को-या कागदावं लेटर लिव्हला...सक्कीरवारी सकाळी देवज्या सुपा जव्हा दुद घालाया ड्येरीला जाईल तव्हा त्याना तसाच म्होरं आकोल्याला जाऊन लेटर हातोहात गट शिक्षान आधिका-याला देवून यियाचा आसा ठरला. त्या गाडी-उताराला पाच-पन्नास रुपये बी दिलं. दुसऱ्या दिशी देवज्या त्येपला काम  करून आला. आला तव्हा येक चांगली बातमी घेवून आला. आकोल्याला त्याला खुद गट शिक्षान आधिकारीच भ्येटलं व्हतं. त्येन्नी म्होरल्या सक्कीरवारी म्हनजे आठादिसाना साळंचा इनिस्पेक्शन कराया येतो आसा शब्द दिला व्हता...आन् म्हणूनच उंद्या सायेब येनार म्हनून संम्द्येंचीच तारांबळ उड्येल व्हती.


          दिल्या आसावला चारबुका शिक्येल व्हता म्हनून त्योय बी प्वोरांचं पाढंच घी, कयिताच म्हनून घी, गनिताच सोडून घी...आश्या कामाला लागला व्हता. गडी-बाप्या मानसांनी उधघाळ्येल भुई तांबड्या मुरूमाना चांगला घातली...बायकांनी चांगल्या चिकान श्येनानी साळंची भुय सारवून काढली...मास्तराच्या घरी क्वोम्बड्याचा ज्येवान व्हनार म्हनुन कालवानात घालाया येसाव म्हतारीकून बाजरीच्या पिठाची कनी करून घेतली व्हती.

      दुस-या दिशी प्वोरा येकदम कडाक इस्तारी मंधी साळत हाजर...बंड्येली निळ दियेल बंडीच्या तुट्येल गुंड्या बयादवार लायेल आन् भुंड्येवं इरेल पाटलूनीला थिगळा लायेल...आशा परकारचा प्वोरांचा थाट तं प्वोरीन्नी द्वान-द्वान येन्या घाल्येल कपाळावं टिकल्या लायेल व्हत्या. सकाळूच प्रार्थना झाल्येवं मास्तरांनी परत येक दफा पोरांची परेड घ्येतली. बरोबर १० च्या ठोक्याला धवळी- धवळी जीपगाडी धुराळा उडयित साळाच्या पटांगनत उभी रह्यली. गाडीतून तिघं जन उतारलं...त्येच्यात योक केंद्र प्रमुख, योक गट शिक्षान आधिकारी वळखीचा व्हता पन तिसरा गडी नवखाच व्हता. त्येची चौकशी क्येली तं त्यो खास तावड्याना धाडलाय आसा समाजला. कायबी करून आसल्या साळा बंदच करायच्या आसाच त्याला सांगून धाडला व्हता. ह्या आइकून तं ड्वोका झोडून घियेची येळ आली व्हती. साळंच्या आजुबाजूच्या पवळ्या, आंगना गावक-येंन्नी भरून ग्येली व्हती. गावच्या जत्रंला, सप्त्याला नै तं इलेक्शनालायं येवढी पब्लिक द्येवळाकं जमत नव्हती.

          प्वोरांची वळख पर्येड झाल्येवं त्या तावड्याना धाडलेल्या मानसाना हाज्री घियाचा  नोंदबुक, मुल्येमापनचा बुक....आशी आनखीन काहीबाही बुका तपासली. गंगा मास्तर आन् दिल्या आसावला ज्याम खुश व्हता...कारन त्या ज्वोडीना कायिता, प्वोरांच्या त्वांडपाट करून घ्येतल्या व्हत्या. पन न्येम्का झाला उलटाच...तावड्याना जानूनबूजून म-हाटी आन् गनित यिषय न घ्येता इतियासाचा पुस्ताक मागावला...गंगा मास्तराचा त्वांड तं पार काळवांडला...पन दिल्या आसावला मातर गालातल्या गालत हासत व्हता ह्या ह्येरून गंगा मास्तर मातर च्याट झाला. दिल्या आसावल्याना मास्तराला ड्योळ्यानाच खुनावला का आत्ता फकस्त गंमत पह्ये....तावड्या ज्यो परश्न यिचारी त्याचा उत्तार सांगाया संम्द्या वर्गाचा हात वर व्हयी...प्वोरा उत्तारा सांगताना पार प्वोप्टावानी बोलत...तानड्यायं बी च्याट झाला....

       त्याचा झाल्ता आसा का, न्येम्का इनिस्पेक्शनला काय यिचारतील त्या क्वोनालाच ठाव नव्हता...म्हनून मंग दिल्या आसावल्याना संम्द्या यिशयाचं द्वोन-द्वोन, तीन-तीन धडं शिकवुन ठियेल व्हतं....श्येवटी ना ईलाजाना तावड्याला चांगला श्येरा मारावा लागला...आन् कमीतकमी २० यिद्यार्थ्यांची आट पूर्न व्हया येक यिद्यार्थी कमी आसूनयं बी साळा बंद करायची गरज  नाय आसा श्येरा देवून टाकला...
       
          इनिसपेक्शन उराकल्येवं साहेब ल्वाक गंगा मास्तराच्या घराकं ग्येलं...तिकं बाजरीची कनी आन् पिठाचा रोंब घालून बनयेल क्वोंबड्येच्या रश्याचा पार वस्रीवं घमकार सुटला व्हता. ज्येवान-खावान उराकल्येवं साहेब धुराळा उडयीत जसं आलं तसंच धुराळा उडयीत ग्येलं....आज सम्द्या गावना दिल्या आसावल्याला उचलून घ्यात्ला व्हता...त्याना जास्तीचा आभ्यास करून नस्ता घ्येतला तं प्वोरा गनमानली आस्ती. ह्या संम्द्येली उमाजला व्हता. गावतल्या संम्द्येंनी मारवतीच्या मंदीरात आन घ्येतली का इढून म्होरं आपल्या गावातली प्वोरा दुसरीकं साळत न टाकता गावातच टाकायेची आन् आपला पट कंधीच यीसच्या खाली येऊ दियाचा नाही....

                 

                      - संतोष अनुसया द. मुठे.



" पाचयीचा पाटा पुंजान "

              🌾🦀 पाचयीचा पाटा पूंजान 🦀🌾




           बाळाच्या जलामल्येल्या दिसापसून पाच दिसांनी "पाचयी" रह्येत्येय. त्याला "पाट्याचा पूंजान" असाय म्हंत्यात. पाचयीला "सटवायची" पुंजा करीत्यात. बाळातनीच्या उश्येशी गायच्या श्येनाना बयदवार सारवून काढीत्यात. तिढंच पाचयीच्या पाट्याचा पुंजान करित्यात. समद्यात आगूदर घराच्या भितीवर "आकरा बळी" काढीत्यात. बळीचा ड्वोका शेंदूर नै तं गुलालाना काढीत्यात आन् खालचा धड तयेच्या नै तं दियेच्या क्वोजेळीने काढीत्यात. बाळातनीच्या उश्येशी असलेल्या भित्तीवं द्वान बळी काढीत्यात. पायेच्या बाजुच्या भित्तीवर व्दान बळी काढीत्यात. घराच्या चौकटीवर दोन्ही बाजुला योक - योक आसं मिळून द्वान बळी काढीत्यात. वस्रीच्या द्वान भित्तीवर योक-योक बळी तं तीन बळी न्हानीघराच्या इढं काढीत्यात.

         घरात्ली जानती सुरती बाय नै तं वळ्खीतली सुईन पाटा पूजीते. समद्यात आगूदर पाटा धिवून पुसून सारावलेल्या जाग्येवर ठियीत्यात. नागल्येच्या पिठाच्या पाच चनक्या करीत्यात. ऊलीसं गहू आणि हारभरं शिजून घुग-या बनित्यात. पाट्येवं कवदरीचा पान आथरून त्येच्येवं कुळसायच्या आन् सटवायच्या नावाना नागलीच्या दान्याचं द्वान बारखालं पुंजोळं घालित्यात. त्येच्याच म्होरं बाजारातून यिकात्री आन्येल वट्टीचा सामान ठियीत्यात. त्येच्यात हळद, कूक्कू, गुलाल, बुका, हाळकूंडा, सुपा-या, खारका, बदाम, जरदाळू आन् गंडादोरा रह्येतोय. नागल्येच्या पुंजोळ्यां म्होरं भाताची पाच मुटकी ठियीत्यात आन् योक भाताचा म्वोठा उंडा करीत्यात. त्या ऊंड्येवं दही आन् गुळ टाकीत्यात. त्या ऊंड्याला 'ठम' म्हंत्यात. शिजयेल घुग-यातून उलीश्या घुग-या पाट्येवं ठियीत्यात. नदीत्ली वाहाळू, दही, दुद, भुज्येल खेकड आन् मासं पाट्येवं ठियीत्यात. गव्हाच्या पिठाच्या पाच पनत्या बनून पाट्येच्या म्होरं पेट्यीत्यात. तिढंच योक दगडी दिवायं बी रह्येतोय. त्याला "दिपक्या" म्हंनतात. त्याला पाचयीला लय मान रह्येतोय. दाराजवळ, न्हानीजवळ आन् पाट्याजवळ दुभांगळी साबरा, बोरीच्या डहाळ्या, लव्हाळा, आंब्याचं डहाळं ठियीत्यात. सम्दा वगमान मांडून झाल्येवं बाळाला उघडा करून पाट्येच्या म्होरं कपड्येवं ठिवून पाया पाडीत्यात. बाळाच्या गळ्यात गंडा बांधीत्यात आन् मंग संम्दी पाया पडत्यात. बाळाचा मामा बाळाला नयी पांघ्रुना आनीतोय. संमद्येली घुग-या वाटीत्यात. हौशी गौशी ल्वोका हौसाना रातच्याला भज्यानयं बी ठियीत्यात.

       दुसऱ्या दिशी पाट्यावं ठियेल नागल्येंचं पुंजोळं सोडून संम्दा वग्मान वाहत्या पान्यात सोडून देत्यात. नागल्या घरातल्या कनगी - क्वोथळीतल्या दान्यात बरकत म्हणून टाकून देत्यात. भितीवं काढ्येल बळी...बाराया दिशी पुशीत्यात. त्याला "बारा बळी म्वोडलं" असा म्हंत्यात. सुईनीला चोळी बांगडी देत्यात. असा ह्या आदिवासी समाज्यात पाटा पुंजायचा कार्येकरम रह्येतोय. थोडक्यात काय तं आपल्या रोज्च्या ज्वेवनात ज्या रह्येताय त्याचाच निवद कुळसायला दाख्यीत्यात.


                         - संतोष अनुसया दगडू मुठे.



" चांदावा "

                           " चांदावा "


          महा बा रिटर [सेवानिवृत्त] झाला आन् आम्ही संम्दी गावाला ग्येलो. गावची प्वोरा पकी आप्रुपावानी मह्याकं पह्याची. म्हतारी क्वोतारी बाssssss तु क्वोनाचा रंssss आसा म्हनून जवळ बोल्वायची आन् पकं मुकं घ्यीयाची. आन् वरून मव्हं गाल पुसून काढायची. तव्हा मला तंबाखू - मिस्रीचा पका वास यियाचा. मागून-मागून तं मी म्हता-या लोकांच्या जवळ जातच नसं. त्येंची भाषाच मला उमजत नसं... इकं-तिकं, ह्यार, गवासला, तुव्हा-मव्हा, इढं-तिढं....आसं सबुद मला उमजायला येळ ग्येला. तव्हा महा गाईड म्हनला तं मही आजी व्हती...तिच मला कह्याला काय म्हनायचा त्या सांगायची. 

      येकदा आसाच आमच्या पेठ्यात येक लगीन व्हता. मी आपला आजीच्या मागं-म्होरंच लुडबूड करीत होतो. नव-येच्या चीलत्याना द्येवाक घ्येतला आन् पानवठ्याकं निघाला. त्येंच्या डोक्यावं द्वान प्वोरांनी गुलाबी श्याल धरली व्हती. तव्हा म्या आजीला यिचारला....

"आज्ये वर ऊन नाय मंग त्येंच्यावर कह्याला कपड्येची सावली धरल्येय गं...?"

तव्हा आजी म्हंगाली...

'आरं बा.... आज त्येंचा मान हाये...म्हनून त्येंच्या डोक्यावं कापाड धरून त्येंची वाजत गाजत निरवनूक काढीत्यात. त्येंन्ली नयी कापडा घालीत्यात. त्याला *चांदावा धरला* आसा म्हंत्यात'.

तव्हा म्या मह्या आजीला यिचारला...

'आजे तुह्या लगनातयं आसाच चांदावा धरला व्हता का गं....?'

आजी म्हंगाली, 

'बाबा तव्हा कह्याचा चांदावा न् बिंदावा...टिचभर कापाड मिळायची भरांता आसायची. मव्हा लगीनयं मला आठवत नाय. मी तव्हा लय बारीक व्हती'.

गावाला आय-बापा परीस आज्या-नाताचा नाताच जादा रह्येताय. तसाच मव्हा व्हता. 

मह्वा आजा लवकरच वारला व्हता. म्हनून आजीला कंधीच देवकाचा मान मिळाला नव्हता. मी मह्या आजीला सारखा म्हनायचो का , 

'आज्ये मह्या लगानात मी तुलाच देवाक आनाया लावून तुह्या डोक्येवं चांदावा धरायचा मान देनार हाये'

आजी मह्या बोलीला हासायची...

पन मी सायी-सातयीला आसतानाच मह्या आजीच्या आंगावरून वारा ग्येला आन् ती जी आथरूनाला खिळली ती परत उठलीच नाय. तव्हा पका पावसाचा धोदाना लागला व्हता. आजीला पुराया खासं पोहोत नियाला बी पाऊस उघडत नव्हता. मंग तव्हा मह्या मामाना ड्वोका लावला आन् खाटल्येच्या वर ताडपत्री धरून कसाबसा मह्या आजीला न्येला. 

चौघांनी ताडपत्री धरल्येली बघून आजीवं जनू का चांदावाच धरलाय आसा मला वाटू लागला. मला पका भरून आला. म्या मह्यावाली टोपी त्वोंडात खुपासली आन् मह्या आयच्या पदरा मागं पका रडलो. आजीला शेवटच्या घडीला चांदायात जायाला मिळाला व्हता. 

"आज जवळजवळ तीस-येक वरसांनी आमच्या आज्या-नाताची चांदायाची ही गोठ मी तुम्हांली सांगुशी वाटली"


                                  

                               - संतोष अनुसया द. मुठे.



Thursday, May 21, 2020

" गावचा घर "

                 🏠 गावचा घर 🏠

      काल आसाच फ्यांड्री पिच्चेर बघितला आन् राती निजताना मला मप्ल्या गावच्या घराचा चितार आपसूकच डोळ्यां देखत उभा राह्यला...ती श्येनाना सारयेल भुई, राखाना लिप्येल भित्ती, आंगनातला भोसाचा मांडव....ह्या संम्दा सायसंगीन दिसत व्हंता...

      घाटाडी वरून नै तं...साबार टोका वरून नै तं...मांडयेच्या शिवावरून ख्यातवाडी गावाकं ह्येरला का गावाच्या खालच्या आंगाला पाच खनाचा द्वोन पाखी घर दिसंल...क्वोनालायं यिचारला का बाबा त्या तम्का घर क्वोनाचा....रंssss ?.... तं क्वोनीयं बी सांगल का त्या दगड्या मुठ्याचा घरयें....

       गावात शिरलो का मुठ्येंच्या पेठ्यात शिरतानाच येक भली मोठी पोहोळी लागत्येय...त्या पोहोळीला ख्येटूनच ववा - दिड ववा वर येक पवळी ये...त्येच्या वरच मह्यावाला घराचा आंगाण....आंगाण म्हंन्जे ह्या आसा भलाच्या - भला...ती येक म्हंनये.... "डांगान जसा का सोन्याचा आंगान".... मला सारखा वाटायचा का ही म्हन आमच्या आंगनावरून तं नाय पडयेल ना...?....आंगान येवढा म्वोठा का...चार मेढीत कंधीच मांडव झाला नैय...बरूबर आठ म्येढी लागायेच्या...भ्वोसाची पाच-सहा वझी आन् पंध्रा - यिस फ्वोकाट्या...ह्या संम्दा मह्या बा ना जमा करूनच ठिय्येल आसायचा...घराच्या पायेच्या वर तोडीच्या दगडांचा जोता ये...दाराच्या कवाडान्ली भल्या म्वोठाल्या बिजाग-या लायेल हायात...भित्ती राखाना सारयेल दिसतील...दाराच्या दोन्ही आंगाला तिरकोनी आकाराच्या द्वान बारखाल्या खिडक्या दिसतील...घराचं म्होरल्या पाख्याला आलेलं वासं दिसाया नकू म्हनून म्होरं नक्षी क-येल लाकडाच्या फळीचा पान लायेल हाये...मांडवावं भिनूगाचा मुगान ठियेल दिसाताय....

         घरात घुस्ला का वस्रीवंच उजया हाताला येक ऊखाळ हाये...त्येच्याच बाजूला द्वान जात्येच्या तळ्या ऊभ्या करून ठिवल्यात...कोपऱ्यात मुसाळयं बी हाये...तिढंच बाजूला कांडाणाचा वैचान आन् क्वोंडा पडलाय...सुरडाची शिराय आन् म्वोळाचा कुच्चा मुसळाच्याच बाजूला ठियेलयं... दाराच्या चौकटीच्या वरच्या कपाळ्यावं १९५९ ह्या घर बांधल्याचा वरीस क्वोरलाय...हिरडीच्या लाकडापसून बनयेल घराच्या तुळया आजूनयं बी शाबूत हायात...आंब्येच्या फळ्येंनी क्येलेली माळ्येची पाटयं चुलीच्या धुराना पार काळी व्हवून ग्येलेयं...पाटयंला कुढं-कुढं भेरूडयं बी लागलाय...माळ्येवं येंघाया ऊखळा जवळच येळाची शिडी लावून ठिवल्येय...माळ्येवं आघोटी भ-येल प्येंढायं आजून शिलक हाये...एका कोपऱ्यात मासं धरायच्या येहंडीचा गडा स्वोडून ठिवलाय...वापरात नस्येल बराच सामान माळ्येवं टाकलाय म्हनून वर पका आइचान झालाय...माळ्येवं उज्येड पडावा म्हनून द्वान कौला बाजूला सारून ठिवल्यात...पुढच्या पाख्याला पाभारीचा चाडा आन् नळ्या बांधून ठिवल्यात...घराची घरभरनी क्येली व्हती तव्हा लाल कपड्यात बांध्येल ना-योळ आजूनयं तसाच आड्याला बांधून ठिवलाय...मह्या लग्नाची काकाण-बाशिंगाय बी तिढंच बाजूला बांध्येल हायात..

        वस्रीवरून आत चुलीकं जाताना आजून येक चौकट लागत्येय...तिला बिजांग-या लायेल नाहीत....ती कुसू बनयेल हाये...त्या कवाडांच्या मागं येक पहार, येक फरशी कु-हाड, येक हाडबा आन् योक दांडा हाये...ही संम्दी हात्यारा हाताखाली आन् नदरंत आसायी म्हनून दाराच्याच आंगाला ठिवल्यात...डाया हाताला घडूशी ठियेल हाये...तिच्येवं द्वान-द्वान तांब्या- पितळ्येच्या हांड्येंच्या उतरंडी लागल्यात...भांडी ठिवाया येक फळी ठ्वोकलेयं....तिच्येवं काश्येची ताटा, तांब्ये, गल्लासा, बारखाल्या ताटल्या, चाटू, सांडशी...आशी बासना बयादवार लावून ठिवल्यात...घडूशीच्या खाली भली म्वोठी काठवठ भितीला उभी करून ठियेल हाये...ती गावातल्याच किसन्या सुताराना बनून दिलेय...घडवशीच्या डाया हातालाच योक उपारन्याना त्वांड बांध्येल रांजोन हाये...त्येच्यात पलीटल्या सालचा ल्वान्चाये...मधारल्या भितीला आतल्या बाजूना सहा मनाचा याक भला मोठा बलाद हाये...तं येका आंगाला साडे तीन मनाची येक कनग आन् द्वान बारखाल्या क्वोथळ्या हायात. द्वान तुळयेंच्या मधूमध येक द्वारखांड बांधलाय...त्येची वळंबन करून तिच्येवं आथ्रुना - पांघ्रुना ठियेल हायात...उजया कोपऱ्यात आऊलाची चुल हाये...भानवशीवं येक गाडगा दिसाताय...त्येच्यात मीठ ठियेल हाये...चुलीच्या धुराना वर निवसा तयार झालाय...याक बांडा मांजार फुकनी उश्याला घेवून चुलीच्या उबाला निजलाय...चुलीच्याच वरल्या आंगाला येक खुट्टीयं त्याला कंदील लटकावलाय....वातीच्या क्वोजेळीना त्येची काच पार काळी व्हवून गेल्येय...शिक्येवं दुधाचा ट्वोप ठिवलाय तं तुळयंला येक गांजवाभर कांदं गांजयात शिकाळून ठिवलंत.

    सैपाक घरातूनच मागील्या बाजूला दार पाडून येक पढयं कहाडल्येय...तिच्यात आंघूळी - पांघूळीसाठी मोरी बहांदल्येय...तिढंच द्वोन बैल बांधाया जागा क्येल्येय...बैलांच्या गव्हानीत कडबा टाकून ठियेल हाये...बैलांचा श्यान-ग्वोमतार काढाया येक खराटा आन् शिप्तारयं बी तिढंच मागील्या बाजूला ठिवलाय...औताची सरजामा जसा जुप, जू, आसूड, पास, फाळ, बट तुट्येल सुतकी, यिळं, क्वोयतं आसा काय बाह्य सामान तिढंच ठियेल हाये...

   घराच्या मागं याक वाडगा हाये...वाडग्याचा कुपान धायटीच्या झिट्येंनी घातलाय...योक दुभांगळ्या खाकोर वाडग्यात उभा क्येलाय...त्येच्येवं द्वोडक्याचा आन् घ्येवड्याचा येल ग्येलाय...मागच्या पढयंवं डांगराचा येल ग्येला व्हता...पन उन्हाना पार वाळून ग्येलाय...न्हानीचा पानी जिढं बह्येर पडाताय तिढं येक कोरपाडीचा झाड लायेल हाये...

ह्या संम्दा आजयं मला सायसंगीन दिसाताय...जनू का म्या दुर्गूनी [दुर्बिण] लावल्येय आन् तिच्यातून मला मह्यावाला घर दिसत सुटलाय आसाच वाटाताय...

                  - संतोष अनुसया द. मुठे.



" मोह "

                         " मोह"


 

     सकाळू-सकाळू रामा-धर्माच्या पहारी कावळ्येंच्या कलकलाटाना गिरजीची झ्वापच उडाली. कावळ्येंच्या कोकन्याना, घुबडाच्या घुगन्याना, आन् कोल्ह्या-कुत्र्येंच्या रात्ती-आपराती इवाळन्याना गिरजीचा जीव घाबरा-घुबरा व्हयाचा. दरावज्याचा कवाड उघडून गिरजी बाह्रये आली आन् घरा म्होरल्या मोहाच्या झाडावं बश्येल कावळ्येंली तिना हाकलला. तसं संम्दे कावळे उडून मोहाच्या बनाकं गेलं. त्या कावळ्यांकं ह्येरता-ह्येरता तिची नदार एका दगडी चि-यावं बश्येल एकांट्या कावळ्यावं थिरावली....जणूका त्यो कावळा तिला मागं घड्येल घटनाची आठवन करून दियाच आला व्हता का काय आसा तिला वाटाया लागला...

         बांबळेवाडीपसून येका उडीच्या अंतरावं असलेल्या मोहाच्या बनात भाग्या आन् गिरजी गुण्या-गोविंदाना नांदत व्हती. कुणाच्या आध्यात ना मध्यात नसल्याने त्येंच्या संवसाराचा गाडा नीटन्येटका चालू व्हता. दाट बनावानी चहुकून  येढ्येल मव्हांच्या झाडात भाग्येची पडाळ एखाद्या चिरेबंदी वाड्यावानी दिसायची. मव्हाची फुला लागायच्या हंगामात तं फुलांच्या घमकाराना वातावरण पार भुलून जायाचा. संम्द्या नह्रायेत भाग्याचा बन सोडून कुढयं बी एवढी मव्हाची झाडा नव्हती. ह्यो बन भाग्याच्या तीन पिढ्या अगूदर पासून व्हता. मव्हाला झाडाला कल्पवृक्ष मानना-या भाग्याच्या खानदानीन बनात एक मोहदेवाच्या नावाना चिरा उभा क्येला व्हता. रोज न चुकता त्याला मोहाची फुला / मोहाची शिपभर दारू / मोहट्या ( मोहाच्या बिया) पसून काढयेल त्येलाचा दिवा लावला जायाचा. ईतभर शेतीचा आरा आसलेल्या भाग्याचा गुदारा या बनावंच चालायचा. माहू - शिमग्याचा महीना आला का, भाग्येची धावपळ सुरु व्हयेची....भाग्या, गिरजी, पाचयीत शिकनारा त्येचा ल्योक धोंड्या आणि सातयीत शिकनारी रुपा संम्दीजना कामाला झटायची. झाडांन्ली यियेल फुला खाली पाचोळ्यात पडली तं सापडत नसत... म्हनून भाग्या मव्हाच्या झाडाखालची जागा झाडून झटकून काढी...तिढं श्यानकाला घालून भुई बयादवार सारवून सूरवून काढी...मोव्हाची फुला ही दिवसा झाडावरून पडत नसत....ती पहाटी-पहाटी पडत. म्हनून मंग रातभर राखाण कराया लागायचा. गावात्ली बेंडगूळा आन् प्येताड कंपनी फुला चोराया यियेची...भाग्या रातभर खंड्या कुत्र्याला घेऊन बनाचा राखान करीे आन् सकाळूच संम्दीजना मिळून झाडाखाली पडयेला संम्दी फुला येचून अंगणात घोंगडीवं सुकयीत....फुलांचा मौसम सुरू झाला का, तळीरामांचा ल्वोंढा बनाकं निघायचा.. भाग्या एका लिमिट मंधीच हातभट्टीची मोहाची दारू काढी... ग्येलंसालच्या जुन्या फुलांचा उपेग दारू काढाया करी. कारन ज्येवढी सुक्येल आन् जुनी फुला तेवढी दारू जास्त आन् चवदार बनं... नव्याना सुकयेल फुलांतील उलीशी फुला म्होरल्या सालच्या भट्टीसाठी ठिवून बाकी बाजारात नेऊन येपा-यांन्ली वपी...

       मव्हाची फुला आन् दारू ह्या द्वान गोठी भागाच्या नदरंत आपल्या आदिवासी रितीभातीचा भागयं बी व्हता. ज्येच्या घरात मव्हाची दारू नसं त्येची श्येताची कामा ख्वोळांबली म्हनून समजा...ह्या भाग्याला ठाव व्हता. इरजूक म्हंन्ली का, दारू-कोंबड्यांचा ज्येवान आसं. सनासुदीला घरी यियेल पाव्हन्या - रावळ्याला जसा चिहा-फराळ देत्यात तसा मव्हाचा पाहूनचार भाग्येच्या घरी व्हयाचा. म्हनून भाग्येच्या आवनीच्या, येटाळनीच्या कामाचा कंधीच ख्वोळंबा होत नसं. पावसाळा तोंडावं आला का, भाग्येची दोन्ही प्वोरा मव्हाच्या ब्या गोळा कराया बनात पळायेची.. तं गिरजी आन् भाग्या मव्हाच्या फुलांचा राप घालून ठ-येल ४-५ गॕलन दारू काढायेची तयारी करीत. घरात दारूची भट्टी व्हती तरी भाग्या दारूच्या येसनाच्या आहारी कंधी गेला नव्हता. मातर आजारपनात, सणासुदीला नै तं मोहदेवाला निवद दावताना त्यो स्वता आन् त्येपल्या प्वोरान्ली योक-योक चमच्या दारू पाजी. घोटभर पिवर दारू  प्येल्येवं रोगरायं बाधत नाय आसा त्याचा म्हंनना व्हता. आन् ह्या खरायं व्हता. त्येंच्या ज्येवनात भुज्येल मव्हाची फुला आन् आंबील रह्याचा आन् संम्दीजना त्या ग्वाड मानून खायेची. प्वोरांन्नी बनातून येचून आन्येल मोहट्या आन् फळा अंगणात घोंगडीवं वाळत घालीत. हिरया फळांच्या साली काढून त्या वाळयीत. पावसाळ्यात गरम पाण्यात त्या वाळयेल साली उमवून त्येची चवदार भाजी बनयीत. तं मोहट्या दगडांनी फोडून आतील शेंगदाण्यावानी ज्यो गर रह्येतोय त्यो काढून ठियीत. आघोट तोंडावं आल्येवं ह्याच बिया तालुक्याच्या बाजारी नेवून अर्ध्या यिकून मीठ-मिरची तं अर्ध्या बियांचा खायाचा त्याल काढीत.

      ह्या साली मोहाला नेमका जरा कमीच  बार आला व्हता. भाग्याचा ड्वोका सालभराच्या पोटपाण्याची चिंता करू- करू पार आऊट व्हयेची येळ आली व्हती . त्येच्यातच राजूरपेठंतील एका वान्येच्या प्वोराच्या वरातीकरता चार बॕरल दारूची आडर भाग्याला मिळाली व्हती. गेल्यासालची आन् यंदाची फुला मिळूनयं बी चार बॕरल भर दारू गळनार नाय याचा भाग्याला अंदाज व्हता. तसाच बाजारहाटाला आन् शिलकीला फुला ठिवना बी व्हताच. काय करावा त्या भाग्याला सुचच ना....त्येच्या डोक्याचा पार गोयंदा झाला व्हता. पन हातची आडर जाता कामा नाय आसायं बी त्याचा येक मन सांगत व्हता. जव्हापसून बांबळेवाचा गज्या बांबळा आणि किसन पाटलाने भाग्याला दारु वाढवायची आसल तं तिच्यात नवसागर आन् धोत-येच्या बियेंची भेसळ कर आसा फुकाटचा सल्ला दिला व्हता तव्हापसून त्याच्या डोस्क्यात भेसळीचाच भुंगा घुमत होता. त्याना आपला हा यिचार गिरजीलायं बोलून दाखावला व्हता.. पण तिला ह्या काय पटला नव्हता. भाग्येची पिव्वर मव्हाची दारु त्येंच्या खानदानाची शान म्हणून वळखली जायेची. आन् आसा काहीबाही क्येला तं मोहदेव कोपाय-बिपायचा आसा भ्यावयं बी तिना बोलून दावला व्हता.भाग्याना हो-हो करून येळ मारून नेली...

     वान्येच्या प्वोराचा लगीन येका हप्त्यावं येवून ठ्येपला व्हता. इकं भाग्याना भट्टीचा राप लावला व्हता. रापातून कशीबशी दोन-सव्वाद्वान बॕरलच दारू गळली व्हती. तेवढीच देऊन येतो असा सांगून भाग्या राजूराच्या बाजाराच्या दिशी वाण्याच्या घरी जाया निघाल्ता. वाटतंच साकिरवाडीला त्येच्या मावसबहीनीच्या पडाळावं त्यो न्येहरीला ग्येला. तिढं त्याना गिरजीची नदार चुकयीत आन्येल द्वान रिकामी बॕराल,नवसागर, धोत-याच्या बीयेंची भुकटी काढली आन् त्या द्वान बॕरल भर्येल दारूत मिसाळली. आत्ता  द्वान बॕरलची चार बॕरल झाली व्हती. ती चार बॕराल घेऊन त्यो राजूराकं निघाला. दारू वान्येच्या हावाली करून त्याना पैसं घ्येतलं, बाजारहाट क्येला आन् भाग्या घराला आला. पन आज भाग्याचा कह्यातच मन लागत नव्हता. त्येच्या मनात कह्येचीतरी चलबिचेल चाल्ली व्हती. लग्नात जे व्हाया नकू व्हता न्येमका त्याच झाला. राती वरात नाचवाताना व-हाड्येंन्नी भेसळीची पकी दारू ढोसली आन् संम्द्यांन्ली ढाळ-वांत्यां व्हया लागल्या. हा-हा म्हनता बातमी पोलिस ठेस्नापोहोत ग्येली आन् सकाळूच पोलिस भाग्येच्या पडाळीवं धडाकले. भाग्याला काय घडला आसल त्या लगेचच उमाजला...म्हनून गप गुमाना काहीही न आळोख्ये-पिळोख्ये न घ्येता त्येना आपला गुन्हा कबूल क्येला आन् पोलिसांच्या सवाध्यान झाला.. देवाची किरपा म्हना का काय पन नशीब कोनाच्या जीवावं ब्येतला नव्हता. म्हनून फक्त दंड भरून भाग्येची सुटका झाली. पिढ्यान्पिढ्या चालत यियेल परंपरेत भाग्याना ढवळाढवळ क्येली म्हनून मव्हादेवानेच त्याला चाचनूक दावल्येची त्याला जाणिव झाली व्हती. म्हनून इथून पुढं तरी असा उलटापालटा कारभार करायचा नाय आशी मव्हादेवाम्होरं आनच घ्येतली. 'मोहा'तून द्वान पैकं कमवायच्या 'मोहा'पायी त्येच्येवं हा प्ररसंग गुदारला व्हंता.

    मव्हादेवाच्या चि-येवं बसून कावळा वरडत होता. त्येच्या द्वाडावानी वरडण्याना कायतरी द्वाडवानी घडू नये म्हनून गिरजी त्याला हाकलीत व्हती...तं भाग्या आपल्या प्वोरान्ली घेऊन मोहट्यांच्या बिया फोडायचा काम करीत व्हता......
    

                    - संतोष अनुसया दगडू  मुठे.



Monday, May 18, 2020

बाळ हिरडा

बाळ हिरडा


आंदी हिरडा म्हंजी काय ह्या उमजून सांगतु.ह्या याक भला मोठा झाड हाय.सादारण 80 वरसाच्या पुढं जगत असंल .यचा उदाहाराण म्हंजी मह्या शेतात   मह्या जनमाच्या आंदीपसूनचा झाड.मला  जसा कळाया लागला तवा पक्का मोठा  झाड होता.तेची सावली चार पाच गुंठेच्या  जागे यवडी पडंतेय .म्हंजी अंदाज आला असंल केवढा मोठा हाये. अजून त्या झाड हाय.
आता ह्या झाडाचा उपयोग सांगतु.सावली  तर होतेयच पर अजून लई महत्म हाये.यच्या मोठ्या फांद्यांपसून शेतीची औजारा बनइत्यात  .मंग नांगराची हाळस ,ठाॅण,रूमणा,जु अन अजून काहीबाई.महाबा बनवायचा ब्वा.तसाच इंधनाचा लाकूडफाटा बी मिळाताय.
आता या झाडाला आलेला बार(मोहर फुला).सादारण एप्रिलच्या सुरवातीला बार  ययाला सुरवात होते.तवा या झाडावर पक्क्या मधमाश्या पंजाया यत्यात.सकाळ संध्याकाळ जर या झाडाखाली गॅलाका नुसता घ्याॅन्ग घ्याॅन्ग आवाज यताय अन वास भी लय भारी. या मधमाश्या या फुलांतला रस नेऊन त्येची माॅद बनइत्यात.या काळातली माॅद खायाला जरासी कडवाट लागते पर लय गुणकारी रहेतेय कारण हिरडीची माॅद म्हणत्यात.
अन आता या झाडाचा फळ म्हंजी हिरडा.मोहरानंतर बारीक बारीक फळा ययाला सुरूवात होते.सादारण मे च्या पहिल्या आठवड्यात. यालाच बाळ हिरडं म्हणत्यात.नंतर हेच मोठं होऊन पक्व होतंत याला मोठं हिरडं म्हणत्यात.आता यच्यात दोनी हिरडं औसेदी अन गुणकारी हायेत.बाळ हिरडं तोडून वाळावलं का आणखी बारीक होतंत .यचा उपयोग खोकल्यासाठी लय होतो.बाजारात यला लय मांगणी रहेतय.अन मोठं हिरडं सादारण दिवाळीच्या आसपास खुडीत्यात .मंग वाळवून इकून टाकीत्यात.यचा उपयोग औषाद ,रंग बनवाया करत्यात असी म्हणत्यात ब्वा.
 मह्या शॅतात पक्या म्हंजी  पंचीस तीस बारीक मोठ्या हिरडी आजही हायात.पर  म्या बारीक होतु तवा महाबा म्हणायचा पाॅराव तुमाली साळात जाया तुमच्या तुम्या  हिरडं करून पैसं करायचं बरका. मंग म्या  मे च्या सुट्टीत पुरा भिडायचो हिरडं वढाया. म्या लय खतरनाक गडी तवा केवढाल्याय हिरडंव माकडा वांद्रासारखा चढायचू अन  हिरडं वढायचू म्हंजी खुडायचू.दिवसाले मह्या मानापरमाणा 4/5 किलू खुडायचू.मंग खळ्यात खडकाव वाळात टाकायचू .असा रोजचा काम.मंग आघोटीला समदं हिरडं वपाया नेयचू.महा बा बी तेनी खुडेल हिरडं घ्यायचा .मंग आमी दोघं बापलॅक निंगायचू बाजरा.शेंडीत गेलेव त्या हिरडं घेणारी पक्की गथूडी वढायची का आमच्याक माप कर म्हणून. पर महा बा पक्का शॅ द्याचा त्येनली मंग ज्या  ठिकाणी टांगेल काटा असंल तिढं इकायचू .मंग महा बा मव्हं पैसं मह्याकं द्यायचा.म्या जॅम खुश होयचू.मंग जराश्याना परत महा बा क पैसं   देऊन टाकायचू.मंग महाबा मला बंडी अन  इजार घ्यायचा .खाऊ घेऊन द्यायचा.मंग  घरी निंगताना एकदम खुशीत निंगायचू.मंग उरलेलं पैसं मला साळात जाताना द्यायाचा.असा होता भौ .

लेखक.  -मनोहर  लांघी. रतनवाडी  ता.अकोले जि.अहमदनगर



Saturday, May 2, 2020

वझा

``                              `वझा```
वैशाखाचा मयना आसंल.  आमाली साळतुन सुटी लागली व्हती. कोंबडा आरावला तसा माहा बाप आन माहा भाव डोळ चोळीत जागं झालं. म्या आपली दिली व्हती ताणुन. माहा बाप मोठ्या मोठ्येनी कहाळुन माह्या भावाला सांगत व्हता" बा दिन्या तो मेसाचा सरा घे, आन तुफल्याला गळगोती घे. आन चल वले लवकर.
   म्या वळाखला हे दोघं हिरडेनली निगालेत.  म्या आपली गोदडी मुदाम तोंडाव घेतली आन झोपायचा ढ्वांग घ्यातला. तेनी कवाड उचकल्याचा आवाज आला अन मफल्याला समाजला, हे दोघं गेलं. मफल्याला झ्वाप येत नवती पण तसाच पडुन रायलो.
    थ्वड्या येळाना आयना उठुन कुयीट आणली आन त्यात राकेल टाकुन चुल पेटवली. मंग मी पण उठुन बसलो.
असा तंगड्या लावुन चुलीपशी बसलो व्हतो. आय म्हंगाली " बा रामा आपलेली लवकर दरीला जाया लागल. तुह्या बापाना हिरड झोडली आसंल.आपलेली जाया लागल लवकर."
     आयना ज्यावान क्याला तवर म्या एक द्वान फाटक्या पोतड्या गवसुन ठिवल्या.  आयना पटापट ज्यावान बांधला आन आमी जळकेवाडीकुन पुढं वागमाळाला गेलो. तिथं दुंद्या लोखांडा दिसला. तो म्हंगाला " सुंदरे काकू दरीला हिरड झोडुन झालेय, तुमाली लवकर बोलावलाय"
   आमी पटापट निगालो. गेलोतं पायला हिरड झोडुन झालेय. पाला पण तेनी पेटवुन दिला व्हता.  म्या गळगोती घ्येतली आन पटापट येचाया लागलो. आम्या समदेनी हिरड येचुन द्वान पोतड्या भरवल्या.  मफल्याला हिरडीव यवडा चडता येत नाय. पण खालून खालुन येचितोय.
     गावातली प्वारा पार शेंडेव जाऊन येचित्यात. ल्वाका म्हणीत व्हती गवार्याचा सोमा पार कशीय हिरड आसुद्याना, परवट भरल्या शीवाय खाली उतरत नाय. कुमा मामा पण पार शेंडेव जाऊन आकड्याना वल्हवुन हिरड येचितोय.
     सांच्यापहार झाली आसल. आमची हिरडेची वझी झाली व्हती.  आमी वझी उचालणारच व्हतो तं आय म्हंगाली " आज घरातला समदा बाजार खपलाय  . या वझ्यातला याक वझा ऊंद्या आडर्याला घेउन जाया लागल."
    माहा बाप म्हंगाला ऊंद्याचा  ऊंद्या पघू. पण आज पोरानली खाया काही आहे काय. माह्या आयच्या डोळ्यात पाणी आला आन हळु आवाजात बापाला सांगितला " लांघेच्या तिकुन आणलेला भातय खपलाय. आन कणगीत काहीच नाय. रातीपुरता सातपुतेच्या तिकुन कायतरी आणुन पोरानली देव आन आपला बघू काय मिळल त्या खाव"
     म्या आयिकला आन बंडीला डोळ पुसित वझा उचालला आन घराकं निगालो
         
रामदास लोखंडे
आहुपे ता आंबेगाव जि पुणे



Saturday, October 26, 2019

दिवाळी गाणी (मोरी गाय ईली गेणुबा)

मोरी गाय ईली गेणुबा....

मोरी गाय ईली गेणुबा
मोरी गाय ईली।
मोरीला झालाय पाऱ्या गेणुबा
मोरीला झालाय पाऱ्या।।

पाऱ्याच्या गळयात गेठा गेणुबा
पाऱ्याच्या गळयात गेठा
गेठयाला मोडलाय काटा गेणुबा
गेठयाला मोडलाय काटा।।

काटया कुटयाच्या वनी गेणुबा
काटया कुटयाच्या वनी
गाई परसल्या पाणी गेणुबा
गाई परसल्या पाणी।।

पाणी पितोळो मासा गेणुबा
पाणी पितोळो मासा
गाई लागल्या देसा गेणुबा
गाई लागल्या देसा।।

देशादेशाचे येळू गेणुबा
देशादेशाचे येळू
गाईनी मांडले खेळू गेणुबा
गाईंनी मांडले खेळू।।

खेळू फुटतो पांडया गेणुबा
खेळू फुटतो पांडया
बैल डरतो नांदया गेणुबा
बैल डरतो नांदया।।

नांदया बैलाची येसन गेणुबा
नांदया बैलाची येसन
निळया घोडीवर बस गेणुबा
निळया घोडीवर बस।।

निळया घोडीचा रवा गेणुबा
निळया घोडीचा रवा
कोण्या शिळीचा पवा गेणुबा
कोण्या शिळीचा पवा।।

पव्या पाव्याच्या चिपळया
आम्ही रशीम गोंडयाच्या मावळया
पाभारीला चार नळया
मोघाडाला तीन नळया।।

हानील बुक्की फोडील चाडा
नरशा आला पिऊन गेला
लाथ बुक्की देऊन गेला
हंडुरले......💐




Friday, July 26, 2019

बैरोबाची जतरा...

#बैरोबाची_जतरा_कळंबई..
सकाळूच उठून हेरितो त काय,आय घरातला सारवून दार झाडाय लागली व्हती.दादा गोठ्यात म्हशींचा दूध कासांडीत काढीत व्हता.म्हतारीआय भानवशी पशी बसून पाणी तापईत व्हती.जरा येळ तसाच आथूरणाव पडून व्हतो,तेवढ्यात चावडीवल्या रेडीव मंदी "वंदे मातरम" चालू झाला.
तसाच डोळं चोळीत बाहेर आलो.त दोंचार बाया मोठोबाच्या दारात श्यानकाला देत व्हॉत्या. काकूंय व्हती तेच्यात,वजच तिला ईचारला इतक्या सकाळूच समदी लागबगीना कामा करीत्यात काय कारेक्रम ये का.त काकू हासाय लागली न म्हंगाली "आरं बा आज आपल्या बैरोबाची जत्राय"...
जसा का आईकला,तसा दोंचार उडीतच मोठोबाच्या दारातून आमच्या दारात.एक पाय उपांदऱ्यातचय त आय म्हंगाली गणपा तुवा बाप गुरा पाजीतोय तवर घेतो काय आंघूळ करुन. तसा डायरेक न्हाणीत.ओंन्मोशिवाय करीतच धाबारा तांब्यातच बादली रिकामी केेली.न्हाणीतून बाहेर आलेव,घडूशीव हंड्यापशी आयना नई कापडा यवस्थीत ठिवली व्हती.मस्त पैकीं मॅनिलासदरा,लँगा,टोपी ऐटबाज पॉशाक करुन हाताची बटनां लावाय म्हताऱ्याआयक.आय म्हनली भोयव बसू नको,पॉता घे तेचेव बस,कापडा मळवू नको,नैत तुई आय चांगली बदडईल.पितळच्या पितळीत गुळाचा चहा आयना दिला,फुरफूर करीत चारपाच दमात खपवला आन बाहेर डायरेक भैरोबाच्या देवळाक.
मांडव,मंडप बांधायची लागबाग,दूनदयाबुवाचा गाडा,गोपाळ्याची बैलगाडी,शिंगाडवाडीकुंन ३ गाड्या,नई कापडा घातलेली गावातली पोखतींलॉका,पॉरा,पकी गर्दी साळच्या म्होरं खाचरात जमा झाली.पाटील दादा म्हंगाला ढोललेजीम घेऊन खळ्याक चला रें डगळ आणाया.आम्ही बारकाली बैलगाडीत,मोठाली चालत निघाली. कॉना आंबेच,कॉना जांभळीच,कॉना उंबराच,कॉना निर्गिलीच,त कॉना लिंबाचं डगळ आणून गाड्या भरल्या. वाजत गाजत लेजिम खेळत बैरोबाच्या दारात सवासस्नींनी हळदीकुकू लावून,ववाळून मांडव डहाळ्याचा कारेक्रम झाला.कुकू लावूनच समदी घरी गेली,दारात गेलो त आय दारातच उभी राहून वाट हेरीत व्हती,मला ववाळुन पायेव पाणी घालून घरात घ्यातला.मला काही कळणाच,आय म्हंगाली गणपा तू देवाक ग्यालता,मांडव घातला,बारीकपॉर देवाचाच रूप असताय म्हणून.मंग काय ठयाप आमची,बसाय घोंगडी,ट्याकाय उशी,ऐटीतच काम,त्यात आमी नावकरी मंग काय...
माह्या उजया बाजूक दादा (महा बा) बसला,पलीकल्या बाजूला जतरला आल्याला महा मामा,म्याव्हना,बारखानल गडी लाईनवार पंगतीला बसलं.म्हताऱ्याआयच्या हातच्या पुरणाच्या पॉळ्या पक्या गॉड,सारभात-पोळ्या खाऊन आमी ज्यावान करीत व्हतो तवर मला वरल्या घराक बोलावना आला.आय म्हण बा जा नाना थांबलाय तुयासाटी दोंन घास खाऊन ये जा.
मी नानाचा बा नावकरी आलोय म्हणून परतेक येळी मान मिळायचा.
(अजूनही परंपरा चालू आहे...)
उलीसाक खाऊन उठलो आन वरल्या घराक गेलो.ज्यांवना झाली हात धिवल.तवर काकूूना ववाळायचा ताट क्याला व्हता.नानानी पुण्याकून नईन कापडा आणली व्हती.हळदकुकू लावून वरल्या घरातली म्हतारीआयसकाट,चुलतं,काकू,पॉरा समदी पाया पडली,मला जरा वंगाळ वाटला,पर नावकरी असल्यामुळं ऐकतच नव्हता कोणी.
परत सजलेल्या नवरदेवासारका नानाच्या हाताला धरुन घराक आलो.मंग नाना,मामा,दादा वटीव घोंगडी टाकून गप्पा माराय लागलं.तवर मी तेंच्या पशीच व्हतो.नानानी १०/-दादानी १०/-आन मामानी ८/-दिलेच आजुनय आठवताय. २८/-रुपये जमलं,बारखाणल्या भावांली,मेवण्याला घेऊन  देवळाक गेलो.देवाच्या पाया पडलो.तवर फुगंवाल,गाड्यावाल,पिपाण्यावाल,खुळखुळ,भुजारी येंची दुकाना लागली व्हती.पोरांली पिपाण्या घेतल्या,गारिगार खाया दिल्या,जतरत फिरलो.घरींयेस्तवर झावळा पडला व्हता.आय म्हणली आता थोडा येळ बसा,तोंडहातपाय धिवा,संदेकाळी भारुड बगाया जायेचेय.केवढा आनंद भारुड पाह्यचा म्हणलेव,ऐकल्यापसून दमच निघणा.कवा एकदाची रात व्हतेय,असा झाला व्हता.
(कलेचा नाद लागला तो तेव्हापासूनचं..)
परत समदी पावण्या,घरातली जेवली.आयला त घडोशीच्या खाली ठिवलेल्या मोठ्या टिपातून भांडेली पण पाणी काडून दिला.समदी कामा उरकलेव गोधड्या,चादरी,बुरंगूस घेऊन देवाम्होर चिचखाली जागा धरुन बसलो.पयला गावातला भजान झाला.राजवाडी,पोखरी,बेंढारवाडी,जांभोरी, मेघोली, काळवाडी, वचपे,कोलतावडा,येंची भजना झाली.बऱ्याच टायमना पालखी आली. द्यावळाभोतीना परदक्षिना करुन दयाव देवळात गेलं.त्याल माजना धुपारती झाली.मंग गावकरेंनी भारुडाचा नारळ फोडला.त्या साली पकी सात-आठ भारुडा आली व्हती.कोनालाय राग नको म्हणून समदी एका टायमाला चालू करायचा ठरला.खेळांत कोणाचा बागुलबुवा चालू,त कोणाचा राजा आल्याला,त कोणाची लढाय चाललेली,जाग आली तवा आमी मातर आयच्या डाया हाताव डॉका ठिवून झोपलो व्हतो..
क्रमशः
© गणपत रामचंद्र कोंढवळे,कळंबई..
